म्युचुअलफंड युनिट आणि करदेयता…..

mutual fund

Mutual Fund Units And Taxation

म्युचुअलफंड युनिट हे आपल्या मालमत्तेचा भाग असून त्याची विक्री अथवा विमोचनातून अल्प किंवा दीर्घ मुदतीचा भांडवली नफा/तोटा होतो. हे युनिट प्रामुख्याने कोणती मालमत्ता (शेअर्स/बॉण्ड/कमोडिटी) किती काळ धारण करतात यावरून त्याची करदेयता ठरते. या युनिट्सचे त्यांनी जास्त प्रमाणात धारण केलेल्या मालमत्तेवरून दोन प्रकार पडतात —

१. समभागावर आधारित योजना ( Equity Mutual Funds) : ज्या योजनेत ६५% किंवा त्याहून अधिक समभाग गुंतवणूक आहे. अशा सर्व योजना यात येतात जसे लार्ज/मिड/स्मॉलकॅप/डायव्हर्सिफाईड इक्विटी फंड, सेक्टरल फंड, इक्विटी बॅलन्स फंड ई.

२. समभागरहित अथवा डेट योजना (Non Equity Mutual Funds) : यामध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक ही कर्जरोख्यात असते. उदा. लिक्विड फंड, मनी मार्केट फंड, गोल्ड फंड, इन्फ्रास्ट्रक्चर डेट फंड, डेट ओरिएंटेड बॅलन्स फंड ई.

१. समभागावर आधारित योजना ( Equity Mutual Funds)

समभागावर आधारित फंड योजनेचे आणि गोल्ड ई. टी. एफ. चे युनिट एक वर्षाच्या आत विकल्यास त्यातून अल्पमुदतीचा भांडवली फायदा/तोटा होतो. यातील फायद्यावर सरसकट १५ % कर द्यावा लागतो. तर याहून अधिक कालावधीनंतर झालेल्या भांडवली नफा/तोट्यातील एक लाखाहून अधिक निव्वळ नफ्यावर १०% कर द्यावा लागतो. यास चलनवाढीमुळे (Inflation) पडणाऱ्या फरकाचा फायदा मिळत नाही. ३१ मार्च २०१८ पर्यंत दीर्घकालीन भांडवली नफा करमुक्त होता. या आर्थिक वर्षांपासून त्यावर काही अटींसह कर बसवण्यात आला आहे. यानुसार गुंतवणूकदारांना ३१ जानेवारीपर्यंत होऊ शकणाऱ्या दीर्घमुदतीच्या नफ्यास करमाफी देण्यात आलेली आहे तर तोट्यास कोणतीही सूट मिळणार नाही. अशा व्यवहारात होणाऱ्या तोट्यास चालू आर्थिक वर्ष पकडून पुढील सात वर्षे भविष्यातील नफ्यासोबत समायोजित करता येईल.

२. समभागरहित अथवा डेट योजना (Non Equity Mutual Funds)

समभागविरहित अथवा डेट फंडातील युनिट तीन वर्षांच्या आत विकल्यास अल्प मुदतीचा भांडवली नफा / तोटा होतो तो व्यक्तीच्या नियमित उत्पन्नात मिळवून त्यावर नियमानुसार कर भरावा लागतो. तीन वर्षांनंतर विकलेल्या युनिट पासून होणारा नफा/तोटा हा दिर्घमुदतीचा समजण्यात येऊन यातील नफ्यावर २०% कर द्यावा लागतो. यातील नफ्याची मोजणी करताना चलनवाढीचा लाभ घेता येतो. तोटा पुढील ७ वर्षात ओढता येतो. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडून (Central Board of Direct Taxes) दरवर्षीचा चलनवाढ निर्देशांक जाहीर केला जातो. विक्री केलेल्या वर्षाच्या निर्देशांकास खरेदी वर्षाच्या निर्देशांकास भागून येणाऱ्या संख्येस खरेदी किमतीने गुणावे. ही आलेली किंमत ही चलनवाढीचा फायदा घेऊन आलेली खरेदी किंमत मानल्याने वाढलेल्या खरेदी किंमतीमुळे एकूण कर कमी द्यावा लागतो.

डेट फंडाच्या युनिटमधून आपल्यास डिव्हिडंड रूपाने उत्पन्न मिळत असेल तर त्यावर फंड हाऊस कडून मुळातून करकपात होऊन मिळतो. या वर्षांपासून इक्विटी म्युचुअल फंडाचे डिव्हिडंडवर नव्यानेच १०% कर अधिक सरचार्ज लावलेला आहे आणि डेट फंडाच्याप्रमाणे फंड हाऊस कडून हा कर मुळातून कापूनच मिळत असल्याने गुंतवणूकदारास यामार्गे मिळणारे हे उत्पन्न पूर्णपणे करमुक्त आहे.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.