मॅथ्यूज यांनी तयार केलेले डास मारण्याचे हे मशीन बघा

डास मारण्याचे मशीन

आपल्याला चावून हैराण करणारा पण चटकन हातात न सापडणारा आपला शत्रू म्हणजे डास.

घरात, बाहेर सगळीकडे डासांमुळे आपण हैराण झालेलो असतो, जगात डासांच्या ३५०० जाती आहेत आणि डासांमुळे डेंग्यू, मलेरिया, चिकूनगुनिया आणि पिवळा ताप असे आजार होतात. अनेक लोक ह्या आजारांनी मृत्युमुखी देखील पडतात.

घरी डास मारण्यासाठी आपण अनेक वेगेवगळे प्रयोग करतो. डासांची कॉईल, गुड नाइटचं मशीन, लिक्विड मशीन, मच्छरदाणी असे सगळे उपाय वापरुन घरात आपण डासांपासून आपली सुटका करून घेतो. परंतु बाहेरचं काय?

सार्वजनिक ठिकाणी डासांचा धोका जास्त आहे. साचलेलं पाणी, पाण्याच्या टाक्या, सेप्टिक टॅंक अशा ठिकाणी तर झुंडीने डास असतात आणि ते सहजपणे माणसांना चावून आजार पसरवू शकतात.

अशा ठिकाणी औषधी फवारे मारण्याचा देखील फारसा उपयोग होताना दिसत नाही. तेवढ्यापुरते डास कमी होऊन पुन्हा ते जोमाने वाढू लागतात.

पण अशा सार्वजनिक ठिकाणीच डास नष्ट होतील असे काही केले तर.. आपोआप आजार पसरणे थांबेल.

हाच विचार केरळच्या कोट्टायम येथे राहणाऱ्या ५० वर्षीय ‘मॅथ्यूज के मॅथ्यू’ ह्यांनी केला. त्यांनी खास आविष्कार करून एक यंत्र बनवले आहे.

त्या यंत्राला त्यांनी हॉकर हे नाव दिले आहे. हे यंत्र सार्वजनिक ठिकाणी डास पकडून मारते आणि ते देखील कोणतेही हानिकारक केमिकल न वापरता.

आहे की नाही आश्चर्याची गोष्ट? चला तर मग , आज आपण ह्या यंत्राबद्दल अधिक जाणून घेऊया.

केरळच्या कोट्टायम जिल्ह्यात कांजिरपल्ली नावाचा तालुका आहे. त्या तालुक्यात एक गाव आहे कप्पदु. तेथे राहणारे श्री. मॅथ्यूज के मॅथ्यू ह्यांनी हा चकित करणारा शोध लावला आहे.

पदवीपर्यंत शिक्षण घेतलेले मॅथ्यूज जेथे राहतात तेथे रबराचे शेत मोठ्या प्रमाणात आहे.

तसेच तेथे डासही मोठ्या प्रमाणात आढळतात. शेतकरी कुटुंबातील एक असल्यामुळे मॅथ्यूज ह्यांनी लहानपणापासून शेतात होणारा डासांचा त्रास बघितला आहे.

डासांकरता केली जाणारी केमिकल फवारणी ही पिकांचे नुकसान करते हे देखील त्यांनी पाहिले होते, त्यामुळे त्यांना कायम असे वाटत असे की एखादे केमिकल विरहित यंत्र असावे जे सार्वजनिक ठिकाणी डासांचा त्रास नाहीसा करू शकेल.

अशातच घरात सहजपणे घडलेल्या एका घटनेमुळे मॅथ्यूज ह्यांना मार्ग सापडला. घरात त्यांच्या एका हातावर बसलेला डास त्यांनी दुसऱ्या हाताने उडवला.

त्यामुळे तो डास न मरता तेथे नुसताच पडला व काही काळाने उडू लागला.

तेव्हा तो डास अचानक घरच्या कौलाच्या फटीकडे जाऊ लागला. त्यावरून मॅथ्यूज ह्यांच्या असे लक्षात आले की डास उजेडाकडे आकर्षित होत आहे.

तसेच काच इत्यादि पारदर्शक वस्तु डासांना ओळखू येत नाहीत. त्यावरून त्यांनी असे यंत्र बनवण्याचा विचार केला ज्याकडे डास आकर्षित होतील.

खूप परिश्रम घेऊन अनेक निरनिराळे प्रयोग करून मॅथ्यूज ह्यांनी हॉकर हे यंत्र बनवले. त्यासाठी त्यांना खूप अडचणींचा सामना करावा लागला.

लोकांनी त्यांची चेष्टाही केली पण मॅथ्यूज मागे हटले नाहीत. ते त्यांचे काम करत राहिले आणि २००० साली त्यांनी ह्या यंत्राचा प्रोटोटाइप तयार केला.

नक्की कसे आहे हॉकर हे यंत्र ?

हॉकर हे दोन भागात बनले आहे. अर्धा भाग पॉलिमरचा असून वरचा अर्धा भाग प्लॅस्टिकचा आहे.

ह्या यंत्रापासून एक नळी निघते ती एखाद्या सेप्टिक टॅंक, बायोगॅस टॅंकला जोडली की तेथील वासामुळे डास ह्या यंत्राकडे आकर्षित होतात आणि यंत्रात शिरून पारदर्शक भागात प्रवेश करतात.

हे यंत्र सौर उर्जेवर चालते त्यामुळे सूर्याच्या उष्णतेमुळे पारदर्शी भागातील डास मरतात. अशा प्रकारे हे यंत्र कार्य करते.

हे यंत्र एकदा बसवले की त्याच्या वापरासाठी कोणताही खर्च येत नाही. संपूर्णपणे सूर्य प्रकाशावर ते चालते. तसेच कोणतेही हानिकारक केमिकल न वापरल्यामुळे हे यंत्र पर्यावरणपूरक आहे.

हे यंत्र वापरण्यासाठी कोणत्याही अतिरिक्त ऊर्जेची, वीज जोडणीची गरज नाही.

डास मारण्याचे घरगुती उपाय

त्यामुळे ते कुठेही वापरता येऊ शकते.

आजपर्यंत हॉकरचे १००० पेक्षा जास्त यूनिट विकले गेले आहेत आणि ज्यांनी हे यंत्र बसवून घेतले आहे ते त्याबद्दल अतिशय खुश आहेत.

मॅथ्यूज ह्यांना ह्या यंत्राबद्दल राज्यस्तरीय पुरस्कार देखील मिळाला आहे. तसेच त्यांनी ह्या यंत्राचे पेटंट देखील घेतले आहे. ह्याच यंत्राचा घरातदेखील उपयोग होऊ शकेल असे मॉडेल बनवण्यात ते सध्या गर्क आहेत.

तर अशी ही कहाणी, एका डास मारणाऱ्या यंत्राची जे कोणत्याही केमिकलशिवाय वापरले जाते. कशी वाटली ते नक्की सांगा मित्रांनो.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.