तुमचा जोडीदारा त्याच्या कुटुंबासमोर नमतं घेतो? तुमची बाजू घेत नाही का?

तुमचा/तुमची पार्टनर तुम्हाला एकटं सोडून, त्याच्या कुटुंबासमोर नमतं घेतो का? तुमची बाजू घेत नाही का? असे होत असेल तर काय करावे?

गौरव आणि नमिता हे एक आधुनिक जोडपं, लग्नाला ७/८ महिने झालेले. दोघेही IT मध्ये जबाबदारीच्या पदावर काम करणारे, सहाजिकच दोघांच्याही कामाच्या वेळा जास्त आणि जबाबदारीही तितकीच जास्त.

गौरवचे आई बाबा आणि हे दोघे असं चौकोनी कुटुंब. गौरवला नमिताच्या कामाची, तिच्यावरच्या जबाबदारीची पूर्ण कल्पना होती, परंतु त्याचे आई बाबा मात्र जरा जुन्या विचारांचे. त्यांना काही सुनेचे उशिरा येणे, घरातील कामे करायला तिला वेळ न मिळणे, आपल्या मुलाइतकाच वेळ तिने घराबाहेर राहणे पटेना.

त्यावरून त्यांनी नमिताला टोमणे मारणे, तिची तक्रार करणे सुरू केले. नमिता स्वतःची बाजू समजावून देण्याचा वारंवार प्रयत्न करत होती. तसेच घरातील सर्व कामांची योग्य व्यवस्था देखील लावत होती.

परंतु तिला आश्चर्य ह्या गोष्टीचे वाटले की ज्याने स्वतःच्या आई बाबांना समजावून सांगायला हवे होते, तो गौरव मात्र गप्प होता. त्याच्या कुटुंबासमोर त्याने नमिताची बाजू न घेता गप्प राहणे पसंत केले. आपल्या आईवडिलांना समजावून न सांगता उलट तो नमितालाच जुळवून घेण्यास सांगत होता.

तुमच्या बाबत देखील असे होत आहे का? तुमचा पार्टनर तुमची भूमिका योग्य असताना सुद्धा त्याच्या कुटुंबसमोर तुमच्या बाजूने बोलत नाही का? तो तुमचे म्हणणे त्याच्या कुटुंबाला योग्य पद्धतीने सांगत नाही का? असे असेल तर हा लेख तुमच्यासाठी, आणि तुमच्या जोडीदारासाठी महत्वाचा आहे.

अशा परिस्थितीत नक्की काय करावे ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

ज्या व्यक्तीबरोबर संपूर्ण आयुष्य घालवायचे असे ठरवून एखाद्या स्त्रीने त्याचा स्वीकार केलेला असतो मग ती नोकरी करणारी असो अथवा गृहिणी, तिची योग्य बाजू आपल्या कुटुंबासमोर उचलून धरणे हे तिच्या जोडीदाराचे कर्तव्य आहे परंतु बऱ्याच कुटुंबात असे होताना दिसत नाही.

तसेच आज २१ व्या शतकात अनेक पुरुषांची देखील अशा पद्धतीची कुचंबणा होत असू शकेल. अशा वेळी त्या त्या व्यक्तीने स्वतः पुढाकार घेऊन खालील उपाय करावेत…

१. तुमच्या जोडीदाराशी संवाद साधा

कोणत्याही नात्यामध्ये एकमेकांशी मनमोकळा संवाद असणे अतिशय महत्त्वाचे असते. तुमचा पार्टनर त्याच्या कुटुंबीयांसमोर तुमची बाजू घेत नाही, त्यांचा तुमच्याबद्दल काही गैरसमज होऊ नये यासाठी काही प्रयत्न करत नाही, अशी जर तुमची तक्रार असेल तर योग्य वेळ पाहून याबाबत तुमच्या पार्टनरशी स्पष्टपणे बोला.

तुमची नक्की भूमिका काय आहे, तुमची तुमच्या पार्टनर कडून काय अपेक्षा आहे हे सर्व त्याच्याशी मोकळेपणाने बोला. जर तुम्हाला काय वाटत आहे हे तुम्ही त्यांना सांगितले नाही ही तर ते समोरच्याला आपोआप कळेल अशी अपेक्षा धरणे चुकीचे आहे.

परंतु संवाद साधताना काही गोष्टींची खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा सुर हा संवादाचा असला पाहिजे, तक्रारीचा नाही.

तुम्ही जर तुमच्या पार्टनरकडे त्याच्या कुटुंबियांची तक्रार करत राहिलात तर त्याची ही चिडचिड होणे सहाजिक आहे. त्याऐवजी चांगल्या सुरात आणि योग्य वेळी तुमची देखील परिस्थितीतून मार्ग काढण्याची इच्छा आहे हे दाखवून देत संवाद साधला तर तो जास्त परिणामकारक ठरेल.

तसेच तुमचे म्हणणे आणि तुमची पार्टनरच्या कुटुंबीयांविषयी असलेली अपेक्षा सांगितल्यानंतर त्यावर विचार करण्याकरता तुम्ही तुमच्या पार्टनरला काही वेळ देणे आवश्यक आहे.

ताबडतोब परिणामांची अपेक्षा करून दु:खी होऊ नका. तुमच्या म्हणण्यावर विचार केल्यानंतर तुमच्या पार्टनरला तुमचे म्हणणे नक्कीच पटेल.

२. स्वतःला जास्त त्रास करून घेऊ नका

तुमच्या पार्टनरशी योग्य संवाद साधण्याबरोबरच या सर्व गोष्टींचा स्वतःला कमीत कमी त्रास होईल याकडे देखील लक्ष द्या.

जोडीदाराच्या कुटुंबियांबरोबर दररोज होणारे वाद-विवाद टाळा. आपले काम, आपली तब्येत याकडे जास्त लक्ष द्या. अर्थात हे सर्व करत असताना आपले कर्तव्य करण्यास चुकू नका.

घरातील कामे करणे, घरातील ज्येष्ठांची, त्यांच्या तब्येतीची काळजी घेणे, लहान मुले असतील तर त्यांची काळजी घेणे या सर्व जबाबदाऱ्यांचे योग्य रीतीने वाटप करून घ्या. तुमच्या वाट्याला येणारी सर्व कामे जबाबदारीने पार पाडा.

अर्थात हे सर्व करत असताना स्वतःला मानसिक त्रास होणार नाही याची काळजी जरूर घ्या. सर्व प्रसंगातून सामोपचाराने, संवाद साधून मार्ग काढता येऊ शकतो यावर विश्वास ठेवा.

आपण जर आपले कर्तव्य योग्य रीतीने पार पाडत असू तर कोणाला आपल्याबद्दल तक्रार करायला जागा उरत नाही. परंतु अर्थातच आपल्या कर्तव्याच्या जाणिवेबरोबरच आपल्या हक्कांचीही जाणीव असावी आणि कोणताही अन्याय सहन करू नये.

३. कुटुंबीयांशी बोलून मार्ग काढण्याचा प्रयत्न करा

पार्टनरशी संवाद साधणे किंवा स्वतःला मानसिक त्रास न करून घेणे या गोष्टी तर आहेतच. पण त्याच बरोबरीने गरज पडल्यास आपली बाजू घरातील सर्व लोकांसमोर ठामपणे मांडता येणे हे देखील आवश्यक आहे.

तुमचे जे काही म्हणणे असेल ते घरातील सर्व मंडळींना योग्य प्रकारे समजावून सांगा, तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमच्यावर असणाऱ्या जबाबदाऱ्या, त्याकरता तुम्हाला किती काळ घराबाहेर राहावे लागते या सर्व परिस्थितीची कल्पना घरातील लोकांना आधीच द्या, सर्वांच्या तब्येतीनुसार घरातील कामे, पथ्य-पाणी हे सर्व कसे सांभाळता येईल याचा सर्वांनी मिळून विचार करा.

आवश्यक असल्यास घरातील कामांसाठी दिवसभराची अथवा 24 तासांची मदत घ्या. असे मदतनीस ठरवताना घरातील ज्येष्ठ मंडळींचा सल्ला अवश्य घ्या, कारण जास्त वेळ ते घरात असतात तर त्यांची सोय पाहणे जास्त गरजेचे आहे.

त्यांच्या तुमच्याविषयी नक्की काय तक्रारी आहेत हे समजून घेण्याचा देखील प्रयत्न करा. आपले काम आणि आपले घर, आपल्या वरील वेगवेगळ्या जबाबदाऱ्या यांमध्ये संतुलन राखण्याचा प्रयत्न करा.

तसेच आपला पार्टनर जर आपल्या बाजूने बोलत नसेल तर गप्प न राहता स्वतः स्वतःची बाजू योग्य प्रकारे मांडायचा प्रयत्न करा.

तर मित्र मैत्रिणींनो, आपला/आपली पार्टनर जर आपली बाजू घेत नसेल तर स्वतः त्याच्याशी/ इतरांशी बोलून त्यातून मार्ग काढा. कुढत राहून, स्वतःला त्रास करून घेऊ नका. संवादाने कोणताही प्रॉब्लेम सॉल्व करता येऊ शकतो ह्यावर विश्वास ठेवून तसा प्रयत्न जरूर करा.

याबाबतीतले तुमचे अनुभव आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसेच इतरांना ही माहिती कळण्यासाठी हा लेख जास्तीतजास्त शेयर करा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय