लॉकडाउन मुळे नोकरी गेली. बालपणीच्या छंदातून केली लाखोंची कमाई

लॉकडाउन मुळे नोकरी गेली. छंदातून कमाई

नोकरी गमावल्यामुळे हताश झालेल्या अनेक व्यक्ती आपल्याला माहिती असतील. 

अशा वेळी हताश होऊ नका. जे काही तुम्हाला चांगलं येतं, ज्यात तुमचा हातखंडा आहे, त्या कामावर लक्ष केंद्रित करा. आता हे एक उदाहरण बघा.

एक मार्ग बंद झाल्यावर निराश न होता दुसरा मार्ग शोधा. नव्याने प्रयत्न करा. प्रयत्न करणाऱ्याच्या पाठीशी देव स्वतः उभा रहातो असंं म्हणतात.

सूरतच्या जलाक देसाई यांची कहाणी ऐकली तर आपल्या लक्षात येतं खरचं आयुष्यात अशक्य असं काहीच नाही.

मित्रांनो, तुम्ही म्हणाल हे सांगायला लिहायला सोपं आहे, प्रत्यक्षात आयुष्य अवघड आहे. आता हेच पहा ना कोविडचं आगमन झालं आणि कित्येकांचं आयुष्य अचानक थांबलं, त्यांच्या प्रवासाला खीळच बसली. शेकडो लोकांना त्यांच्या नोक-या गमवाव्या लागल्या.

जलाक देसाई यांना ही कोरोनाचा प्रसाद मिळालाच. त्यांना ही नोकरी गमवावी लागली. सारं जग जेंव्हा स्वतःच्याच घरात कोंडलं गेलं तेंव्हा जलाक देसाई यांनी आपल्या कलेला मात्र मुक्त संचार करू दिला.

सुरवातीच्या काळात कुणीही जलाक यांना मदत केली नाही. त्यांच्या छंदाला कुणी गांभीर्याने ही घेतलं नाही.

स्वतः जलाक यांना आपण कलेच्या माध्यमातून यशस्वी होऊ यावर विश्वास नव्हता. पेंटिंग आपल्या आयुष्याला नवी दिशा देईल, लाखोंची कमाई करून देईल असा विचार जलाक यांनी स्वप्नातही केला नव्हता.

जलाक आणि त्यांच्या घरच्या लोकांचा ठाम विश्वास होता की कलेतून नियमित आणि चांगलं उत्पन्न कधीच मिळणार नाही. करीयरसाठी फार्मकॉलॉजी मध्ये डिग्री घेतल्यानंतर जलाक यांनी एक फार्मास्युटिकल कंपनी जॉईन केली.

मुलाच्या जन्मानंतर त्याच्या संगोपनासाठी जलाक यांनी आपल्या करीयरमध्ये ब्रेक घेतला.

तीन वर्षांनी जलाक यांनी आपला जॉब पुन्हा सुरू केला. यावेळी त्यांनी एका आयुर्वेदिक कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून आपलं काम सुरू केलं.

जलाक यांच्या आयुष्याची घडी नीट बसत आलेली होती तोवर कोरोनाचा काळ आला.

जलाक यांची नोकरी गेलीच. घरातच बसायचं कुठं बाहेर जायचंच नाही अशा लॉकडाऊनच्या काळात त्यांनी पुन्हा आपल्या कलेला वेळ दयायचा असं ठरवलं आणि ब्रश हातात घेतला.

पेटिंगकडे मोर्चा वळवल्यानंतर जलाक यांनी आपल्या कलाकृती सोशल मिडियावर पोस्ट करायला सुरवात केली.

जलाक यांची सुरेख पेटिंग्ज बघून प्रत्येकाने भरभरून कौतुक केलं.

कौतुकाची थाप पाठीवर पडली की कलाकार हरखून जातो. कलाकाराचा उत्साह वाढतो.

कौतुकाचा वर्षाव झाला, तरी जलाक यांचे पाय जमिनीवर होते. कलेची ताकद मात्र त्यांच्या लक्षात आली होती. आता याच मार्गावरून पुढे जायचं जलाक यांनी पक्कं केलं.

कलेच्या क्षेत्रात पुन्हा टाकलेलं पाऊल आता मागे घ्यायचं नाही हा निर्धार करून जलाक यांनी ‘जे डी क्रिएटर्स लेन’ नावाची एक वेबसाइट सुरु केली. या वेबसाईटवर जलाक यांनी आपली चित्रं, अपलोड केली.

वेबसाईटवरचं जलाक यांचं पहिलचं चित्रं पंधरा हजार रूपयांना विकलं गेलं. कलेच्या प्रांतात येण्याचा निर्णय योग्य होता यावर शिक्कामोर्तब झालं.

त्यानंतरच्या छोट्या कालावधीत 40 कलाकृती विकल्या गेल्या. ज्यातून 3 लाखांची कमाई जलाक देसाई यांनी केली.

लॉकडाऊनचा काळ संपल्यानंतर जलाक यांच्या कलाकृतींना मागणी वाढली. कॅनव्हास बरोबरच काचेच्या बाटलीवर आणि वेगवेगळ्या माध्यमातून जलाक यांची कला बहरली.

अमूर्त चित्र शैलीबरोबर श्रीनाथजी आणि बुद्धांच्या प्रतिमा रेखाटायला त्यांना खूप आवडतं.

जे काम करायचं ते जीव ओतून करायचं ही जलाक यांची वृत्ती आहे.

कलेला कमी लेखून प्रस्थापित क्षेत्रात करीयर करायचं हे आपल्या मनावर पक्कं ठसवलेलं असतं.

यामुळे आपण चित्रकलेकडे वळायला उशीर केला याची खंत जलाक यांना वाटते.

देर आए दुरूस्त आए असं म्हणत आता मात्र जलाक यांनी आपलं पुर्ण लक्ष आपल्या कलेवर केंद्रित केलं आहे.

घरातल्या सगळ्या जबाबदा-या सांभाळून कलेत स्वतःला झोकून देणा-या जलाक यांच्या कलाकृतींना राहतं घर अपुरं पडायला लागलं आहे.

नव्या घरात नवी स्वप्नं रंगवणा-या जलाक यांच्या चित्रांचं, कलाकृतीचं अनेक सेलीब्रेटींनी कौतुक ही केलं आणि या कलाकृती खरेदी ही केल्या.

जलाक देसाई आपल्या या यशाने समाधानी नाहीत. आता त्यांची इच्छा आहे की कलेच्या क्षेत्रात काम करण्याची इच्छा असणाऱ्या महिलांना आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून एक फ्लॅटफॉर्म उपलब्ध करुन दयावा, त्यांना प्रशिक्षण दयावं.

कलेच्या माध्यमातून गगनभरारी घेणा-या जलाक देसाई सांगतात, आपल्या स्वप्नांना मुठमाती देऊ नका. स्वतः वर स्वतःच्या कलेवर विश्वास ठेवा. आत्मविश्वासाने आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रयत्न करा. एक दिवस तुम्ही नक्की यशस्वी होणारच.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.