फादर्स डे…..

fathers-day

शेरखानला जबड्यात लुसलुशीत कोकरू घेऊन जाताना पाहून अंकल आश्चर्यचकित झाला. “काय शेरू…. आज सकाळी सकाळी कुठे …..?? तेही स्वतः शिकार घेऊन …..” जबड्यातील शिकार खाली ठेवून मिश्या पुसत शेरखान हसला.

“अरे…. हे पोरांनी काहीतरी नवीन काढले बघ. सकाळपासून मागे लागलीत. आजोबांना शिकार घेऊन जा. आज फादर्स डे आहे म्हणे….. आजोबांना विश करून या. च्यायला……मी पहिली शिकार केल्याबरोबर म्हातारा मला यापुढे तुझे तूच बघ म्हणून दुसरीकडे निघून गेला. पुढे मीच माझ्या कर्तृत्वावर मोठा झालो. आता म्हातारा झालाय पण मस्ती कमी नाही झालीय. म्हटले घरी चल तर ऐकत नाही. जमेल तशी शिकार करून जगतोय. आज पोरं म्हणाली भेटून या.… काहीतरी गिफ्ट घेऊन जा म्हणून ही शिकार केली. चांगले कोवळे हरीण मारले आज….”

अंकल सोंड वर करून हसला “खरे आहे….. तुझा बाप खूप मानी. पण तुझ्यावर खूप प्रेम. तुझ्या जन्माच्या वेळी अस्वस्थ होऊन गुहेबाहेर फेऱ्या मारताना मी पाहिलंय त्याला. तर तुझ्या जन्माचा आनंद होऊन डरकाळ्यानी अख्खे जंगल दणाणून सोडले होते. त्या खुशीत त्याने एकदम पाच हरणे मारली होती.. तू लहान असताना शिकाऱ्यांनी गुहेवर हल्ला चढविला होता. तेव्हा लपून छपून तुम्हाला दूर घेऊन जाताना त्याच्या चेहऱ्यावरचे काळजीचे भाव कधीही विसरणार नाही मी. आयुष्यात प्रथमच घाबरलेले पाहिले मी त्याला. तुझ्याबद्दल त्याला नेहमी काळजी वाटायची. तू एक नंबरचा आळशी….. कसे होईल ह्याचे या जंगलात….. म्हणून सारखा माझ्याकडे येऊन काळजी करत बसायचा.

किती तरी दिवस तुला शिकारीचे धडे देत होता. पण आयुष्यात पहिल्यांदा तू स्वतंत्र शिकार केलीस तेव्हा त्याला किती आनंद झाला ते मलाच माहितीय. त्या खुशीत त्याने त्या दिवशी एकही शिकार केली नाही. तीन जणांना तरी जीवदान दिले असेल. रात्री माझ्याकडे आला होता. आज मोठ्या जबाबदारीतून मोकळा झालो असे म्हणत मला पाच भले मोठे ऊस दिले आणि स्वतः छोटा ससा खाल्ला”.

“मग तो निघून का गेला… ?? शेरखानने चिडून विचारले.

“हाच तर जंगलाचा कायदा आहे शेरू…..आपले पालक फक्त आपल्याला स्वतःच्या पायावर उभे राहायला शिकवतात मग पुढची जबाबदारी आपली. त्यांनी आपल्याला जन्म दिला आपल्याला मोठे केले. यापेक्षा अजून काय करावे ….?? अंकल त्याला समजावत म्हणाला.

“खरे आहे अंकल …बरे झाले पोरांनी आठवण करून दिली. या फादर्स डे च्या निमित्ताने का होईना त्यांची आठवण झाली …” असे म्हणून पुन्हा शिकार जबड्यात पकडली आणि चालू लागला.

नेहमीच्या तालात चालत असताना शेजारची हालचाल त्याच्या लक्षात आली नाही. अचानक समोरच्या झाडीतून दोन माणसे बंदूक घेऊन पुढे आली. आपल्या बेसावधपणामुळे आपण फसलो हे शेरखानच्या लक्षात आले पण आता उशीर झाला होता. त्याने पळण्यासाठी आजूबाजूला पाहिले.. शिकाऱ्यांनी नेम धरला इतक्यात मागून ती ओळखीची डरकाळी त्याला ऐकू आली. आणि क्षणार्धात तो म्हातारा वाघ उंच उडी मारून त्यांच्या मध्ये उभा राहिला. दुसरा वाघ पाहून दोन्ही शिकारी हडबडून गेले. स्वतःला सावरत ते पळून गेले.

म्हातारा वाघ हळू हळू शेरखान जवळ चालत आला. बाबा ….म्हणून शेरखानने त्याला हाक मारली तितक्यात त्याचा एक पंजा वर आला आणि सणकून शेरखानच्या तोंडावर आपटला. “अजूनही आळस अंगात आहेच तुझ्या…. कितीवेळा सांगितले सावधगिरीने चाल. राजालाही धोका असू शकतो. अरे ..बाप आहे मी तुझा. म्हणून लक्ष ठेवून आहे मी. पण दरवेळी हा बाप तुला वाचवायला येणार नाही. शेरखान निमूटपणे खाली मान घालून म्हणाला “हॅपी फादर्स डे बाबा …..”

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!