नायिका

actress

संतोष दिघेला दारात बघून मी चक्रावलो.हसत हसत आता शिरलेला संतोष आमच्या सौ.च्या छद्मी चेहर्याकडे पाहून थंड झाला. हळूच मला म्हणतो “काय रे ……?? वहिनीला काही सांगितले नाहीस का माझ्याबद्दल ….??

तशी सौ म्हणाली “हो बोलले ना हे.….. पण तुम्हाला नावाने ओळखतात चेहऱ्याने नाही. तसेही लेखकांना कोण विचारतो म्हणा”.

संतोषचा पडलेला चेहरा पाहून आम्ही हसू लागलो. पाठीवर थाप मारून त्याला बसविले आणि विचारले “काय काम काढलेस ….??

पुढ्यात आलेल्या चहाचा घोट घेऊन संतोष म्हणाला “भाऊ…. सिरीयलसाठी एक मुलगी पाहिजे. नवीन फ्रेश चेहरा नायिका म्हणून. आहे का कोणी… ??

“काहीही काय विचारतोस ….?? माझा काय संबंध याच्याशी….?? मी चिडून बोललो.

स्वयंपाक घरातून सर्व बोलणे ऐकणारी सौ. ताबडतोब बाहेर आली. “भाऊजी …माझ्या भाचीला विचारू का ..??

“कोण ती स्वाती ….? मी ओरडूनच विचारले.” काहीही काय …?? त्याला नायिका हवीय. तिला अभिनयाचे ज्ञान शून्य आहे….

तसा संतोष उभा राहिला आणि सौच्या हातातील उपम्याची डिश काढून घेतली. मग एक चमचा उपमा तोंडात कोंबून म्हणाला” काही हरकत नाही. नाकीडोळी नीट आहे ना ….??? स्पष्ट बोलते ना …?? पुरेसे आहे आपल्यासाठी”.

“अरे काहीतरी काय बोलतोस दिघ्या..?? आता मी मुळावर आलो.” अरे ….ज्यांना अभिनयाचा गंध नाही त्यांना डायरेक्ट नायिकेचा रोल…..तुझ्यासारखी सगळ्यांची लॉटरी लागते का… ??

सौच्या चेहऱ्याकडे लक्ष जाताच मी गप्प झालो.

” नायिकेला अभिनय कुठे करायचा असतो भाऊ..?? माझ्या मालिकेत पहिल्या पन्नास भागात नायिका लहान मुलीसारखी हसते खेळते, झाडावर चढते, सायकल चालवते,पाण्यात उड्या मारते. आता हे सर्व करायला अभिनय कशाला हवाय. बरे ती काय करते…. म्हणजे कोणत्या खेळाची आवड…??

“फुटबॉल…”सौ शांतपणे उत्तरली.

“अरे देवा…..!! संतोषने थोडावेळ विचार केला, “हरकत नाही. आपण तिला फुटबॉल खेळायला लावू दोन एपिसोड”

“पुढे ….?? मी उत्सुकतेने विचारले.

“अरे ….नंतर पूर्ण सिरीयल ती रडणारच आहे. त्यामुळे एकच अभिनय करायचा आहे तिला. आता रडणे म्हणजे कपाळावर आठ्या आणि चेहरा जमेल तितका वाकडा ठेवणे डोळे मोठे करणे. कधीतरी चुकून हसायचे तेही चार ते पाच एपिसोडनंतर फक्त एक मिनिटं “.

मी सौ कडे पाहिले तिने फक्त मान डोलावली.

“हरकत नाही …. नसेल तर शिकव. आतापासूनच तिला साडी नेसून स्वयंपाक करायला शिकव. दोन तीन डान्स असतील तिचे. मैत्रिणीच्या लग्नात, दिराच्या लग्नात.. छान मिरवायला मिळेल तिला.

“अरे पण संतोष ….ह्या क्षेत्रात कितीतरी तरुण नायिका आहेत त्यातली का पाहत नाहीस तू ??? माझा भाबडा प्रश्न.

“बरोबर आहे तुझे भाऊ.. पण नवीन मुलगी घेतली की तिला पैसे कमी दयावे लागतात शिवाय ती डेट ही भरपूर देऊ शकते आणि जुन्या चेहऱ्यांना पाहून लोक कंटाळलीत. नायिकेला टिपिकल अभिनय करायचा असतो आणि हल्ली मध्यमवर्गीय मुली आवडतात सगळ्यांना “.

“म्हणजे स्वाती फिक्स तर…..” सौ आनंदाने म्हणाली.

” हो तर… घेऊन या तिला उद्याच” असे म्हणत संतोष उठला.

“संतोष असे असेल तर चरित्र अभिनेत्यासाठी माझा विचार कर ना…. ??  मी हसत विचारले.

“केला असता भाऊ… पण ते भरपूर पडलेत इंडस्ट्रीत आणि नायिका सोडून सर्वच चरित्र अभिनेते असतात. पाच सहा एपिसोडच काम असते त्यांना. त्यामुळे तुला चान्स नाही. येतो मी” असे बोलून तो बाहेर पडला.

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!