चूक

चूक

खालून विक्रमची हाक ऐकू आली आणि माझा चेहरा खुलला तर सौ.च्या कपाळावर आठ्या पडल्या. “लवकर घरी या ….उगाच उशीर करीत बसू नका”. सौच्या ह्या बडबडीकडे लक्ष न देता मी तयार होऊन खाली आलो.

विक्रम बाईकवर होता. मला बघून म्हणाला” चल बस मागे…. जायचं एकाकडे “.

“च्यायला एकाकडे जायचंय ….??? मला वाटले बसायचय.. ..?? मी थोडे रागात म्हटले.

“अरे भाऊ….. श्रावणबिवण काही आहे की नाही…… नेहमी बसायचे कसे सुचते…… आणि वहिनी मला शिव्या देते”. विक्रम हसत म्हणाला “त्या नितीन कदमकडे जायचे आहे. एक काम आहे त्याच्याकडे. तिकडून मग बसू ….?? मनात त्याला शिव्या देत मी बाईकवर बसलो आणि नितीनकडे निघालो.

आज नितीनकडे वेगळे वातावरण आहे हे आत शिरल्यावर कळले. नेहमीप्रमाणे आम्हाला पाहून वहिनीच्या कपाळावर आठ्या दिसल्या नाहीत उलट आमचे अगदी हसत हसत स्वागत झाले.

“बरे झाले भाऊजी…. तुम्ही आलात. मी याना सांगणार होते तुम्हाला बोलवायला….” वहिनी हसत म्हणाल्या.

काही न समजून मी विक्रमकडे पहात बसलो. विक्रमने डोळ्यानेच मला गप बस असे दटावले. इतक्यात नितीन बाहेर आला. त्याचाही चेहरा प्रसन्न दिसत होता.

“अरे विक्रम…… आज इनक्रिमेंट झाले माझे. स्वप्नातही वाटले नव्हते असा अचानक पगार वाढेल आणि तोही इतका..…! शिवाय दोन महिन्याची भरपाई” नितीन हसत हसत म्हणाला. मीही मनापासून अभिनंदन केले त्याचे. विक्रमने कसनुसं हसत त्याला हात मिळवला.

“हो ….. छान पगार वाढला यांचा. आता बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आमचे. घराचा हप्ता जातोय….. मुलगा दहावीला आहे त्याच्या क्लास ची फी…… घरात काही फर्निचर घ्यायचे आहे….. हे सर्व होईल आता हळू हळू …” वहिनी फारच खुश दिसत होत्या. तिने श्रीखंड पुरी आमच्यासमोर आणून ठेवली.” आता श्रावण चालू आहे म्हणून हे गोड घ्या. संपल्यावर तिखटाचं जेवायला यायचं तुम्ही. विक्रम भाऊजीमुळे याना नोकरी लागलीय हे विसरणार नाही आम्ही…..” वहिनी उत्साहाने बोलत होत्या.

मी काही न बोलता श्रीखंड पुरीवर तुटून पडलो पण विक्रमचा हातकाही चालत नव्हता. यावेळी नेमके उलटे का झाले याचा मी खाता खाता विचार करीत होतो. इतक्यात विक्रमने त्याच्या ताटातील पुऱ्या माझ्या ताटात टाकल्या मी बघताच म्हणाला” तेलकट नको वाटते हल्ली…. तू खा.

“उद्या मी ह्यांना मॉलमध्ये घेऊन जाणार. छान कपडे घेते यांच्यासाठी. किती वर्षे तेच तेच कपडे वापणार आणि शूजही घेते. चप्पल फाटली तरी बदलत नाहीत बरेच दिवस. आता स्वतःसाठी काहीतरी करा…..” वहिनी प्रेमाने नितीनकडे पाहत म्हणाल्या.

“चला निघतो आम्ही….” अचानक विक्रम म्हणाला “घाई आहे जरा भेटू नंतर…..” असे म्हणत मला खेचतच बाहेर काढले. बाहेर येताच मी विक्रमवर चिडलो “काय झाले तुला अचानक…?? अर्धवट उठवलेस मला.”

“भाऊ काही त्याचे इनक्रिमेंट झाले नाही….. पगारवाढ झाल्याचा त्याचा गैरसमज झालाय…..” विक्रम माझ्याकडे पाहत शांतपणे म्हणाला.

” म्हणजे ….?? मी हादरून विचारले .

“अरे….. माझी भाची संध्या ह्याच्या कंपनीत एचआरला आहे. तिच्याकडे शब्द टाकला म्हणून याला नोकरी मिळाली. काही महिन्यांपूर्वी काही लोकांचे इनक्रिमेंट झाले. त्यात हा नव्हता. आज त्यांचे पगार झाले. चुकून ह्याच्या अकाऊंटमध्ये कोणाचा तरी पगार जमा झाला. ती रक्कम मोठी आहे. ह्याला वाटले ह्याचेही इनक्रिमेंट झाले. म्हणून हा खुश झालाय. संध्याचा फोन आला मला म्हणाली काही ही करून त्याच्याकडून त्या रकमेचा चेक घेऊन या. अजून बऱ्याच जणांच्या बाबतीत हे घडलंय. सर्वांकडून कंपनी चेक घेतेय .आता तिची नोकरी धोक्यात आलीय म्हणून मी यांच्याकडे चेक घ्यायला आलोय पण इथे तर भलताच प्रकार चालू . मला तर काय बोलावे सुचत नव्हते शेवटी असह्य झले आणि तुला खेचतच बाहेर घेऊन आलो” विक्रम हताशपणे म्हणाला.

“मग संध्याचे काय …?? मी विचारले.

“तिचे ती बघून घेईल… चूक तिची आहे आणि चुकीला माफी नाही” विक्रम चिडून म्हणाला आणि बाईक घराकडे वळवली.

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!