तिची गोष्ट

तिची गोष्ट

देव विजोड लोकांच्या जोड्या लावतो हे खरं असलं तरी त्या जोड्या लावायला प्रत्यक्ष  देव येत नाही हे सुद्धा तितकंच खरं. पण जरा काही झालं कि देवावर खापर फोडायची आपल्याला सवयच झाली आहे.

पण ‘ती’ तशी नाहीये जिच्या बद्दल मी सांगणार आहे. अर्धवट वयात तिचं आणि त्याचं प्रेम झालं आणि वय पूर्ण होताच लग्न झालं. नवरा दिसायला खूपच छान, स्मार्ट, हँडसम कॅटॅगरीतला अगदी Display Item. तशी ती पण छानच…. फार सुंदर नसली तरी परत परत वळून बघणेबल नक्कीच.

अर्थात लोक का परत परत वळून बघतात हे तिला वयाची चाळीशी झाली तरी समजलेलं नव्हतं. जिथे ती जाईल तिथे ती अगदी Centre of Attraction व्हायची. यामुळेच असेल कदाचित, नवऱ्याला तिचं कितीही कौतुक वाटत असलं तरी त्या बरोबर संशयाचा किडा सुद्धा वळवळतच असायचा खुपदा.

जितकी ती नास्तिक तितकाच नवरा धार्मिक आणि खुपसा अंधश्रद्धाळू होता. जरा काही झालं की देवीला नारळ बोल किंवा पाच नारळाचं तोरण बोल असं सारखं सुरूच असायचं त्याचं.

तिला अर्थातच हे पटायचं नाही. पण बोलेल कोण आणि ऐकेल कोण? उगीच वादाला  विषय नको म्हणून हल्ली हल्ली या विषयावर ती काही बोलायचीच नाही. यांचं गाव कोकणात आणि गावाला घराण्याचे मूळ देव होते म्हणून नवऱ्याचे बहुतेक सगळे सण जसं कि होळी, दसरा, गणपती गावालाच साजरे व्हायचे.

तिच्या नोकरीपायी  तो तिला कधीच जबरदस्तीने  माझ्या बरोबर आलंच पाहिजेस असं म्हणायचा नाही.   पूर्वी म्हणजे लग्न  नवीन असताना तो तिला आग्रह करायचा बरोबर चलण्यासाठी, पण तिच्यासाठी ते महाकठीण काम होतं, कारण एकतर तिला या सगळ्याची हौस नव्हती आणि दुसरं म्हणजे ऑफिसला दांड्या मारून हे सगळं करणं तिच्या खिशाला परवडायचं नाही.

संसार जरी दोघांचा असला तरी त्याचा गाडा बरीच वर्ष म्हणजे अगदी आत्ता आत्ता पर्यंत ती एकट्यानेच हाकत होती. अवघड जागेचं दुखणं कुणाला सांगता येत नाही तसंच हे.

अगदी अलीकडे म्हणजे ३-४ वर्षांपासून नवऱ्याला पॉकेटमनी देणं बंद झालं झालं होतं, नाहीतर ते सुद्धा ती करत होती. तर झालं काय दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दसऱ्याच्या आधी नवरा देव उठवायला म्हणून गावाला निघाला.

त्याच्या एका  काकाने घटस्थापनेच्या दिवशी देव बसवून जायचे आणि याने दसऱ्याच्या २ – ३ दिवस आधी जाऊन ते ऊठवायचे असं वर्षानुवर्षे सुरु होतं. जाताना वाटेतून नेहमीप्रमाणे त्याने तिला एक फोन सुद्धा केला.  

तिथून गाव जेमतेम तासाभराच्या अंतरावर असेल. पहिला फोन साधारण सकाळी ११ च्या सुमारास आला म्हणजे फार तर १२ किंवा १२.३० पर्यंत तो गावात पोहोचेल असा अंदाज तिने केला.

असाही तिथे नेटवर्कचा प्रॉब्लेम असायचा, त्यामुळे पोहोचल्याचा फोन नाही आला तर निदान मेसेज तरी यायचाच हा नेहमीच अनुभव. दिवसभर कामाच्या  धबडग्यात मेसेज आला की नाही हे पहायला ती विसरूनच गेली.

संध्याकाळी ऑफिसमधून बाहेर पडल्यावर मेसेजबॉक्स चेक करताना तिच्या लक्षात आलं कि याचा मेसेज आलाच नाहीये. का आला नसेल? काळजीतच पडली आणि लगेच त्याच काळजीपोटी तिने त्याला कॉल लावला तर चक्क Switched Off ची टेप. बरं याच्याकडे एक सोडून दोन दोन नंबर्स, म्हणून मग दुसरा नंबर ट्राय केला तर तो पण Switched Off.

तिला वाटलं सकाळी लवकर निघालाय आणि त्यात इतकं अंतर एकटाच ड्राईव्ह करत गेलाय तर फोन बंद करून झोपला असेल. साधारण साडेसात वाजेपर्यंत ती घरी पोहोचली.

मेसेज तर आला नव्हताच आणि मध्ये मध्ये फोन लावत होती तर तोही लागत नव्हता. बरं नेटवर्कचा इश्यू असेल तर Out of Coverage Area अशी टेप येईल ना? हे सारखं सारखं Switched Off ऐकून तिला काळजी वाटायला लागली. त्यात याचा सोडून गावातल्या कुणाचाही नंबर तिच्याकडे नव्हता.

चौकशी करणार तरी कुठे आणि कुणाकडे? आठ वाजून गेले, साडेआठ झाले  तरी त्याचा फोन बंद तो बंदच. आता मात्र तिचा धीर सुटायला लागला.

वाईट साईट विचार मनात येऊन डोळे भरून यायला लागले. घरात धीर  द्यायला तिचा एकुलता एक  मुलगा होता आणि तो वयाच्या मानाने खूप Matured सुद्धा होता. वय लहान असल्यामुळे असेल कदाचित पण फार पॉजिटीव्ह विचार करायचा. हिला अशी ढेपाळलेली बघून मग त्याने मुंबईतल्या इतर नातेवाईकांकडे फोन करून गावातल्या कुणाचा नंबर आहे का याची चौकशी करायला सुरुवात केली.

८- १० फोन केले तेव्हा गावातल्या एक दोन जणांचे नंबर मिळाले. त्यातल्या एकाने तर तो अजून गावात आलाच नसल्याचं छातीठोकपणे सांगितलं. दुसरा म्हणाला येणार होता काय ? गाडी दिसली नाही. झालं हिचा धीर अजूनच सुटला. आता काय करायचं? जो माणूस सकाळी १२ किंवा १ पर्यंत गावात पोहोचायला हवा तो रात्रीचे ९  वाजले तरी पोहोचला नाही?

काय करायचं न कुठे शोधायचं? मुलगा पण बिचारा टेन्शन मध्ये आला. तेवढ्यात या फोनाफोनीत अजून एकाचा नंबर सापडला जो नेमका  गावातल्या घराशेजारीच रहात होता.   धडधडत्या काळजाने त्याला फोन लावला, पहिल्या  फटक्यात तो लागला आणि त्याने उचलला सुद्धा.

हिने स्वतःचं नाव सांगताच तो  तेवढ्याच तत्परतेने म्हणाला “थांबा हं वहिनी, भाऊ इथंच उभा आहे.”   हे ऐकल्यावर तिचा जीव अक्षरशः भांड्यात पडला आणि तिला जोरदार हुंदका फुटला, त्याचा आवाज ऐकायला ती अगदी आतूर झाली. काय काय विचार येऊन गेले होते आत्तापर्यंत मनात.

“काय ग ए  भें XX द,  Xड  साली झालंय काय तुला रडायला?  भें XX द,  अक्ख्या गावभर फोन कशाला फोन करत सुटली आहेस?   भें XX द, नाटकं करते नुसती, तुला माहीत आहे ना इथे नेटवर्क नसतं तरी  भें XX द फालतूगिरी करतेस काय?” एक शब्दही न बोलता तिने फोन ठेवून दिला.

तिला जेवढी अक्कल होती त्या प्रमाणे तिला इतकं कळत होतं कि नेटवर्कचा इश्यू असेल तर Switched Off अशी टेप न येता Out of Coverage Area अशी टेप येते, फक्त देवीची पूजा करायला गेलेला माणूस अगदी जवळच्या माणसाशी असा का वागतो हे मात्र तिला कळत नव्हतं किंवा तेवढी अक्कल तिला आली नव्हती ………..

मनाचे श्लोक

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!