असेही रक्षाबंधन….

रक्षाबंधन

रात्रीपासून ती आणि तिचे साथीदार अंधारात दबा धरून बसले होते. गडचिरोलीचे ते जंगल भयानकच होते पण त्याहीपेक्षा खतरनाक होते तेथील नक्षलवादी. अश्याच एका नक्षलवादी म्होरक्याच्या मागावर ती होती.

ती अनुजा रणदिवे …. नक्षलवाद्यांच्या काळजात धडकी भरविणारी अधिकारी. गडचिरोली चंद्रपूरच्या दहशतवादी विरोधी पथकाची प्रमुख. आतापर्यंत तिने अनेक नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले होते. पण आतापर्यंत तिने एकालाही जिवंत कसे पकडले नाही याची चर्चाच जास्त होत होती. विचारले की ती म्हणायची पेपरवर्कचा कंटाळा येतो. तसेही तिला ऑफिसमध्ये बसलेले फारच कमीवेळा पाहिले गेले होते.

आज रक्षाबंधन होते तेव्हा नक्षलवाद्यांचा म्होरक्या माखन बहिणीला भेटायला येणार याची खबर तिला मिळाली होती आणि म्हणून आपल्या वीस साथीदारांसह रात्रीपासून त्याच्या वस्तीजवळ दबा धरून बसली होती. सकाळचे सात वाजता आले होते. डोळ्यावरची झापड दूर करीत हातातील ए. के. ४७ सांभाळत ती समोरच्या वस्तीवर नजर ठेवून होती. मध्येच तिला भावाची आठवण झाली. दरवर्षीप्रमाणे राखी पोस्टाने पाठविली होती. ह्या नोकरीत भावाला प्रत्यक्षात भेटून राखी ही बांधता येत नाही असा विचार मनात येउन स्वतःशी हसली.

इतक्यात वस्तीत काही हालचाल सुरू झाल्याची चाहूल तिच्या अनुभवी कानांनी टिपली. हात उंचावून तिने आपल्या साथीदारांना सावध केले. वस्तीभोवतीचा वेढा हळूहळू आवळला गेला. लक्ष ठरविली गेली आणि एकच क्षणी ती सर्व साथीदारांसहित त्यावर तुटून पडली. वस्तीतली सर्व रहिवासी भांबवून गेले. एक वादळ यावे तसा तिचा हल्ला होता. काही कळायच्या आतच काही नक्षलवादी अंगावर गोळ्या घेऊन पसरले तर काहींनी क्षीण प्रतिकार करीत मरण पत्करले.

ती आपल्या दोन सहकाऱ्यांसोबत एखाद्या झंझावतासारखी माखनच्या झोपडीत शिरली. आतमध्ये माखन आपल्या बहिणीचा ढालीसारखा वापर करून उभा होता. त्याची बहीण भीतीने थरथर कापत उभी होती. अनुजाने हातातली ए. के. 47 खाली केली आणि साथीदारांनाही इशारा केला.

“मारू नका त्याला ….” ती हात जोडून म्हणाली. अनुजाने मान डोलावली. मग हातातील राखी दाखवून नजरेनेच तिची संमती घेतली. तिनेही नजरेने होकार दिला. माखनच्या थरथरत्या हातावर तिने राखी बांधली आणि ओवाळणी केली तोपर्यन्त अनुजा आणि तिचे सहकारी सावधपणे उभे होते.

सर्व आटोपताच तिच्या सहकाऱ्यांनी त्याच्यावर झडप घातली आणि सर्व बाहेर जाण्यासाठी वळले. अचानक अनुजाच्या कानावर ओळखीचा बारीक हलका आवाज आला…. क्षणार्धात ती वळली आणि आपल्या हातातील रायफलीच्या गोळ्यांनी माखनच्या बहिणीच्या शरीराची चाळण केली. माखनने चमकून बहिणीकडे पाहिले तेव्हा ती माखनची रायफल हातात घेऊन खाली कोसळत होती.

“कुत्र्या…… तुझ्या बहिणीला माहीत नाही की नेहमी बंदुकीशी मैत्री करणाऱ्यांना तिचा लोड करण्याचा आवाज झोपेतही ओळखून येतो. खरे तर तुला ही आताच वर पोचवणार होते पण तुझ्यासाठी हिने मरण पत्करले त्याची आयुष्यभर तुला जाणीव राहायला हवी ती कशी मेली हे सतत तुला डोळ्यासमोर दिसायला हवे म्हणून तुला जिवंत ठेवते. आता बस आयुष्यभर तिची आठवण काढीत जेलमध्ये “असे बोलून बाहेर पडली”


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!