रविवारची सुट्टी ‘नुसतीच आळसात’ कंटाळवाणी घालवत असाल तर हे ट्राय करून बघा

रविवारची सुट्टी कोणी सुरू केली

‘दिवस उद्याचा सवडीचा, रविवार माझ्या आवडीचा‘ हे गाणं लहानपणी सगळ्यांनी म्हटलेलं असतं. लहान असताना आपल्याला सगळ्यांना रविवार इतका आवडतो की भोलानाथला आपण आठवड्यातून रविवार किमान तीनदा येऊ दे अशी विनंती करतो.

पण जसजसे आपण सगळे मोठे व्हायला लागतो तसतसे जबाबदारीच्या ओझ्याखाली इतके दबून जातो की रविवार म्हणजे आठवड्याचा सुट्टीचा वार सुद्धा नकोसा वाटायला लागतो. रविवारी करायची म्हणून इतकी कामे मागे लागतात की हळूहळू सुट्टीचा कंटाळा यायला लागतो. कामांच्या यादीत आपण इतके गुरफटून जातो की सुट्टीचा आनंद घ्यायचेच विसरून जातो.

त्याशिवाय रविवार संपला की येणाऱ्या सोमवारी पुन्हा नेहमीचे रुटीन सुरू होऊन नोकरी व्यवसायातील कामे करायची आहेत या कल्पनेने रविवार आणखीच कंटाळवाणा होऊ लागतो.

सुट्टीनंतर कामावर जाणे जीवावर येत असेल तर या ५ गोष्टी करा

पण असे होऊ नये म्हणून आज आम्ही तुम्हाला तुमचा संडे ‘फन’डे कसा बनवता येईल ह्याच्या काही ट्रिक्स सांगणार आहोत.

ह्या ट्रिक्सचा वापर करून तुम्ही तुमचा सुट्टीचा वार अगदी एन्जॉय करू शकता. रविवार आनंदात घालवू शकता. चला तर मग पाहूया सुट्टीचा आनंद घेण्यासाठी काय करता येईल?

१. व्यायाम करणे

रविवार म्हंटले की सुट्टीचा दिवस, त्यामुळे सगळ्यांचाच रविवार आळसात घालवण्याकडे कल असतो. परंतु तसे करण्यामुळे मरगळ येऊन पुढचा संपूर्ण आठवडा देखील कंटाळवाणा वाटू लागतो.

त्याऐवजी रविवारी सकाळी थोडे लवकर उठून जर आपण काही योगासने किंवा एरोबिक्स यासारखे व्यायाम केले तर उत्साही आणि ताजेतवाने वाटते.

आधीच्या आठवड्याचा संपूर्ण थकवा निघून जातो, सगळी मरगळ झटकली जाते आणि आपण सुट्टीचा दिवस आनंदात घालवून पुढील आठवड्यात करायच्या कामांना सामोरे जाण्यास सज्ज होतो.

योगासनांसारख्या व्यायामामुळे मानसिक स्वास्थ्य टिकून राहण्यास देखील मदत होते. त्याच प्रमाणे आपण सकाळच्या वेळी मोकळ्या हवेत फिरायला जाणे, पळायला जाणे यासारखे व्यायाम देखील करू शकतो.

व्यायाम करण्यामुळे शरीरातील स्नायूंचे आखडलेपण कमी होऊन ते बळकट होण्यास मदत होते. कोणताही व्यायाम करताना वॉर्म अप आणि स्ट्रेचिंग करायला मात्र विसरू नका.

तुमच्याकडे एखादा पाळीव कुत्रा किंवा मांजर असेल तर त्यांना फिरायला घेऊन जाणे हा देखील एक चांगला व्यायाम असू शकतो. नियमित व्यायाम करण्यामुळे शरीरात एंडोरफिस नावाच्या हार्मोनची निर्मिती होते.

या हार्मोनमुळे मेंदूला आनंदी राहण्याचे संदेश मिळतात. नैराश्‍य कमी करण्यास या हार्मोनची खूप मदत होते.

२. सकाळच्या कोवळ्या उन्हात बसणे

हल्ली व्यस्त आणि धावपळीच्या जीवनामुळे दररोज कोवळे ऊन मिळणे जवळपास अशक्य बनले आहे. त्यामुळे कोवळ्या उन्हातून मिळणाऱ्या ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता हल्ली सर्वांना भासू लागली आहे. परंतु रविवारी म्हणजेच सुट्टीच्या दिवशी मात्र आपण हे सहज साध्य करू शकतो.

सुट्टी म्हणजे उशिरा उठायचे हे समीकरण बदलून थोडे लवकर उठून गरम वाफाळत्या चहाचा कप हातात घेऊन गच्ची किंवा बाल्कनीत कोवळ्या उन्हात बसावे.

असे करण्यामुळे आपल्याला ताजेतवाने तर वाटतेच त्याशिवाय शरीराची ‘ड’ जीवनसत्वाची कमतरता देखील भरून निघण्यास मदत होते.

कोवळ्या उन्हात किमान १० ते १५ मिनिटे बसावे. कुटुंबातील सदस्यांनी एकत्र बसून हा आनंद घेतल्यास सोन्याहून पिवळे.

३. गरम पाण्याने आंघोळ करणे

बऱ्याच लोकांना सुट्टीच्या दिवशी आळसामुळे किंवा ‘आता कुठे ऑफिसला जायचे आहे’ या कल्पनेमुळे आंघोळ करायचा कंटाळा येतो.

परंतु असे न करता उलट रविवारी जास्त वेळ घेऊन छान गरम पाण्याने निवांत, सचैल स्नान करावे. आपल्या त्वचेची, केसांची काळजी घ्यावी. केसांना तेल लावणे, हातापायांना मॉइश्चरायझर लावणे या गोष्टी आठवड्याभरात पुरेसा वेळ न मिळाल्यामुळे करता येत नाहीत.

अशा सर्व गोष्टी रविवारी जरूर कराव्यात. त्यामुळे केसांची आणि शरीराची निगा तर राखली जातेच पण मनालाही आनंद मिळतो. पुढील आठवड्यात काम करण्याचा उत्साह दुपटीने वाढतो.

४. ध्यानधारणा करा

ध्यानधारणा किंवा मेडिटेशन हे मनःशांतीसाठी खूप उपयुक्त आहे. रविवारच्या सुट्टीच्या दिवशी देखील तुम्ही जर तुमच्या नोकरी किंवा व्यवसायातील कामांचा विचार करत राहिलात तर तुमच्या मनाला ताजेतवाने वाटणार नाही.

मनातले कामाचे विचार बाजूला टाकून दिवसभरात किमान काही मिनिटे तरी स्वस्थ बसा, डोळे मिटून ध्यान करण्याचा प्रयत्न करा. असे करण्यामुळे मन आणि शरीर या दोघांनाही आराम मिळतो आणि मनातले नकारात्मक विचार, नैराश्य बाजूला टाकले जाते. शक्‍यतो दररोज ध्यानधारणा करण्याची सवय लावून घ्यावी.

५. आवडीच्या छंदाला वेळ द्या

आपला रविवार आनंदात घालवण्यासाठी त्या दिवशी तुमच्या आवडीच्या छंदाला आवर्जून वेळ द्या. बाग काम करणे, चित्र काढणे, नृत्य करणे, गाणे शिकणे, एखादे वाद्य वाजवायला शिकणे, वेगवेगळ्या प्रकारच्या हस्तकला शिकणे यासारखे छंद जोपासा.

त्या व्यतिरिक्त चांगली गाणी ऐकणे, वाद्य संगीत ऐकणे यामुळे देखील आपल्या मनाला उभारी येऊन उत्साहित वाटते. मनामध्ये सकारात्मक भावना निर्माण होतात.

६. आवडत्या व्यक्तींशी बोला

एरवी आठवडाभर व्यस्त असल्यामुळे आपल्याला आपल्या आवडत्या व्यक्तींशी बोलायला वेळ मिळत नाही. रविवारी आवर्जून ते काम करा. घरात असणाऱ्या वृद्ध लोकांशी बोलणे, लहान मुलांशी खेळणे ह्या गोष्टी मनाला एक निराळाच आनंद देतात.

त्याचप्रमाणे दूर असणाऱ्या एखाद्या नातेवाईक किंवा मित्र मैत्रिणीशी फोनवर बोला. असे करण्यामुळे आपण सर्वांच्या संपर्कात राहू शकतो आणि आपल्याला आणि समोरच्या व्यक्तीला देखील खूप आनंद मिळतो.

७. दिवसभराची सहल आयोजित करणे

दररोजच्या व्यस्त दिनक्रमात बाहेर जाणे, एखाद्या सहलीला जाणे हे सहज शक्य होत नाही. परंतु बाहेर जाण्यासाठी मोठ्या सुट्टीची वाट बघत न बसता रविवारी एखादी एक दिवसीय सहल आयोजित करा.

घराजवळचे एखादे निसर्गरम्य ठिकाण, चांगले रिसॉर्ट, समुद्रकिनारा, बाग या ठिकाणी तुमचा दिवस व्यतीत करा.

असे करण्यामुळे मनाला उभारी येऊन ताजेतवाने वाटते. सहल म्हटली की ती परदेशात किंवा परगावी असली पाहिजे असे काही नाही.

आपल्या घराजवळ देखील अशी अनेक ठिकाणे असतात जी आपण पाहिलेली नसतात आणि खरे तर अतिशय सुंदर, निसर्गरम्य असतात.

अशा ठिकाणांना आपल्या कुटुंबीय किंवा मित्रमंडळीं समवेत भेट देऊन सुट्टीचा दिवस खऱ्या अर्थाने एन्जॉय करा.

मित्र-मैत्रिणींनो, अशाप्रकारे आपला सुट्टीचा दिवस घालवून आपण आपला संडे फनडे बनवू शकतो. या सर्व ट्रिक्सचा वापर करून तुमचा दिवस आनंदात घालवा. तुमच्याकडे आणखी काही ट्रिक्स असतील तर त्या आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. स्वस्थ राहा आनंदी राहा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!