किसी की मुस्कुराहटोंपे हो निसार…… शैलेंद्र

आता मुंबईचे समुद्र किनारे घाणीने गिळंकृत केले आहेत. किनाऱ्याकडे फेसाळत येणाऱ्या लाटांमध्ये मानवी प्रगतीचा अहंकार व दर्प ये जा करतो. समुद्राची गाज तर कोलाहलात कधीच विरून जाते. मात्र ५० च्या दशकात हा समुद्र असा नव्हताच मुळी. जुहूच्या समुद्र किनाऱ्याची ओढ असलेला एक तरूण सकाळीच घरा बाहेर पडायचा. तेव्हा गल्ली सुनसान व रस्ते निर्मनुष्य असत आणि हे रस्ते त्याला प्रचंड उर्जा देत. त्याने लिहलेली बहूतेक गीतं या सुनसान रस्त्यावरून समुद्राकडे जाताना त्याला सुचली. रस्ते हे मार्ग क्रमणासाठी, तर समुद्र हा जीवनाचे सार सामावून घेणारा…… म्हणून तो नेहमी म्हणायचा, “जर मुंबईची ही सकाळ नसती जर हे सुनसान रस्ते ही नसते आणि जर हे रस्ते नसते तर…. तर मी माझ्या एकटेपणात कधी डुबलोच नसतो….. मग माझी ही गाणी मला कधी स्फुरलीच नसती ”

केसरीलाल राव बिहारच्या आरा जिल्ह्यातील धुसपूर गावचा भूमिहीन मजूर. जन्माने धुसिया चर्मकार त्यामूळे जात वास्तवाचा बळी. जमीनदारांच्या शेतात मजूरी करणे हाच काय तो जगण्याचा आधार. पण कामाच्या शोधात त्यांनी गाव सोडले. तो आगोदर रावळपिंडी (जे आताच्या पाकिस्तानात आहे) येथे आला. येथील ब्रिटीश हॉस्पिटल मध्ये ठेके घेत पत्नी चार मुलं आणि एक मुलगी यांचा संसार चालवू लागला. शंकरदास हा सर्वात मोठा मुलगा. सुरूवातीस बरे चालले पण नंतर आर्थिक तंगीने बेजार झाला. शेवटी कुटूंब कबीला घेऊन मथूरेत आला. इथे केसरीलालचा मोठा बंधू मथुरेत रेल्वेत कामाला होता त्यामुळे आसरा मिळाला. मथुरा शहरातील रेल्वे कर्मचाऱ्याची कॉलनी ध्यौली प्याऊ या नावाने ओळखली जाते. शंकरदास शाळेत जाऊ लागला. घरात दारिद्र्य इतके की भूक मरावी म्हणून वडील सर्व मुलांना बिडी प्यायला लावत. पण अशा परिस्थितीतही शाळा ते इंटर पर्यंतचे शिक्षण शंकरदासने पूर्ण केले.

शंकरदास लहानपणापासून महादेवाचा निस्सिम भक्त. पण जगण्याच्या वाटेवर काटेच काटे पसरलेले. पाय रक्तबंबाळ होईतो पायपीट होई सर्व कुटूबांची. त्यात त्याची एकुलती एक लहान बहिण आजारी पडली. तिला वाचविण्याचा आटापिटा केला पण दारिद्रयाने आर्थिक नाड्या अशा आवळल्या की पैशा अभावी तिचा उपचार होऊ शकला नाही आणि ती मृत्यू पावली. शंकरदास प्रचंड उद्ग्विन झाला. त्याचा दगडाच्या देवा वरील विश्वास कायमचा लोपला….. या काळात त्याने आपला शाळकरी मित्र इंद्र बहादूर खरे सोबत कविता करायचा छंद जोपासला. रेल्वेलाईनच्या जवळ एक छोटे तळे होते. तळ्या शेजारच्या एका मोठ्या दगडावर बसून हे दोघे मित्र कविता करत असत…. पूढच्या सबंध आयुष्यात याच कवितेने शंकरदासला मान मरातब, पैसा, प्रसिद्धी मिळवून दिली आणि चित्रपटसृष्टीला महान गीतकार “शैलेंद्र” मिळवून दिला.

कवी त्याच्या काव्य प्रतिभेने कितीही मोठा असला तरी पोट नावाचा अवयव आणि कुटूंब नावाची व्यवस्था प्रतिभेवर बहूतेक वेळा मात करते. शैलेंद्र स्वातंत्र्याच्या भावनेने पेटलेला कवी होता. शैलेंद्रला मुंबईला रेल्वेतली नोकरी मिळाली आणि माटूंग्याला घर मिळाले तेव्हा त्यांच्या हृदयातही कवितेने आपले घर केलेले होतेच. अशावेळी वरीष्ठाची मर्जी नोकरदार एकवेळ सांभाळू शकतो पण कवीला ते जमत नाही. शेवटी स्वातंत्र्याचा जागर आणि कवीच्या निष्ठेने मत केली व शैलेंद्रने नोकरी सोडली. स्वातंत्र्य संग्रामात आपल्या लेखणीला धार लावून उडी घेतली. हे दिवस “चले जाव”चे होते. स्वातंत्र्याच्या उर्मीने थेट तुरूंगातही जावे लागले. त्यांची “जलता है पजांब’’ ही कविता.

किसने हमारे जलियाँवाले बाग मे आग लगाई,
किसने हमारे देशमे फुट की ये ज्वाला धधकाई||
किसने माता की अस्मत को बुरी नजर से ताका,
धर्म और मजहब से अपनी बदनियत को ढाँका||
कौन सुखाने चला है पाँचो नदियोंकी धारा,
जलता है जलता है पंजाब हमारा प्यारा,
जलता है जलता है भगतसिंह की आंखो का तारा||

त्या काळात ही कविता स्वातंत्र्य संग्रामात उतरलेल्या अनेक युवकानां प्रेरणा देत असे. याच कवितेने त्यांचा चित्रपटसृष्टीकडे जाण्याचा दरवाजा देखिल किलकिला केला………………

मुंबईतल्या एका काव्य संम्मेलनात पृथ्वीराज कपूर सोबत राज कपूर यांनी पहिल्यांदा शैलेंद्रला “जलता है पजांब’’ कविता म्हणताना ऐकले. राज कपूर त्यावेळी ‘आग’ या चित्रपटाची निर्मित् करत होते. त्यांनी शैलेंद्र यानां ही कविता मागितली मोबदला देण्यासही तयार झाले. पण शैलेंद्र पडले पक्के सिद्धांतवादी. काव्याची विक्री करणे त्यांच्या सिद्धांतात बसणारे नव्हते. त्यांनी राजकपूरला चक्क नकार दिला. पण राजकपूरला शैलेंद्रमध्ये त्यांचा गीतकार स्पष्ट दिसत होता. त्यांनी आपले व्हिजिटिंग कार्ड त्यांच्या हाती दिले व म्हणाले, “आप कुछ भी कहें लेकिन, पता नहीं क्यों मुझे आप के अंदर सिनेमा का एक सितारा नजर आता है. जब जी चाहे इस पते पर चले आना.”

झाँसी स्टेशनवर शैलेंद्रजीचे एक दूरचे नातेवाईक स्टेशन मास्टर होते. एकदा शैलेंद्रजी त्याना भेटायला गेले आणि त्यांची मुलगी शंकुतला हिच्या प्रेमात पडले. त्यावेळी शैलेंद्रकडे लग्नासाठी घ्यायचे नवीन कपडेही नव्हते. पण शकुंतलाच्या वडीलांनी परवानगी दिली व त्यांचे लग्न झाले. रेल्वेतील नोकरी फार मोठ्या पगाराची नव्हती. शंकुतला त्यांच्या जीवनात बहूदा आनंद घेऊन आली असावी. एकदा त्यानां आपल्या पत्नीला झाँसीला पाठवायचे होते पण खिशात पैसे नव्हते. राजकपूर यांनी दिलेले व्हिजिटींग कार्ड त्यानां आठवले. ते चेंबूरला आर.के. स्टुडिओत पोहचले. राजकपूर यांच्या कडून ५०० रूपये घेऊन त्यांनी पत्नीला दिले.

मग एक दिवस ते पैसे परत करण्यासाठी म्हणून ते राज कपूरकडे पोहचले. ५०० रूपये त्यानां परत करू लागले तसे राज कपूर यांनी त्यांचा हात त्यांच्याच खिशाकडे परत नेला आणि मंदस्मित करत म्हणाले म्हणाले, “मला पैसे परत नको आहेत बस माझ्या चित्रपटासाठी दोन गाणी लिहून दे.” तेव्हा राजकपूर “बरसात” च्या तयारीत मग्न होते. त्यावेळी योगायोगाने पाऊसही सुरू होता. शैलेंद्रनी चित्रपटसृष्टीतले पहिले गीत लिहले, “बरसात मे, हम से मिले तूम, सजन तुमसे मिले हम….. बरसात मे…. ” चित्रपट इतिहासातील पहिले टायटल साँग म्हणून या गीताकडे बघितले जाते. १९४९ मध्ये प्रदर्शीत झालेल्या या चित्रपटाने शैलेंद्र सोबत संगीतकार शंकर जयकिशन, लताबाई आणि हसरत जयपूरी यांना घराघरात नेऊन बसविले. या चित्रपटात शैलेंद्र यांची फक्त दोन गाणी होती. पैकी वर दिलले टायटल साँग आणि दुसरे….. “पतली कमर है… तिरछी नजर है….”

ज्या काळात शैलेंद्र गीत लिहीत होते त्या काळात उर्दू भाषेचे वर्चस्व असणाऱ्या कवींचा वरचष्मा होता. म्हणूनच की काय शैलेंद्रची अत्यंत सोपी शब्दरचना असलेली पण तितकीच भावगर्भ असलेली गाणी उठून दिसत. असे म्हणतात की सोपे लिहणे हे अत्यंत अवघड काम असतं. शैलेंद्र यांची सर्वच गाणी सहज सोपी असल्यामुळे पाठ होत असत आणि त्याच्या मधूर चालीमुळे ओठावरही सहज रेंगाळत असत. त्या काळात ज्या गीताने त्यानां जगात लौकिक मिळवून दिला ते गाणे होते…. “आवारा हूँ…… या गर्दिश में हूँ, आसमान का तारा हूँ…..”

एकदम साधे शब्द पण कमालिचे अर्थपूर्ण. आवाराचे हे गाणे त्या काळात रशियात अत्यंत लोकप्रिय होते. त्यावेळी चित्रपटसृष्टीतही साम्यवादी विचारामुळे भारावलेले अनेक साहित्यिक, कलावंत व संगीतकार होते त्यात स्वत: राज कपूर, पटकथाकार के.एम. अब्बास, वसंत साठे, हसरत, शैलेंद्र हयांचाही समावेश होता. एका विचार धारेचे लोक एकत्र आले की काम सोपे होऊन जात असे. राज कपूर आणि त्याची टीम अखेर पर्यंत एकत्र टिकू शकली ती यामुळेच.

अनेकदा मुंबईच्या गर्दी गोंगाटापासून राजकपूर लोणावळयास असलेल्या आपल्या फार्म हाऊस मध्ये निवांतपणे बैठकी घेत. एकदा त्यांनी संगीतकार जयकिशन, शैलेंद्र व ऱ्हिदम मास्टर दत्ताराम यानां घेऊन लोणावळा गाठला. एका झाडाखाली सतरंजीवर सगळे गप्पा मारत बसले. सोबत बाजा, ढोलक, तबला, हार्मोनियम होतेच. राज कपूर शंकर आणि जयकिशनला म्हणाले- “मला एका नृत्य गीतासाठी चाल हवी आहे. तुमच्याकडे एखादी ट्युन आहे का?” यावर जयकिशन म्हणाले, “सध्या तर माझ्याकडे नाही नंतर सांगतो”. शंकरजी म्हणाले, “माझ्याकडे आहे”. मग राज कपूर दत्तारामला म्हणाले, “दत्तू, दादरा ठेका वाजव बघू” मास्टर दत्तराम ठेका वाजवू लागले. शंकरजी कडे गाणे नव्हते म्हणून त्यांच्या कडील चालीला त्यांनी काहीतरी शब्द लावले…… “रमैय्या वस्तावय्या….. रमैय्या वस्तावय्या…” बराच वेळ ते चाल वाजवत राहिले. शेवटी राज कपूर म्हणाले, “अरे आता याच्या पूढे काय. तेवढ्यात बाजूला बसलेले शैलेंद्र म्हणाले…… “मै ने दिल तुझको दिया….” आणि बघता बघता एक अजरामर गाणे तयार झाले. शंकरजी मुळचे हैद्राबादचे असल्यामुळे अनेकदा ते तेलुगू शब्दांचा वापर चाल देताना करीत असत. रमैय्या म्हणजे “राम” आणि वस्तावैय्या म्हणजे “परत कधी येणार” ‘श्री ४२०’ मधील या गाण्यातला नायक राजू देखिल आपल्या मूळ मित्रांमध्ये जेव्हा परत येतो तेव्हा सर्वजण हे गाणे म्हणत असतात. शैलेंद्रने या गाण्याला साध्या शब्दांच्या कोदंणाने इतक्या उंचीवर नेऊन ठेवलेय की आजही ६२ वर्षा नंतर गाण्याच्या भेंड्या खेळताना “र” हे अक्षर आले की पहिले गाणे आठवते ते “रमैय्या वस्तावैय्या”

मथुरेहून मुंबईला येण्यापूर्वी शाळा कॉलेजात असताना शैलेंद्रना हॉकी या खेळाचे खूप वेड होते. या खेळापासून त्यांना खूप उर्जा मिळत असे. मात्र जात नावाच्या वास्तवाचा चटका त्यानां एकदा हॉकी खेळतानाच बसला. ते खेळत असताना कुणी तरी म्हणाले, “ घरात खायला नाही तरी हे लोक हॉकी खेळणार?” मनातील अत्यंत चीड आणि मानभंगामुळे त्यांनी हॉकी स्टीक लगेच मोडून टाकली आणि मुंबईत जायचे मनात पक्के केले. मला वाटतं त्यांच्या मनातील हीच चीड, संताप, वेदना, स्वाभिमान शब्द बनून त्यांच्या लेखणीतुन झरत असावेत. ते मॅकॅनिकल इंजिनीअर होते. रेल्वेतले काम संपले की समोर कागद घेऊन तास न् तास ते कविता लिहीत बसत. नाहीतर चर्नी रोड जवळच्या ऑपेरा हाऊस समोर असलेल्या “प्रगतीशील लेखक संघा” च्या कार्यालयात जाऊन बसत. इथे त्यावेळी अनेक कवी साहित्यिकांचा जमावडा असे. राज कपूर यानां त्यांनी पहिल्यांदा इथेच बघितले होते.

अत्यंत समर्पक शब्द आणि त्यातुन व्यक्त होणारी संवेदना ते सहज लिहित ती अशी….

कल तेरे सपने पराये भी होंगे, लेकिन झलक मेरी आँखों में होगी….
फूलों की डोली में होगी तू रुख़सत,
लेकिन महक मेरी साँसों में होगी…..
(शम्मीकुपूरचा ब्रह्मचारी- १९६८)

प्रेमात असो की विवेक डळमळताना असो आपलं पाऊल घसरू शकते यावर ते म्हणतात, “सहज है सीधी राह पे चलना, देखके उलझन, बच के निकलना…. कोई ये चाहे माने न माने, बहुत है मुश्किल गिर के संभलना…..” (राजकपूरचा जिस देश गंगा बहती है-१९६०).

चित्रपटात येण्यापूर्वी ते देशभक्तीपूर्ण गीत लिहित असत. त्यांचा हा प्रभाव नंतर अनेकदा दिसून आला. भलेही आमची वेषभूषा कुठलीही असो हृदय मात्र हिंदुस्तानीच असेल, “मेरा जूता है जापानी… ये पतलून इंग्लिशतानी, सरपे लाल टोपी रूसी फिर भी दिल है हिंदूस्तानी…..”

संगम चित्रपटातील, “तन सौंप दिया, मन सौंप दिया, कुछ और तो मेरे पास नहीं….. जो तुम से है मेरे हमदम, भगवान से भी वो आस नहीं…..” आपल्या संशयी पतीला समजावताना एक सरळ गृहिणी किती साध्या शब्दात कौटुबिंक जीवनातील स्त्रीचं स्थान समजावून सांगत आहे.

गाईड चित्रपटातील, “आज फिर जिने की तमन्ना है…आज फिर मरने का इरादा है…” कुचंबणा सहन करणाऱ्या विवाहित स्त्रीला जेव्हा मुक्त आभाळाचा तुकडा दिसू लागतो तेव्हा ती आणखी वेगळं काय म्हणेल?

गझल म्हणताच आठवतात ते विरहाने व्याकुळ होणारे प्रेमी. शैलेंद्र यानी जी प्रेम गीतं लिहिली त्यात ते वास्तवा पासून कधीच लांब गेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या गीतात प्रेम जितक्या सहजेते येतं तितक्याच सहजतेने वास्तवाचं दर्शन देखील, “प्यार हुआ इकरार हुआ है, प्यारसे फिर क्यूँ डरता है दिल”…… किंवा “हर दिल जो प्यार करेगा वो गाना गाएगा, दिवाना सैकडो मे पहचाना जाएगा” किंवा दिल अपना और प्रीत परायी मधील, “अजीब दास्ताँ है ये…. कहाँ शुरू कहाँ खतम”….. “अनाडी” चित्रपटातील त्यांची सर्वच गाणी म्हणजे तत्वज्ञानच आहे. मग ते प्रेमाचं असो की व्यवहारातलं… “दिल की नज़र से, नज़रों के दिल से ये बात क्या है, ये राज़ क्या है, कोई हमें बता दे” किंवा “किसी की मुस्कूराहोटों पे हो निसार”…… हे गीत म्हणजे जागतिक स्तरावर माणसाला एका सुत्रात बांधण्याचा मंत्रच आहे……

विजय आनंद यांचा “गाईड” हा चित्रपटसृष्टीतला माईल स्टोन. खरे तर चित्रपटात विवाहीत नायिका न स्विकारण्याचा तो काळ. शिवाय चित्रपटाच्या शेवटी अध्यात्माची पण किनार….. यातील सर्वच गाणी लिहतानां शैलेंद्रने अत्यंत काळजीपूर्वक लिहली आहेत. “गाता रहे मेरा दिल”, “पिया तोसे नैना लागे रे”, “क्या से क्या हो गया”, “दिन ढल जाए”, “तेरे मेरे सपने अब एक रंग है”………. प्रत्येक गाण्यात स्वत: शैलेंद्र संवेदनेसह विरघळत असत. साहिर, शकील, मजरूह, शैलेंद्र हे मूळात आगोदर कवी. चित्रपट गीते नंतर लिहली या सर्वांनी. चित्रपट गीतं लिहतानां अनेक मर्यादा आणि तडजोडी कराव्याच लागत. त्या शैलेंद्र यांनी केल्या पण स्वत:चा वेगळा विशिष्ट बाज ठेवूनच. पटकथेत शैलेंद्र यांची गाणी मिसळून जात ते ठिगळ वाटत नसे.

शैलेंद्र उत्तम डफ वाजवित असत कारण ते स्वातंत्र्य संग्रामातील शाहीर पण होते. राज कपूर शैलेंद्र कडून डफ वाजविणे शिकले. त्यांच्या चित्रपटात या डफाचा वापर खूप सुंदर असायचा. “मेरा नाम राजू घराना अनाम”…. “होटोपे सच्चाई होती है”….. “दिल का हाल सुने दिलवाला”….”रामैय्या वस्तावय्या”…. या गाण्यातला डफ…… स्वातंत्र्याचा हुकांर म्हणजे डफ हे वाद्य ते फक्त ताल धरण्याचेच काम करत नाही तर त्यावर तडतडणारी बोटे दमनाचा निषेधही करतात. शैलेंद्रची गाणी म्हणजे जोडाक्षर विरहीत कवितांचा भाता….. यातला प्रत्येक शब्दबाण रसिकांच्या हृदयावर अचूक लागेल अशी व्यवस्था असलेला………

संगीतकार आणि गीतकार यांच्या जोड्या हमखास ठरलेल्या असत. शंकर जयकिशनसाठी शैलेंद्र यांनी सर्वाधिक गीते लिहली. शंकर जयकिशन अनेक निर्मात्याकडे शैलेंद्रसाठी शब्द टाकत असत. पण एकदा त्यांनी दक्षिणेतील चित्रपट करताना शैलेंद्र ऐवजी दुसऱ्या गीतकाराकडून गाणी लिहून घेतली. शैलेंद्र यानां ही गोष्ट बोचली. दोघात बातचित बंद झाली. शैलेंद्र अत्यंत भावनिक होते. त्यांनी शंकर जयकिशन यांना आपल्या भावना कळवल्या त्या अशा, “छोटीसी ये दुनिया पहचाने रास्ते है, कही तो मिलोगे तो पूछेंगे हाल”… शंकर जयकिशन या चार ओळीने हेलावले… त्यानी अबोला सोडला. नंतर या चार ओळीचे पूर्ण गाणे १९६२ मधील “रंगोली” या चित्रपटासाठी शैलेंद्र यांनी लिहले. या चित्रपटाचे निर्माते राजेंद्रसिंग बेदी यांना खरे तर मजरूह सुलतानपूरी यानां साईन करायचे होते पण शंकर जयकिशन यांनी शैलेंद्रसाठी आग्रह केला आणि त्यांनी तो मान्यही केला.

शैलेंद्र यांचे मोठे पूत्र जे आता हयात नाहीत, त्यांच्या लहानपणीचा एक किस्सा… शैलेंद्रच्या पत्नी जेव्हा सतत चुली समोर असत तेव्हा हा मुलगा बाबा घरी आला की त्यानां म्हणायचा, “बाबा, जर आम्ही भाकरीचे झाड लावले तर किती छान होईल…. एक रोटी तोडायची अन् आंब्या बरोबर खायची..’’ अजाणत्या वयातील मुलाचे हे बोल पूढे त्यांच्या गीतात प्रकटले….. १९५७ मधील हृषिकेश मुखर्जी यांच्या “मुसाफिर’’ या चित्रपटात किशोरदाचे एक गाणे आहे, नायकही तेच आहेत……

मुन्ना बड़ा प्यारा, अम्मी का दुलारा…… यात पूढील ओळी आहेत
एक दिन वो माँ से बोला, क्यूँ फूँकती है चूल्हा
क्यूँ ना रोटियोँ का पेड़ हम लगा लें…
आम तोड़ें, रोटी तोड़ें, रोटी-आम खा लें
काहे करे रोज़-रोज़ तू ये झमेला…
अम्मी को आई हँसी, हँसके वो कहने लगी
लाल, मेहनत के बिना रोटी किस घर में पकी
जियो मेरे लाल, जियो मेरे लाल ……
मेहनत के बीना रोटी किस घर मे पकी….
या एका ओळीत त्यांनी जगण्याचे सार सांगितले आहे.

शंकर जयकिशन यांच्या व्यतिरिक्त शैलेंद्र यांनी संगीतकार सलील चौधरी (मधूमती), एस.डी.बर्मन (गाईड, बंदीनी, काला बाजार), रविशंकर(अनुराधा) यांच्यासाठीही अप्रतिम गाणी लिहली. मधूमती चित्रपटातील “सुहाना सफर और ये मौसम हँसी”…. या गाण्यासाठी दिग्दर्शक बिमल रॉय वाट बघत होते. मुदत संपूनही गाणे आले नाही म्हणून त्यांनी शैलेंद्र यांना बोलावून घेतले. शैलेंद्र म्हणाले गाणे सर्व तयार झालेय पण मला एक ओळ अचूक सूचत नाहीए, मला आणखी एक दिवस वेळ द्या. गाण्याची ओळ होती- “ये गोरी नदियों का चलना उछलके”……… याच्या पूढची ओळ शैलेंद्रच्या मना सारखी उतरत नव्हती.. पण दुसऱ्या दिवशी सकाळीच बिमलदाना त्यांनी फोन केला व ओळ सूचली असे सांगितले… पूढची ओळ होती…”के जैसे अल्हड चले पी से मिल कर” बिमलदा म्हणाले. अरे व्वा !! सुंदरच. कशी सुचली? शैलेंद्र म्हणाले, “मी जेव्हा घराच्या खिडकीत बसून खाली गल्लीतल्या रस्त्यावर बघत होतो तेव्हा एक तरूणी अत्यंत घाईने पण प्रसन्नपणे जातानां दिसली आणि ही ओळ सुचली.”

मी एकदम पहिल्या परिच्छेदात जो जुहू आणि सुनसान रस्त्यांचा उल्लेख केला आहे तो शैलेंद्र यांच्या संबंधीत होता. त्यांना सकाळी लवकर उठून समुद्रावर जायला आवडत असे. घर ते समुद्र आणि समुद्र ते घर या दरम्यान ते अगदी एकांतात असत. स्वत:च्या मनाच्या डोहात शिरायला असे एकांत किमान कवीला तरी हवे असतात. त्यांच्या अनेक गीतांनी याच रस्त्यावर जन्म घेतला. “ये मेरा दिवानापन है” (१९५८: यहूदी), “सब कुछ सिखा हमने” (१९५९: अनाडी), “मै गाँऊ तुम सो जाओ”(१९६८: ब्रह्मचारी) या तीन गीतानां फिल्म फेअरचा पुरस्कार मिळाला. अमला मुजूमदार या त्यांच्या कन्या आठवण सांगताना म्हणतात, “बाबा एका गीतात ‘सब कुछ सिखा हमने, ना सिखी होशीयारी’ असे म्हणतात, वास्तविक जीवनातही ते तसेच होते. अनेकदा सेटवरील कामगार तंत्रज्ञ अडचणीत त्यांच्याकडे मदतीसाठी येत. मग नुकत्याच गाण्याच्या मिळालेल्या मानधनातुन ते त्यांनां पैसे देत. घरी आल्यावर पाकिट कपाटात ठेवत. मग आई त्यातुन पैसे काढून घेई. बाबा पाकिट हलके झालेले बघून आईला विचारत तर आई म्हणे- “तुम्ही अनेकानां पैसे वाटता मग शिल्लक कसे राहतील?” बाबा मग फक्त छानपैकी हासत. कारण त्यानां माहित असायचे की ‘आईने पैसे काढून घेतले आहेत.’

बरसात या पहिल्याच चित्रपटाने त्यांच्यावर लक्ष्मीची पण बरसात केली. बऱ्यापैकी कमाई होऊ लागली. मग त्यांनी एक नवीन घर खरेदी केले व घराचे नाव ठेवले “रिमझिम”. राजकपूर यांचा बरसात नतंरचा दुसरा चित्रपट होता आवारा. आवाराची कथा ऐकण्यासाठी ते शैलेंद्रला बळजबरीने सोबत घेऊन गेले. ख्वाजा अहमद अब्बास यानी कथा तयार केली होती. शैलेंद्र अगदी साध्या कपडयात गेले होते. अब्बास साहेबांनी त्यांच्याकडे फारसे लक्ष दिले नाही. मग सर्व कथा ऐकून झाल्यावर राज कपूर शैलेंद्रकडे बघत म्हणाले, “क्यूँ कवीराज कुछ समझ मे आया”. यावर शैलेंद्र म्हणाले, “हाँ, समझमे तो आया, काफी अच्छी कहानी है”. यावर राजकपूर म्हणाले, “और क्या समझ मे आया?” यावर शैलेंद्र म्हणाले, “बेचारा गर्दीशमे था पर आसमान का तारा था.” या उत्तरावर अब्बास साहेबांनी चमकून त्यांच्याकडे बघितले व ते राजकपूरला म्हणाले, “मला यांची परत एकदा ओळख करून द्या. मी दोन अडीच तास जी कथा ऐकवत होतो त्याचे सार या कवीराजने फक्त एका ओळीत सांगितले….” शैलेंद्रजीची हीच तर खासियत होती….. खूप मोठी गोष्ट खूप सोपी करून सांगायची. “आवारा” चे हे टायटल गीत प्रचंड लोकप्रिय झाले. सर्वसामान्य पण गुणी माणसाचं सहजसोप्प तत्वज्ञान-

घरबार नही संसार नहीं मुझसे किसीको प्यार नहीं
उस पार किसीसे मिलने का इकरार नहीं
सुनसान नगर, अन्जान डगर का प्यारा हूँ……..

खरे तर आज इतक्या वर्षा नंतरही असे लाखो आवारा डोळ्यात असंख्य स्वप्ने घेऊन आमच्या आजूबाजुला धडपडताना दिसतात.

