मुलांचा डबा झटपट संपेल अशा ६ पौष्टिक रेसिपीज

“आई, रोज काय गं तेच तेच टिफीन मध्ये, मला कंटाळा येतो, काहीतरी मस्त खाऊ देत जा ना….”
घराघरातला हाच संवाद आहे आणि मग आईच्या समोर यक्षप्रश्न उभा रहातो. रोज नवीन काय करू?
शिवाय टिफीन मधले पदार्थ पौष्टिक तर असलेच पाहिजेत!!!
या लेखातून पाहूया सहा पौष्टिक आणि रुचकर रेसिपीज. सोमवार ते शनिवार दर दिवशी आलटून पालटून यातला एक पदार्थ तुम्ही देऊ शकता!!!
१ मिक्स भाज्यांचा पराठा
पोळी भाजी सतत खाऊन मुलांना कंटाळा येतो. मग असा पराठा रुचिपालट करण्यासाठी छान आहे.
साहित्य गाजर, बीटरुट, यलो किंवा रेड बेल पेपर अश्या रंगीत भाज्या अगदी बारीक चिरून/किसून घ्या.
आल्या लसणाची पेस्ट, बारीक चिरलेली कांद्याची पात, उकडलेला बटाटा, हळद, लाल तिखट, जिरे, मीठ आणि कव्हरसाठी मिक्स धान्य आटा .
तुपावर जिरे फोडणीला टाकून त्यात बारीक चिरलेल्या भाज्या घालाव्यात.
पाणी न घालता वाफेवर शिजवून घ्यावे. त्यात हळद, लाल तिखट, मीठ घालून पूर्ण शिजवून घ्यावे.
थंड झाल्यावर उकडलेला बटाटा कुस्करून त्यात घालावा. मिश्रण एकजीव करून घ्यावे.
पोळीसाठी कणीक मळतो त्याचप्रमाणे कणीक मळून थोडे मोठे गोळे बनवावेत.
जाडसर लाटून त्यात भाज्यांचे मिश्रण भरुन घ्यावे. मंद आचेवर पराठा तुपावर खरपूस भाजून घ्यावा.
पुदिना किंवा ओव्याच्या पानांची घट्टसर चटणी वाटावी आणि त्यासोबत हा रंगीत पराठा टिफीन मध्ये द्या आणि मुलांना खुश करा.
यात मेथी, पालक, कोबी आपल्या आवडीनुसार भाज्या वापरु शकता.
मूगडाळ (साली सहीत), मसूर डाळ, चणाडाळ, उडीदडाळ समप्रमाणात घेऊन स्वच्छ धुवून घ्याव्यात.
साधारणपणे चार, पाच तास भरपूर पाण्यात भिजवून ठेवाव्यात. नंतर निथळून घेऊन जाडसर वाटून घ्याव्यात. पाण्याचा वापर कमीतकमी करावा.
या मिश्रणात हळद, मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, आले आणि मिरची ठेचून घेऊन घालावी.
चवीप्रमाणे तिखट करावे. अप्पेपात्र गरम करून त्याला तेल किंवा तूप लावावे. आणि हे मिश्रण त्यात ओतून दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्यावे.
काळ्या मनुका, सिडलेस खजूर आणि थोडी चिंच गरम पाण्यात भिजवून ठेवावी.
नंतर मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यावे. वाटताना त्यात चार काळे मिरीचे दाणे, बडीशेप, चवीपुरते लाल तिखट आणि मीठ घालावे.
सैंधव मिठाचा वापर करावा. आंबट गोड चटणी आणि प्रोटीन युक्त अप्पे मुलांना नक्कीच आवडतील.
३. मटार, मका टिक्की
हिरवे मटार, मक्याचे दाणे पाणी न घालता कुकरमध्ये वाफवून घ्या.
बटाटे उकडून घ्या. थंड झाल्यावर हे सर्व एकत्र करून नीट कुस्करून घ्यावे.
त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर, हळद, लाल तिखट, मीठ, कसुरी मेथी, जीरे पावडर, आमचूर पावडर, ब्राऊन ब्रेड क्रम्स, किंवा रवा, थोडे बेसन आणि तांदूळ पीठ घालून तेलावर घट्ट मळून घ्यावे.
गोल आकाराच्या टिक्की बनवून रव्यामध्ये घोळून घ्याव्यात. नंतर तव्यावर शॅलो फ्राय करावे.
४. पौष्टीक शेवगा आंबोळी
एक वाटी उडीद डाळ आणि तीन वाट्या तांदूळ स्वच्छ धुवून आठ तास भिजवत ठेवावे.
त्यात थोडे मेथीदाणे टाकावे. नंतर निथळून घ्यावे आणि जाडसर वाटावे.
हे मिश्रण रात्रभर झाकून ठेवावे. सकाळी पीठ चांगले फुगून येते.
शेवग्याची ताजी पाने मिळाली तर स्वच्छ धुवून घेऊन अगदी बारीक चिरून घ्यावीत व आंबोळीच्या पिठात मिक्स करावीत.
अन्यथा शेवग्याच्या पानांची पावडर आणि चवीनुसार मीठ घालावे व मिश्रणात थोडेसे पाणी घालून व्यवस्थित ढवळावे.
याच्या आंबोळ्या काढाव्यात. नारळाची चटणी आणि या कॅल्शियम युक्त आंबोळ्या असा पॉवर पॅक्ड टिफीन तय्यार!!!
५. पारंपारीक पदार्थ गोडाच्या तवसोळ्या
गावठी काकडी किंवा तवसे किसून घ्यावे. फक्त गर आणि पाणी एवढेच घ्यावे.
साल घेऊ नये. या गर व पाण्यात हळूहळू तांदूळ पीठ घालावे व बारीक किसलेला गूळ व चिमूटभर मीठ घालून नीट ढवळून घ्यावे.
पाणी गरज लागली तरच घालावे आणि तव्यावर घावन किंवा आंबोळी प्रमाणे पीठ पसरून या तवसोळ्या कराव्यात.
कोकणात या गोड किंवा मिरची घालून तिखट सुद्धा करतात. तिखटाच्या करताना गूळ घालू नये.
६. तिरंगी भात
सिमला मिरची, गाजर, टोमॅटो मध्यम आकाराचे तुकडे करून घ्यावेत.
बारीक चिरलेला कांदा, आलं लसूण पेस्ट, हळद, लाल तिखट, लिंबाचा रस, बारीक चिरलेली कोथिंबीर, पुदिना, जिरे, हिंग, कढीपत्ता, वेलची, दालचिनी, लवंग, तेल, चवीनुसार मीठ.
नेहमीप्रमाणे भात शिजवून घ्यावा. एका भांड्यात तेल गरम करून जिरे, हिंग, कढीपत्ता यांची फोडणी करावी. त्या वरील सर्व खडे मसाले टाकून बारीक चिरलेला कांदा घालावा व परतून घ्यावा.
त्यावर आलं लसूण पेस्ट, हळद, लाल तिखट, सर्व भाज्या व मीठ घालून शिजवून घ्यावे. पाणी जास्त न घालता वाफेवर शिजवावे.
जरुरीनुसार थोडे पाणी घालावे. भाज्या पूर्ण शिजल्यावर त्यात भात नीट मिसळून त्यावर लिंबू रस, पुदिना, कोथिंबीर व गरजेनुसार थोडे मीठ घालून एक वाफ आणावी. गोड लिंबाचे लोणचे किंवा घट्ट दही याबरोबर हा भात चविष्ट लागतो.
असे निरनिराळे, रंगीत पदार्थ चविष्ट तर आहेतच पण पोषणाची गरज पूर्ण करतात.
योग्य नियोजन करून हे पदार्थ बनवले तर वेळ सुद्धा वाचेल आणि टिफीन चटकदार होईल.
मग वाट कसली बघताय? चला लगेच पदार्थ करून बघा. सर्व मैत्रिणींशी शेअर करा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा
'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा