तुमच्या सगळ्या चिंता दूर करतील, फक्त हे ६ कानमंत्र

marathi-prernadayi

कोणाच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स नाहीत? प्रॉब्लेम्स नाहीत असा कोणीच जीव या जगात नाही. जगणे म्हणजे काय हेच तर असते, आलेल्या प्रॉब्लेम्सचा सामना करत करत सुख प्राप्त करणे.

कधीकधी आपली लाईफ आधीपासूनच कॉम्प्लिकेटेड असते तर कधीकधी आपण स्वतः ती अधिक किचकट बनवतो.

किचकट लाईफ जगणे, प्रॉब्लेम्स घेऊन जगणे म्हणजेच जीवन जगणे नाही, तर त्या प्रॉब्लेम्सचा हसत हसत सामना करणे आणि अगदी साधेपणाने जीवन जगणे होय.

प्रॉब्लेम असलेली लाईफ म्हणजे काय? डोक्यावर कर्जाचा डोंगर, न पुरणारा पगार, घरात सतत भांडणे, मित्र-मैत्रिणी नाहीत, कामात सतत मतभेद, मग या टेन्शनमधून एखादे व्यसन करणे आणि ते व्यसन सोडण्यासाठी पुन्हा संघर्ष करत राहणे.

असे बरेच अडचणींचे प्रकार आपल्याला भेडसावत असतात.

म्हणजे प्रॉब्लेम एकच असतो पण, आपण त्यावर अतिविचार करून किंवा काहीच विचार न करता वागत राहून, त्याचा इतर गोष्टींवर परिणाम करून घेतो आणि प्रॉब्लेम्सचा गुंता वाढवत जातो.

कर्ज हा एक प्रॉब्लेम असतो पण त्याचा इतर गोष्टींवर इतका परिणाम होतो की त्यातून दहा नवीन प्रॉब्लेम्स निर्माण होतात.

त्यामुळे प्रथम पहिल्या प्रॉब्लेमवरच जर मात केली तर पुढील प्रॉब्लेम्स निर्माणच होणार नाहीत.

अशावेळी आपल्याला काय केले पाहिजे? टेन्शन घेतल्याने आपल्या हाती काहीच लागत नाही. उलट अनेक समस्या निर्माण होतात.

प्रत्येकासाठी आदर्श जीवनाची व्याख्या वेगवेगळी असते. प्रत्येकाची दिनचर्या वेगवेगळी असते.

प्रत्येकाला आयुष्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी हव्या असतात आणि त्या गोष्टी मिळाल्या नाहीत, तर आपण वेगवेगळे किचकट प्रयत्न करून त्या गोष्टी मिळविण्याचा प्रयत्न करतो.

नेहमी किचकट प्रयत्न करूनच गोष्टी मिळतात असं नसून, कधीकधी सोप्या मार्गांनी देखील गोष्टी मिळवता येतात. आज आपण या लेखात अशाच काही सोप्या मार्गांची माहिती पाहू.

आयुष्यातील अडचणी सोप्या करण्याचे ६ मार्ग

१. पुढच्यास ठेच, मागचा शहाणा – ही म्हण तुम्ही ऐकून असाल. तर नेहमी या म्हणीचा तुमच्या जीवनात वापर करा. आपल्या भूतकाळातून आपण खूप काही गोष्टी शिकल्या पाहिजे.

भूतकाळातून शिकणे म्हणजे ज्या चुका आधी केल्या आहेत त्याच पुन्हा-पुन्हा करणे नाही.

तर, त्या चुकांमधून काय शिकायला मिळाले, त्या धड्याचा वापर तुमच्या वर्तमान आणि भविष्यासाठी करणे होय.

यामुळे तुम्हाला आलेल्या समस्येवर अतिविचार करण्याची किंवा ती समस्या आणखी किचकट बनविण्याची गरज उरणार नाही.

२. तुमच्या सुखी जीवनासाठी नक्की काय महत्त्वाचे आहे – आपण जीवनातील कोणत्याही गोष्टी अशाच करत नाही. प्रत्येक गोष्टीमागे कारण असते. जेव्हा आपण गोष्टी अशाच करतो तेव्हा आपले जीवन अर्थहीन झालेले असते.

त्यामुळे रोज आपण करत असलेल्या प्रत्येक गोष्टीमागचे कारण शोधता आले पाहिजे.

एकदा कारण सापडले की आपल्याला त्यातील काय महत्त्वाचे आहे व काय महत्त्वाचे नाही हे समजते.

जे महत्त्वाचे आहे तेच आपल्या जीवनात ठेवले पाहिजे. बाकीच्या महत्त्व नसलेल्या गोष्टी आयुष्यातून काढून टाकणेच योग्य राहील.

३. सतत बिझी राहण्यापेक्षा, कार्यशील बनण्याकडे लक्ष द्या – टेन्शन घालवण्यासाठी कित्येक जण एखाद्या कामात मन गुंतवण्याचा विचार करतात.

परंतु, फक्त एखाद्या कामात मन गुंतवून आपले प्रॉब्लेम्स कधीच सुटत नाहीत व त्यातून निष्पन्न देखील काहीच होत नाही.

कोणत्याही कामात मग्न राहण्यापेक्षा, जे काम आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे अशा कामात मग्न राहणे आपण निवडले पाहिजे.

४. आधी द्यायला शिका मग एखाद्या गोष्टीची अपेक्षा करा – कधी कधी आपण अत्यंत स्वार्थी वागत असतो. कित्येकदा आपण फक्त एखाद्याकडून काहीतरी मिळवण्याची अपेक्षा करतो.

परंतु आपल्याला देताही आले पाहिजे. त्यासाठी आधी आपण देणारे झालो पाहिजेत.

जर तुम्हाला प्रेम हवे असेल तर तुम्हाला लोकांना आधी प्रेम देता आलं पाहिजे, मित्र हवे असतील तर लोकांशी प्रेमाने बोलून मैत्री करता आली पाहिजे.

५. ऐकावे जनाचे करावे मनाचे – तुमच्याकडे कितीही मित्र, नातेवाईक असले तरी तुम्ही तुमच्या अडचणींसाठी त्यांचे मत काय आहे हे जाणून घेऊ शकता.

परंतु, नेहमी कृती हि तुमच्या मनाला पटणारी असावी. इतरांचे मत विचारात घेऊन तुमच्या परिस्थितीला योग्य ठरेल असा निर्णय घेण्याची क्षमता तुमच्यात विकसित करा.

तुमच्यातली निर्णयक्षमता वाढविण्यासाठी काय करावे हे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

याचा जर तुम्ही तुमच्या जीवनात अवलंब केला तर तुमच्या आयुष्यातला गुंता सोडवणं तुम्हाला सहज शक्य होईल.

६. आयुष्य पर्फेक्ट नसलं तरी चालेल पण साधं सोपं आणि सरळ असलं पाहिजे – कित्येकदा आपण पर्फेक्ट लाईफसाठी खूप आटापिटा करतो पण त्या प्रयत्नात आयुष्य अधिकच अवघड होऊन जातं.

जेवढी आपल्याला आपली लाईफ सिंपल ठेवता येईल तेवढे आपण आयुष्यात जास्त सुखी राहू शकतो.

त्यामुळे प्रॉब्लेम्सना आणखी किचकट बनवण्यापेक्षा आपण त्यांना सोप्या रितीने कसे सोडवू शकतो याचा विचार करायला हवा.

त्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात काही अवघड समस्यांचा सामना करत असाल तर आधी त्या समस्यांमागील कारण जाणून घ्या, अधिक किचकट उपाय करून बघण्यापेक्षा साध्या – सोप्या उपायांचा वापर करून गुंता सोडवा. यामुळे तुमचे जीवन अधिक सुखी होईल.

Manachetalks

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

 

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!