ट्रायल सब्जेक्ट्स

माझ्या कॉटवर पडून मान एका बाजूला करून अश्रूंना वाट मोकळी करून मी खोलीतल्या तिच्या भागात बघत होते.

तिची मुलगी सामानाची आवराआवर करत होती. कॉट शेजारी ठेवलेल्या टेबलवरची कपबशी, ताटली चमचा, नातेवाईकांनी आणलेली फळं आणि बिस्किटाचे पुडे सगळं भरून ठेवलं. नवऱ्याने मग सगळी औषध आवरली. डॉक्टरांच्या चिठ्ठीत वाचून लागणारी औषध वेगळी काढली, न घ्यायची उरलेली औषधं आणि हॉस्पिटलला रिप्लेस करायच्या औषधांची चिठ्ठी घेऊन मुलाला फार्मसी मधे पाठवलं.

माझ्या भागात ही आवराआवरी करायची वेळ येणारे लवकर हे मला माहीत होतं, पण ती घरी जाण्यासाठी की आणखी दुसऱ्या हॉस्पिटल मधे जाण्यासाठी हे मला कळत नव्हतं. पण हे आशिषला, माझ्या नवऱ्याला, कळलं असावं कदाचित. आज जास्तच हळवा वाटत होता. सकाळपासून बसून होता माझ्या बाजूला. डोक्यावरून हात फिरवत होता माझ्या. ट्रीटमेंट नंतर गेलेले केस परत वाढायला लागले होते, ते त्याला टोचत असतील असं सारखं वाटत होतं.

कधीकाळी माझ्या लांबसडक केसांतून असाच हात फिरवायचा तो. एकेक बट घेऊन त्याच्या बोटांच्या फटीमधून सोडवायचा. आता त्याला कसं वाटतं असेल? एकदा वाटलं की त्याचा हात बाजूला घेऊन माझ्या हातात घट्ट पकडून ठेवावा पण तो करत होता ते आवडत ही होतं आणि हात उचलण्याइतके अंगात त्राण ही वाटत नव्हते. नजर फिरवून मी त्याच्याकडे पाहिलं, त्याच्या दुसऱ्या हाताने त्याने माझ्या डोळ्यातलं पाणी पुसलं.

काही खावंसं वाटतंय का विचारलं. मी नाही म्हणल्यावर टेबलावर झाकून ठेवलेल्या वाटीतलं नारळपाणी मला चमच्याने पाजलं आणि दुपारी आई डब्यात माझी आवडती कण्हेरी पाठवणार असल्याचं सांगितलं. मला पाणी पाजून त्याचं समाधान झाल्यावर त्याने वाटी परत झाकून ठेवली, माझं तोंड टिशू पेपरने पुसलं, चमचा धुवून ठेवला आणि डॉक्टरांनी भेटायला बोलवलंय असं सांगून गेला.

जाता-जाता तिचा नवरा आणि आशिष काहीतरी बोलले, “फोन करतो” अशी खूण करून आशिष घाईत निघून गेला. गेल्या काही महिन्यात ह्या दोघांचीही मैत्री झालीच होती. मी मान परत तिच्या दिशेने वळवली, ती ही माझ्याकडेच बघत होती. शेजारी उभ्या असलेल्या मुलीला सांगून मग हळू हळू चालत माझ्या कॉटपाशी आली. तिला सोडून तिची मुलगी परत गेली आणि आम्ही दोघी एकमेकींचा हात हातात घेऊन बसलो, बराच वेळ, काहीच न बोलता. दोघीनांही पहिली भेट आठवत होती आणि खरंतर पहिल्या भेटीतच ह्या शेवटच्या भेटीची कल्पना होती, कोणी कोणाचा निरोप आधी घ्यायचा इतकाच काय तो प्रश्न होता.

सहा महिन्यांपूर्वी मला ती भेटली होती…..

marathi-storyमाझ्या कर्करोगावर एक उपाय म्हणून डॉक्टरांनी सुचवलेल्या त्यांच्याच एका मित्राच्या ‘Clinical Trial’मध्ये सहभागी होण्याचा निर्यण मी आणि आशिषने घेतला होता. कसलंस नवीन औषध बाजारात आणायचं होतं. त्याची प्राण्यांवर तपासणी झाली होती, आणि माणसांमध्येही किती मात्रेत हे औषध द्यायचं ह्याचं संशोधन झालं होतं. आता हे आम्हाला, रुग्णांना, देऊन तपासायचं होतं की हे जितकं लॅबोरेटरीमध्ये सुरक्षित आणि परिणामकारक वाटलं तितकं खरंच आहे का?

झालाच तर फायदाच होणार होता, मला नाही तरी पुढे कोणालातरी झालाच असता. तसंही “अजून कोणता उपाय नाही, ह्यात सहभागी नाही झालात तर तुमची आहे ती ट्रीटमेंट सुरूच राहील त्यात काही कमीजास्त नाही पण ह्याने कदाचित फायदा होऊ शकतो” असं डॉक्टरांनी सांगितलंच होतं आणि निर्णय आमच्यावर सोडला होता. तीन वर्ष ह्या रोगापायी पैसे नुसते खर्च होत होते, ह्या ट्रायल मधे सहभागी झालो तर औषधं, लॅब रिपोर्ट्स, मधे करावं लागलच तर हॉस्पिटलायझेशन, इतकंच काय यायचा जायचा खर्च पण आपल्याला करायचा नव्हता. दोन डॉक्टर्सना भेटून, मनातल्या सगळ्या शंकांचं निरसन करून ह्या ट्रायलमधे भाग घ्यायचा निर्णय घेतला.

ह्याच ट्रायलच्या पहिल्या व्हिजिटला मला भेटली होती अपर्णा, माझ्याहून बरीच मोठी पण पहिल्यापासून अपर्णा म्हणूनच हाक मारली. दर आठवड्याला यायचं होतं, एकाच रोगाने ग्रासलो होतो आणि माझ्या पुढेच उभी होती म्हणून पटकन ओळख झाली. त्यावेळेस तिकडे एक चुटपूतीत मुलगी होती, डॉक्टर प्रत्येक पेशन्टला ट्रायल बद्दल नीट समजावून सांगत होते. फायदे, तोटे काहीच लपवाछपवी नव्हती तेंव्हा ही मुलगी, पूर्वा, आमच्याकडून एका फॉर्मवर सही करून घेत होती. ह्याच वेळेस डॉक्टरांनी आम्हाला ‘ट्रायल सब्जेक्ट्स’ ना काही महत्वाची माहिती दिली आणि ती माहिती आमच्या पर्यंत पोहोचली ह्याची नोंद पूर्वा करत होती.

पुढे मग माझी आणि अपर्णाची मैत्री वाढली, व्हिझीटला एकत्र जाणं सुरु झालं, आशिषने सोडलं तर अपर्णाचा नवरा किंवा मुलगा आणायला यायचा त्यामुळे तिच्या घरच्यांबरोबर ओळख झाली. तिचं आणि मुलांमधलं प्रेम बघून खूप भरून यायचं, मला आई होताच नाही आलं आणि माझ्यामुळे आशिषला ही बाबा होताच येणार नव्हतं ही गोष्ट सतत सलत राहायची. अपर्णाला ही पोरांची काळजी होती, मुलगा २० वर्षाचा होता पण मुलगी अडनिड्या १५व्या वर्षात आणि बरोबर अशावेळेलाच नातेवाईकांचा आणि मित्रमंडळींचा खरा चेहरा दिसतो तसा तिला ही दिसला होता. एकमेकांचं दुःख समजून घेणाऱ्या आम्ही दोघीच एकमेकांसाठी होतो.

असंच छान नातं पूर्वाशी ही झालं होतं, मैत्री नाही म्हणता येणार ती एथिक्स आणि प्रोफेशनला बांधली गेली होती पण तिची काळजी, प्रेम दिसायचं. शिकण्याचा उत्साह होताच पण त्याचबरोबर आम्हा सब्जेक्ट्सबद्दल कळकळ ही दिसायची. आमच्यावर ट्रीटमेंटचा उपयोग होत होता का माहित नाही पण ह्या मुलीच्या उत्साहाचा, सकारात्मकतेचा नक्की होत होता.

दिवस भरभर जात होते, चालू असलेली किमो आणि ही ट्रायल त्यांचे विपरीत परिणाम दाखवत होते, बाकी परिणाम डोळ्याला दिसत नव्हते पण बरं होऊ अशी आशा मनात घर करून होती आणि अशातच एकदा अचानक मध्यरात्री मला खूप उलट्या सुरु झाल्या. ट्रायलच्या दरम्यान कसलाही त्रास झाला, अगदी किंचित अंग गरम जरी वाटलं तरी, लगेच डॉक्टरांना कळवायचं असं सांगितलं होतं आणि त्याप्रमाणे आम्ही कळवलं आणि लगेच ऍडमिट झालो.

दुसऱ्या दिवशी अपर्णाला ही असाच त्रास झाला, योगायोगाने. ट्रायलमधल्या सगळ्याच सब्जेक्ट्सची विशेष काळजी घेतली जाते त्यामुळे आमच्या ह्या उलट्यांचा ट्रायल ड्रगशी काही संबंध आहे का ह्याचा शोध सुरु झाला, तसं असेल तर आम्हाला ताबडतोब ट्रायल मधून काढून टाकलं असतं. पण चालू असलेल्या कुठल्याच औषधाला न जुमानता रोगच बळकट होत चालला होता असं समजलं. ट्रीटमेंट आणि ट्रायल सगळं सुरूच आणि आम्ही हॉस्पिटलमध्ये, एकाच खोलीत, किती दिवस ह्याचा हिशोब आता लक्षात नाही.

कशातच काही नसताना अचानक तब्येत बिघडली होती तशीच अचानक सुधारायला लागली पण फक्त अपर्णाची. आणि शेवटी आज तिला घरी जायचा ग्रीन सिग्नल मिळाला होता.

“तू पण लवकर बरी हो. माझ्यानंतर माझ्या मुलांची आई तू होणारेस असं वचन दिलं आहेस मला, विसरलीस का घाबरलीस?” अपर्णाने मला भूतकाळातून बाहेर आणलं आणि तितक्यात आशिष आत आला. त्याच्या मागून पूर्वा आणि डॉक्टर. मला कळलं आता परत कसलीतरी माहिती सांगणं, नोंदी करणं, परत त्या सह्या, साक्षीदार.. हे सगळं का? जाणारा माणूस कोणता ही प्रयोग सहन करूच शकतो ना?

“एक ‘अनऍप्रूवड’ ड्रग आहे, त्याला बाजारात यायला परवानगी नाही पण काहीच उपाय नसल्यास, शेवटचा इलाज म्हणून वापरतात म्हणे. आपल्याला ह्या औषधांचा काहीच उपयोग झाला नाही, आजार बळकट होतोय आणि किमोने खूप अपाय होतोय त्यामुळे आता हा एक शेवटचा उपाय म्हणून डॉक्टर हे औषध वापरायची परवानगी मिळतीये का बघताहेत. ते वापरायची परवानगी मिळाली तर ठीके.” आशिष असं तुटक काहीतरी बोलला आणि डोकं हातात घालून बसला. उरलेलं सांगायला डॉक्टर होतेच.

माझं शरीर चालत नसलं तरी आता खोलीतला आमचा भाग आवरायची वेळ ही आलीच आहे हे कळण्याइतपत डोकं तेवढं चालू होतं नेमकं……..

 लेखिका- मुग्धा शिरीष शेवाळकर

याही कथा तुम्हाला खूप आवडतील ….🎁🎁

भेटली ती पुन्हा……
अनुबंध
कौल


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय