अन्नातील पोषक द्रव्ये टिकवून ठेवण्यासाठी स्वयंपाक करताना कोणती काळजी घ्यावी

अन्नातील पोषक द्रव्ये टिकवून ठेवण्यासाठी स्वयंपाक करताना कोणती काळजी घ्यावी

जाणून घ्या स्वयंपाक करण्याची कोणती पद्धत सर्वोत्तम आहे? कोणत्या पद्धतीने स्वयंपाक केला असता अन्नातील पोषक द्रव्ये टिकून राहण्यास मदत होते?

मनुष्य हा देखील एक प्राणीच असला तरी मानवाला इतर प्राणीसृष्टीपासून वेगळी बनवते ती आपली खाण्याची पद्धत. निसर्गातील इतर सर्व शाकाहारी, मांसाहारी किंवा मिश्राहारी प्राणी त्यांचे अन्न कच्चे खातात. जीवसृष्टीत मानव हा एकमेव प्राणी आहे जो अन्नावर वेगवेगळ्या प्रक्रिया करून मग ते खातो.

उत्क्रांतीच्या अगदी सुरुवातीला मानव सुद्धा जंगलात सापडलेली फळे, कंदमुळे किंवा शिकार केलेल्या प्राण्याचे मांस कच्चेच खात असे. परंतु जवळजवळ १० लाख वर्षांपूर्वी मानवाने आगीचा शोध लावला. अशी समजूत आहे की तेव्हा कोण्या एका आदिमानवाकडून चुकून आगीत पडलेला मांसाचा तुकडा भाजला जाऊन तो चविष्ट आणि नरम बनला आणि मानवाला अन्न शिजवण्याची पहिली पद्धत कळली.

मग हळूहळू प्रगत मानवाने अन्न शिजवण्याच्या, ते साठवून ठेवण्याच्या अनेक पद्धती शोधून काढल्या आणि अन्न अधिक चवदार आणि पौष्टिक कसे बनेल ह्याचा प्रयत्न केला. ह्यामध्ये अन्न भाजणे, वाफेवर शिजवणे, पाणी घालून शिजवणे, उकडणे, तळणे ते अगदी मायक्रोव्हेव ओव्हन मध्ये अन्न शिजवणे इथपर्यंत प्रगती झाली.

आज आपण अशाच काही पद्धतींची माहिती करून घेणार आहोत. त्यातून आपण अन्न शिजवण्याची आणि त्यातील पौष्टिक घटक टिकवून ठेवण्याची सर्वोत्तम पद्धत शोधून काढू शकू.

हे तर अगदी खरे आहे की कोणत्याही पद्धतीने का असेन अन्न शिजवणे हे फक्त चव वाढवण्यासाठी केले जात नाही. अन्न शिजवल्यामुळे ते पचायला हलके बनते, त्यातील जिवाणू, कीटाणू नष्ट होतात. अन्न खाण्यासाठी सुरक्षित बनते.

असे देखील मानले जाते की अन्नावर जितकी शिजवण्याची प्रक्रिया जास्त तितके त्यातील पौष्टिक घटक कमी होत जातात. असे अन्न मग शरीराला पोषण देऊ शकत नाही. परंतु ह्यावर कच्चे अन्न खाणे हा उपाय तर असू शकत नाही, त्यामुळे ह्या सर्वांचा काहीतरी सुवर्णमध्य काढणे आवश्यक आहे.

पारंपारिक पद्धतीने करण्याच्या स्वयंपाकाच्या प्रक्रिया आपणा सर्वांना माहीत आहेतच. आज आपण काही आधुनिक पद्धती देखील आजमावून पाहूया.

१. मायक्रोवेव मध्ये स्वयंपाक करणे स्वास्थ्यवर्धक आहे का?

स्वयंपाक करण्याची सर्वात आधुनिक पद्धत म्हणजे मायक्रोवेव मध्ये स्वयंपाक करणे. ह्या पद्धतीने अन्न शिजवण्यावर बरीच उलटसुलट मते मांडली जातात. परंतु हे तर मान्य केलेच पाहिजे की मायक्रोवेव्हमध्ये स्वयंपाक करणे अतिशय सोपे, वेळ वाचवणारे आणि बिनचूक असते.

मायक्रोवेव्हमध्ये एकीकडे स्वयंपाक करताना दुसरे काम देखील सहजपणे करता येऊ शकते. त्यामुळे आधुनिक स्त्रियांसाठी मायक्रोवेव्हमध्ये स्वयंपाक करणे हे एक वरदानच आहे. अन्नातील पोषक घटकांचा विचार केला तर देखील मायक्रोवेव्हमध्ये स्वयंपाक करणे फायदेशीरच आहे असे दिसून येते.

कमी तापमानात अन्न शिजवले जाणे आणि ते कमीत कमी वेळात शिजवले जाणे यामुळे मायक्रोवेवमध्ये अन्नातील पोषक घटक टिकून राहण्यास खूप मदत होते. हिरव्या पालेभाज्या मायक्रोवेव मध्ये उकडल्या असता त्यातील खनिजे टिकून राहण्याचे प्रमाण इतर कोणत्याही पद्धतीपेक्षा सर्वात जास्त आहे.

लसूण किंवा मशरुम्स मधील एंटीऑक्सीडंट्स टिकून राहण्यासाठी ते मायक्रोवेव्हमध्ये शिजवणे सर्वात चांगले आहे. मायक्रोवेव्हमध्ये पसरट भांड्यात अन्न शिजवले असता एक सारख्या तापमानात सर्व अन्न शिजल्यामुळे त्यातील पोषक घटक टिकून राहतात. यावरून असे दिसून येते की मायक्रोवेव्हमध्ये अन्न शिजवणे ही आधुनिक पद्धत निश्चितच चांगली आहे.

२. बेकिंग आणि रोस्टिंग 

स्वयंपाक करण्याची दुसरी आधुनिक पद्धत म्हणजे बेकिंग. तसेच आणखी एक आधुनिक पद्धत वापरली जाते आणि ती म्हणजे अन्न थेट विस्तवावर भाजणे किंवा रोस्टिंग. या दोन्ही प्रकारांमध्ये अन्नातील पोषक घटक काही प्रमाणात टिकून राहतात हे जरी खरे असले तरी खूप जास्त तापमानात बराच वेळ अन्न शिजल्यामुळे त्यातील विटामिन बी, विटामिन ए सारखे पोषक घटक मात्र ४० टक्के इतके कमी होऊ शकतात. रोस्टिंगचा उपयोग मुख्यत्वे मांसाहारी पदार्थ करण्यासाठी केला जातो तर बेकिंग पद्धतीने ब्रेड, केक, बिस्किटे इत्यादी पदार्थ बनवले जातात.

३. तळणे किंवा शॅलो फ्राय करणे 

तळणे – तळणे हा जगभरात सगळीकडे अन्नावर प्रक्रिया करण्याचा सर्वाधिक लोकप्रिय मार्ग आहे. परंतु तळण यामुळे अन्न चविष्ट लागत असले तरी त्यातील ओमेगा थ्री फॅटी ऍसिड सारखे पौष्टिक घटक मात्र उच्च तापमानाला तळले गेल्यामुळे नष्ट होऊ शकतात. परंतु त्याच वेळी तळले जात असताना अन्नातील विटामिन बी आणि विटामिन सी हे घटक मात्र तसेच राहतात. बटाट्या सारख्या स्टार्च युक्त पदार्थांवर मात्र तळल्यामुळे प्रतिरोधी स्टार्च तयार होण्याची प्रक्रिया सुरू होते.

शॅलो फ्राय करणे 

शॅलो फ्राय करण्याच्या पद्धती मध्ये तेलाचा वापर कमीत कमी असल्यामुळे पदार्थ चवदार तर होतोच परंतु त्यातील पौष्टिक घटक टिकून राहण्यास मदत होते.

याशिवाय स्टर फ्राय करणे ही अजून एक आधुनिक पद्धत सध्या खूप लोकप्रिय होत आहे. यामध्ये एखाद्या पसरट कढईत अथवा भांड्यात मोठ्या आचेवर पदार्थ हलवून हलवून शिजवला जातो. त्यामुळे पदार्थातील पोषक घटक तसेच राहून पदार्थ चांगल्या प्रकारे शिजतो. त्यामुळे स्टर फ्राय करणे ही एक चांगली पद्धत मानता येईल.

४. अन्न वाफेवर शिजवणे 

वाफेवर अन्न शिजवलेल्या मुळे त्यातील पोषक घटकांचे संरक्षण होण्याचे प्रमाण सर्वात जास्त असते. हिरव्या पालेभाज्या वाफेवर शिजवलेल्या असता त्यातील सर्व पोषक घटक टिकून राहतात. असे म्हटले जाते की वाफेवर शिजवलेल्या अन्नाची चव फार काही चांगली नसते परंतु अन्न वाफेवर शिजवून नंतर त्यात चवीसाठी तेल, तूप आणि मीठ मसाले घातले असता अन्नातील पोषक घटकांचा फायदा तर मिळतोच आणि ते चवदार देखील लागते.

५. आंबवलेले पदार्थ 

पदार्थ आंबवण्याची म्हणजेच किण्वन करण्याची प्रक्रिया पदार्थांचे पौष्टिक गुणधर्म वाढवण्यास मदत करते. अशा पदार्थांमध्ये विटामिन बी १२ चे प्रमाण सर्वाधिक असते. फर्मेंटेशन म्हणजेच आंबवण्याची प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये इडली, ढोकळा, डोसा इत्यादी पदार्थांचा समावेश होतो. असे पदार्थ आरोग्यासाठी अतिशय गुणकारी असतात.

तर ह्या आहेत अन्न शिजवण्याच्या काही आधुनिक पद्धती. ह्या पद्धतींबरोबरच अन्न शिजवताना काही अगदी बेसिक नियमांचे पालन जरूर करावे त्यामुळे त्यातील पौष्टिक घटक टिकून राहतात. जसे की,

१. अन्न झाकून शिजवावे.

२. अन्न विशेषतः मांसाहारी पदार्थ शिजवताना सुटणारे पाणी टाकून देऊ नये. त्याचा वापर करावा.

३. अन्नपदार्थ उकळून शिजवताना कमी पाण्याचा वापर करावा.

४. भाज्या चिरण्याआधी धुवाव्या, चिरलेल्या भाज्या धुवू नयेत.

ह्या सर्व टिप्स वापरुन आपण आपले अन्न अधिकाधिक पौष्टिक बनवू शकतो. ह्याबाबतीतले तुमचे अनुभव आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.