उदे गं अंबे, उदे!!

भारत हा उत्सवप्रिय देश आहे. या देशात वर्षभर काही ना काही उत्सव साजरे होत असतात.. नुकताच दहा दिवसांचा गणेश उत्सव साजरा करण्यात आला आणि आता नवरात्री उत्सव दोन दिवसावर येऊन ठेपला आहे. “नवरात्र” आदिशक्ती जगन्माता दुर्गेचा हा उत्सव. हिंदू संस्कृती ही शिवउपासने बरोबरच शक्तीउपासनेला तेवढेच महत्व देते. आदिमाता आणि आदिशक्ती म्हणून जिचा उल्लेख केला जातो त्या देविमातेला विविध ठिकाणी विविध स्वरूपामधून, वेगवेगळ्या चालीरितीने पुजले जाते. घरोघरी घटस्थापना करून त्यांंची विशेष पुजा करण्यात येते. देशाच्या विविधते मध्ये जी एकता दडलेली आहे, त्यानुसार प्रत्येक राज्यात नवरात्र उत्सवाला आगळी वेगळी झळाळी मिळते.

नवरात्रौत्सव हा आदिमाया आदिशक्तीचा. अर्थात खऱ्या अर्थाने स्त्रीशक्तीचा जागर करणारा आहे. जिच्यापासून जगाची उत्पत्ती झाली तीच ही जीवदायिनी स्त्री.. परंतु याच स्त्रीची आपल्या समाजातील पूर्वापार प्रतिमा कशी होती, आता कशी आहे? हे यानिमित्ताने तपासण्याची गरज आहे. एकीकडे जगदंबेचा उद्‌घोष करायचा, कालीपुढे डोकं टेकायचं, महालक्ष्मीला देव्हाऱ्यात पुजायचं, दुर्गेची उपासना करायची, लक्ष्मीची आराधना करायची, सरस्वतीचे गोडवे गायचे, तर दुसरीकडे समाजात वावरणाऱ्या त्याच शक्तीच्या सूक्ष्म रूपाचा अनादर करायचा. तिच्यावर बळाचा वापर करायचा. वस्तूसमान समजून तिचा उपभोग घ्यायचा. हि मानसिकता आजही समाजात दिसून येते. त्यामुळेच या पारंपरिक उत्सवांकडे डोळसपणे पाहणे आणि उत्सवामागचा मूळ अर्थ तपासून तो आचरणात आणणे काळाची गरज आहे.

प्रत्येक समाजातील महिलेचा दर्जा हा त्या समाजाच्या प्रगतीचा टप्पा दर्शवितो. भारतीय संस्कृतीचा विचार करता इतर कोणत्याही संस्कृतीपेक्षा भारतीय संस्कृतीने प्रत्येक युगात स्त्रीला महत्त्वाचे स्थान दिलेले आढळून येईल. पूर्वीपासून आतापर्यंत स्त्रीचे महत्त्व व स्थान लक्षात घेऊनच सर्वात आधी आपल्या मातेला नमस्कार करण्याची आपली परंपरा आणि संस्कृती आहे. तिचे स्थान उच्च आहे, म्हणूनच आपल्या संस्कृतीमध्ये ‘मातृदेवो भव’ असे म्हटले आहे. पुरातन काळात अनेक रणरागिणींनी आपल्या पराक्रमानी इतिहासाची पाने रंगवलेली दिसून येतात. आजची स्त्रीही पुरुषांच्या तुलनेत कोठेही मागे नाही. प्रचंड आत्मविश्र्वास, चिकाटी, जिद्द आणि बुद्धिमत्तेच्या जीवावर स्त्रीने विविध क्षेत्रांमध्ये आपलं कर्तृत्व सिद्ध केलं आहे, पुरुषांची मक्तेदारी समजल्या जाणाऱ्या पोलिस, लष्करी दल याबरोबर, रिक्षा, ट्रक चालविणे, पेट्रोलपंपावर पेट्रोल भरण्याचे काम करणे, बस कंडक्टर, पत्रकारिता, फायरब्रिगेड ही क्षेत्रे सुद्धा महिलांनी काबीज केली आहेत. कला, शिक्षण, विज्ञान, खेळ, राजकारण, समाजकारण अर्थकारण अशा सर्वच क्षेत्रात स्त्रीया उतुंग झेप घेत आहे. मात्र तरीही समाजाची पुरुषी मानसिकता अजून बदलायला तयार नाही. परंपरा आणि रूढींच्या जाचातून तिची सुटका अद्यापही झालेली नाही.

आजही घराघरात स्त्री चा छळ केला जातो. हुंड्यासाठी तिला जाळून मारले जाते. महिला मुली रस्त्यावर सुरक्षित फिरू शकत नाही. स्त्रीला केवळ उपभोगाची वस्तू समजणारे महाभाग आजही आपल्या समाजात वावरत आहेत. घरात, कामाच्या ठिकाणी महिलांना अनेक अत्याचारांना तोंड द्यावे लागते. बलात्कार, स्त्री भ्रूणहत्येच्या घटना आणि अन्याय, अत्याचाराला बळी पडणाऱ्या स्त्रियांचं शोषण पाहिलं कि आपण देवीची उपासना का करतो? असा उद्वेगजन्य प्रश्र्न मनाला पडतो. २१ व्या शतकातही आपल्याला हुंडाबळीचा कायदा, महिलांवरील अत्याचार तसेच बलात्करांचा कायदा अधिक कडक करावा लागत आहे. आधुनिकतेच्या गप्पा मारणाऱ्या या समाजात ‘बेटी बचाव बेटी पढाव’ सारखी योजना राबवावी लागत असेल तर आपण प्रगत झालो असे म्हणायचे तरी कसे ? भारतीय संस्कृतीमध्ये देवी शक्तीचे प्रतिक मानले जाते. सुख समृध्दी देणारी लक्ष्मी, शक्ती व संरक्षण देणारी महाकाली दुर्गा, ज्ञान देणारी महासरस्वती. अशा शक्तीचे आपण पूजन करतो आणि दुसरीकडे मुलगा हा कुळाचा वंश तर मुलगी म्हणजे ओझे असा खुळचट विचार जोपासतो याला काय म्हणावे. आज मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. १००० मुलांमागे ७०० ते ८०० मुली हे प्रमाण आपल्या समाजाला भूषणावह आहे का? याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. स्त्री-भ्रूण हत्येची प्रकरणे पाहिली तर आपल्या लक्षात येईल की, स्त्री-भ्रूण हत्या समाजाच्या सर्वच स्तरांवर होतेय. बुलडाणा जिल्हा मातृतीर्थ म्हणून ओळखला जातो. ज्या माँ जिजाऊने आपल्या दृढ निश्चयाने आणि पराक्रमाने छत्रपती शिवरायांना स्वराज्याची प्रेरणा दिली. आणि स्वराज घडविले त्या जिजाऊंच्या जिल्ह्यात मुलींचा जन्मदर चिंताजनक आहे. त्यामुळे आता या प्रश्नाच्या मुळाशी जायला हवं. वरवरच्या गोष्टी करण्यात फार काही हासील नाही. त्यामुळे हे सामाजिक व्यंग काढून टाकण्यासाठी ठोस कृती करायला हवी. आदिशक्तीची नवरात्रात पुजा करत असताना जो भक्तीभाव आपण तिच्याप्रती दाखवितो तीच भक्ती आणि तेच प्रेम आपण प्रत्येकाने समाजातल्या प्रत्येक स्त्रीबाबत मनापासून दाखवावे.. अंगणाअंगणातून नारीशक्तीचा उद्‌घोष व्हावा. तेंव्हाच घराघरात स्थापित झालेली ती आदिशक्ती सुखावेल.

दैत्य आणि असूर यांचा नाश करण्यासाठी सगळ्या देवदेवताना आदिमायेचा जागर करून आदिशक्तीला साकडे घालावे लागले तेव्हा कुठे या असुरांचा निप्पात झाला होता. आजच्या काळात वाईट प्रवृत्ती आणि खुज्या मानसिकतेचे राक्षस सगळीकडे बोकाळले आहेत. महिला-मुलींवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस इतक्या वाढत आहे की, भारताची नोंद “महिलांसाठी असुरक्षित देश” म्हणून केल्या जात आहे. ही नुसती दुर्दैवी नाही तर चिंताजनक बाब आहे. त्यामुळे या प्रवृत्तीचा निप्पात करण्यासाठी पुन्हा एकदा आम्ही मातृशक्तीलाच आवाहन करीत आहोत. ‘उदे’ म्हणजे ऊठ, जागी हो.. आई! आदिशक्ती जगन्माते, जागी हो.. उदयोस्तू.. उदे गं अंबे उदे..!!


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय