जीभेचा रंग पांढरा दिसतोय? जिभेची काळजी का आणि कशी घ्यायची

जीभेचा रंग पांढरा दिसतोय? जाणून घ्या ही पाच कारणं

सामान्यतः पडणाऱ्या पुढील 👉 प्रश्नांची उत्तरे या लेखात सापडतील: जिभेची रचना कशी असते? | जिभेचे कार्य |जीभेचा पांढरा रंग आणि तुमचे आरोग्य यांचा काय संबंध आहे? | जीभ पांढरी होण्याची ५ कारणे

जीभ म्हणजे रसना!!! वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी जीभेचा उपयोग होतो. पण तुम्हाला माहीत आहे का जीभ हा आपल्या आरोग्याचा आरसा आहे.

जेव्हा तुमची तब्येत बिघडते आणि तुम्ही डॉक्टरांना भेट देता तेव्हा ते तुमची जीभ तपासून पहातात. जीभेच्या रंगावरून अनेक प्रकारचे रोग ओळखता येतात.

या लेखातून जीभेचा पांढरा रंग आणि त्यामागची कारणे सविस्तर जाणून घेऊया.

आपल्या शरीरातील जीभ हा एक मोठा स्नायू आहे. शरीरातील प्रत्येक अवयवावर त्वचेचे आवरण असते पण फक्त जीभ हा अवयव याला अपवाद आहे.

जीभेला काही हाड आहे की नाही? असं जरी व्यवहारात आपण बोलत असलो, तरी कोणतेही हाड किंवा सांध्याशिवाय स्वतंत्रपणे हालचाल करु शकणारा हा एकमेव अवयव आहे. प्रत्येक व्यक्तीची जीभ लांबीला कमीजास्त असते. काही जण जीभेच्या टोकाने नाकाला स्पर्श करु शकतात!!!

जीभेची रचना जाणून घेऊया

जीभ हा स्नायूंचा एकत्रित समूह आहे. आणि यावर कनेक्टिव्ह टिश्यू चे आवरण असते.विशिष्ट प्रकारच्या म्युकस मेम्ब्रेनचा पातळ थर जीभेच्या पृष्ठभागावर दिसून येतो. जीभेचे मूळ घशाच्या स्नायूंना जोडलेले असते.

शरीररचने प्रमाणे जीभेचे तीन भाग पुढीलप्रमाणे

१. जीभेच्या कडा आणि पुढचे टोक यांचा उपयोग प्राथमिक स्वरूपाचे पचन आणि बोलण्यासाठी आवश्यक असलेली हालचाल याकरिता होतो.

२. जीभेचा मागील भाग थोडा खडबडीत असून त्यावर टेस्ट बड्स म्हणजे स्वाद ग्रंथिका असतात.

३. जीभेचा शेवटचा भाग हा घशाच्या स्नायूंना जोडलेला असतो व तो आपल्याला दिसत नाही. अशाप्रकारे आधार मिळाल्याने जीभ तोंडात स्थिर रहाते.

जीभ हे एक ज्ञानेंद्रिय आहे. यामुळे पदार्थाची चव समजते.

जीभेवरील खडबडीत भागात पॅपिला नावाच्या सूक्ष्म ग्रंथी असतात. त्यांचे कार्य म्हणजे

१. चवीचे ज्ञान

या पॅपिलाच्या सहाय्याने मेंदूपर्यंत चवीचा संदेश पाठवला जातो. आपली जीभ पाच प्रकारच्या चवी ओळखू शकते. गोड, आंबट, खारट, कडू आणि तिखट.

२. पचन

जीभ नसेल तर बोलताच येणार नाही. दात, घशाचे स्नायू आणि तोंडाचे मसल्स यांचा समन्वय साधण्यासाठी जीभ मदत करते. विविध ध्वनींमधून भाषेचा उगम होतो आणि या ध्वनींपैकी तालव्य स्वर जीभेमुळे निघतात.

४. बॅक्टेरिया आणि व्हायरस पासून संरक्षण

जीभेच्या मुळाशी असलेले टॉन्सिल्स आणि ॲडेनॉइड्स या ग्रंथी बाहेरुन मुखात प्रवेश करणाऱ्या घातक जीवाणूंपासून शरीराचे संरक्षण करतात. जर या ग्रंथी शस्त्रक्रिया करून काढून टाकलेल्या असतील तर शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते.

जीभ हा आपल्या आरोग्याचा आरसा आहे.

जीभेच्या रंगावरून तुमच्या आरोग्याची चाचपणी करता येते. डॉक्टर तुम्हाला तपासत असताना तोंड उघडून मोठा आ करा असं का सांगतात?

कारण जीभेच्या रंगात काही बदल झाले आहेत का याचं निरीक्षण करण्यासाठी ते अशा सूचना देतात.

जेव्हा वातावरण बदलते आणि त्यामुळे फ्लूचा प्रादुर्भाव होतो त्यावेळी आरशात तुमची जीभ नक्की पहा. थोडा पांढुरक्या रंगाचा थर जीभेवर आल्याचे तुमच्या लक्षात येईल.

हा शरीराने पुढे येणाऱ्या आजारपणाचा संकेत दिला आहे हे लक्षात ठेवा. याचप्रमाणे अनेक आजारांचे लक्षण जीभेच्या बदललेल्या रंगावरून समजते.

कोणतेही इन्फेक्शन झाले की जीभेवरील पॅपिला सुजतात आणि त्याद्वारे बॅक्टेरीया या छोट्या ग्रंथीत अडकून पडतात.

जीभेचा पांढरा रंग आणि तुमचे आरोग्य यांचा काय संबंध आहे?

जीभेची तपासणी करून डॉक्टर अनेक प्रकारचे अनुमान काढतात. पण आता आम्ही तुम्हाला जीभ पांढरी होण्याची पाच प्रमुख कारणे सांगणार आहोत.

जीभ पांढरी होण्याची ५ कारणे

१. Oral Thrush (जीभेवर पुरळ उठणे)

हे लक्षण मुख्यत्वे नवजात शिशू आणि लहान मुलांमध्ये दिसून येते. काही वेळा प्रौढ व्यक्तींना सुद्धा असा त्रास होऊ शकतो. यामागील कारण आहे कॅन्डीडा नावाचे यीस्ट किंवा बुरशी. हे आपल्या शरीरातच असते आणि काही वेळा फार वेगाने पसरते. पण काही जुजबी उपचार करून ही लक्षणे पूर्णपणे निघून जातात.

२. Leukoplakia

सतत घसा व तोंडात इन्फेक्शन किंवा खवखव होत असेल तर हे लक्षण दिसते. दारु किंवा तंबाखूचे सेवन करणाऱ्या व्यक्तींमध्ये हे जास्त प्रमाणात दिसून येते. जरी हे धोकादायक नसले तरी दीर्घ काळानंतर याचे रुपांतर कॅन्सर मधे होऊ शकते.

शरीराचा इन्फेक्शन पासून बचाव करण्यासाठी जीभेवरील पेशींची भरपूर प्रमाणात वाढ होते व त्या केराटिन या घटकाशी संयोग पावतात आणि मग जीभेवर पांढरा थर दिसू लागतो.

३. नैसर्गिक बदल

ज्याप्रमाणे शरीरातील इतर अवयवांच्या मृत पेशी निघून जातात आणि मग नवीन पेशी निर्माण होतात त्याचप्रमाणे काही वेळा जीभेच्या काही विशिष्ट भागांवरील पेशी निघून जातात आणि तिथे पांढरे चट्टे पडतात. हा भाग नाजूक, दुखरा आणि हुळहुळा होतो.

४. Oral Lichen Planus

तुमची प्रतिकारशक्ती बराच काळ बिघडलेली असेल तर हे लक्षण दिसते. यात जीभ तर पांढरी दिसतेच पण छोट्या छोट्या जखमा सुद्धा दिसून येतात. या आजारातून पूर्ण बरे होणे शक्य नसले तरी औषधांच्या सहाय्याने तुम्ही परिस्थिती नियंत्रणात ठेवू शकता.

५. Syphilis

यालाच फिरंग रोग असेही म्हणतात. हा एक प्रकारचा STD (Sexually Transmitted Disease) असून अनियंत्रित आणि धोकादायक लैंगिक संबंध हे याचे कारण आहे. यातील बॅक्टेरीया अतिशय घातक असून वेळेवर निदान आणि औषधोपचार केले नाहीत तर मृत्यू येऊ शकतो. यातही जीभ पांढरी होते. पण इतर चाचण्या आणि रुग्णाची संपूर्ण माहिती घेतल्यानंतरच निदान निश्चित केले जाते.

याशिवाय इतर अनेक कारणांमुळे जीभेचा रंग पांढरा दिसतो. यातील खालील काही कारणे अशी आहेत

१. वय 

लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींना ओरल थ्रश मुळे असा त्रास होतो.

२. ॲंटिबायोटिक्समुळे

जास्त प्रमाणात ही औषधे घेतल्यास त्यांचा दुष्परिणाम म्हणून जीभ पांढरी होते.

३. दुखापत होणे

कृत्रिम दात, कवळी यांच्यामुळे दुखापत होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे दात चावणे किंवा सतत काहीतरी चघळणे अशी सवय असेल तर पांढरे चट्टे पडतात.

४. हायपोथायरॉयडीझम

थायरॉईड ग्रंथी कमी प्रमाणात हार्मोन्स तयार करत असेल तर त्याचा परिणाम शरीराच्या चयापचय क्रियेवर होतो आणि त्यामुळे जीभ पांढरी होते.

५. व्यसनाधीनता

दारु, तंबाखू, धूम्रपान, मादक पदार्थ यांचे व्यसन असेल तर या पदार्थांमधील हानीकारक केमिकल्स तोंडात आणि जीभेवर साचून पांढरा थर निर्माण करतात.

६. पाणी कमी पिणे

यामुळे श्वासाची दुर्गंधी, तोंड कोरडे पडणे आणि पांढरट जीभ असे बदल दिसून येतात.

७. औषधांचा दुष्परिणाम

विशेषतः कॅन्सरच्या औषधांमुळे असे दुष्परिणाम होऊन जीभ पांढरी होते.

८. तोंडाची नीट स्वच्छता न ठेवणे

प्रत्येक वेळी काही खाल्ले की न विसरता चुळा भराव्यात. दिवसातून दोन वेळा सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी नित्यनेमाने ब्रश करावा. जीभेवरील साचलेला थर नियमितपणे काढून टाकावा. अस्वच्छतेमुळे दात, हिरड्या आणि जीभेचे आरोग्य धोक्यात येते. डेंटल फ्लॉस आणि टंग स्क्रेपर यांचा वापर करावा म्हणजे स्वच्छता करणे सोपे जाते.याबाबतीत डेंटिस्टचा सल्ला जरूर घ्यावा.

यावरून तुमच्या लक्षात आले असेल की जीभ हा अवयव दिसायला छोटासा आहे पण तुमचे आरोग्य राखण्यासाठी त्याचे योगदान खूप महत्त्वाचे आहे. म्हणून आपल्या जीभेची योग्य ती काळजी घ्या आणि कोणत्याही प्रकारचा बदल किंवा पांढरे चट्टे असं काही आढळलं तर लगेच वैद्यकीय सल्ला घ्या.
लेख उपयुक्त वाटला तर लाईक व शेअर करा.

Manachetalks

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!