दुसऱ्या व्यक्तीच्या नकारात्मक उर्जेपासून स्वतःचा बचाव कसा करायचा?

दुसऱ्या व्यक्तीच्या नकारात्मक उर्जेपासून स्वतःचा बचाव कसा करायचा?

आयुष्यात आपल्याला अनेक प्रकारची माणसं भेटतात.

काही माणसांच्या सहवासात आपल्याला आनंद मिळतो. जगण्यात रस निर्माण होतो.

तर काही माणसांच्या सहवासात उदास वाटतं नैराश्य दाटून येतं.

आजकाल आपण आपल्या आजूबाजूला पहात़ो तेंव्हा लक्षात येतं की आयुष्यातल्या सगळ्या चांगल्या वाईट घटना स्वीकारायला प्रत्येक जण सक्षम नसतो.

छोट्याशा पराभवाने, अपयशाच्या एखाद्या पायरीवर व्यक्ती इतकी हतबल होऊ शकते की आत्मघाताच्या दिशेनं तिचे विचार सुरू होतात.

मित्रांनो, लक्षात घ्या सतत पॉझिटिव्ह थिंकिंग करणाऱ्या व्यक्तींचा प्रभाव पडून आपले विचार ही सकारात्मक होतात.

तर नकारात्मक व्यक्तीच्या प्रभावामुळे आपले विचार ही नकारात्मक दिशेने धावायला लागतात.

मग नकारात्मक व्यक्तींच्या उर्जेचा आपल्यावर पडणारा प्रभाव कसा थांबवायचा? चला जाणून घेऊया.

आपल्या शरीरामध्ये दोन प्रकारची ऊर्जा कार्यरत असते.

दोन्ही प्रकारची ऊर्जा वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या पातळीवर काम करते.

सकारात्मक म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी जेव्हा आपल्या शरीरामध्ये ऍक्टिव्ह असते, तेव्हा अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आपण करत असतो.

एखाद्या ध्येयाप्रती छान नियोजन करतो.

भविष्याविषयी अतिशय आशादायी विचार आपल्या मनात असतात.

आपले नातेसंबंध ही उत्तम असतात.

जेंव्हा पॉझिटिव्ह एनर्जीने भारलेल्या, ‘पेला अर्धा भरला आहे’ असं म्हणणाऱ्या व्यक्ती आपल्याला भेटतात तेंव्हा आपल्यालाही प्रत्येक गोष्टीतले चांगले पैलू शोधायला शिकवतात.

आयुष्यात काय कमी आहे यापेक्षा आपल्याकडे काय काय आहे याचा शोध एकदा आपण घ्यायला शिकलो तर आपलं आयुष्य आनंदी व्हायला वेळ लागत नाही.

काही व्यक्ती मात्र अशा असतात ज्या सतत नकारात्मक बोलत राहतात.

दुसर्‍यांच्या चुका शोधत बसतात किंवा कुठल्याही गोष्टीतले दोष शोधण्याचा प्रयत्न करतात.

अशा व्यक्ती आपल्या ही नकळत आपल्या मनात नकारात्मक भावनांचं बीज रोवतात.

आपल्या मनात नकारात्मक भावना पटकन रूजायला लागते.

अशा व्यक्तींपासून खरं तर चार हात लांब राहणंच योग्य असतं.

पण प्रत्येक वेळेला ते शक्य होत नाही.

अशा व्यक्ती आपल्या ऑफिसमध्ये, किंवा मित्रपरिवारात किंवा अगदी जवळचे नातेवाईक सुध्दा असू शकतात.

ज्यांच्या पासून आपण फार लांब जाऊ शकत नाही.

मनाचेTalks वरचे लेख वाचून बरेच लोक असेही कमेंट करतात की, अशी निगेटिव्ह व्यक्ती आपल्या जवळचीच असेल तर काय करायचे? अशा लोकांना तर आपण टाळू शकत नाही!

अशा नकारात्मक व्यक्तींना आपण टाळू शकलो नाही तरी त्यांची नकारात्मक ऊर्जा मात्र आपल्यापासून दूर ठेवू शकतो….

सगळ्यात पहिल्यांदा आपण आपल्या वागणुकीचा विचार करून आपल्यावर नकारात्मक विचारांचा प्रभाव आहे की सकारात्मक विचारांचा प्रभाव आहे याचा शोध घेतला पाहिजे.

सकारात्मक विचारांचा प्रभाव आपल्या मनावर असेल तर आपण अजून ब-याच चांगल्या गोष्टी करू शकतो.

पण समजा नकारात्मक भावनेने तुम्हांला घेरलं असेल तर मात्र वेळीच पावलं उचला.

१) प्रतिकार करू नका

नकारात्मक गोष्टींपासून दूर राहायला बरेचजण वेगवेगळ्या टेक्निक्स वापरतात.

काहीजण त्यांना सामोरं येणाऱ्या निगेटिव्ह एनर्जीचा नकळत प्रतिकार करतात.

समजा एखाद्याने आपला अपमान केला आपल्याला अपशब्द वापरले तर या व्यक्ती ही लगेच प्रत्युत्तर देतात.

यामुळे मनात भावना साठून राहत नाहीत आणि त्यामुळे ‘आपल्याला बरं वाटतंय’ असं आपल्याला वरवर वाटायला लागतं.

खरतर मनात खोलवर कुठेतरी अस्वस्थता दडलेली असते.

मनात उगीचच द्वेष धगधगत राहतो आणि द्वेषाच्या विष वेली जर मनात रूजल्या तर आपण सकारात्मक विचार कसा करणार?

या लगेच रिऍक्ट करण्यामुळे एक भांडखोर व्यक्ती अशी आपली प्रतिमा मात्र निर्माण होऊ शकते.

2) नकारात्मक उर्जा शोषून घेऊ नका

बऱ्याच व्यक्ती नकारात्मक ऊर्जेचा प्रतिकार न करता ती ऊर्जा स्वीकारून ती शोषून घेण्याचा प्रयत्न करतात.

म्हणजे काय तर समोरच्याने अपमान केला, अपशब्द वापरले किंवा चुकीची गोष्ट केली तरीही त्याच्यावर कोणतीही प्रतिक्रिया न देता शांतच रहायचं.

आपल्याला या गोष्टीचा कितीही त्रास झाला, राग आला तरी तो व्यक्त करायचा नाही.

पण मग अशा व्यक्तींचं काय होतं की मनामध्ये घुसमट तयार होते.

ज्यामुळं मानसिक शांतता दूर पळून जाते.

भांडणापासून वादावादीपासून दूर राहायचं म्हणून एकही शब्द न बोलता त्रास सहन करायचा ही टेक्निक खूप छान वाटली तरी आपल्यासाठी हानिकारकच असते.

नकारात्मक उर्जेला प्रतिकार किंवा ही नकारात्मकता शोषून घेण्याचा प्रयत्न करणे यामुळे आपलं मन कमकुवत व्हायला लागतं.

3) नकारात्मक ऊर्जेला परिवर्तित करा

आयुष्यातली प्रत्येक गोष्ट आपण स्वीकारली तरच आयुष्य सोपं होतं.

नकारात्मक गोष्टही आपल्याला स्वीकारावीच लागते.

मात्र त्या गोष्टीला प्रतिकार करून किंवा त्या गोष्टीला शोषण्याचा प्रयत्न करून आपली क्षमता वाया घालवण्यापेक्षा आपण ही ऊर्जा परिवर्तीत करू शकतो.

परिवर्तीत करायची म्हणजे नेमकं काय करायचं?

आता बघा हां, एखाद्या व्यक्तीने आपला अपमान केला तर आपली प्रतिक्रिया कशी असू शकते ?

एक तर आपण त्या व्यक्तीला शाब्दिक प्रतिकार करू किंवा काहीच न बोलता मनातल्या मनात स्वतःला त्रास करून घेऊ.

ती व्यक्ती माझ्याशीच का अशी वागली? यापेक्षा ती कुठल्या परिस्थितीमध्ये आहे याचा विचार करणं तुम्हाला संतुलीत ठेवते.

नकारात्मक ऊर्जेला परिवर्तीत करणे म्हणजे एखादा आपल्याशी वाईट वागला चुकीचा बोलला चुकीची गोष्ट आपल्या बाबतीत पडली तरी लगेच रिऍक्ट न होता थोडासा विचार करा की त्या व्यक्तीच्या आयुष्यात काहीतरी अडचण आहे, की ज्यामुळे ती व्यक्ती वैतागली आहे आणि म्हणूनच ती इतकं वाईट बोलली, वाईट वागली.

“ती व्यक्ती माझ्याशी अशी का वागते?” असा गैरसमज सांभाळण्यापेक्षा त्या व्यक्तीच्या वर्तनामागे एखादा प्रॉब्लेम असू शकेल अशा दृष्टीने तुम्ही विचार केला तर आपण भावनांचं संतुलन साधू शकतो. मुळातच इतरांना त्रास देणारी व्यक्ती ही स्वतःच मधल्या कमीपणाच्या भावनेनेच इतरांना त्रास देत असते.

एक साधा विचार करा जेव्हा तुम्हाला साधं सर्दी-पडसं झालेलं असतं तेव्हा तुम्ही किती चिडचिडे होता. प्रत्येक गोष्टीमध्ये भांडण उकरून काढण्याची उर्मी येते ना अशा वेळी.

तसचं समोरच्या व्यक्तीला सुद्धा एखादी शारीरिक व्याधी किंवा मानसिक चिंता असू शकते. किंवा एखादा न्यूनगंड सुध्दा असू शकतो. ज्यामुळे ती व्यक्ती इतरांना त्रास देते.

त्यातला शारीरिक त्रास काहीवेळा लक्षात येऊ शकतो, पण एखाद्याच्या मनातली चिंता आपल्याला कधीच दिसू शकत नाही.

चिंता मनाला पोखरते, वेदना देते त्यामुळे एखादी व्यक्ती आपल्याशी, आपल्या बरोबर इतर लोकांशी ही वाईट वागलेली असू शकते.

जगामध्ये इतकी दुःख आहेत, समस्या आहेत, इतक्या अडचणी आहेत त्यामुळे माणसं दुःखी आहेत, चिंताग्रस्त आहेत.

त्यामुळे केवळ स्वतःचा विचार न करता समोरच्या व्यक्तीला समजून घेऊन त्याचे विचार त्याच्या भावना आणि त्याची नकारात्मकता आपण चांगल्या पद्धतीने हाताळली पाहिजे.

पटकन चिडून किंवा पूर्णपणे शांत राहून आपण नकारात्मकता थांबवू शकत नाही.

तर निर्लेप मनाने आपण समोरच्या व्यक्तीला सामोरं जाणं हाच आपल्यापासून नकारात्मकतेला दूर ठेवण्याचा योग्य पर्याय ठरतो.

या निगेटिव्ह उर्जेच्या व्यक्ती आपल्याशी कशा पद्धतीने वागतात त्याच्या विचारांमध्ये आपण नेहमी उगाचच गुंतून राहतो.

“ही व्यक्ती माझ्याशी इतकी वाईट वागली” , “ती माझ्याबद्दल वाईट साईट दुसऱ्यांना सांगत असते”, “माझ्या आदरच कोणी करत नाही”, “माझ्यावर कोणी प्रेम करत नाही” अशा भावना सतत निर्माण करून स्वतःमध्ये निगेटिव्ह एनर्जी निर्माण करू नका.

समोरची व्यक्ती अडचणींना, समस्येला तोंड देत असेल आणि म्हणून ती व्यक्ती चुकीचं वागत असेल हे समजावून घेऊन आपल्याकडे आलेल्या नकारात्मक ऊर्जेला चांगल्या प्रतीच्या सकारात्मक उर्जेमध्ये बदला.

हाच खरा आणि अतिशय सोपा उपाय आहे आपल्यापासून दुसऱ्यांची निगेटिव्हिटी दूर करण्याचा.

जेंव्हा तुमचं मन उदार होतं, क्षमाशील होतं तेंव्हा तुमचे विचार विशाल होतात…. आणि ही ऊर्जा तुम्हाला चांगल्या ठिकाणी वापरता येते.

अशावेळी प्रेम, आदर ,काळजी, शांती या भावनांमध्ये कुठल्याही अडचणी, कुठलेही ब्लॉक तयार होणार नाहीत.

तुमचं आयुष्य अतिशय उत्तम पद्धतीने यशस्वी वाटचाल करेल…..

भावनांवर कोणतंही औषध नसतं मात्र आपल्या भावनेला समजून घेऊन त्यांना योग्य वळण लावणं हे तरी आपल्या हातात नक्कीच असतं.

भावनांना योग्य पद्धतीने हाताळल्यामुळे त्याचा प्रभाव आपल्या शारीरिक मानसिक आरोग्यावर, मनःशांती वरती चांगल्या पद्धतीने पडतो.

नकारात्मक उर्जेपासून दूर पळून जाण्यापेक्षा तिचा स्वीकार करुन तिचं रुपांतर सशक्त सकारात्मक उर्जेत करणं हे महत्त्वाचं ठरतं.

हे नेहमीच लक्षात ठेवा.

afva nahi manachetalks psrva

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.