अतिविचारांमुळे ग्रस्त आहात का?? मग ‘हे सात उपाय’ तुम्हाला शांत करतील

अतिविचारांमुळे ग्रस्त आहात का?? मग 'हे सात उपाय' तुम्हाला शांत करतील

माधुरी एक दिवस घरात सारखी चिडचीड करत होती.

सकाळपासून बाईसाहेबांना काय झालंय ते कोणालाच काही कळेना.

काही बोलायला जावं तर हीचा आरडाओरडा.

बरं ती स्वतः कोणाशी काही बोलेना.

सारखी कुठल्यातरी विचारात होती. हल्ली तिचा हा स्वभावच झाला होता.

लहानसहान गोष्टींचा वैताग यायचा तिला. असं वाटायचं की तिचा तिच्या भावनांवर ताबा राहत नाहीये.

त्यामुळे केवळ तिचा ताणतणाव वाढत होता.

तुमच्या बाबतीतही असं काहीतरी होतं का?? मग त्याची कारणं आधी शोधून काढा.

बारीकसारीक गोष्टींची चिकित्सा करत बसणं, अतिविचार करणं, क्षुल्लक कारणांवरून दुःखी होणं, अती भित्रा स्वभाव असणं अशी काही कारणं असू शकतात.

त्याचा परिणाम असा होतो की मानसिक कणखरता नाहिशी होते.

अशा गोष्टींची जर सवयच जडली तर स्वतःचं मानसिक, शारिरीक स्वास्थ्य, आपल्या संपर्कातले लोक, आपली चारचौघात असलेली प्रतिमा यावर केवळ वाईट परिणाम होतो.

याच वेळी गरज असते ती आपलं मानसिक स्वास्थ्य राखून अशा संकटांवर मात करण्याची.

या लेखात आपण असेच मुद्दे चर्चेला घेऊया जे आपल्या अति विचार करण्यावर नियंत्रण ठेवतील.

१. अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न करा :

वर्क फ्रॉम होम सुरू आहे, बॉसचा फोन आला आणि एकीकडे बाळ रडतंय मग आधी कशाला महत्त्व देणार??

शांतपणे एकेक प्रश्न सोडवणं महत्वाचं.

अडचणींकडे पाठ फिरवली आणि पळायचा प्रयत्न केला तर त्या वाढतच जाणार.

परिणामी आपलाच त्रास वाढणार. परिस्थिती चिघळली तर त्याचा वाईट परिणाम तुमच्यावर आणि आजूबाजूच्या लोकांवर होणार.

अटीतटीचा प्रसंग आलाच तर दोन पावलं मागं सरकून प्रश्न सोडवा. फक्त विचार करत बसण्यापेक्षा कृती करा.

२. स्वतःसाठी वेळ राखून ठेवा :

दिवसातली किमान १५ मिनीटं स्वतःसाठी राखून ठेवा.

तुम्ही नेमके कशामुळे आणि का अडचणीत आहात ते बघा.

जमलं तर स्वतःच्या भावनांना वाट मोकळी करून द्या.

एकदा मन शांत झालं की त्रास कमी होईल.

पुन्हा तेच तेच विचार येऊ देऊ नका. आवडत असेल तर स्वतःची एक डायरी करा.

दिवसभरात आलेले अनुभव त्यात लिहा. कोणाशी फारसं बोलावं वाटलं नाही तर ही युक्ती नक्कीच करून बघा.

नकारात्मक विचार त्यातून झटकायचा प्रयत्न करा. दडपण येणार नाही.

३. वेगवेगळ्या आवडत्या कामात गुंतून रहा :

तेच तेच काम सतत करत राहिल्यामुळे थकवा येऊ शकतो.

म्हणून अधूनमधून दुसऱ्या कामात लक्ष द्या.

पुन्हा आधीच्या कामात लक्ष केंद्रित करणं सोपं होईल.

कंटाळा आला म्हणून रिकामं बसू नका.

‘खाली दिमाग सैतान का घर’ फावल्या वेळात छंद जोपासा.

घरगुती कामं करताना छानशी गाणी ऐका, म्हणा. म्हणूनच की काय पूर्वी बायका जात्यावर दळताना, वाती वळताना अगदी स्वयंपाक करतानासुद्धा बरीचशी स्वरचित गाणी म्हणायच्या.

त्यातून आपल्या भावना व्यक्त करायच्या.

ताण घालवण्यासाठी ही पूर्वीपासून पद्धत.

४. आवाक्याबाहेरच्या गोष्टी सोडून द्या :

आपण शेवटी माणसं आहोत.

प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी घडते असं नाही आणि ती आपण घडवलीच पाहिजे असंही नाही.

आपण फक्त आपल्यावरच नियंत्रण ठेवू शकतो.

मग आवाक्याबाहेरच्या गोष्टी सोडूनच दिल्या पाहिजेत.

अट्टाहास करून मनस्ताप होण्यापेक्षा सोडून द्यायला शिका.

तुम्हाला स्वस्थता नक्कीच मिळेल.

जसं, आवडता सिनेमा बघताना लाईट गेले. त्रागा करण्यापेक्षा सिनेमा पुन्हा कधीतरी बघा….

लाईट जाणं हे तुमच्या हातात नाही.

५. परिपूर्ण होण्याचा दुराग्रह सोडा :

माणसानं महत्वाकांक्षी जरुर असावं पण दुराग्रही होऊ नये.

महत्वाकांक्षा माणसाला प्रोत्साहन देतात तर दुराग्रह केवळ असमाधान देतो.

एखादी गोष्ट मिळवण्यासाठी माणूस खूप झटतो.

पण हवं ते मिळालं नाही तर निराश होऊन आयुष्य घालवण्यापेक्षा पर्याय शोधून खुशाल चालत रहावं.

माणसांकडूनच चूका होतात.

त्या टाळून योग्य कृती करता आली पाहिजे.

अमितला NEET परिक्षेत १ मार्क कमी मिळाला म्हणून मेडिकलला जाता आलं नाही.

म्हणून रडत न बसता तो आवडीने जीवशास्त्रज्ञ झाला.

त्याची महत्वाकांक्षा निष्फळ ठरली असं म्हणता येणार नाही पण तो दुराग्रहामुळे झुकला नाही.

६. योग्य दृष्टिकोन बाळगा :

कोणतंही मोठं ध्येय साध्य करण्यासाठी आधी छोटी ध्येयं ठरवा.

एकेक टप्पा पूर्ण करा.

स्वतःबद्दल अति आत्मविश्वास बाळगण्यापेक्षा आपली बलस्थानं आणि मर्यादा ओळखा.

मनातल्या मनात मनोरे बांधण्यापेक्षा कृती करा.

मराठ्यांच स्वराज्य उभं करणं हे छत्रपती शिवाजी महाराजांच ध्येय होतं.

पण त्याची सुरुवात करताना आधी रयतेच्या मनात स्वराज्याची भावना जागृत केली. पुढचा इतिहास तर आपल्याला माहितच आहे.

७. मनापासून कृती करा :

गुरूजींच्या आज्ञेप्रमाणे अर्जुनाने पक्ष्याच्या डोळ्याचा वेध घेतला ही गोष्ट आपल्याला माहितच आहे.

तात्पर्य काय तर कोणतही काम करताना एकाग्र चित्ताने करणं महत्वाचं.

लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी वेळीच टाळता आल्या पाहिजेत.

केवळ विचार करत बसलं तर हे लक्ष विचलित होऊ शकत.

एकाग्रता ही सवयीने जमते. त्यासाठी प्राणायाम, ध्यानधारणा केली तर नक्कीच फायदा होईल.

आनंद ,दुःख, तणाव, नैराश्य या गोष्टी माणसांच्या बाबतीत घडतातच.

पण या भावनांना योग्य वळण लावता आलं पाहिजे. हे केवळ आपणच करू शकतो.

हे आपल्याच हातात असतं. तुम्हीही अतिविचारांनी ग्रासले असाल तर वरचे पर्याय नक्की अनुभवून पहा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

2 Responses

  1. Dhondiram kokare says:

    Very good thought

  2. प्रमोद रा. नाईक says:

    अतिविचार येतात तेव्हां मनाला शांत करण्यासाठी सात उपाय सांगितले आहेत ते खुप छान आहेत अंमलात आणले तर नक्कीच फायदा होईल. खुप छान त्या बद्दल मनाचे talks टीम चे मनापासून आभार. व या अशा उपक्रमासाठी खुप खुप शुभेच्छा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!