राकेश शर्मा हे भारताचे पहिले अंतराळवीर आहेत. ते जेव्हा १९८४ मध्ये अंतराळात पोहोचले तेव्हा भारताच्या तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्याशी त्यांनी अंतराळातून संवाद साधला.
तेव्हा इंदिराजींनी त्यांना विचारले की “अंतराळातून आपला भारत देश कसा दिसतो?” त्यावर राकेश शर्मा यांनी तेथून उत्तर दिले “सारे जहासे अच्छा हिंदोस्ता हमारा!” त्यांचे हे उत्तर संपूर्ण भारतवासीयांनी रेडिओद्वारे ऐकले. सर्वांचा ऊर अभिमानाने भरून आला होता.
मानवाला नेहमीच अंतराळात नक्की काय काय आहे याबद्दल अतिशय कुतूहल असते. त्यामुळे अनेक वर्षांपासून निरनिराळ्या साहसी अंतराळ मोहिमा सगळ्याच देशांकडून चालवल्या जातात. अमेरिकेने १९६९ मध्ये नील आर्मस्ट्रॉंग आणि एडविन एल्ड्रिन यांना चंद्रावर पाठवले होते. आपला भारत देश ही त्यात मागे नाही. आज पर्यंत निरनिराळे उपग्रह आपण अंतराळात पाठवले आहेत. तसेच काही अंतराळवीर देखील अंतराळात गेले आहेत. चंद्रावर अंतराळवीर पाठवण्याची देखील इसरोकडून तयारी सुरू आहे.
संपूर्ण जगभरातून मोठ्या प्रमाणात अंतराळवीर अंतराळात प्रवेश करून येतात. सर्वसामान्य लोकांना अंतराळवीर आणि त्यांच्या मोहिमा याबद्दल अतिशय कुतूहल आणि उत्सुकता असते. तसेच आपणही एकदा अंतराळात प्रवास करावा असे जवळ जवळ सर्वांनाच केव्हा ना केव्हा वाटते. अनेक लहान मुलांचे तर ते स्वप्न देखील असते आणि त्यातील बरीच मुले ते स्वप्न पुरे करण्यासाठी भरपूर प्रयत्न करतात.
परंतु अंतराळवीर होणे वाटते तितके सोपे नसते. अर्थातच त्यासाठी भरपूर अभ्यास करावा लागतो हे तर आहेच परंतु अंतराळवीर शारीरिक दृष्ट्या देखील अतिशय तंदुरूस्त असावे लागतात. आज आपण अंतराळवीर अंतराळात जातात त्यामुळे त्यांना कोण कोणते आजार होऊ शकतात या विषयाची माहिती जाणून घेणार आहोत.
अंतराळवीर अंतराळात प्रवास करतात म्हणजे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर जाऊन मायक्रो ग्रॅव्हिटीमध्ये प्रवास करतात. या मायक्रो ग्रॅव्हिटीचा त्यांच्या शरीरावर निश्चितपणे परिणाम होतो.
मायक्रो ग्रॅव्हिटीचे सर्वाधिक दुष्परिणाम माणसाच्या पोटावर होतात. अधिक काळपर्यंत मायक्रो ग्रॅव्हिटी मध्ये राहिल्यामुळे पोटातील आतड्यांच्या एपिथेलियल सेल्सना हानी पोहोचू शकते. म्हणजेच अंतराळवीरांच्या आतड्यांचे कार्य बिघडू शकते. एपिथेलियल सेल्स आतड्यांमध्ये असणाऱ्या बॅक्टेरिया फंगस आणि इतर विषाणूंना शरीराच्या इतर भागात जाण्यापासून रोखण्याचे काम करतात.
परंतु मायक्रो ग्रॅव्हिटी मध्ये राहिल्यानंतर आतड्यांचे हे काम सुरळीतपणे होऊ शकत नाही. त्यामुळे अंतराळवीरांना गॅस्ट्रो सारखे आजार होऊ शकतात. त्या व्यतिरिक्त आतड्यांना, पोटाच्या आतील भागाला सूज येणे, तेथे अल्सर होणे, पोट दुखी, लिव्हरचे आजार असे आजार होऊ शकतात.
अधिक संशोधन केल्यानंतर असे आढळून आले आहे की जास्त काळ मायक्रो ग्रॅव्हिटी मध्ये राहिल्यामुळे प्रतिकार शक्ती कमी होते आणि त्यामुळे वेगवेगळी इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो. तसेच अंतराळवीरांना टाइप १ मधुमेह होण्याचा देखील धोका असतो.
मायक्रो ग्रॅव्हिटी म्हणजे नक्की काय ?
ग्रॅव्हिटी म्हणजे गुरुत्वाकर्षण. पृथ्वीकडे गुरुत्वाकर्षण आहे म्हणून आपण जमिनीवर पाय टेकवून उभे राहू शकतो. पृथ्वीच्या मध्याकडे असणारे गुरुत्वाकर्षण आपल्या सर्वांना जमिनीवर स्थिर ठेवण्याचे प्रमुख काम करते.
जितके गुरुत्वाकर्षण कमी तेवढा मनुष्य जमिनीपासून वर उचलला जाईल. चंद्राचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीपेक्षा कमी असल्यामुळे तेथे चालण्याकरता पाऊल उचलले तरी आपण हवेत उचलले जातो. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा कक्षेबाहेर झिरो ग्रॅव्हिटी म्हणजेच अजिबात गुरुत्वाकर्षण नसलेला जो भाग आहे तेथे अंतराळवीर जातात.
तेथील गुरुत्वाकर्षण अतिशय कमी म्हणजेच मायक्रो ग्रॅव्हिटी असे असते जे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या दहा लाख पट कमी आहे. म्हणजेच गुरुत्वाकर्षण जवळजवळ अजिबातच नसते. त्यामुळे अंतराळात अंतराळवीर कितीही जड मोठ्या वस्तू असल्या तरी सहजपणे हलवू शकतात. कारण अंतराळवीर स्वतः आणि यानातील सर्व वस्तू वजन विरहीत अवस्थेत पोहोचलेले असतात.
अशा मायक्रो ग्रॅव्हिटी मध्ये अधिक काळपर्यंत राहिल्यामुळे अंतराळवीरांच्या शरीरावर त्याचा परिणाम होतो. अंतराळवीरांच्या शरीरावर त्याचा इतका परिणाम होतो की ते अंतराळातून पृथ्वीवर परत आल्यानंतर सुद्धा चौदा दिवस पर्यंत त्यांच्या शरीरावर तो परिणाम कायम राहतो. हळूहळू तो परिणाम कमी होताना दिसून येतो.
अंतराळवीरांच्या शरीराबरोबरच त्यांच्या मेंदूवर देखील मायक्रो ग्रॅव्हिटी चा प्रभाव पडतो. मेंदूची काही कार्ये सुधारतात तर ऐकण्याची क्षमता यासारखी काही कार्ये तुलनेने बिघडतात. परत आल्यानंतर आणि योग्य ती काळजी घेतल्यानंतर ते पूर्ववत होऊ शकतात.
म्हणूनच अंतराळवीरांची निवड करताना त्यांच्या बौद्धिक सामर्थ्य आणि कणखर मानसिकता या बरोबरच त्यांची शारीरिक तंदुरुस्ती देखील विचारात घेतली जाते. तसेच अंतराळात राहण्यासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर ते संपूर्णपणे तंदुरुस्त आहेत हे सिद्ध झाल्यावरच कोणत्याही अंतराळवीरांना अंतराळात जाण्याची संधी मिळते.
भविष्यात पर्यटनासाठी अंतराळात जाण्याचे मानवाचे स्वप्न आहे. जर आपणा सर्वांना कधीतरी अंतराळात जाऊन वजन विरहित अवस्थेचा अनुभव घ्यायची इच्छा असेल तर आपण आपली शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक स्वास्थ्य दोन्हीही अतिशय उत्तम ठेवले पाहिजे.
म्हणजे मग भविष्यात जेव्हा परदेशी जाण्याइतके अंतराळात जाणे सोपे होईल तेव्हा आपणही ते नक्कीच करू शकू. अंतराळवीरांबाबतची ही रंजक माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा लेख जास्तीत जास्त शेअर करा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा