स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?

प्रश्नोत्तरे आपण शालेय वयापासूनच सोडवत आलो आहोत. एखादा विषय शिकत असताना तो आपल्याला कितपत समजलाय हे कसं कळतं?

त्या विषयावरचे प्रश्न आपण सोडवू शकतो की नाही?

उत्तरं बरोबर जुळतात का? यावरुन शिकलेला विषय आपण कितपत समजून घेतलाय याची कल्पना येते.

प्रश्न हे एक प्रभावी माध्यम आहे. कुतुहल जागृत असण्याचे ते लक्षण आहे.

तसेच एखाद्या समस्येचे मूळ शोधून काढण्यासाठी प्रश्नांची मदत घ्यावी लागते. पण यासाठी योग्य वेळी योग्य प्रश्न विचारणे गरजेचे आहे.

या लेखातून आम्ही तुम्हाला अशाच पाच प्रश्नांविषयी सांगणार आहोत. हे प्रश्न तुम्ही स्वतःलाच विचारायचे आणि सर्व बाजूंनी विचार करून त्यांची उत्तरे शोधून काढायची.

घाई अजिबात करू नका. आपल्याला फक्त सवाल जवाब नको आहेत.

तर विचारमंथन करून उत्तर शोधून काढा. पुरेसा वेळ घ्या, चिंतन करा आणि मिळालेले उत्तर लिहून काढा.

नक्कीच तुमच्या मनात आलं असेल की एवढे महत्त्वाचे असे कोणते प्रश्न आहेत?

तर हो, खरंच खूप महत्त्वाचे आहेत हे प्रश्न. कारण यातून तुम्ही आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय घेणार आहात.

एक व्यक्ती म्हणून अधिक समृद्ध होण्यासाठी यांची तुम्हाला मदत होईल.

तसंच आपण कोण आहोत, आपल्याला नक्की काय हवंय आणि आपली प्रगती कशी होईल, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला स्वतःला हे प्रश्न विचारावेच लागतील.

कोणते आहेत हे पाच प्रश्न?

१. जेव्हा तुमच्या आयुष्यात एखादी अनपेक्षित घटना घडते तेव्हा स्वतःला विचारा की यातून मला काय शिकायचे आहे?

हा पहिला प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. कारण यातूनच कठीण प्रसंगात दडलेल्या संधीचा आपण शोध घेणार आहोत.

म्हणजेच हा प्रश्न पडझडीतून सावरुन रचनात्मक कामाकडे आपल्याला वळवणारा आहे.

कितीही वाईट घटना असू दे, त्यातही नेहमीच एक चांगली बाजू असते. फक्त त्यादृष्टीने आपल्याला बघता आले पाहिजे.

ही घटना मला काय सांगू पहातेय? यातून मी काय शिकले पाहिजे?

असा विचार केलात तर अजून खोलवर जाऊन मनन करता येईल. मग तुम्हाला असे प्रश्न पडतील की माझ्या आयुष्यात कोणत्या गोष्टीची कमतरता आहे?

मला सतत कोणती चिंता सतावत आहे? याचे उत्तर शोधत असतानाच तुम्हाला आसपास उपलब्ध असलेल्या संधी दिसू लागतील.

मित्रांनो, आयुष्यात जेव्हा कठीण परिस्थिती येते तेव्हा नवीन काहीतरी शिकण्याची संधी घेऊनच येते.

अनपेक्षित आणि भयंकर प्रसंगात डगमगून न जाता योग्य प्रश्न आणि त्यांची योग्य उत्तरं शोधत रहाणे हाच उत्तम उपाय आहे.

इंग्रजी भाषेत एक सुंदर वाक्प्रचार आहे. When life gives you lemons, make lemonade.

२. कोणतीही रिस्क घेताना स्वतःला विचारा, यामुळे वाईटात वाईट काय घडू शकते?

कोणतेही धाडस केल्याशिवाय आपली प्रगती होऊ शकत नाही. आहे त्याच परिस्थितीत समाधानी रहाणारी व्यक्ती अनुभव समृद्ध होत नाही.

पाणी वाहतं असेल तरच प्रवाहाला वेग येतो. साठलेल्या पाण्यावर शेवाळ साचून त्याचं डबकं तयार होतं.

म्हणून आयुष्यात रिस्क घेतली पाहिजे. त्यामुळे आपल्या क्षमतांचा कस लागतो.

आपण काय करु शकतो हे काहीवेळा स्वतःला माहीत नसतं. पण एक धाडसी निर्णय आयुष्याची दिशा बदलून टाकू शकतो.

परंतु हे धाडस आंधळं नसावं. अविचाराने उचललेलं पाऊल नुकसान करु शकतं.

म्हणूनच सारासार विचार करून एखाद्या कामात उडी घेतली पाहिजे. आणि एखाद्या विषयाचा चहूबाजूंनी अभ्यास करण्यासाठी प्रश्न विचारले पाहिजेत.

कोणतेही धाडस करण्यापूर्वी परिस्थितीचा नीट विचार केला पाहिजे.

त्यासाठी एक प्रश्न स्वतःला विचारायचा. तो म्हणजे मी जर ही रिस्क घेतली तर वाईटात वाईट काय घडेल?

मी काय गमावून बसेन? या निर्णयामुळे कोणती परिस्थिती ओढवू शकते? आणि या प्रश्नांची उत्तरे शोधताना तुम्हाला कळेल की कितपत रिस्क आपण घेऊ शकतो.

काहीवेळा तुम्हाला असं उत्तर मिळेल की हे धाडस मुळीच करु नये कारण यात फार मोठे नुकसान होऊ शकते. अशावेळी थोडे थांबून योग्य वेळ येताच तुम्ही त्या निर्णयाचा फेरविचार करु शकता.

किंवा एवढा सखोल विचार केल्यावर तुम्हाला कळेल की आपण जेवढे घाबरतोय तेवढी चिंता करण्याची काही गरज नाही.

यालाच कॅल्क्युलेटेड रिस्क असं म्हणतात. याचंच दुसरं नाव आहे डोळस धाडस !!!

सर्वार्थाने विचार करून पाऊल उचलत असल्यामुळे आपला आत्मविश्वास चांगला असतो.

आणि कोणत्या अडचणी येऊ शकतात हे माहीत असल्याने आपण मानसिकरित्या तयार असतो. त्यामुळे तणाव आला तरी आपण त्याचा सामना करु शकतो.

३. जेव्हा तुम्हाला हरवून गेल्यासारखे वाटते, तेव्हा स्वतःच्या मनाला विचारा की तुम्हाला आयुष्यात नक्की काय मिळवायचे आहे?

काही वेळा आयुष्यात अशी परिस्थिती येते की आपण पूर्णपणे गोंधळून जातो. कोणता निर्णय घ्यावा हे कळत नाही.

मनाच्या अशा अवस्थेत काय करावं काहीच कळत नाही.

अशावेळी स्वतःला एक प्रश्न विचारावा की मला कोणती गोष्ट मिळवण्याची सर्वात जास्त इच्छा आहे?

अशी कोणती गोष्ट आहे की तिच्याशिवाय माझे आयुष्य अपूर्ण आहे? या प्रश्नाचे उत्तर म्हणजे तुमचे ध्येय किंवा पॅशन की ज्याच्याशिवाय तुम्ही राहूच शकत नाही.

हा एक प्रश्न तुमचा प्राधान्यक्रम कोणता हे ठरवण्यासाठी खूप उपयोगी पडतो. आपल्या प्रायोरिटी लिस्टवर कोणती गोष्ट पहिल्या नंबरवर आहे हे स्पष्टपणे कळेल.

आणि मग त्यानुसार दुसरी, तिसरी गोष्ट कोणती हे देखील तुम्हाला समजेल. यामुळे मनाचा गोंधळ कमी होऊन जाईल आणि कोणता मार्ग निवडावा हे अधिक चांगल्या प्रकारे उलगडेल.

आपण कितीही परिश्रम केले तरीही एकाच वेळी अनेक गोष्टी साध्य करणे शक्य नसते.

म्हणून आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचे काय आहे हे स्वतःला ठाऊक हवे. म्हणजे त्या दिशेने निश्चितच प्रयत्न करता येतात.

अन्यथा एक ना धड भाराभर चिंध्या अशी अवस्था होते आणि पश्चात्ताप पदरी पडतो.

४. तुम्ही अगदी थकून गेला असाल तर याक्षणी माझ्यासाठी काय महत्त्वाचं आहे? हा प्रश्न स्वतःला विचारा.

बऱ्याचदा आपण इतक्या जबाबदाऱ्या एकाच वेळी पार पाडत असतो, की त्यामुळे आपण पूर्णपणे थकून जातो. त्या ओझ्याखाली पार दबून जातो.

अशावेळी एक खूप महत्वाचा प्रश्न स्वतःला विचारावा की या वेळी कोणती जबाबदारी पार पाडणे सर्वात महत्वाचे आहे? म्हणजेच टॉप प्रायोरिटी काय आहे!!!

अशी कामं की जी पुढे ढकलणे शक्यच नाही. हे काम कोणतंही असू शकतं. वैयक्तिक, कौटुंबिक किंवा शैक्षणिक !!!

एकदा का याबाबत भूमिका स्पष्ट झाली की आपला वेळ व शक्ती एकवटून आपण त्या गोष्टीवर फोकस करु शकतो.

आणि अशाच प्रकारे प्राधान्यक्रम ठरवून एकामागून एक कामं पार पाडू शकतो.

एकावेळी एकाच कामावर लक्ष केंद्रित केल्यामुळे एकाग्रता साधली जाते. हातात घेतलेलं कामही नीट पार पडल्यामुळे समाधान वाटतं.

कामात शिस्त आली की वेळेचे नियोजन योग्य प्रकारे होते आणि मानसिक व शारीरिक थकवा कमी होतो.

५. जेव्हा तुमचे समाधान हरवल्यासारखे वाटते तेव्हा स्वतःला विचारा की माझ्या आयुष्यातील उत्तम गोष्टी कोणत्या आहेत?

आयुष्यात कधीतरी अशी वेळ येतेच की आपण आतापर्यंत जे काही मिळवलं ते पुरेसं नाही अशी भावना मनात निर्माण होते.

आणि यामुळे आपला आनंद आणि समाधान कुठेतरी हरवून जाते. अशावेळी काय करायचं?

तर आपल्या आयुष्यात ज्या बेस्ट गोष्टी घडल्या आहेत त्या आठवायच्या. कोणती नाती आपल्याला आनंद देतात हे पहावे.

जेव्हा अशाप्रकारे नवीन नजरेने आपण जीवनाकडे पहातो तेव्हा समजते की कित्येक गोष्टी आपण गृहीत धरत असतो.

पण अशा पद्धतीने विचार केला तर समजतं की आपल्याला खूप काही मिळालंय आणि त्यासाठी आपण कृतज्ञ असलं पाहिजे.

काळजी घेणारे कुटुंब, निरोगी आयुष्य, चांगली नोकरी अशा अनेक गोष्टी आहेत की ज्यासाठी आपण मनापासून आभार मानले पाहिजेत.

मग आपोआपच आपण आनंदी आणि समाधानी होतो.

त्यामुळे जेव्हा कधी आपण काय मिळवलंय याबाबत तुमच्या मनात शंका उत्पन्न होईल त्यावेळी हा प्रश्न स्वतःला जरुर विचारा.

इतकंच नव्हे तर वेळोवेळी आपल्या आयुष्यात असलेल्या चांगल्या गोष्टी आठवून पहा म्हणजे तुम्हाला जगण्यातला खरा आनंद सापडेल.

तर मित्रांनो हे पाच महत्त्वाचे प्रश्न नेहमीच लक्षात ठेवा. वेळोवेळी स्वतःला या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी प्रवृत्त करा.

यामुळे वरवर विचार न करता एखाद्या गोष्टीचा सखोल अभ्यास करण्याची सवय लागेल. तसंच तुम्हाला जी उत्तरं मिळतील त्यामुळे तुमच्या आयुष्याला चांगली दिशा मिळेल.

शेवटी काय तर विचारमंथन होणे हे महत्त्वाचे. आणि ते करण्याचे काम हे प्रश्न निश्चितच साध्य करतील.

हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करुन सांगा. लाईक व शेअर करून उपयुक्त माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय