एका कुटुंबाचा आधार झालेल्या, तृतीयपंथी लता यांची प्रेरणादायी कहाणी

तृतीयपंथी लता यांची प्रेरणादायी कहाणी

कधीकधी आपल्या समोर अशा काही गोष्टी येतात ज्यामुळे आपला जगण्याकडे बघायचा दृष्टीकोणच बदलून जातो.

आपण आपल्या घरात सुरक्षित असताना बाहेर काय चालले आहे याचा बऱ्याचदा आपण विचार करत नाही.

पण काही लोकांच्या गोष्टी, लाईफ स्टोरीज वाचल्या की मात्र आपले डोळे एकदम उघडतात.

आपल्याला या लोकांची कष्ट करायची तयारी, आयुष्याला सामोरे जाण्याचा एटीट्युड इतका भावतो की नकळत आपण त्यांच्याकडून प्रेरणा घेतो. 

तुम्हाला सुद्धा या गोष्टीचा अनुभव अनेक वेळा आला असेल.

अशा गोष्टी वाचल्याने आपल्याला प्रेरणा तर मिळतेच पण त्याचबरोबर लोकांना कोणते प्रॉब्लेम्स असू शकतात, त्यांच्या आयुष्यात कसे आपण कधी विचार सुद्धा करू शकत नसलेले प्रश्न उभे राहतात आणि त्या सगळ्याला ते कसे खंबीरपणे तोंड देतात हे समजते. 

आयुष्य जगायचे असेल तर तक्रार करून उपयोग नसतो, आयुष्य जगायला हिंमत लागते हे अशा गोष्टींमधून समजते. 

आज सुद्धा आपण अशीच एक गोष्ट बघणार आहोत. ही गोष्ट आहे लताची.

लता बंगलोरमध्ये राहणारी एक ४० वर्षीय तृथीयपंथी आहे. 

तसे म्हटले तर ही एक प्रकारची सक्सेस स्टोरीच आहे कारण लताने अनेक अडचणींना सामोरे जाऊन, धीटपणाने त्या सगळ्यांवर मात करून स्वतःला समाधान मिळेल असे आयुष्य निर्माण केले आहे. 

आपल्याकडे खरेतर तृथीयपंथींना त्यांच्या मनासारखे काम करायची मुभा नाही.

लोकांच्या अपमानास्पद नजरा, शेरे त्यांना सहन कराव्या लागतात.

यामुळे बहुतांश तृथीयपंथी हे इतर कामे करायला लायक असूनही रस्त्यावर भिक मागायचे काम करतात.

लताची गोष्ट सुद्धा काही वेगळी नाही. ती सुद्धा बंगलोरच्या रस्त्यावर भिक मागून उदरनिर्वाह करते. मग तिच्याबद्दल वेगळे असे काय आहे?

स्वतःचा खर्च भागवून लता एका वयोवृद्ध जोडप्याला आणि तीन मुलांना पोसते.

पण हे लोक लताच्या आयुष्यात कसे आले? आणि ती त्यांची काळजी करते, त्यांचा खर्च करते तो नेमका कसा? 

लता सांगतात, की १२ वर्षांपूर्वी, म्हणजे २००८ मध्ये त्यांची एक मैत्रीण कॅन्सरने वारली.

या मैत्रिणीच्या पाठी तिचा नवरा आणि दोन मुले होती.

मैत्रिणीच्या निधनानंतर तिचा नवरा सुद्धा आजारी असायचा.

आजारपणामुळे तो मुलांची जबाबदारी घेऊ शकत नव्हता म्हणून लता यांनी ती जबाबदारी आनंदाने स्वीकारली.

लता यांच्याकडे काही पैसे साठवलेले होते, त्या पैशातून त्यांनी या मुलांसाठी राहायला आन्ध्रप्रदेशात घर घेतले. 

याच दिवसात, तिला या वृद्ध जोद्प्याबद्दल  समजले.

हे जोडपे जगण्यासाठी खटपट करीत होते. त्यांना बघणारे कोणीच नव्हते.

लता यांनी पुढचा मागचा विचार न करता या जोडप्याची सुद्धा जबाबदारी स्वीकारली.

तिला होईल तसे तिने त्यांचे करायचे ठरवले. त्यांच्यावर ती स्वतःच्या आई वडिलांसारखे प्रेम करू लागली.

या वृद्ध जोडप्याला लता स्वतःचे आईबाबाच मानतात.

त्यांच्याबद्दल बोलताना त्या सांगतात की आईला मधुमेह आहे आणि बाबांना पॅरलीसीस.

या व्यतिरिक्त त्या अजून एका मुलीला मदत करतात. ही मुलगी म्हणजे त्यांच्या एका नातलगाची मुलगी.

तिचे पती वारल्यानंतर तिच्यावरच घराची आणि तिच्या बाळाची जबाबदारी आली.

लता यांना याची जाणीव झाली आणि म्हणून त्या दर महिन्याला त्यांना काही रकमेची मदत करतात. त्या पुढे सांगतात की या मुलांची आणि आई-बाबांची देखभाल करणारे कोणी नव्हते म्हणून ती मी करायची ठरवली.

त्या म्हणतात की अशाप्रकारे त्यांचा परिवार पूर्ण झाला. याबद्दल त्यांना प्रचंड समाधान आणि आनंद वाटतो. 

लता सांगतात की बंगलोरला राहून त्या दर महिन्यात एकदा आंध्रप्रदेशला आपल्या या परिवाराला भेटण्यासाठी जातात.

त्यांना त्यांच्या या परिवारासोबत राहता येत नाही कारण त्यांना बंगलोरमध्ये राहून जितके पैसे कमावता येतात तितके आंध्रप्रदेशमध्ये येणार नाहीत.

बंगलोरमध्ये त्या एका तृथीयपंथी गटात राहतात.

इतक्या लोकांची आर्थिक जबाबदारी, वृद्ध आईबाबांची औषधे, मुलांचे शिक्षण याचा आर्थिक भार त्यांच्यावर असल्याने त्यांना बंगलोरला राहणे भागच आहे. 

लता यांनी स्वखुशीने ही जबाबदारी स्वीकारून, स्वतःसाठी एक परिवार स्वतः तयार केला आहे. यामागे कुठेतरी त्यांच्या भूतकाळातील दुखः दडलेले आहे.

लता यांना स्वतःचा परिवार होता, आईबाबा होते. जन्मतः मुलाचे शरीर असलेल्या लता यांच्या भावना मात्र मुलीसारख्या होत्या.

पण भीतीपोटी त्यांनी ही गोष्ट आपल्या आईबाबांपासून लपवून ठेवली. वयाच्या १७व्या वर्षी, जेव्हा असह्य झाले तेव्हा मात्र त्यांनी स्वतःच्या आईबाबांना विश्वासात घेतले.

पण यानंतर त्यांना जे अपेक्षित होते तेच घडले. त्यांना स्वतःच्या परिवाराकडून अवहेलना सहन करावी लागली होती.

त्यांना तशा परिस्थितीत घरी राहणे अशक्य वाटू लागले आणि १७व्य वर्षी आंध्रप्रदेशातील एखा खेड्यातून त्या शहरात आल्या. त्यानंतर त्यांचे खरे स्ट्रगल सुरु झाले. पण त्या सगळ्याला अत्यंत धीटपणे सामोरे गेल्या. 

तो काळ होता १९९७ चा.

घरातून बाहेर पडल्यावर एका NGO मध्ये काम करता करता त्यांनी आपले शिक्षण सुरु ठेवले.

या काळात प्रचंड मेहनत, काम आणि अभ्यास करून त्यांनी आपले बीए पर्यंतचे शिक्षण चांगल्या मार्कांनी पूर्ण केले.

यानंतर त्यांना एका चांगल्या कंपनीत समुपदेशकाची नोकरी मिळाली. ४ वर्षे त्यांनी ही नोकरी केली पण या काळात त्यांना त्यांच्या सहकाऱ्यांकडून बरेच त्रास झाले.

या त्रासांना वैतागून त्यांनी ही नोकरी २००५ साली सोडली. 

यानंतर जसे सगळे तृथीयपंथी करतात, त्याप्रमाणे त्यांनी करायचे ठरवले – ‘रस्त्यावर भिक मागणे.’ 

लता सांगतात की, ‘आपल्या देशात जरी तृथीयपंथी लोकांकडे बघायचा, त्यांच्याशी वागण्याचा दृष्टीकोन बदलत असला तरी आपल्याला अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे.

अजूनही आपल्याकडे तृथीयपंथी लोकांना वेगळी वागणूक देणारी लोकं आहेत आणि याचमुळे तृथीयपंथी लोकांना इतर कोणते काम करायची संधी मिळत नाही. 

तृथीयपंथी लोकांना सुद्धा कुटुंब असते, त्यांची जबाबदारी असते.

त्यासाठी पैसे कमवायची तयारी असताना, तसे शिक्षण असताना सुद्धा त्यांना काम करता येत नाही.

अशामुळे रस्त्यावर उतरून भिक मागण्याशिवाय त्यांच्याकडे पर्यायच उरत नाही.’ असे सांगून लता आपली हळहळ व्यक्त करतात.

लता यांना जाणीव आहे की लोकांची मते बदलणे तर त्यांच्या हातात नाही पण तृथीयपंथी लोकं सुद्धा माणसे असतात आणि त्यांना चारचौघांसारखी वागणूक मिळावी अशी त्यांची इच्छा त्या बोलून दाखवतात. 

पण इतके असून सुद्धा त्या एका मानलेल्या कुटुंबाला पोसू शकतात आणि या कुटुंबाला सुद्धा त्यांच्याबद्दल प्रेम वाटते, त्यांचा अभिमान वाटतो या गोष्टीमुळे त्या समाधानी असल्याचे सांगतात. 

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!