बॅंगलोर डायरीज् … श्री श्रींच्या सान्निध्यात (भाग- ३)

shri-shri-ravishankar

ते वर्ष होतं १९७५, बंगळुरुमध्ये एक सेमिनार आयोजित केला होता, विषय होता, वैदिक ज्ञान आणि विज्ञान!, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे एकाहुन एक सरस आणि विद्वान वक्ते आपली अभ्यासपुर्ण भाषणे सभागृहापुढे प्रस्तुत करत होते, जगाला आपल्या ‘भावातीत ध्यान’ ह्या संकल्पनेने वेड लावणारे, ‘महर्षी योगी’ त्या सभेच्या अध्यक्षस्थानी होते.

आणि एक एकोणीस वर्षाचा युवक मंचावर बोलण्यासाठी उभा राहतो, जेव्हा तो बोलु लागला, तेव्हा सारे दंग झाले, चेहर्‍यावर प्रसन्न स्मितहास्य, वेद आणि विज्ञान दोन्हींचं गहन अध्ययन, मधुर आवाज, अदभुत शैली, सार्‍यां दिग्गजांनासुद्धा त्याने आपल्या बोलण्याने खिळवुन ठेवले.

महर्षी योगी सुद्धा त्या तरुणावर, ज्याच्या असामान्य प्रतिभेवर लुब्ध झाले, त्या तरुणाचे नाव होते, ‘रविशंकर नारायण’. त्यांनी त्या तरुणाला आपल्यासोबत ह्रषिकेशला नेले. तिथे काही दिवसांतच आपल्या वागणुकीने तो सर्वांचा लाडका झाला.

पुढे महर्षींनी नोएडामध्ये एक विशाल यज्ञ आयोजित केला, त्याच्या आयोजनाची बरीचशी जबाबदारी रविशंकर यांना दिली, त्यांनी ती इतक्या उत्कृष्टपणे पार पाडली की महर्षी महेश योगी त्यांना आपल्या उत्तराधिकार्‍याच्या रुपात पहायला लागले.

रविशंकर यांना कर्नाटकात पाठवले गेले, तिथे दोनशे विद्यार्थ्यांना वेदाचं शिक्षण देणारी एका पाठशाळेची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली, रविशंकर आणि त्यांचे सहकारी ती शाळा खुप छान सांभाळत होते.

अचानक एके दिवशी महेश योगींचे फर्मान आले, ही शाळा दक्षिण भारतातुन उत्तर भारतात दिल्लीत स्थलांतरित करावी, आणि रविशंकर यांनी पुरीच्या पीठाची शंकराचार्यांची गादी स्वीकारावी आणि संस्कृतीच्या प्रचार प्रसाराचे काम करावे.

सर्वजण दुविधेत पडले, दोनशे विद्यार्थांचे पालक दिल्लीत मुलांना पाठवण्यास तयार नव्हते, पाठशाळा बंद पडणार होती, पण रविशंकर यांनी सर्वांना सांगितले, ही शाळा बंगळुरु मध्येच चालणार, पण ह्या शाळेसाठी जागा, पैसा कुठुन येणार? सर्वजण बुचकळ्यात पडले, दोनशे मुलांचे रोजचे जेवण बनवण्यासाठी सुद्धा त्यांच्याजवळ पुरेसे धान्य नव्हते, रहायला जागा नव्हती.

रविशंकर म्हणाले, “काळजी करु नका, निर्धास्त रहा, मदत मिळेल.”

आणि एक माणुस त्यांना भेटायला आला, “काही महीन्यांसाठी मी विदेशात जात आहे, माझं घर रिकामचं आहे, तुम्ही पाठशाळा तिथे चालवु शकता, असाचं एक माणुस काही पोते धान्य घेऊन येतो, आणि त्यांनतर एकामागुन एक मदतीचा ओघ चालु राहतो, त्यातुनच पुढे आर्ट ऑफ लिविंगची सुरुवात झाली, आणि ती संस्था केवढी मोठी झाली, हे आज आपल्या डोळ्यासमोर आहे.

पहाडासारख्या संकटांना सहजपणे सामोरे जाणारा तो युवक म्हणजे, श्री श्री रविशंकर! त्यांचे नावात ‘श्री श्री’ कसे जोडले याचीही गोष्ट रंजक आहे, सुरुवातीच्या काळात सगळे त्यांना पंडीत रविशंकर म्हणायचे, पण अगोदरच त्याच नावाचे एक सतारवादक ‘पंडीत रविशंकर’ प्रसिद्ध होते, हे नावातलं साम्य टाळण्यासाठी त्यांनी नावापुढे ‘श्री श्री’ विशेषण जोडलं!..

त्यांनी केस का वाढवले याचीही अशीच इंट्रेस्टींग कहाणी आहे, दिसायला ते अत्यंत नाजुक, सडपातळ होते, पोरसावदा वयातच, आपल्या विशीतच त्यांनी प्रवचने द्यायला सुरु केली, त्यांचं नाव, कौतुक ऐकुन मोठेमोठे लोक त्यांचं प्रवचन ऐकायला उत्सुकतेने यायचे, आणि त्यांना पाहील्यावर “हा तर मुलगाच दिसतोय, हा आपल्याला काय शिकवणार?” असे भाव ऐकणार्‍याच्या मनात यायचे. त्यात श्रीं श्रीं चा आवाजही पातळ होता, भारदस्त नव्हता, मग प्रथमदर्शनी छाप पडावी म्हणुन त्यांनी केस आणि दाढी वाढवायला सुरुवात केली, आणि त्याचा योग्य परीणाम झाला, त्यांचं दिव्य रुप अधिकच भारदस्त झालं!..

त्यांच्या सहवासात, संपर्कात आल्यावर आकंठ दुःखात बुडालेला माणुस देखील प्रसन्न होवुन परत येतो, त्यांनी स्वतःमधलं निरागस मुल तसचं जपलयं! आपल्यालाही ते हाच संदेश देतात, दुःखाकडे आश्चर्याने बघा, त्याचा त्रास होणार नाही,

कठीण प्रसंगात सुद्धा हसत राहणं, हीच जीवन जगण्याची खरी कला!..

आनंदी जीवन जगण्यासाठी त्यांनी साधी सोपी सात सुत्रे दिली आहेत, जी जीवनात आणल्याने लाखो लोकांचं आयुष्य सुखकर झालं,

श्री. श्री. रविशंकर यांचं चरित्र वाचताना, त्यांच्या आयुष्यात पावला पावलावर त्यांनी लॉ ऑफ अट्रेक्शन वापरल्याचं दिसुन येतं, त्यांच्या प्रवचनातुनही कित्येकदा या विषयावर त्यांनी विवेचन केलं आहे, त्याबद्द्ल अधिक डिटेल मध्ये, पुढच्या भागात!..

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!