दिवाळीपूर्वी साफ करा मनाची जळमटे

दिवाळी, सणांची राणी!!! प्रकाशाचा हा उत्सव जवळ आला की घरोघरी तयारी सुरू होते. कानाकोपरा लख्ख झाडून, घरातील लहानमोठ्या सर्व वस्तू, फर्निचर अगदी घासून पुसून चकचकीत झालं की घर कसं आनंदाने न्हाऊन निघतं.

हे असं नीटनेटकं आवरलेलं घर, कुठेही पसारा नाही हे दिसायला तर छान दिसतंच पण अश्या छान नेटक्या घरात आपला मूड पण हसरा, आनंदी होतो.

घरातला बारीकसारीक कचरा, रद्दी एवढ्या निगुतीने आपण साफ करतो आणि दिवाळीसाठी जय्यत तयारी करतो पण खरा सणाचा आनंद घेण्यासाठी मन असंच साफ करतो का?

तुम्ही म्हणाल की मन कसं साफ करायचं? ते तर दिसतंच नाही आणि मन म्हणजे काय वस्तू आहे का ? तर खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत, हा ‘मनाची साफसफाई कशी करायची’ हे सांगणारा विशेष लेख!!!

मनाची सफाई म्हणजे काय?

आपल्या शरीराप्रमाणेच मनाचं आरोग्य सुद्धा जपलं पाहिजे. शरीरावरची आजारांची लक्षणं पटकन दिसून येतात पण मनाचं तसं नाहीय.

कित्येक वेळा स्वतःलाच काय होतंय हे नक्की कळत नाही. निरुत्साह, उदासवाणेपणा, कंटाळा येणं, आवडीच्या गोष्टी देखील नकोशा वाटणे, रडू येणे किंवा राग येणे ही सर्व लक्षणं काय सांगतात?

मन थाऱ्यावर नाहीय असंच यावरून लक्षात येतं. म्हणजे मनाचा मूळ स्वभाव आनंद, शांतता, समाधान यापासून दूर कुठेतरी मन भरकटत गेलंय हे समजून जायचं आणि वेळीच या मनाला शांत करायचं.

राग, उदासी, आळस हा मनात साठलेला कचरा, मनाची जळमटं आहेत आणि ती वेळीच साफ करावी लागतात.

नाहीतर त्यांचे थर जमा होतात आणि मनाची अवस्था बिघडत जाते.

मनाची सफाई कशी करायची?

मन साफ करायचं तर आधी त्याचं खरं स्वरूप समजून घेतलं पाहिजे. आईच्या गर्भात जेव्हा मूल वाढत असतं, तेव्हा ते एक गाढ शांतता, सुरक्षित वातावरण यांचा अनुभव घेतं.

जन्माला आल्यानंतर लहान बालक हे नेहमी खेळकर, आनंदी, खळखळून हसणारं असं दिसतं.

जसजसं आपलं वय वाढतं, तसा मनावर आजूबाजूच्या घटना, लोकांचे बोलणे, समाजाच्या धारणा यांचा परिणाम होतो.

स्पर्धा, मत्सर, ईर्ष्या या भावना हळूहळू मूळ धरु लागतात. आता तर जग इतकं जोरात धावतंय की कोणालाही थांबण्याची उसंतच नाही.

अगदी शाळेत जाणाऱ्या लहान मुलांपासून ते नोकरी, व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना जीवघेण्या स्पर्धेला तोंड द्यावे लागते. आणि मग हे मन हळूहळू थकत जातं.

बेफाम धावणारा हा मनाचा घोडा मग मंदावतो, धापा टाकू लागतो आणि शेवटी अडखळतो, ठेचकाळतो.

ही लक्षणं म्हणजेच कंटाळा, निरुत्साह, रडू येणे इत्यादी अनेक लक्षणांच्या द्वारे मन आपल्याला इशारा देत असतं की थोडं थांब, मला विश्रांती हवीय!!! हे नेमकं ओळखलं पाहिजे.

रोजची जबाबदारी, कर्तव्य यांच्या ओझ्यामुळे दबलेल्या मनाला जरा मोकळा श्वास घेऊ दिला की बऱ्याच प्रमाणात त्रास कमी होऊ शकतो.

मनाची साफसफाई करण्याचे काही उपाय

१. मेडिटेशन

ध्यान करणे हा मन: शांतीसाठी उत्तम उपाय आहे. शक्यतो सकाळच्या वेळी घरातील एका शांत जागी डोळे मिटून बसावे. लक्ष आपल्या श्वासावर देऊन मनातील विचारांचे शांतपणे निरीक्षण करावे.

सुरुवातीला अनेक विचार मनात गर्दी करतील. पण त्यांना चांगले किंवा वाईट असे कोणतेही लेबल लावू नये. हे फक्त विचार आहेत एवढेच लक्षात घ्यावे.

हळूहळू मनातील गोंधळ शांत होईल. नियमितपणे ध्यान करणारी व्यक्ती शांत, आनंदी असते. आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर धैर्याने मात करू शकते.

२. दीर्घश्वसन

अस्वस्थता, चिंता, भीती यामुळे पहिला परिणाम आपल्या श्वासावर होतो. छातीत धडधड, धाप लागणे, श्वास कमी पडणे, छातीवर दडपण जाणवणे अशी लक्षणे दिसतात.

अशा वेळी जाणीवपूर्वक खोलवर श्वास घेतला की दडपण लगेच दूर होते. दीर्घश्वसनामुळे सर्व पेशींपर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा भरपूर प्रमाणात होतो.

ताजेपणाचा अनुभव येतो. सजगतेने खोलवर श्वास घेतला की जखडलेले स्नायू सैल होतात. शरीर आणि मनही रिलॅक्स होते.

३. नियमित व्यायाम

चालणे, जॉगिंग, पोहणे, सायकलिंग, योगासने असा कोणताही व्यायाम नियमितपणे करावा. व्यायामामुळे मेंदू कार्यक्षम रहातो.

हॅपी हार्मोन्स रिलीज झाल्यामुळे उत्साही वाटते. याशिवाय कोवळ्या सूर्यप्रकाशात, सकाळी व्यायाम केला तर व्हिटॅमिन D चा लाभ मिळतो.

त्यामुळे व्हिटॅमिन D अभावी येणारे डिप्रेशन दूर ठेवता येते.

४. चौरस आहार

सर्व जीवनसत्त्वांनी युक्त असा आहार घेतल्याने शरीराचे योग्य पोषण होते. याचबरोबर झिंक, सेलेनियम, मॅग्नेशियम या मायक्रोन्यूट्रियंट्सच्या अभावी येणारे डिप्रेशन योग्य आहार घेतल्याने आटोक्यात येते.

हिरव्या पालेभाज्या, फळे, ड्राय फ्रूट, योग्य प्रमाणात पाणी पिणे हे सर्व मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी आवश्यक आहे.

५. मनाला विश्रांती देणे

सततचे काम, टेन्शन, स्ट्रेस दूर करण्यासाठी मन वेगळ्या विषयात गुंतवले पाहिजे. म्हणून कोणता ना कोणता छंद जोपासणे खूप गरजेचे आहे.

वाचन, संगीत, बागकाम, कुकींग, लिखाण यामुळे मनाला आनंद मिळतो.

त्याच त्याच विचारातून थोडा वेळ का होईना पण सुटका मिळते. आवडते काम करताना मन प्रसन्न होते.

६. निसर्गाशी नाते जोडावे.

सूर्योदय किंवा सूर्यास्त यावेळचे वातावरण मनाला किती आनंद देते!!! समुद्राच्या लाटा, नदीचा खळखळाट, पावसाचे तुषार, ओल्या मातीचा गंध, हिरव्या गार गवतावरचे दवबिंदू, धुक्याची दुलई पांघरून आलेली सकाळ, डोलणारी शेतं, रात्रीचे तारकांनी उजळलेले आकाश, पौर्णिमेचा चंद्र हे सर्व मनाला शांत करते, समाधान देते.

म्हणून मनाला थकवा आला की निसर्गाच्या कुशीत चार दिवस हरवून जावे आणि पुन्हा नव्या उमेदीने कामाला सुरुवात करावी.

वर्षातून एकदा तरी कुटुंबासोबत असा वेळ घालवला तर सर्वांचे मन: स्वास्थ्य चांगले राहील.

७. रोज डायरी लिहीणे

डायरीत दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घटना आणि त्यावेळचे आपले विचार लिहून काढावेत.

कोणत्या प्रसंगात आपल्या मनात नकारात्मक भावना येतात हे यावरून लक्षात येते.

या भावना एका कागदावर लिहून तो कागद फाडून टाकावा. म्हणजे मनातील त्रासदायक विचार, भावना यांचे ओझे साठून रहात नाही.

वेळच्यावेळी बोलून व्यक्त होणे खूप गरजेचे आहे. जवळच्या व्यक्तीला किंवा समुपदेशकांना मनातील दुखऱ्या जागा उघड करुन दाखवाव्यात.

नाहीतर ही ठसठसणारी जखम अधिक खोलवर जाते. दु:खद भावना मनात सतत घोळवत ठेवल्याने शांतता नष्ट होते. म्हणून माफ करायला शिकावे.

भांडण, अपमान किंवा हेवेदावे यावर माफ करणे हा प्रभावी उपाय आहे.

ज्यांच्यामुळे आपल्याला त्रास झाला त्यांना आणि त्यापेक्षा जास्त महत्त्वाचे म्हणजे स्वतःला माफ करावे.

तरच आपण मनावरचे ओझे उतरून हलक्या मनाने पुढे वाटचाल करु शकतो.

हे उपाय करुन तुम्ही मनाला लागलेली नकारात्मक विचारांची जळमटं, दुखऱ्या, नकोशा भावनांची अडगळ निश्चितच कमी करु शकता.

म्हणजे मग मनात आपोआपच चांगल्या, सकारात्मक विचार, भावना यांना प्रवेश करण्यासाठी जागा मोकळी होईल. दिवाळीचे दिवे घरात, अंगणात उजळतील तसेच मनामनांतही प्रकाशमान होवोत आणि मंगलमय विचारांची पहाट आपल्या आयुष्यात येवो याच शुभेच्छा!!!

हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करुन सांगा. लाईक व शेअर करुन आपल्या मित्रमैत्रिणींना सकारात्मक संदेश द्या.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “दिवाळीपूर्वी साफ करा मनाची जळमटे”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय