रहस्याच्या मागे लपलेले रहस्य

law of attraction marathi | marathi prernadayi vichar | रहस्य पुस्तक मराठी pdf

तुमच्यापैकी अनेक जणांनी ‘द सिक्रेट’ हे पुस्तक वाचले असेल. आकर्षणाचा सिद्धांत सोप्या भाषेत मांडणारी ‘द सिक्रेट’ ही डॉक्युमेंटरी फिल्मही बघितली असेल.

तुमच्यापैकी अनेकांचा ‘लॉ ऑफ अट्रॅक्शन’ वर विश्वास असेल. आजपर्यंत Ask, Believe, Receive म्हणजे ‘कल्पना करा, विश्वास ठेवा आणि साध्य करा’ या सुत्राचा अनेकदा कळत नकळत तुम्ही वापर केला आहे आणि अनेक गोष्टी मिळवल्या आहेत. आकर्षणाचा सिद्धांत शंभर टक्के काम करतो याचा तुम्ही अनुभव घेतलेला आहे आणि तरीही अनेकदा मनापासून वापर करुनही तुमच्या अनेक इच्छा आजही अपुर्णच राहीलेल्या असतील.

आकर्षणाच्या सिद्धांतामध्ये जीवनाला आकार देण्याची शक्ती आहे यात शंकाच नाही. तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या सहाय्याने मोठी मोठी स्वप्ने पुर्ण करण्याचे मनापासून प्रयत्न केले असतील तर तुम्हाला आतापर्यंत हे ही कळून चुकले असेल की आकर्षणाचा सिद्धांत वाटतो तितका सोपा पण नाही.

कारण मनामध्ये क्षणाक्षणाला उमटणाऱ्या विचारतरंगांना आकार देणे आणि लाटांप्रमाणे हेलकावे खाणाऱ्या भावनांना नियंत्रणात ठेवणे हे जगातल्या सर्वात कठीण कामापैकी एक काम आहे.

जेव्हा मनोभावे आकर्षणाचा सिद्धांत वापरुनही वारंवार अपयश यायला लागते तेव्हा लोक इतके निराश होतात की तेव्हा ते ‘नको ही भानगड’ असे म्हणून सरळ शरणागती पत्कारतात आणि अतृप्त व दुःखी जीवनाचा पर्याय स्वीकारतात.

असे का होते? लॉ ऑफ अट्रॅक्शन खरंच खरा आहे की फसवा आहे? खरा असेल तर आपले नेमके काय आणि कुठे चुकते? द सिक्रेट हे पुस्तक, ही डॉक्युमेंटरी फिल्म खुप छान आहे. पण त्या निर्मात्यांचा पूर्ण आदर करुन मी सांगतो, त्यामध्ये सांगितलेला आकर्षणाचा सिद्धांत हा अर्धसत्य आहे. तो अपुर्ण आहे. लोकांना प्रभावित करण्याकरता अर्धवट स्वरुपात तो आपल्यासमोर मांडला गेला आहे.

हे एकदम व्यावहारिक उदाहरण घ्या.

मला माझे वजन पंधरा किलोने कमी करायचे आहे. यासाठी मी ‘द सिक्रेट’चा फॉर्मुला वापरण्याचे ठरवले. मी एका सोफ्यावर डोळे बंद करुन बसतो. माझे वजन कमी झाले आहे. कमी झाले आहे अशी दिवसभर मनापासुन कल्पना करतो. वजन कमी झालेल्या पिळदार, आकर्षक शरीराची प्रतिमा मी तासनतास डोळ्यांसमोर आणत राहतो. नंतर मी जेवण करुन दिवसभर गादीवर लोळून काढतो. संध्याकाळी उठल्यावर मी टी.व्ही नाहीतर नेटफ्लिक्स लावतो. चिप्सची पाकिटं, कोल्ड्रींक्स यांच्यावर ताव मारत मी कूठल्यातरी चित्रपटाचा आनंद लुटतो. रात्री पुन्हा भरपेट जेवण करुन मनसोक्त ताणून देतो.

दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पुन्हा वजन कमी झाले आहे, माझे पोट सपाट झाले आहे, शरीर आकर्षक झाले आहे, अशी मनातून कल्पना करतो. बायसेप, ट्रायसेप, सिक्सपॅक यांची कल्पना करतो. आता तुम्ही मला सांगा, अशा वागण्याने माझे वजन कमी होईल का? अर्थातच नाही.

जोपर्यंत मी सकाळी उठून घाम निघेपर्यंत व्यायाम करणार नाही, चरबीयुक्त पदार्थ बंद करुन आरोग्यदायी आहार घेणार नाही, जीभेचे चोचले बंद करणार नाही तोपर्यंत माझे वजन घटणार नाही हेच सत्य आहे. तसेच कोणत्याही ध्येयाला पुर्ण करण्यासाठी प्रत्यक्षात कृती करणे अटळ आहे.

मग जर फक्त कृती करुनच यश मिळणार असेल तर आकर्षणाच्या सिद्धांताला अर्थ आहे की नाही?

गेल्या आठ वर्षांपासुन आकर्षणाच्या सिद्धांत वापरत वापरत मला जे काही उमगले त्यावरुन मी तुम्हाला सांगतो. लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या पोटात दोन उपसिद्धांत लपले आहेत, ज्याची कुठेही जास्त चर्चा होत नाही. गणिताच्या भाषेत मी असे समीकरण मांडतो.

लॉ ऑफ अट्रॅक्शन = लॉ ऑफ व्हायब्रेशन + लॉ ऑफ ऍक्शन.

आकर्षणाचा सिद्धांत = उर्जा + कृती

१) लॉ ऑफ व्हायब्रेशन 

प्रसिद्ध वैज्ञानिक निकोला टेस्ला म्हणायचा ह्या ब्रम्हांडाचं रहस्य उलगडायचं असेल तर आपल्या अवतीभवती आस्तित्वात असलेली उर्जा आणि त्यांचे सुक्ष्म तरंग यांचं बारकाईने निरीक्षण करा.

या जगात अनेक अदृश्य गोष्टी आहेत, त्या खुप परिणामकारक आहेत पण त्या उर्जेच्या स्वरुपात असल्यामूळे आपल्या डोळ्यांना दिसु शकत नाहीत म्हणून आपल्याला त्यांचे महत्व अजिबात लक्षात येत नाही.

शरीर डोळ्यांना दिसते, मन डोळ्यांना दिसत नाही पण मन शरीरापेक्षा कितीतरी शक्तिशाली आहे. वस्तु दिसतात पण विचार दिसत नाहीत. राग, चिडचिड, प्रसन्नता, दुःख, निराशा या भावना डोळ्यांना दिसत नाहीत पण आपल्या भविष्याची आणि संपुर्ण जीवनाची मालकीच या न दिसणाऱ्या भावनांच्याच ताब्यात आहे.

ज्याप्रमाणे रेडिओ आणि टीव्ही एका अदृश्य व्हायब्रेशन्सच्या सहाय्याने चालतात, त्याचप्रकारे मानवी मनसुद्धा अदृश्य अशा विचारतरंगानी प्रभावित होवून आपल्या शरीराला आज्ञा देते. विचारतरंगांची अदभुत शक्ती जर एकदा लक्षात आली तर पुढचा खेळ एकदम सोपा होऊन जातो.

आकर्षणाच्या सिद्धांतामध्ये सांगितल्याप्रमाणे तंतोतंत पद्धतीने ध्येय लिहून काढले आणि त्यांची डोळे बंद करुन मनोभावे कल्पना केली तरी यश मिळत नाही. कारण आपल्यावर दिवसभर मोठ्या प्रमाणात नकारात्मकतेचा मारा होत असतो.

आपल्या मेंदुला खाद्यस्वरुपात दिली जाणारी नव्वद टक्के माहिती विषारी स्वरुपाची असते हे तुम्हाला माहीत आहे का?

बातम्या, वर्तमानपत्रे, टी.व्ही.वरच्या मालिका, व्याभिचार आणि मारधाड यांचा पुरस्कार करणारे चित्रपट, वेबसिरीज आपल्यामध्ये ठासून नकारात्मकता भरण्याचे काम करतात. तरीही आपणही विरंगुळा आणि ‘क्षणभर विश्रांती’ नावाखाली पुन्हा पुन्हा तिथेच मनोरंजन शोधायला जातो.

कधी माध्यमे तर कधी आपल्या अवतीभवतीचे लोक आपल्या मनात खळबळ, दुःख आणि निराशा निर्माण होईल असे वातावरण निर्माण करतात.

आपल्या विचारतरंगांना ते सहज प्रभावित करतात, ज्यामूळे आपले नुकसान होते. या सर्वांपासून आपला बचाव करणारं तंत्र आपण विकसित केलं पाहिजे. सर्व प्रकारच्या परिस्थितीमध्ये जो व्यक्ती स्वतःला उत्साही आणि उर्जावान ठेवण्यात यशस्वी होतो तोच व्यक्ती उच्च प्रतिचे विचारतरंग निर्माण करुन आपले ध्येय साध्य करु शकेल.

एखादा माणूस जेव्हा प्रचंड रागात असेल तेव्हा कधीही तो डोळे बंद करुन मी इतरांवर खुप खुप प्रेम करतो अशी कल्पना करु शकणार नाही. हे त्याला शक्यच होणार नाही.

जो माणूस आतुन स्वतःला हतबल आणि दुर्बळ समजतो, त्याच्या मनाच्या जमिनीत ‘मी खूप शक्तिशाली आहे’ या भावनांचे बीज रुजुच शकणार नाही. ‘मी संपत्तीवान आणि सामर्थशाली आहे’चा अंकूर फूटूच शकणार नाही.

तुम्ही गरीब आहात, पेट्रोल-डिझेल, दाळी आणि तेलांचे भाव वाढले की तुमचे जगणे अवघड होईल, अशा कलकलाटापुढे मनातील प्रसन्नता आणि समृद्धता या भावनांचे रोप मान टाकते. हळुहळू निर्जीव होते.

‘मी कमजोर आहे, असहाय्य आहे’, ही अभावाची भावना माणसाला निष्क्रियतेकडे घेऊन जाते तर ‘माझ्यात परिस्थिती बदलण्याचे सामर्थ्य आहे’ ही भावना माणसाला यशाच्या उत्तुंग शिखरावर नेऊन पोहोचवते. ‘मला फसवले जात आहे, माझ्यावर अन्याय होतो आहे’ ही विषवल्ली व्यक्तीच्या आत असलेल्या कृतज्ञतेच्या भावनांना नष्ट करते.

तुम्ही मनात कोणत्या प्रकारच्या फ्रिक्वेंसीला प्रवेश देता आणि कोणत्या प्रकारच्या व्हायब्रेशन्सला थारा देता, यावर तुमचे भविष्य अवलंबून आहे.

२) लॉ ऑफ ऍक्शन 

एका जागी बसुन कल्पना केल्याने हवा तितका पैसा मिळेल, काहीही न करता चांगले आरोग्य मिळेल, फक्त विचार करुन करुन जीवापाड प्रेम करणारी माणसं मिळतील, शुन्य कृती करुन तुम्हाला आदर सन्मान आणि प्रसिद्धी मिळेल, अशा प्रकारचे विचार ऐकले की आपण खुप आनंदी होतो.

प्रत्येक माणसाला काहीही न करता सर्व सुखसुविधा मिळवायची एक जन्मजात इच्छा असते. याला इंग्लिशमध्ये ‘इन्संट ग्रॅटिफिकेशन’ असे म्हणतात. झटपट सुख आणि वैभव मिळवण्याच्या नादात माणूस खोट्या आकर्षणाच्या सिद्धांताच्या सापळ्यात स्वतःहून अडकतो. त्याला सगळं काही झटपट आणि मोफत हवं असतं, पण या जगात काहीही फुकट मिळत नाही. ‘कशाच्या तरी बदल्यात काहीतरी’ हेच या ब्रह्मांडाचं साधं सोपं गणित आहे.

बीज लावलं नाही तर झाड कसं उगवेल? जेवण केले नाही तर शक्ती कशी मिळेल? ज्याप्रमाणे फक्त खाण्याचा आभास किंवा अभिनय केल्याने शरीराला उर्जा आणि शक्ती मिळणार नाही त्याचप्रमाणे नुसतीच एका जागी बसुन कल्पना केल्याने प्रगती होणार नाही.

केवळ विचार केल्याने ध्येय प्रत्यक्षात साकाणार नाहीत. त्यासाठी कृती ही करावीच लागेल. वास्तविक जीवनात काम करण्यासाठी पुढाकार घ्यावाच लागेल.

‘लॉ ऑफ व्हायब्रेशन’ आणि ‘लॉ ऑफ ऍक्शन’ यां दोघांचा मेळ ज्याला जमला. ‘लॉ ऑफ अट्रॅक्शन’ त्याच्यावर प्रसन्न झाला. ‘अ आकर्षणाच्या’ या पुस्तकाच्या तीस धड्यांमध्ये हे दोन्ही सिद्धांत मी तुमच्यापुढे वेगवेगळ्या रंजक पद्धतीने मांडले आहेत. मला विश्वास आहे की या पुस्तकातील प्रत्येक लेख वाचकाला एक सकारात्मक उर्जा देईल, आणि दिवसभरातील ताणतणावांना झटकून टाकणारं एक सुरक्षाकवच निर्माण करेल.

आभार आणि शुभेच्छा!

Manachetalks

 

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.