घरच्या घरी सौंदर्य उपचार

Face Care Tips

सुंदर, नितळ त्वचा, मुलायम केस, चेहऱ्यावर निरोगी सौंदर्याचे तेज असलेली व्यक्ती चारचौघात उठून दिसते. वय वाढत असताना सुद्धा टापटीप राहून स्वतःची काळजी घेतली तर अकाली म्हातारपण येत नाही.

आणि यासाठी फार महागडे उपचार, ब्युटी पार्लर मध्ये जाऊन खूप पैसे खर्च करण्याची काहीच गरज नाही.
आज आम्ही तुम्हाला किचनमध्ये सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टी वापरून घरच्याघरी सौंदर्य कसे खुलवता येते हे सांगणार आहोत.

किचनमधल्या या वस्तू कधीच वाया घालवू नका

१. काकडीची साल

कोशिंबीर करताना उरलेली काकडीची साल चेहऱ्याला लावण्यासाठी वापरावी.

डोळ्यांवर या सालीचे मोठे तुकडे ठेवले तर गारवा जाणवतो. जळजळ कमी होते.

याच सालींचे अगदी बारीक बारीक तुकडे करून आईस ट्रे मध्ये घालावे व यात पाणी भरून फ्रिजरमध्ये ठेवून द्यावे.

थोड्या वेळातच छान काकडी युक्त बर्फ तयार होतो. हे आईस क्युब रुमालात गुंडाळून चेहऱ्यावर फिरवावे. सुरकुत्या, डाग, काळेपणा नाहीसा होतो.

सन टॅनिंग झाले असेल तर याचा खूप चांगला उपयोग होतो. त्वचा उजळ होते. कोरफडीचा गर आणि काकडीची साल एकत्र वाटून पेस्ट करावी व चेहऱ्यावर लावावी.

वाळल्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून टाकावे. सैल पडलेल्या त्वचेचे टोनिंग करण्यासाठी याचा उपयोग होतो. उन्हाळ्यात त्वचा थंड रहाण्यासाठी काकडी उत्तम आहे.

२. उकडलेल्या बटाट्याची साल

उकडलेला बटाटा स्वयंपाकासाठी वापरला जातो पण साल मात्र वाया जाते. पण हीच बटाट्याची साल जर चेहऱ्याला चोळून हलका मसाज केला तर वांग, काळे डाग कमी होतात.

भाजल्यामुळे त्वचेवर डाग पडतात त्यासाठी पण याचा उपयोग होतो. जागरण, अपुरी झोप, टेन्शन यामुळे डोळ्याखाली काळी वर्तुळे येतात. बटाट्याची साल यावर अलगद चोळली तर काळेपणा कमी होतो.

३. बेसन आणि दूध

बेसन आणि दुधाची साय एकत्र करून त्यात किंचित हळद मिसळावी. हे मिश्रण चेहऱ्याला लावले असता त्वचा मुलायम होते.

मसूर डाळीचे पीठ, बेसन, मुलतानी माती, चंदन पावडर, हळद, सुकवलेल्या संत्र्याच्या साली, सुकवलेल्या देशी गुलाब पाकळ्या सर्व बारीक कुटून किंवा पावडर करून ठेवावी.

यात कच्चे दूध किंवा लिंबाचा रस किंवा कोरफड गर मिसळून पेस्ट बनवावी. आणि याचा लेप लावावा.

अशाप्रकारचे मिश्रण दिवाळीच्या उटण्यासारखे तुम्ही वर्षभर वापरु शकता. केमिकल युक्त साबणा पेक्षा आंघोळीसाठी ही बाथ पावडर वापरुन पहा. दिवसभर फ्रेश वाटेल. त्वचा मऊ मुलायम होईल.

५. फ्रुटपॅक

अतीप्रमाणात पिकलेली फळं फेकून न देता फेसपॅक स्वरूपात वापरता येतात. केळी, पपई किंवा टोमॅटो यांचा गर लावला तर चेहरा चमकदार होतो.

याशिवाय नारळाच्या दुधात बेसन मिक्स करून लावावे. कोरडेपणा घालवण्यासाठी हा खूप छान उपाय आहे.

६. होम मेड स्क्रब

संत्रे, लिंबू यांच्या साली नीट वाळवून मिक्सर मधून जाडसर फिरवून घ्यावे. साय, पाणी किंवा लिंबू रस यापैकी काहीही घेऊन त्यात हे मिश्रण ढवळावे आणि खरबरीत स्क्रब बनवावा.

या स्क्रबने काळे पडलेले कोपर, गुडघे, मान यांना हलका मसाज केला तर काळेपणा दूर होतो. क्लिन्झर म्हणून हे वापरावे.

चेहऱ्याप्रमाणेच केसांची निगा राखणेही आपल्याला सहज शक्य आहे. ते सुद्धा घरच्या घरी तुमच्या वेळेनुसार!!! कसे ते पाहूया.

घरच्या घरी करा हेअर स्पा

सलोन मध्ये या ट्रिटमेंट खूप महाग असतात. याशिवाय जी केमिकल क्रीम वापरतात त्यापेक्षा शून्य खर्चात आपण आपल्या सोयीनुसार घरीच केसांची उत्तम देखभाल करू शकतो.

रुक्ष, तुटके, गळणारे, निस्तेज, राठ किंवा अती कुरळे केस असतील तर हे जरूर करुन पहा. यासाठी रोजच्या वापरातील तांदूळ घ्यावेत.

आपल्या केसांची लांबी पाहून त्याप्रमाणे अंदाजे तांदूळ घ्या. मध्यम लांबीच्या केसांसाठी अर्धी लहान वाटी तांदूळ हे प्रमाण पुरेसे आहे.

हे तांदूळ रात्रभर पाण्यात भिजवावे. साधारण सहा-सात तास तांदूळ भिजले पाहिजेत. भिजवताना यात चमचाभर मेथी दाणे टाकावे.

सकाळी हे मिश्रण फरमेंट होते. हे गॅसवर शिजवायला ठेवावे. शिजवताना यात अर्धी छोटी वाटी कढीपत्त्याची पाने घालावीत. हे तांदूळ पूर्ण भात होईपर्यंत शिजवण्याची गरज नाही.

तांदूळ मऊसर झाला की गॅस बंद करावा. हे मिश्रण गाळून त्यातील जाडसर पाणी काढून घ्यावे. थंड करत ठेवावे. पूर्ण थंड झाल्यावर नंतर वापरावे.

एका पसरट भांड्यात दोन चमचे कोरफड जेल, दहा थेंब ग्लिसरीन, एक व्हिटॅमिन E कॅप्सुल फोडून त्यातील द्राव घ्या.

यात हळूहळू शिजवलेल्या तांदळाचे जाडसर पाणी मिसळून सतत ढवळत रहावे. पाणी एकदम मिक्स न करता जेवढे लागेल तेवढेच मिसळावे.

आपल्याला केसांसाठी जाडसर क्रीम बनवायचे आहे हे लक्षात घेऊन पाण्याचे प्रमाण ठरवावे. घट्टसर स्पा जेल तयार होईल.

केस नीट विंचरून पूर्ण गुंता सोडवून घ्यावा. यानंतर केसांवर स्प्रे बॉटल मधून पाणी शिंपडावे. केस व्यवस्थित भिजवून घ्यावे.

कोरड्या केसांवर स्पा जेल लावले तर ते नीट लावता येत नाही. किंवा धुताना केस तुटू शकतात.
हेअर ब्रशने हे जेल केसांच्या मुळाशी आणि नंतर खालच्या दिशेने केसांच्या टोकापर्यंत व्यवस्थित लावून घ्यावे.

केसांना मुळांशी हळूहळू मसाज करावा. म्हणजे रक्तपुरवठा वाढतो. सर्व जेल लावले की केस बांधून घ्यावे.

यानंतर गरम पाण्यात एक टॉवेल भिजवून घट्ट पिळून घ्यावा. हा टॉवेल केसांवर बांधून ठेवावा. यामुळे केसांना शेक मिळतो.

लावलेले जेल नीट शोषले जाण्यासाठी याचा उपयोग होतो. एक तासानंतर किंचित कोमट पाण्याने केस स्वच्छ धुवून घ्यावेत.

तांदळाचे पाणी आंबवलेले असते त्यामुळे ते त्याच दिवशी वापरावे. साठवून ठेऊ नये.

या घरगुती स्पा मुळे केस चमकदार होतात. कोंडा कमी होतो. केसगळतीचे प्रमाण कमी होते.

कढीपत्ता, भिजवलेले मेथी दाणे, जास्वंदीच्या कळ्या, दही, आवळा \पावडर, मेंदी, अंडे, शिकेकाई, रीठा हे सर्व केसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे.

आपल्या गरजेनुसार यांचा वापर करावा. महागडे शाम्पू किंवा कंडिशनर यापेक्षा हे पारंपारिक उपाय साधे, सोपे आणि परिणामकारक आहेत.

नॅचरल हेयर डाय

उकडलेला बीट कुस्करून त्याचे पाणी, कॉफी पावडर, मेंदी आणि आवळा पावडर हे सर्व लोखंडी कढईत जाडसर भिजवून रात्रभर ठेवावे. यात चमचाभर खोबरेल तेल मिसळून एकजीव करावे व ब्रशने केसांना लावावे. एक तास झाला की केस स्वच्छ धुवून घ्यावेत.

पांढऱ्या केसांसाठी हा केमिकल रहीत सुरक्षित आणि स्वस्त असा सुंदर हेयर डाय!!! नियमितपणे वापर केला तर केस काळे दिसू लागतात, कोरडेपणा कमी होतो. केसांवर नैसर्गिक चमक येते. कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.

थोडी कल्पकता आणि जागरूकता असेल तर घरच्या घरी कोणतीही वस्तू वाया न घालवता आपण सौंदर्य प्रसाधने बनवू शकतो.

पैसे वाचवून बचतही करू शकतो. शिवाय ही नैसर्गिक प्रसाधने तुमच्या केस, त्वचेसाठी अत्यंत सुरक्षित आहेत.

मग केमिकल उपचार न करता तुम्ही सुद्धा या टिप्स वापरून तुमचे सौंदर्य खुलवा. तुम्हाला माहीत असलेली घरगुती सौंदर्य थेरपी आणि प्रसाधने कोणती हे कमेंट्स मध्ये जरूर लिहा. लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!