भविष्याची चिंता करणे टाळण्याचे ८ प्रभावी उपाय

तुमच्या बाबतीत असे झाले आहे का की पुढे काय होईल, उद्या आपल्यासमोर काय वाढून ठेवलेले असेल ह्या विचारांनी तुमची रात्रीची झोप नष्ट झाली आहे का?
भविष्यात काय होईल ह्या विचारांनी तुम्ही हैराण झाले आहात? पुढे भविष्यात काय घडेल ह्याचा विचार करण्यामुळे तुम्ही तुमचा वर्तमान गमवत आहात? कोरोनाची हि दुसरी लाट आल्यापासून सर्वांच्याच बाबतीत हे घडत आहे….
रोजचे जगणे मुश्किल झाले आहे. दररोजच्या कामांवर लक्ष केंद्रित करणे अवघड होऊन बसले आहे… तर मग भविष्याची चिंता करणे टाळण्याचे उपाय जाणून घेणे तुमच्यासाठी आवश्यक आहे.
भविष्याची चिंता, काळजी सर्वांनाच वाटते. ते अगदी सहाजिक आहे. परंतु सतत त्याच काळजीत, त्याच विचारात राहणे, त्याचा स्वतःला त्रास करून घेणे मात्र योग्य नाही.
कारण वारंवार भविष्याची चिंता करणे हे आपल्यासाठी योग्य नाही. कसे ते पाहूया.
१. भविष्याची चिंता करताना आपली सध्याची मानसिक स्थिति मात्र बिघडून जाते.
२. अशा चिंता करण्यामुळे त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग समोर असूनही ते आपल्या लक्षात येत नाहीत.
३. सतत चिंता करण्यामुळे आपल्या शरीरातील ऊर्जा कमी होत जाते आणि ऊर्जा कमी झाली की चिंता वाढते. हे दुष्टचक्र सुरूच राहते.
४. त्यामुळे आपला मूड देखील सतत खराब राहतो आणि त्यातून बाहेर पडणे शक्य होत नाही.
५. एकातून एक चिंतेचे विचार वाढत जातात आणि जास्तच चिंता वाटू लागते.
तर अशा ह्या भविष्याच्या चिंतेपासून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न आपण सर्वानी केलाच पाहिजे. त्यासाठी करण्याचे काही उपाय खालीलप्रमाणे
१. मनावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करा.
तुम्ही भविष्याच्या चिंतेच्या गर्तेत जात आहात असे तुम्हाला वाटू लागले तर ताबडतोब स्वतःच्या मनावर, विचारांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करा. त्याकरता आत्ता आजूबाजूला काय चाललंय, काय चांगलं घडतंय त्याचा विचार करा. म्हणजे तुम्ही भविष्याच्या बाबतीतल्या चिंतेतून, वाईट विचारांमधून बाहेर येऊ शकाल.
२. दीर्घ श्वसन करा.
जर तुम्ही एखाद्या चिंतेने, काळजीने घेरले गेलात तर शरीर आणि मनाला एक प्रकारची अस्वस्थता येते. अशा वेळी दीर्घ श्वसन करा.
दीर्घ श्वसन केल्यामुळे शरीराला जास्त प्रमाणात ऊर्जा मिळेल आणि एक प्रकारचे रीलॅक्सेशन मिळेल. काळजी , एन्जायटी कमी होईल.
३. जे आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा.
जेव्हा भविष्याच्या चिंतेने तुम्हाला निराश वाटू लागेल तेव्हा सध्या तुमच्याजवळ असणाऱ्या गोष्टींची यादी करा, घडणाऱ्या चांगल्या घटना आठवा आणि त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा.
म्हणजे सध्या तरी आपण आनंदी आहोत ह्या भावनेनी तुम्ही सतावणाऱ्या भविष्याच्या चिंतेवर मात करू शकाल.
४. जर तर चा विचार करा.
भविष्याविषयी नुसती चिंता करत बसण्याने काहीही साध्य होणार नाही. त्याऐवजी भविष्यात जर खरंच अशी परिस्थिति आली तर मी कसं वागेन, त्या परिस्थितीवर कशी मात करेन याचा विचार करा.
त्यामुळे भविष्याची वाटणारी चिंता कमी होऊन त्याऐवजी त्यावर उपाय सुचू लागतील. संकटातून बाहेर पडण्याचे मार्ग दिसु लागतील.
५. परिस्थितीवर नियंत्रण मिळवा.
आपण एखाद्या समस्येचा विचार करू लागलो, त्याबद्दल काळजी करू लागलो की आपल्याला आपले परिस्थितीवरचे नियंत्रण सुटत चालले आहे, आपण काही करू शकणार नाही असे वाटू लागते.
अशा वेळी केवळ विचार करत न बसता परिस्थिति नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करा. पुढे उद्भवणाऱ्या समस्यांवर काय उपाय करता येतील ह्याचा विचार सुरु करा.
६. स्नायू कडक आणि शिथिल करा.
जर एखाद्या विचाराने तुम्ही त्रस्त झाले असाल तर स्नायूंचा व्यायाम करणे फायद्याचे ठरते. शरीरातील सर्व स्नायू आधी ताठ, कडक करा, ताणून धरा.
तशा स्थितीत काही सेकंद थांबा आणि मग सर्व स्नायू शिथिल करा. ह्यामुळे स्ट्रेस मुळे शरीर आणि मनावर आलेला ताण कमी होण्यास खूप मदत होते. ह्या क्रियेला प्रोग्रेसिव मसल रीलॅक्सेशन असे म्हणतात.
७. चिंतेला किती महत्व द्यायचे ते ठरवा.
अनेक वेळा आपण भविष्यात घडू शकणाऱ्या अगदी क्षुल्लक गोष्टींचा खूप बाऊ करतो आणि त्याबद्दल खूप विचार करत राहतो. परंतु असे न करता ज्या गोष्टीची आपण चिंता करत बसलो आहोत ती गोष्ट खरंच तितकी महत्वाची आहे का ह्याचा मनाशी गांभीर्याने विचार करा.
ती गोष्ट इतकी चिंता करण्याएवढी महत्वाची नाही हे आपल्या मनाला समजवा आणि चिंता करण्यातून बाहेर पडा.
८. व्यक्त व्हा.
भविष्याच्या चिंतेचा मनातल्या मनात विचार करून कुढत राहू नका. त्याचा तुमच्या मानसिक स्वास्थ्यावर निश्चित वाईट परिणाम होणार.
मनात कुढण्याऐवजी तुमची चिंता जवळच्या व्यक्तींना बोलून दाखवा. अनेक वेळा कोणी उपाय सांगितले नाहीत तरी नुसत्या बोलण्याने देखील मन हलके होते. चिंता कमी होते.
कोणाशी बोलणे काही कारणामुळे शक्य नसेल तर तुमचे चिंतेबद्दलचे विचार एखाद्या डायरीत लिहून काढा. किंवा तुमच्या मोबाईलला एक फ्रंट कॅमेरा असतो, तर स्वतःशीच स्वतःसाठी या विषयी बोलणारा एक व्हिडीओ बनवा…
त्यामुळे देखील मनाला दिलासा मिळतो. पुढे सकारात्मक विचार करण्यासाठी प्रेरणा मिळते.
तर अशा प्रकारे भविष्याविषयीच्या चिंतेच्या गर्तेत न सापडता विविध उपायांनी तुम्ही स्वतःला त्यातून बाहेर काढू शकता.
तुम्ही देखील लेखात दिलेल्या उपायांचा उपयोग करून स्वतःला चिंतेत गर्क होण्यापासून रोखा आणि आनंदी रहा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा