“हापूस….”

मु.पो.पालशेत.
ता. गुहागर.
जि. रत्नागिरी.

रत्नांची खाण.
मे महिन्याचा सीझन.
गावभर घमघमाट.
सांगायला कशाला हवंय ?
तुम्ही ओळखलं असणारच.
अर्थात्…..हापूसचाच…

hapoosआख्खं गाव हापूसच्या दिमतीला.
झाडाझाडावर मणामणाचं ओझं.
फळ तयार होत आलेलं.
तो रंग…..तो वास…..तो माहौल.
मनस्वी….नैसर्गिक.
सगळंच स्वर्गीय.
बागेशी राखणीला तैनात, भालदार चोपदार.
वांदरांपासून जीवापाड जपायचं.
एकेक झाड म्हणजे खडकावरला अंकुर.
बीज अंकुरे अंकुरे…

आजा पणजाने लावलेलं.
तळहाताच्या फोडासारखं जपलेलं.
फळ पुढची पिढी खातेय.
अर्थात् नवीन पिढीही, पुढच्या पिढीची सोय करतेच आहे.
प्रत्येक झाड म्हणजे आठवणींचा खजिना.
कुणाची तरी आठवण जपणारं.
खोल काळजात मुळं रूतलेली.
जीवापाड काळजी घ्यायची.
हवं नको ते बघायचं.
रक्ताचं पाणी….औषधं फवारायची.

इथं मनुष्यबळ नाही म्हणून, थेट यूपी बिहारहून माणसं आणायची.
नवीन पिढीनं, पुण्या मुबैंशी आधीच संधान बांधून ठेवलेलं.
ट्रका भरून फळांचा राजा बाहेर जातो.
आल्यागेल्यांवरची हापूसची फुकटची ऊधळण…
कधीच थांबलीय.
आता तर काय, कोयीलाही किंमत यायची.
असू देत…..तरीही..
आंबा पिकतो…..रस गळतो.
कोकणचा राजा झिम्मा खेळतो.

Hapoosसगळा झिम्मा त्या राजासाठीच.
सीझनचा पहिला आंबा.
त्याचा रंग , गंध .
मालक सुखावतो.
पहिली फोड…..जीभेला झालेला तो आंबोळी स्पर्श.
आयुष्याचं सार्थक करणारा.
बाकी सारं झूठ.
हापूस आणि हापूसच.
हेच एक अंतिम सत्य.

ही गोडी चाखणारा प्रत्येक जण श्रीमंत व्हायचा.
पालशेतच्या घराघरात बिल गेटस् अवतरयाचे.
अपवाद फक्त…..बगूनाना.
साडेएकोणतीस वर्ष झालीयेत.
मागच्या वर्षीपर्यंत….
इतक्या वर्षात ,
बगूनानांची बाग कधी बहरलीच नाही.
खोल जमीन धरून बसलेली ,वांझोटी झाडे.
पुरूषभर ऊंच गवताशी लपाछपी खेळणारी.
ऊजाड…..ओसाड.
राग ऊदासी……मोहोरच नाहीये ईतकी वर्ष.
फळ कुठून धरणार ?
त्याआधी असं कधीच झालं नव्हतं.
असाच मे महिना होता तो.
संपत आलेला.

Hapoos ManacheTalksटेंगशा….बगूनानांचे ऊपद्व्यापी चिरंजीव.
दहावीत होते तेव्हा.
वर्षभर ऊनाडक्या केलेल्या.
शाळेपेक्षा आंब्यावरच जीव जडलेला.
खुशाल शाळेची जगबुडी करून,
आंब्याच्या बुंध्याशी दुपार जोजवायचा तो.
आंब्याचं झाडन् झाड बोलायचं टेंगश्याशी.
जीवापाड जपायचा टेंगशा बागेला.
खुरपणी , पाणी , फवारणी , राखणी..
सगळं मनापासून.
डोंगरभर आंबा यायचा.
ऊपयोग काय?

आंब्याशी पैशाचा व्यवहार जुळला नव्हता तेव्हा.
डोंगरभर आंबा, टीचभर पोट भरायला कुचकामी.
अभ्यासाशी नाळ जुळलीच नाही.
सगळीच गणितं चुकलेली.
बगूनानांना खूप वाटायचं ….
पोरानं शिकावं.
निदान मास्तर तरी व्हावं.
मासिक ऊत्पन्नाचा खात्रीशीर रतीब सुरू व्हायला हवा.

कसचं काय ?
दरसाल निक्काल.
कसाबसा वरच्या वर्गात ढकलला जायचा, टेंगशा.
बगूनानाची सटकायची.
गुरासारखा फोडून काढायचा टेंगश्याला तो.
पोर आईमागं लपायचं.
दरवर्षी असंच.
रवाळनाथाक काळजी.
नेहमीसारखा दहावीचाही ‘निक्काल’ लागलेला.
पोरगं टरकलं.
शाळेतून थेट आंब्याखाली.
ढसाढसा रडलं.

बापसासमोर ऊभं रहायची हिंमत नव्हती.
“कुठल्या तोंडानं जायचं ?
नकोच.
त्यापेक्षा इथनं दूर निघून जावं.
कायमचं…”
आईची खूप आठवण येत होती.
तरीही…
हापूसच्या आंब्यानं खूप अडवण्याचा प्रयत्न केला.
टेंगश्या गेला तो गेलाच.
मागे वळून सुद्धा न पाहता.
त्याची माय वेडीपिशी झालेली.

Hapoosबगूनाना ?
स्वतःवर इतका चिडणारा माणूस दुसरा नसेल.
दोघांच्या आयुष्यातला रसच संपलेला.
आला दिवस ढकलायचा फक्त.
कार्बन डाय आॅक्साईड फुफुसात भरून घेत असावेत दररोज.
जगण्याचं ओझं सहनशक्तीच्या लिमीटबाहेर.
तेव्हापासून..
बगूनानाच्या बागेतला हापूसही निपुत्रिक झालाय.
त्याचाही बहर संपलाय.
उरलीयेत ती फक्त जुनी खोंडं.
जिवंतपणी मरणयातना भोगणारी.
ऊजाड…..भकास…….बेसूर.

साडेएकोणतीस वर्ष.
असंच चाललंय.
यावर्षी काय झालंय ?
बगूनानांची बाग.
गवतात हरवलेली.
माणसाचा हात न लागलेली.
तरीही मोहोरलीय.
पानं दिसणार नाहीत इतका मोहोर.
पुन्हा डोंगरभर आंबा येणार की काय ?
इतक्या वर्षांनी ?
आलाय.
भरपूर फळ धरलंय.

रवाळनाथाच्या मनात काय चाललंय, कुणास ठावूक ?
बगूनाना आणि नानी.
त्या दोघांना काय फरक पडतोय ?
त्यांच्या आयुष्यातला हापूस कधीच संपलाय.
चूक…..हापूस संपलेला नाहीये.

तशीच ती, रणरणती मे महिन्यातली दुपार.
तांबड्या अंगणात एक मारूती गाडी थांबते.
“आयो…”
टाहो फोडत एक पस्तिशीचा ईसम घरात शिरतो.
मागे रेंगाळणारी त्याची बायको.
तिच्या खांद्यावरचं ते छोटं पोर.
नाकी डोळी नीट बघा.
डिट्टो बगूनाना.
असल्या बातम्या पसरायला वेळ लागतो होय ?

hapoosटेंगश्या परत आलाय.
मुंबैस असतो.
फळांचा मोठा व्यापारी झालाय.
वाशीस स्वतःच्या मालकीचा गाळा घेतलाय.
मुंबैस स्वतःची जागा…..गाडी.
आख्खं गाव कौतुकास हजर.
टेंगश्याची आई ऊधळलेली.
बगूनाना वेडापिसा.
तांबड्या मातीवर आसवांचा सडा……आनंदाची रांगोळी.

वाचण्यासारखे आणखी काही…..

आमचा हरी
सिझरिंग
रेल रोको इन ‘आमची मुंबई’….

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!