शैलेंद्र यांनी जितके टायटल साँग चित्रपटासाठी लिहले आहेत तितके कदाचितच इतर कुणी लिहले असतील. चाहे कोई मुझे “जंगली” कहे, मेरे मन की गंगा…बोल राधा बोल “संगम” होगा के नही, भैया मेरे “छोटी बहन” को ना भूलाना, आ हा “आयी मिलनी बेला” देखो आयी, जीवन के दो पहलू है ये “हरीयाली और रास्ता”, सच है दुनियावालो की हम है “अनाडी”, जिस देश मे गंगा बहती है, “दिल अपना और प्रित परायी”, किसने है ये रीत बनायी, जानेवाले जरा होशियार यहाँ के हम है “राजकूमार” वगैरे वगैरे. विशेष म्हणजे गाण्यातील टायटल हे अजिबात ओढून ताणून आणले आहे असे वाटतच नाही इतके ते गीतात एकजीव झालेले आहे. आवारा चित्रपटातील त्यांचे घर आया मेरा परदेसी, आवारा तील आवारा हूँ, बरसात मे हमसे मिले तूम ही गाणी तर हिंदी चित्रपटा संगीतातील लॅन्ड मार्क आहेत…. एका गीतात शैलेंद्र म्हणतात, ‘होगें राजे राजकुवँर, हम बिगडे दिल शहजादे… हम सिंघासन पर जा बैठे, जब जब करे इरादे…………’ लोकशाहीचे मूल्य काय असते हे त्यांनी इतक्या अचूक शब्दात मांडले आहे की महान कवी गुलजार यानांही या गीताची भूरळ पडते.

राजकपूर यांचा अत्यंत महत्वकांक्षी चित्रपट म्हणजे “संगम’’… नर्गिसने आरके कॅम्प सोडल्या नंतर त्यांच्या चित्रपटाची मूख्य नायिका कोण होणार? याचे सर्वांना कुतूहल होतेच. त्यांनी वैजयंती माला यांच्याकडे प्रस्ताव दिला. पण त्यांचा काही लवकर होकार येईना… मग राजकपूर यांनी एक दोन ओळीचे पत्र लिहले….. त्या ओळी होत्या… “तेरे मनकी गंगा और मेरी मनकी जमूना…. का बोल राधा बोल संगम होगा की नही?” यावर उत्तर आले, होगा…होगा…होगा…मग पूढे राज कपूरने हा मुखडा धरून पूढचे गाणे लिहण्याची जबाबदारी शैलेंद्रवर सोपविली… ती त्यांनी इतकी सुंदर पार पाडली की आज ५४ वर्षानंतरही हे गाणे तितकेच लोकप्रिय आहे जितके तेव्हा होते….. या गाण्यात वैजयंती मालानेही सहभाग घेतला….होगा.. होगा.. होगा…

सामाजिक शोषण, गरीबी, सत्तेचा माज यावर अत्यंत परखडपणे पण तिक्याच सोप्या शब्दात त्यांची लेखणी प्रहार करीत असे. जे जे त्यांनी वास्तवात भोगलं ते ही त्यांनी त्यांच्या गीतातुन प्रकट केलं.

छोटे से घरमे गरीब का बेटा,
मै भी हूँ माँ के नसीब का बेटा
रंज-ओ-गम बचपन के साथी
आंधियो मे जली जीवन बाती
भूख ने हे बडे प्यार से पाला
दिल का हाल सुने दिलवाला……….

शैलेंद्र यांनी पैसा, प्रसिद्धी, मान सन्मान भरपूर मिळवलं पण बालपण मात्र कधीच हरवू दिलं नाही.भले ही ते अत्यंत कष्टप्रद होतं, त्यात अनेक अडीअडचणी, वेदना होत्या तरीही ते प्रियच वाटत असे त्याना. त्यानांच काय आम्हाला ही तर तसेच वाटते. आमच्या सर्वांची ही ठसठस आणि हूरहूर त्यांनी किती सुंदर शब्दात व्यक्त केली आहे-

मेरे ख़्वाबों के नगर, मेरे सपनों के शहर
पी लिया जिनके लिए, मैंने जीवन का ज़हर
ऐसे भी दिन थे कभी, मेरी दुनिया थी मेरी
बीते हुए दिन वो हाय, प्यारे पल-छिन
कोई लौटा दे मुझे बीते हूए दिन……………

शैलेंद्रजी आपल्या लेखणीचा वापर एखाद्या एक्स-रे मशीन सारखा करत असत. चेहऱ्यावर मुखवटे लावून जगणाऱ्या लोकांचा आतला खरा चेहरा ते सहजपणे लोकां समोर उघडा पाडत. लेखनाची एकदा उर्मी आली की ते अस्वस्थ् होत. एकदा ते मास्टर दत्ताराम यांच्या सोबत बसले असताना लिखान सुरू होते. कागदावर लिहायचे, नाही आवडले की फाडून त्याचा बोळा करायचे. शेवटी पेनातली शाई संपली. अन अचानक त्यांनां सुंदर ओळी सुचल्या. पण पेनाततली शाई संपलेली. त्यांनी आजुबाजूला बघितले. सिगारेट पेटवतानांच्या काडीपेटीच्या अनेक काड्या समोर दिसल्या. मग त्यांनी त्या काड्याच्या कार्बनने ओळी लिहल्या- “ए मेरे दिल कही और चल….” एका नितांत सुंदर जीवंत गाण्याचा जन्म विझलेल्या काडयाच्यां साह्याने झाला.

क्रांतीची गाणी गाणाऱ्या शैलेंद्रच्या आत देखिल अनेक शैलेंद्र होते. जीवनातील सर्वच भावनांचा उत्कट अविष्कार म्हणूनच त्यानां सहज करता आला असावा. अन्यथा “रंज-ओ-गम बचपन के साथी, आंधियो मे जली जीवन बाती लिहणारी” त्याची लेखणी- “ये मेरा दिवानापन है, या मोहबत का सुरूर, तू न पहचाने तो है ये तेरी नजरों का कसूर….” ही प्रेमाची तरलता तितक्याच उत्कटतेने लिहते. अध्यात्माताचा स्पर्श असलेली ……ओ जानेवाले हो सके तो लौट के आना, वहाँ कौन है तेरा, मुसाफीर जाएगा कहाँ, मेरे साजन है उस पार, मै मनमार ओरे माझी ले चल पार, दुनिया बनानेवाले क्या तेरे मनमे समाई, तू प्यार का सागर है, जीना यहाँ मरना यहाँ, झुमती चली हवा……………..त्यांनी लिहलेली “दिल तेरा दिवाना है सनम” सारखी प्रेम गीते, “याद न जाए”…सारखी विरह गीते, “तू प्यार का सागर है” सारखी भक्तीरसपूर्ण गीते, “नन्हे मुने बच्चे तेरी मुठ्ठी मे क्या है” किंवा “जुही की कली मेरी लाडली”…सारखी बाल गीते, “जाओ रे जोगी तूम जाओ रे” सारखी शास्त्रीय संगीतावर आधारीत गीते, अब की बरस भैया को सारखी कौटुबिंक गाणी… अशी लांबलचंक यादी शैलेंद्र याच्यां खात्यात जमा आहे. इतकेच नाही तर त्यांनी एक असा वेगळा प्रयोग आपल्या गीतात केला जो आज पर्यंत कुणीच करू शकला नाही. राजेंद्र कुमारच्या “ससूराल” चित्रपटात एक गाणे आहे- एक सवाल मै करू एक सवाल तूम करो….हे एक सवाल जबाब पद्धतीचे गाणे आहे. मात्र यात एक वैशिष्ठ्य असे आहे की जे उत्तर आहे तोच पुन्हा एक प्रश्न आहे.

राज कपूरच्या “श्री ४२०” आणि दिलीप कुमारच्या “मुसाफिर” या चित्रपटात शैलेंद्रने छोटीसी भूमिका पण केली आहे. चित्रपटाचा एक काळ असा आला की चित्रपटात शैलेंद्रचे एक जरी गीत असले तरी तो चित्रपट हीट होई. त्यांची अनेक गाणी लोक संगीत आणि ग्रामीण संस्कृतीच्या बोली भाषेचे प्रतिक असे. शहरातील शिक्षित ते खेड्यातला अडाणी अशा प्रत्येकाच्या ओठावर ही गाणी असत. “मधूमती” मधील दैया रे दैया हाय हाय चढ गया बिछूवा, “राजकूमार” मधील इस रंग बदलती दुनियामे, मेरा नाम जोकर मधील”मेरे अंग लग जा बालमा”, काँच की चुडिया सारखी त्यांची काही गाणी मदहोश करणारी पण आहेत, त्यात प्रणयाची धूंदीही आहे पण कधीही अश्लीलतेचा शिक्का आपल्या गाण्यावर उमटू दिला नाही….

मेरा नाम जोकर हा राज कपूरचा अत्यंत महत्वकांक्षी चित्रपट. पण चित्रपटांची दीर्घ लांबी आणि प्रेक्षकांची कमी वेळेतील चित्रपट बघण्याची आवड यामुळे इतका सुंदर चित्रपट म्हणावा तसा चालला नाही. या चित्रपटातील एक अत्यंत सुंदर गाणे म्हणजे “जीना यहाँ मरना यहाँ….” पण या गाण्याचा ते मुखडाच लिहू शकले. त्यांच्या मृत्यू नंतर हे गाणे त्यांचे पूत्र शैली शैलेंद्र यांनी पूर्ण केले.

१४ जानेवारी १९६१ मध्ये शैलेंद्र यांनी एका चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरूवात केली. फणीश्वर नाथ रेणू या प्रसिद्ध लेखकाच्या “मारे गए गुलफाम” या कादंबरी बर आधारीत हा चित्रपट होता. खरे तर हा चित्रपट एक कविताच होता. १९६६ मध्ये प्रदर्शीत झालेल्या या चित्रपटाचे नाव तिसरी कसम. चित्रपट पूर्ण होण्यास पाच वर्षे लागली. रेणू आणि शैलेंद्र यांनी दिवसरात्र एक करून प्रचंड मेहनत घेतली. ३ ते ४ लाखाचे बजेट २०-२५ लाखावर गेले. चित्रपट निर्मितीच्या शेवटच्या दोन वर्षात रेणूजी पण त्यांच्या गावी निघून गेले आणि शैलेंद्र पूर्णपणे एकटे पडले. रेणू शिवाय अंतीम संकलन पूर्ण करण्याची शैलेंद्र यांची इच्छा नव्हती. पण रेणूजीना येथे आणून ठेवायचे कुठे? हॉटेलचा खर्च ते करू शकत नव्हते. स्वत: रुणूजीवर पण ५०० रूपयाचे कर्ज होते. तेही मुंबईला येऊ शकत नव्हते. राज कपूर, वहिदा रेहमान हे मुख्य कलावंत. बासू भट्टाचार्य हे दिग्दर्शक होते. राजकपूरने फक्त एक रूपया मानधन घेऊन या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार व राष्ट्रपतीचे सुवर्ण कमळ मिळाले पण चित्रपट चालला नाही. भारतीय लोक संस्कृतीचा हा उत्कट अविष्कार होता. रेणूजीनी यात संवाद लिहले होते. त्या शैलेंद्र यांनी लिहलेली सर्वच गाणी या कथानकात इतकी मिसळून गेली की रेणू कोणते आणि शैलेंद्र कोणते हे ओळखता येऊ नये. मला व्यक्तीश: हा चित्रपट प्रचंड आवडतो. यातला राज कपूर त्याच्या चित्रपटातील राजकपूर मुळीच नाही. भोळा भाबडा हिरामण गाडीवान आणि नाचणारी वहीदा रहमान…… खरोखरच लाजबाब आहे.

यातील एकेक गाणे म्हणजे एकेक रत्नच. लोक संगीताचा अप्रतिम दरवळ शैलेंद्रच्या सर्वच गाण्यात आहे…… पान खायो सैंया हमारे, सजनवा बैरी हो गए हमार, दुनिया बनानेवाले, सजन रे झूठ मत बोलो, चलत मुसाफिर मोह लिया रे….राज कपूर यांनी चित्रपटाच्या शेवटात बदल करण्यास सांगितले होते. शेवट दु:खान्त नको असे त्यांनी सुचविले होते पण रेणू व शैलेंद्र यानी नकार दिला. रेणूजी पटण्याला निघून गेले. वितरक पण तयार होईनात. ट्रंकेतील चित्रपटाची रिळे बघून ते विषण्ण होऊ लागले. शैलेंद्र मनाने खूप खचले. रात्र रात्र जागरण होऊ लागले. परीणामी हा झुंजार कवी आजारी पडला. दिल्ली व उत्तर प्रदेशातील काही वितरकानी “तिसरी कसम” खरेदी केला खरा पण त्याच्या प्रमियरला ते जाऊ शकले नाही. एकटे पडलेले शैलेंद्र मग एकाकी झाले. त्यांनी आपल्या मित्राला, रेणूनां एक पत्र लिहीले- “मित्रा, सर्व सोडून गेले…मी एकाकी झालोय. चित्रपट प्रदर्शीत झालाय. आता हसू की रडू ते समजत नाही, पण या चित्रपटाचा मला अभिमान आहे.”

मग एक दिवस विखुरलेल्या शैलेंद्रने स्वत:ला सावरले. ३ डिसेंबर १९६६ ला शैलेंद्र राज कपूरच्या घरी गेले. दोघेही मित्र ऐकमेकांशी काहीच बोलले नाही. मुक्यानीच दोघांनी संवाद साधला. जड मन आणि उदासीचे सावट घेऊनच शैलेंद्र घरी परतले. जणू काही या महान गीतकाराने सर्व जगाचे ओझे आपल्या खांद्यावर पेलले आहे. त्यांची लेखणी एकदम नि:शब्द झाली. उसळून येणारे शब्दझरे अचानक आटले……खरं तर हा प्रतिभावान कवी पैशामुळे नाही तर जवळच्या अनेक नातेवाईक, मित्र, सहकारी यांच्या वागणुकीने व्यथीत झाला होता. चित्रपट नगरी ही खरोखरच माया नगरी आहे. इथे मनाचे सौदे सहजपणे केले जातात. मानवी व्यवहाराच्या कठोर वास्तवाने शेवट पर्यंत या कवीचा पिच्छा केला.

१३ डिसेंबर १९६६ चा दिवस. शैलेंद्र खूप बैचेन होते. पत्नीने त्यांची बैचेनी बघून राजकपूरला फोन केला. राज कपूरनी त्यानां त्यांच्या परीचयाच्या डॉक्टरकडे जाण्याचा सल्ला दिला. शैलेंद्र डॉक्टरकडे निघाले. मग मध्येच त्यानां राज कपूरला भेटायची इच्छा झाली व ते थेट राज कपूरच्या घरी पोहचले. गप्पा मारताना राज कपूरनी विचारले- “जीना यहाँ मरना यहाँ कधी पूर्ण होणार? यावर मिस्कीलपणे शैलेंद्र म्हणाले, “उद्याचा तमाशा होऊन जाऊ दे एकदाचा…” १४ डिसेंबर राज कपूरचा जन्म दिवस… शैलेंद्र दवाखन्यात दाखल झाले. रात्र कशीबशी पार पडली. दुसरा दिवस १४ डिसेंबर राज कपूरचा वाढ दिवस होता. शैलेंद्रना सारखे वाटत होते की राज कपूरचे अभिष्टचिंतन करण्यासाठी मला गेले पाहिजे. मात्र त्यांची नाजुक अवस्था लक्षात घेता डॉक्टर परवानगी देत नव्हते.

राज कपूर यांची पत्नी कृष्णा कपूर व मुकेश हॉस्पिटल मध्ये पोहचले. आर.के. स्टुडिओतील सर्व कर्मचारी शैलेंद्रसाठी प्रार्थना करत होते. अखेर दुपारी शैलेंद्रची ओजस्वी शब्दयात्रा कायमची थांबली. सर्वत्र ही बातमी वाऱ्या सारखी पसरली. राज कपूर यांच्या वाढ दिवसाची तयारी पूर्ण झालेली. त्यांचा तर विश्वासच बसेना…आपला मित्र शैलेंद्र मध्येच असा कसा सोडून जाऊ शकतो? ते थेट शैलेंद्रजींच्या घरी पोहचले. शैलेंद्रजीच्या पार्थिवावर कोसळून धाय मोकलून रडले… त्यांच्या कल्पनेला शब्दरूप देणारा त्यांचा मित्र जो काल त्यांच्याशी बोलला तो आज अचानक सोडून गेला होता…राज कपूर यांच्या चित्रपट कारकिर्दीतला हा फार मोठा आघात होता. राज कपूरच्या नंतर येणाऱ्या प्रत्येक वाढ दिवसाला शैलेंद्रच्या आठवणीने ढसाढसा रडायचा. नंतर त्यांनी धर्मयुग या मासिकात शैलेंद्रवर लेखही लिहला. त्या त्यांनी लिहले होते- “माझे शरीर स्टुडिओत असायचे पण आत्मा शैलेंद्र जवळ असायचा नेहमी.”

धूसपूर गावचा शंकरदास ते चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा गीतकार शैलेंद्र हा प्रवास अवघा ४३ वर्षांचा. त्यांच्या अंत्य यात्रेला चित्रपटसृष्टीतीलच नाही तर अख्खा जनसमुदाय लोटला होता. त्यांच्या मृत्यू नंतर शैलेंद्र खरोखरच किती मोठे होते याचा प्रत्यय येणे सुरू झाले आणि आजही दर दिवसागणीक शैलेंद्र मोठे होत आहेत..….. ३० ऑगस्ट हा त्यांचा वाढदिवस… त्यांच्या लेखणीला सलाम…..


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय