Psycho – खेचतंय कुणीतरी माझा हात….

Psycho

एक्स रे काढून बघू, डॉक्टर म्हणाले, आज सहा महिने झाले, माझा उजवा हात मधेच दुखायचा आणि मधेच काहीच झालं नाही इतका व्यवस्थित असायचा, असं का व्हावं हे काही समजेनासं झालंय मला अगदी, चार डॉक्टर झाले, एक्स रे झाले, पेन किलर, पेन किलर ऑइंटमेंट्स सर्व झालं, पण आता मला सिरिअस वाटायला लागलं होतं…. सहा महिने अशीच चालढकल चालली होती ,म्हणून आज स्पेशियालिस्ट्स कडे आले होते, खूपच ठणकत होता हात गेले चार पाच दिवस… म्हणजे अगदी हालचाल करणं कठीण होत होतं.

सहा महिन्यापासून माझं लक्ष माझ्या हाताकडे केंद्रित झालं होतं, असं का व्हावं हेच लक्षात येत नव्हतं. मात्र अलीकडे ह्या दोन महिन्यात मी एक निष्कर्ष काढला होता पण माझ्या निष्कर्षावर कोणी विश्वास ठेवेल असं वाटत नव्हतं. म्हणजे ते मला जाणवलं पहिल्यांदाच जेंव्हा मी सहा महिन्यापूर्वी आमच्या बिल्डिंगसमोरचा रस्ता ओलांडत होते. म्हणजे मी माझ्या तंद्रीतच होते. कित्येकवेळा ह्यांनी मला सांगितलंय क्रॉस करताना भानावर रहात जा म्हणून. त्या दिवशी मी चक्क चांगल्या भानावर होते क्रॉस करताना. रस्ता खूप वाहता होता. त्यामुळे क्रॉस करणं जरा कठीण होतं. म्हणजे इकडे अनेक ऍक्सिडंट्स झालेले होते त्यामुळे भितीपण वाटायची क्रॉस करताना. त्या दिवशी मी अशीच क्रॉस करताना अचानक मला ते जाणवलं. जाणवलं म्हणजे भास वगैरे नाही चक्क जाणीव झाली.

मी इकडे तिकडे क्रॉस करताना बघत असताना माझ्या हाताला एकदम ओढ बसली जणू कोणीतरी माझा हात माझ्या बाजूला उभं राहून गच्च पकडून खेचतंय. क्रॉस करताना लहान मुलं आईचा हात गच्च धरतात तसा. खूपच ओढ वाटत होती मला हात वर करताच येत नव्हता. असं का होतंय मला समजत नव्हतं पण हाताची ओढ जाणवत होती हे मात्र खरं. सिग्नल लागला आणि मी भरभर क्रॉस केला पण माझ्या हाताला ते ओढणं जाणवतच होतं, माझा हात इतका दुखायला लागला त्या दिवशी. मी सामान घेऊन घरी आले आणि माझं वेडवाकडं झालेल तोंड बघून ह्यांनी विचारले, अगं सामान उचललंस म्हणून असेल. मी काय सांगणार….. सामान आणायच्या आधीचा प्रसंग? त्या दिवशी रात्री हात चोळला आणि घट्ट बांधून ठेवला मग जरा बरं वाटलं. मी विसरून गेले तो प्रसंग.

एखाद्या आठवड्यानी मी आणि हे दोघेजण निघालो बाजारात. बऱ्याच वस्तू आणायच्या होत्या. संध्याकाळची वेळ होती म्हणजे साडेसहा सात ची…. अंधार पडायला लागला होता. आम्ही दोघेही क्रॉस करायला उभे राहिलो झेब्रावर आणि तितक्यात माझ्या हाताला झटका बसला आणि खाली कोणीतरी अक्षरशः माझ्या हाताला लोम्बकळल्या सारखं माझा हात खेचत होतं. म्हणजे मी हात वर करण्याचा प्रयत्न करत होते. पण मला हात घेताच येत नव्हता वर. माझी धडपड बघून काय झालं गं! असं विचारलं ह्यांनी. मी काहीच बोलले नाही पण ह्यांच्या लक्षात आलं मला काहीतरी त्रास होतोय ते.

सिग्नल मिळाला आणि मी अक्षरशः काहीतरी खेचत नेते आहे असं फीलिन्ग आलं मला. माझं असं खेचल्यासारखं चालणं बघून ह्यांनी पण आश्चर्य व्यक्त केलं. सामान घेऊन घरी आलो. हात प्रचंड दुखायला लागला. अगदी रडकुंडीला आल्यासारख झालं. उद्या जाऊ डॉक्टरकडे आपण. ठरवलं आम्ही…. आणि सर्व झालं अगदी एक्स रे वगैरे सर्व काहीच मिळत नव्हतं रिपोर्ट्स मध्ये…..

हात चोळणे/शेकणे सर्व प्रकार करत होते. हळू हळू पंधरा दिवसांनी आपोआपा थांबला हात दुखायचा. अगं अवघडला वगैरे असेल असे सल्ले सुद्धा ऐकले अनेकजणांचे, पण मला कसली तरी शंका येत होती, म्हणजे दोनदा तो प्रसंग मी अनुभवला होता. म्हणजे माझ्यावर कोणी विश्वास ठेवेल का ह्याबद्दल मी साशंक होते? म्हण्टलं आज आपण मुद्दामून बघूया. संध्याकाळी त्याचवेळेस निघाले बाहेर आणि आले बिल्डिंगच्या खाली म्हणजे क्रॉस जवळ तो एक्सपीरिअन्स येतो मला त्यामुळे मी दिशेने चालू लागले पण आज मी दचकलेच म्हणजे क्रॉस पर्यंत जायच्या आधीच माझ्या हाताला खेच बसू लागली.

मधेच हलकं वाटायचं मधेच ओढ पण क्रॉस ला उभे राहिले आणि माझा हात गच्च धरल्यासारखा वाटला ओढल्यासारखा. क्रॉसची भीती वाटून कोणी लहान मुलानी धरल्यासारखा बाप रे….. मी सहज माझ्या हाताकडे नजर वळवली मी दचकलेच काहीतरी हालचाल दिसली माझ्या उजव्या बाजूला. कोणीतरी लहान मूल असल्यासारखं वाटलं. मी घामानी थबथबले…. जबरदस्ती क्रॉस केल्यासारखं वाटलं मी गेले आणि परत उलट क्रॉस केला. बिल्डिंगच्या दरवाजापर्यंत ती ओढ जाणवली आणि नंतर एकदम हलकं. घरी येऊन प्रचंड हात दुखी परत एक आठवडा. हे कस सांगणार ह्यांना? हसतील मला…… तरीही धीर करून विषय काढला ह्यांच्यासमोर. वेडी आहेस का तू?

अगदी मानसोपचार तज्ज्ञही गाठला. पण हात दुखी काही जात नव्हती. मला कारण माहिती होतं पण जगाला न पटणारं…

त्या दिवशी अशी खेच जाणवल्यावर…. मी सहज म्हणलं अरे हळू जरा. हाताची पकड सैल झाली जरा परत दोन मिनीटांनी गच्च पकड. लोक माझ्याकडे बघायला लागले मी कोणाशी बोलत्ये म्हणून?

त्या दिवशी अशीच त्या ओढीबरोबर मी क्रॉस करत होते माझ्या आयुष्याला जणू ती ओढ चिकटली होती आणि अचानक क्रॉस करताना माझ्या हाताची पकड सैल झाल्यासारखी वाटली आणि मला ते धूसर दृश्य स्पष्ट झालं माझ्यासमोर….. तो लहानगा पडला होता रस्त्यावर गाडीसमोर आणि गर्दी झाली होती आजूबाजूला. लहानग्याच्या आईला दोष देत होते लोक. आई आतडी पिळवटल्यासारखी रडत होती. अहो त्यांनी हात सोडला हो माझा अचानक मी काय करू?

बाजूला व्हा बाजूला व्हा. माझी बायको आहे असे शब्द माझ्या कानावर आले. काय झालं ग? मला उचललं ह्यांनी आणि मी शुद्धीवर आले तोंडावर पाणी वगैरे….. घरी आलो…. प्रचंड वेदना हातमधून जाणवत होत्या….

काही उपयोग होणार आहे का डॉक्टर एक्स रे चा, मी निराश होत विचारले… हल्ली फ्रिक्वेन्सी कमी झालीये, पण सवय पण झालीये….

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!