आणि बायकोने समाजसेवेचं भूत उतरवलं…

एखाद्याला मदत करताना एक छोटी चूक तुम्हाला त्रासदायक कशी ठरू शकते, याचा नुकताच मला प्रत्यय आला. काही दिवसांपूर्वी मला ठाणे स्टेशनवर एक आजी भेटली होती. ठाणे स्टेशनवर बिचारी भीक मागत होती. बर्‍याच विषयावर तिच्यासोबत गप्पा झाल्या माझाही म्हातारीवर विश्वास बसला. तेव्हापासून म्हातारीला मदत मिळावी म्हणून मी धडपडत होतो. काही दिवसांपुर्वी फेसबुकवर त्यासाठी आवाहनही केलं होतं. त्यामाध्यमातून अनेक सामाजिक संघटनांनी पुढाकार घेऊन मदत करण्यासाठी कळवलं होतं. परंतू आजीचा पत्ता माहित नसल्यामुळे मदत तिच्यापर्यंत पोहोचवणं शक्य झालं नव्हतं.

त्यानंतर साधारण दोन तीन महिन्यांनी म्हातारी मला भेटली. विचारपूस केली असता, आजच गावाकडून आली असं तिने सांगितलं. गप्पा गोष्टी झाल्यानंतर थेट तिला विचारलं, तुला गावाकडे मदत मिळून देऊ का? मागच्यावेळी तू भेटली होती तेव्हा मी एक बातमी पेपरमध्ये छापली होती! बातमीचा विषय काढल्यानंतर ती माझ्याकडे बघतच राहिली. मी तिला मोबाईलमधील बातमी आणि तिचे फोटो दाखवले. आजी हसायला लागली. म्हणाली, ‘फोटो पण छापले का? आमच्या गावाकडे तर काही नाही आलं!’

मी म्हटलं सगळीकडे आली. खूप लोक मदत करायला तयार आहेत तुला. तुझा पत्ता विचारत होते. पण घाईघाईत मी विसरलो होतो. आज पूर्ण पत्ता दे! तुला या वयात असं इतक्या दूर येण्याची गरज पडणार नाही. म्हातारीनं दिलखुलास हसत गावचा संपूर्ण पत्ता सांगितला. इतक्यात ट्रेन आली, मी म्हातारीच्या हातातली पोतडी उचलून घेतली आणि ट्रेनमध्ये चढलो. सोबत एक मित्र होता. त्याच्यासोबत बोलत असतानाच माझं स्टेशन आलं. आजीला म्हटलं, ‘काळजी घे, माझा मोबाईल नंबर दिलाय गरज पडली तर फोन कर’, तिच्याशी बोलतच ट्रेनमधून उतरलो. मित्राला सांगितलं आजीला कल्याणला उतरून दे!

घरी गेलो, एक पोस्ट फेसबुकवर टाकली. अशी अशी एक आजी आहे. मागच्यावेळी मी केलेल्या आवाहनाला आपण उत्तम प्रतिसाद दिला होता. गाव माहीत नसल्यामुळे आपण तिला मदत करू शकलो नव्हतो. तर आता समजलंय की, ती या या गावची आहे. आपण मदत करा, गरज वाटली तर मीसुद्धा येईल! खाली माझा मोबाईल नंबर दिला.

थोड्यावेळातच ती पोस्ट वार्‍यासारखी व्हायरल झाली. आजीच्या नातेवाईक आणि घरच्या लोकांपर्यंत पोचली. त्यांनी मला फोन केला. माहिती घेतली. त्यांच्यासाठी त्यांची आई भीक मागते हेच मुळात धक्कादायक होतं. अत्यंत सुशिक्षित आणि सुखवस्तू घरातील असल्यामुळे आजीला असं करण्याची गरज नव्हती. तिच्या नावाने त्यांनी फिक्स डिपॉझिटमध्ये गुंतवणूक केलेली आहे. घरातही तिला काहीच कमी नाही. आम्हाला मुलीकडे किंवा इतर नातेवाईकडे जाते असं सांगून ती घरून गेली. आम्हाला माहीतच नाही ती तिकडे असं काही करत असेल म्हणून, असं आजीच्या नातवाने सांगितलं. पुढे तो म्हणाला, कदाचित ती चुकून तिकडे आली असेल! नवरात्रात नऊ दिवस देवाचं करायला आमच्यातले लोक जातात. आम्हाला तिने सांगितलं की, ‘देवाचं करायला जाते, मग तिकडे कशी आली?’

मी म्हटलं तसं नाही खूप दिवसांपासून बघतोय मी तिला. दोन महिन्यांपूर्वी तर मी आजीला सगळं विचारलं होतं आणि त्याचा व्हिडिओ पण आहे माझ्याकडे! त्यांना हे ऐकून मोठा धक्काच बसला. त्यांनी मला व्हिडीओ पाठवायला सांगितला. तो बघितल्यावर त्यांना पटलं! त्यानंतर त्यांनी मला सर्व हकीकत सांगितली. म्हातारीच्या नावाने त्यांनी एफड्या केलेल्या आहेत. आमची आर्थिक बाजू देखील भक्कम आहे. इतकं सगळं देवाने दिलेलं असताना आमच्या आईवर अशी वेळ आम्ही येऊ देऊ का? असा तर आम्ही स्वप्नातही विचार करू शकत नाही. इतकंच नाही तर गावातल्या इतरही लोकांनी मला तेच सांगितलं. मलाही हळूहळू त्यांचं पटत होतं. ते एक एक गोष्ट तपशीलवार सांगत होते. त्याला गावातील लोकही दुजोरा देत होते. मग मला प्रश्न पडला की, आजी असं का करत असेल? मला जो प्रश्न पडला होता त्याच प्रश्नाचं कोडं आजीच्या मुलांना पडलं होतं.

आजीच्या कुटुंबियांना याचा त्रास होईल हे माझ्या तेव्हा लक्षात आलं. मात्र आता उशीर झाला होता. आधी असं काही होईल याचा मी विचारच केला नव्हता. माझ्या डोक्यात एवढंच होतं की, आपण सामाजिक संस्थांकडून तिला मदत मिळून देऊ! पण करायला गेलो एक आणि झालं दुसरंच! हा सर्व प्रकार झाल्यानंतर मी सर्वात आधी फेसबुक पोस्ट डिलीट केल्या. तो पर्यंत माझाही फोन वाजायला लागला होता. अनेकांचे फोन आले. काही वेळानंतर मलाही त्याचा मनस्ताप झाला.

इतकं सगळं झाल्यावरही आजीच्या घरच्यांनी हा विषय अत्यंत शांतपणे आणि संयमाने हाताळला! मला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घेतली. हे सगळं घडत असताना माझा फोन सतत वाजत होता. मी लोकांना उत्तर देऊन थकलो होतो. त्यामुळे मी फोन बंद करून ठेवला. सकाळी बायकोला सगळं सांगितलं. तिने यावर कुठलीही प्रतिक्रीया न देता सगळं ऐकून घेतलं. दुसर्‍या दिवशी पहाटे चार वाजता म्हातारीच्या घरच्यांचा फोन आला. मी झोपलो होतो. तिने फोन उचलला. त्यांनी विचारलं कुठे आहेत. ती म्हणाली झोपलेत. बरं ठीक आहे, त्यांना सांगा आम्ही कल्याणला आहोत. आजी काही सापडत नाही, तुम्ही थोड्यावेळासाठी या म्हणावं! तिने हो म्हणून फोन बंद करून ठेवला.

ती माझ्या उठण्याची वाट पाहत होती. साधारण नऊ वाजता उठलो. तिच्या लक्षात येताच ती माझ्याजवळ येऊन बसली. तीचा चेहरा उतरलेला होता. म्हटलं काय झालं. ती म्हणाली. तुमचं हे समाजकार्य बंद करा. ट्रेनमध्ये कोणी भेटलं का पैसे दे! कोणाची अनाथाश्रमात सोय कर. कोणालाही नंबर द्यायचा आणि सांगायचं मदत लागली तर अर्ध्या रात्री फोन कर! म्हणजे रात्री अपरात्री तुमचे फोन येणार आणि त्याचा त्रास आम्ही सहन करायचा!

मी म्हटलं, अगं सांग तरी काय झालं. ती म्हणाली काय होणार आहे. काही झालं तरी तुम्हाला काय फरक पडतो. पगार झाला की तुम्ही लोकांना मदत करायची आणि मी महिनाभर घरात अडचण भोगायची. रात्रीअपरात्री तुमचे फोन येणार, तुम्ही झोपणार नाही आणि आमचीही झोप उडवणार! लोकं चांगले नाहीत आजकालचे! चांगलं झालं तर ठीक, नाहीतर चांगलं करण्याच्या नादात एखादी चूक झाली, तर लोक पटकन चूक दाखवतात! आजपर्यंत आपल्याला या समाजसेवेतून काय मिळालं मला सांगा! आनंद मिळण्याऐवजी त्रासच झालाय ना! आता आणखी त्रास नका देऊ, बास झालं आता!

तिला नेहमीप्रमाणे उडवून लावत मस्त चहा बनवायला सांगितला! रागारागात तिने चहा आणला! गरमागरम चहासोबत पुन्हा तिने थेट विषय काढला! अशा अशा लोकांचा पहाटे फोन आला होता. ते तुम्हाला बोलवत होते. मग मी तिला समजावून सांगितलं, ते लोक आजीला शोधत आहेत. ती सापडत नाही म्हणून त्यांनी फोन केला असेल. तू काळजी करू नकोस! तिच्यासमोरून त्यांना फोन केला. त्यांच्याशी बोललो, म्हटलं असे रात्री फोन करू नका माझ्या बायकोला आवडत नाही! त्यांनीदेखील या संवादाला हसून प्रतिउत्तर दिलं. बायकोलाही आनंद झाला! त्यानंतर त्यांनी स्वतःहून माल फोन केला नाही!

इतकं मात्र खरं की, बायकोसोबतच्या चाय पे चर्चेतून आपल्या अशा वागण्याचा घरच्यांना त्रास होतोय याची पहिल्यांदा जाणीव झाली. रोज ऑफिसमधून निघाल्यापासून तर घरी पोहोचेपर्यंत ती सारखे फोन का करते, आपण घरी पोहोचल्याशिवाय तिला शांतपणे झोप का येत नाही? याचं कारणही आता कळून चुकलं होतं. रात्री ऑफीसमधून येताना तिच्या आवडीचा आईस्क्रिम घेतला. घरी पोहोचल्यावर दाराची कडी वाजवली. तिने आनंदानं दार उघडलं. म्हटलं बॅगेत बघ काय आहे? आईस्क्रिम बघितल्यावर तिच्या चेहर्‍यावर जो आनंद मला दिसला, तो शब्दांत व्यक्त करणं कठीण आहे. थोळ्याच वेळात ती आनंदानं झोपी गेली. यापुढे तिला निश्चिंत झोप मिळावी म्हणून ठरल्याप्रमाणे मी मोबाईल बंद केला. तसंही आमच्या संसाराला आणखी काय हवं होतं?

आजीबद्दलचा पूर्वीचा लेख..

मला भेटलेली आजी!


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय