ओळखीचं ओळखणं

manachetalks

खरे तर ‘ओळख’ आणि ‘ओळखणं’ ह्यातला फरक ओळखायला आपण चुकतो. हीच चुक मग आपल्याला अनुभवांची शिदोरी देते. कधी कटू, कधी चांगले, कधी काही काळ पुरणारे तर कधी आयुष्य बदलवणारे.

दोन व्यक्ती कोणत्याही माध्यमातून एकेमकांशी बोलल्या की आपण ओळख झाली अस म्हणतो. ती ओळख कधी समोरासमोर, कधी फोन वरून तर कधी व्हर्चुअल जगातून होते. साध्या हाय, हेलो पासून सुरु झालेला प्रवास हा कुठवर जाईल हे कोणीच सांगू शकत नाही. एकदा आपली मतं, मनं जुळली कि मग ही ओळख पुढल्या पायरीवर जाते. आणि मग आपण तो माणूस ओळखायला लागतो. पण असे काही अनुभव येतात की ‘ओळख’ आणि ‘ओळखणं’ ह्यात जमीन आस्मानाच अंतर आहे हे कटू सत्य आपल्या समोर उभ रहातं.

कोणतीही नवीन ओळख झाली कि त्यात नव्याची नवलाई असतेच. कधी न जुळलेले कोन अचानक जुळून येतात आणि आपण त्यात खूप आनंदी होतो. आपण त्या व्यक्ती बद्दल काही मतं बनवतो. चांगली आणि वाईट दोन्हीही मग एका साच्यात बसवतो. ते साचे पण आपणच निर्माण केलेले असतात किंबहुना त्यात बसवण्याची घाई आपल्यालाच जास्त असते. नवीन ओळखीत हरवून जाताना अनेकदा चुकीच्या साच्यात बसवल्याने येणारे अनुभव बरेचदा खूप त्रासदायक, क्लेशदायक आणि मन तोडणारे असतात. ह्यात चुक कोणाची? खरे तर ‘ओळख’ आणि ‘ओळखणं’ ह्यातला फरक ओळखायला आपण चुकतो. हीच चुक मग आपल्याला अनुभवांची शिदोरी देते. कधी कटू, कधी चांगले, कधी काही काळ पुरणारे तर कधी आयुष्य बदलवणारे.

माणसांची ओळख व्हायला वेळ लागत नाही. वेळ लागतो त्याला ओळखायला. ओळख होण्याचे तक्ते साधारण बाह्य गोष्टींवरून ठरतात तर ओळखण्याचे तक्ते मात्र आतल्या गोष्टींवरून ठरतात. ओळख ही साधारण आपल्या बरोबरीच्या लोकांशी आपण करतो. बरोबरीचे निकष हे पैसा, स्टेट्स, समाज, शिक्षण, नोकरी ह्या गोष्टीवरून ठरतात. पण ओळखण्याचे निकष हे परिस्थिती, वैचारिक जडणघडण, प्रगल्भता आणि प्रतिक्रिये वरून ठरतात. अनेकदा ओळखीला आपण ओळखणं समजून माणसांना आपलं बनवतो. त्यांच्यावर विश्वास ठेवतो. त्यांच्याशी संबंध जोडतो. पण जेव्हा अश्या ओळखी मध्ये “ओळखणं” होत तेव्हा त्यात कित्येक मैलाच अंतर असतं.

अनोळखी जगात ओळख व्हायला वेळ लागत नाही. अनेकदा पडद्यामागून होणारी ओळख आपल्याला पटकन हवीहवीशी वाटते. कारण समोर उभ केलेल चित्र इतक सुंदर असतं की आपण त्यात हुरळून जातो. तो मी नव्हेच चा मुखवटा घालून इकडे सगळेच वावरत असतात. त्यामुळे समोर येणाऱ्या अनेक गोष्टींना आपण ओळखणं समजतो. मग संबंध जोडतो. पण हे पडदे बाजूला झाले की खरी ओळख समोर येते जी अनेक दिवस, महिन, वर्ष लपलेली असते. मग आपण त्यात पूर्ण तुटून जातो. कारण असं काही असू शकत ह्यावर आपला विश्वास नसतोच. सगळच चित्र एकदम भकास दिसायला लागतं. दिलेले रंग पटकन उडून जातात. आपण असा कसा विश्वास ठेवला ह्याचा विचार आपण करत रहातो.

“ओळख” आणि “ओळखणं” ह्यात खूप अंतर असलं तरी ते कापता येत. आपली ओळख ही ओळखी पुरती मर्यादित ठेवायची कि त्याचं रुपांतर ओळखण्यात करायचं हे आपल्याला ठरवता आणि ओळखता यायला हव. कोणत्या गोष्टी मधून माणूस ओळखता येतो हे माहित झाल की मग ओळखीच रुपांतर ओळखण्यात व्हायला वेळ लागत नाही. पण साध्या ओळखी वरून आपल्याला खूप काही ओळखायला येत ह्या अविर्भावात राहणं आपल्याला तोंडावर पाडतं हे ही तितकच खरं. म्हणून ‘ओळख’ आणि ‘ओळखणं’ ह्या एकाच नाणाच्या दोन बाजू असल्या तरी त्यात खूप अंतर आहे हे आपण नेहमीच ध्यानात ठेवायला हवं.

कोणतीही नवीन ओळख झाली कि त्यात नव्याची नवलाई असतेच. कधी न जुळलेले कोन अचानक जुळून येतात आणि आपण त्यात खूप आनंदी होतो.

1 COMMENT

  1. मस्त लेख , अशी माणसं ओळखण्याची दैवजात देणगी काहींना असते त्यांच्याबद्धल मला नेहमीच आश्चर्य, कौतुक आणि कुतूहल वाटत आले आहे !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.