व्हेरिकोज व्हेन्स म्हणजे काय? व्हेरिकोज व्हेन्सची कारणे, लक्षणे आणि त्यावरचे उपचार

व्हेरिकोज व्हेन्स मराठी

व्हेरिकोज व्हेन्स म्हणजे नक्की काय? जाणून घ्या व्हेरिकोज व्हेन्सचे प्रकार, त्याची कारणे, लक्षणे आणि त्यावरचे उपचार

आपल्या शरीरात अनेक नसा असतात हे तर आपण सर्व जाणतोच. ह्या नसा आपल्या शरीरात रक्ताभिसरणाचे काम करतात.

जेव्हा ह्या नसांच्या आकारात वाढ होते तेव्हा त्यांना व्हेरिकोज व्हेन्स असे म्हणतात.

शरीरातील कोणत्याही नसांची वाढ होऊन त्यांचे व्हेरिकोज व्हेन्स मध्ये रूपांतर होऊ शकते. परंतु पायाच्या आणि पावलाच्या नसांमध्ये ह्याचे प्रमाण जास्त दिसून येते.

पायाच्या आणि पावलाच्या नसांवर उभे राहण्यामुळे आणि चालण्यामुळे आपल्या शरीराचा भार येतो त्यामुळे तेथील दबाव वाढतो. म्हणून व्हेरिकोज व्हेन्सचे प्रमाण पायाच्या नसांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येते.

व्हेरिकोज व्हेन्स त्वचेच्या खाली लगेच असणाऱ्या स्तरावर दिसून येतात. त्या निळ्या रंगाच्या आणि फुगलेल्या दिसतात. काही लोकांना व्हेरिकोज व्हेन्सचा काहीच त्रास होत नाही. परंतु काही लोकांमध्ये मात्र त्यामुळे रक्ताभिसरणाच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.

व्हेरिकोज व्हेन्सचे प्रकार 

१. मध्यम प्रकार

मध्यम प्रकारच्या व्हेरिकोज व्हेन्स निळ्या रंगाच्या असतात. त्या त्वचेखाली दिसून येतात. सहसा मध्यम व्हेरिकोज व्हेन्सची समस्या फार गंभीर मानली जात नाही. परंतु तरीही ह्याकडे खूप काळ दुर्लक्ष केल्यास ही समस्या गंभीर होऊ शकते.

२. गंभीर प्रकार

जर व्हेरिकोज व्हेन्सकडे बराच काळ दुर्लक्ष केले तर त्यांचे गंभीर प्रकारच्या व्हेरिकोज व्हेन्समध्ये रूपांतर होऊ शकते. अशा प्रकारच्या व्हेन्समुळे आरोग्याच्या गंभीर तक्रारी उद्भवू शकतात.

३. गरोदरपणात होणाऱ्या व्हेरिकोज व्हेन्सच्या समस्या

एखादी स्त्री जेव्हा गर्भवती असते तेव्हा तिच्या शरीरात रक्ताचे उत्पादन वाढते आणि त्यामुळे रक्तवाहिन्यांवर दाब येतो. त्यामुळे गरोदरपणाच्या कालावधीत स्त्रीच्या पाय आणि पोटाचा भाग येथे व्हेरिकोज व्हेन्स तयार होऊ शकतात.

४. स्पायडर व्हेन्स 

त्वचेच्या आतील स्तरावर कोळयाच्या जाळ्याप्रमाणे नसांचे जाळे दिसून येते. ह्या नसा बारीक आणि वाकड्यातिकड्या असतात. सहसा हा प्रकार फारसा गंभीर मानला जात नाही.

व्हेरिकोज व्हेन्सची लक्षणे

१. त्वचेखाली निळ्या, हिरव्या किंवा जांभळ्या नसा दिसून येणे.

२. दोरीसारख्या दिसणाऱ्या आणि वाकड्यातिकड्या नसा दिसणे.

३. नसा सुजलेल्या, फुगलेल्या, वर आलेल्या दिसणे.

४. सतत पाय दुखणे, जडावल्यासारखे वाटणे.

५. जास्त काळ उभे राहिले अथवा सलग जास्त वेळ बसले की पाय दुखणे.

६. पोटरी, घोटा आणि पावलांवर सूज दिसणे

७. नसांवर आणि आसपासच्या भागात खाज येणे.

८. त्वचेवर अल्सरचे चट्टे दिसून येणे. ही एक गंभीर समस्या आहे.

व्हेरिकोज व्हेन्स होण्याची कारणे

१. वाढते वय

वाढत्या वयानुसार शरीरातील नसांचा लवचिकपणा कमी होत जातो. त्या कडक बनू लागतात. अशा वेळी हृदयाकडे होणारा रक्तपुरवठा कमी होऊन नसांमध्ये रक्ताचे प्रमाण वाढते आणि व्हेरिकोज व्हेन्स दिसून येतात.

२. गरोदरपणा

एखादी स्त्री जेव्हा गर्भवती असते तेव्हा गर्भाच्या पोषणासाठी तिच्या शरीरातील रक्ताचे उत्पादन वाढते आणि त्यामुळे तिच्या रक्तवाहिन्यांवर दाब येतो. त्यामुळे गरोदरपणाच्या कालावधीत स्त्रीच्या पाय आणि पोटाचा भाग येथे व्हेरिकोज व्हेन्स तयार होऊ शकतात.

३. स्थूलता

स्थूलतेमुळे त्या व्यक्तीच्या शरीरातील नसांवरचा दबाव वाढतो आणि त्यामुळे व्हेरिकोज व्हेन्सची समस्या होऊ शकते.

व्हेरिकोज व्हेन्स होऊ नयेत म्हणून काय करावे?

व्हेरिकोज व्हेन्स होऊच नयेत ह्यासाठी थेट काही उपाय उपलब्ध नाहीत. परंतु त्यांचे प्रमाण कमीत कमी ठेवण्यासाठी खालील उपाय उपयोगी ठरतात.

१. भरपूर व्यायाम करणे

२. वजन आटोक्यात ठेवणे वापरणे.

३. फायबरयुक्त आणि कमी मिठाचा आहार घेणे

४. उंच टाचांचे चपलाबूट आणि घट्ट मोजे न वापरणे.

५. अधूनमधून पाय वर उचलणे

६. सतत बसलेले किंवा उभे असताना आपली स्थिति (पोज) बदलणे.

व्हेरिकोज व्हेन्सचे निदान

व्हेरिकोज व्हेन्सचे निदान करण्यासाठी डॉक्टर पायाच्या सुजलेल्या नसांचे प्रत्यक्ष निरीक्षण करून तपासणी करतात. त्याशिवाय सोनोग्राफी, व्हेनोग्राम ह्यासारख्या तपासण्या सुद्धा कराव्या लागू शकतात.

व्हेरिकोज व्हेन्सवरील उपचार

व्हेरिकोज व्हेन्सवर उपचार करताना डॉक्टर सर्वप्रथम जीवनशैलीमध्ये बदल करण्याचा सल्ला देतात. रुग्णाने जीवनशैलीमध्ये खालील प्रमाणे बदल करावे.

१. जास्त वेळ उभे राहू नये. सलग जास्त वेळ एका जागी बसू नये.

२. वजन आटोक्‍यात ठेवावे तसेच स्थूलता असेल तर ती ताबडतोब कमी करावी.

३. शरीरातील रक्ताभिसरण वाढवण्यासाठी शरीराच्या योग्य त्या हालचाली आणि व्यायाम अवश्य करावा.

४. गुडघ्यापर्यंतच्या पायावर दाब देणारे घट्ट मोजे किंवा स्टॉकिंग वापरावे.

५. झोपताना पायाखाली उशी घेऊन पाय उंच करावेत.

जीवनशैलीतील या बदलाप्रमाणे इतर काही उपचार देखील व्हेरिकोज व्हेन्सवर उपयोगी पडतात.

१. कॉम्प्रेशन

पावलांपासून गुडघ्यापर्यंत घट्ट असणारे मोजे किंवा स्टॉकिंग वापरणे. ह्यामुळे पायाच्या नसांवर दाब येऊन तेथे रक्त साठून राहत नाही. ते हृदयापर्यंत पोचून रक्ताभिसरण वाढते. तसेच यामुळे नसांची सूज देखील कमी होते.

२. सर्जरी

जीवनशैलीतील बदल आणि स्टॉकिंगच्या वापरामुळे देखील जर व्हेरिकोज व्हेन्सची समस्या कमी होत नसेल तर डॉक्टर सर्जरी म्हणजेच ऑपरेशन करण्याचा सल्ला देतात. सर्जरी दरम्यान फुगलेल्या नसांना चीर देऊन आणि कापून बरे केले जाते. व्हेरिकोज व्हेन्सची समस्या जर अगदीच गंभीर झाली असेल तर हा उपाय केला जातो.

तर मित्र-मैत्रिणींनो हा आहे, व्हेरिकोज व्हेन्सबाबत होणारा आजार आणि त्याची कारणे , लक्षणे आणि उपाय. या आजाराचे प्रमाण कमी असतानाच त्यावर योग्य उपचार केले तर तो सहजपणे बरा होऊ शकतो. परंतु दुर्लक्ष झाल्यास हा आजार गंभीर स्वरूप धारण करतो आणि त्याचे त्वचेवरील अल्सरमध्ये देखील रुपांतर होऊ शकते. त्यामुळे अशी काही लक्षणे आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि या आजारातून बरे व्हा.

Manachetalks

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!