स्वातंत्र

स्वातंत्र

फोनवर ठरल्याप्रमाणे मी त्या पंचतारांकित हॉटेलच्या गेटवर पोहोचलो. समोरच्या रस्त्यावरून मी बऱ्याचवेळा गेलो होतो पण असल्या आलिशान हॉटेलच्या आत जायची वेळ कधी आली नव्हती. त्या मॅडमनी फोनवर सांगितलं होतं की त्या गार्डला माझ्याबद्दल सांगुन जातील , मी फक्त त्यांचं नाव सांगितलं तर तो मला त्यांच्याकडे घेऊन जाईल. पण त्या गार्डच्या जवळ जाताच त्याने कपाळाला आठ्या पडल्या. पण त्याकडे दुर्लक्ष करून मी त्याला विचारलं .

“संगीता मॅडम इधर आयी है क्या ?”

“कोण हवय तुम्हाला, इकडे खूप लोक आहेत आम्हाला कुणाचं नाव नाही माहित”

माझ्या आवाजाच्या टोन वरूनच माझा मध्यमवर्ग ओळखत त्याने तुसड्या आवाजात उत्तर दिलं. आता आली का पंचाईत. चार वेळा फोन लाऊन झाला होता ह्या बाईला पण उचलला नव्हता. आता एक शेवटचा प्रयत्न करायचा नाहीतर गप घरी यायचं असं ठरवून मी तिचा नंबर लावला आणि पलीकडून नशिबाने तो उचलला गेला.

“येतोयस ना रे तू ?”

“तुमच्या हॉटेलच्या गेटवर उभा आहे ”

“मग ये की आत…. रिसेप्शन जवळ, बस आलेच मी खाली ”

“नको, तुम्हीच या गेट जवळ”

“बरं आले थांब दोन मिनिट”

त्या सिक्युरिटी गार्डशी परत बोलायची काय माझ्यात हिम्मत नव्हती. आता ह्या बाई खाली कधी येतात त्याची वाट बघत मी तिकडेच उभा राहिलो. एकतर मी त्यांना कधी बघितलं सुद्धा नव्हतं, फक्त फेसबुकवर आम्ही बोललेलो थोडसं कधीकधी. माझ्या घराच्या जवळच्या हॉटेलमध्ये त्या राहणार होत्या म्हणाल्या म्हणून म्हटलं भेटू. भेटल्यावर काय बोलायचं ह्याचा विचार करत मी तिकडेच घुटमळत राहिलो. बाईंच एक मिनिट १० मिनिटांचं असाव कारण त्या बरोबर २० मिनिटांनी खाली आल्या. त्यांनी आतूनच हात दाखवला आणि मला हातानेच आत बोलावलं. मी माझ्याच बापाचं हॉटेल असल्याच्या रुबाबात आत गेलो. तिकडचं ते कुठून कुठून पडणारं पाणी, वेगवेगळ्या आकाराच्या त्या खुर्च्या बघत बघत मी आत गेलो.

तिकडे दोन दोन खुर्च्या आणि मधे एक काचेचं टेबल असं खुपकाही मांडलेलं होतं. एका खुर्चीवर मी बसलो आणि एकावर बाई बसल्या. त्यांनी मला एकदा बोलताना सांगितल होतं की त्यांचा एक मुलगा इंजिनियर आहे आणि दुसरा मुलगा सि.ए. करतोय. मी तेव्हाच डोक्यात कॅल्क्युलेशन करून टाकलं होतं, इंजिनियर म्हणजे किमान २३ वर्ष, मुल झालं तेव्हा बाईंचं वय किमान २५ म्हणजे एकूण बाई हाफसेंच्युरीच्या जवळपास पोहोचलेल्या असणार. पण टाइट टी शर्ट, जेमतेम मांड्या झाकणारी शॉर्ट पँट, मोकळे सोडलेले कुरळे खांद्यापर्यंतचे येणारे केस, डोळ्यांवर लावलेला स्टाइलीश गॉगल, हाताच्या बोटांना कलाकुसर करून लावलेल नेलपेंट हे सगळं बघून माझे सगळे अंदाजच चुकले. बाईनी स्वतःला एवढं मेंटेन ठेवल होतं की त्या फार फार तर ३०-३५ च्या वाटत होत्या. पण बाईंच्या हाताची नखं मात्र अगदी बारीक कापलेली होती हे मला खटकलं. लांब नखं त्यांच्या एकूण गेटअपला शोभली असती.

“तुम्ही एवढ्या मोठ्या मुलांची आई वाटत नाही हो”

पहिल्याच बॉलवर सिक्सर मारत मी बोललो आणि त्याचा हवा तसाच परिणाम झाला. बाई खळखळून हसल्या आणि “ thanks for the compliment ” म्हणाल्या. गप्पांची सुरवातच एवढी छान झाल्यामुळे आमच्या गप्पा मस्त रंगल्या. मी माझ्या बद्दल सांगत होतो बाई त्यांच्याबद्दल सांगत होत्या. तेवढ्यात त्यांच्या फोनवर ‘श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ’ ही ट्यून वाजली. बाईंचा एकून गेटअप आणि ती ट्यून खूपच मिसमॅच वाटली. स्क्रीनवर आलेलं ‘अहो’ हे नाव मी बघून न बघितल्यासारख केलं.

“एकंच मिनिट हा…. मी फोन घेऊन आले. ह्याला ना मी नसले की घरी अजिबात करमत नाही” म्हणून बाई फोन कानाला लाऊन जरा लांब जाऊन बोलायला लागल्या. त्या लांब गेल्या तरी तिकडच्या शांततेमुळे मला त्याचं बोलण अगदी स्पष्ट ऐकू येत होतंच म्हणा.

“हो पोचले…. करणारच होते हो फोन….. आत्ताच तर रूम मिळालेत……. हो….. नाही….. नाही जाणार…. हो सगळ्या बायकाच आहेत कितीवेळा सांगू, तुम्ही स्वतःच बसवलंत ना मला गाडीत, होता का कुणी पुरुष तिकडे…. हो…. तो काळा सलवार कमीज घातलाय तुम्ही दिलेला….. तुम्ही होता ना बॅग भरताना, बघितलेत ना सगळे कपडे मी भरलेले…. सगळे ड्रेसच आणलेत मी फक्त बाकी काहीच नाही घालणार आहे….. आता ठेवू का, मला जरा फ्रेश व्हायचं आहे…. लगेच नाही ना…. प्लीज…. अर्ध्या तासाने करते फोन बास… बाय”

बाई फोन ठेऊन परत समोर येऊन बसल्या.

“आमच्या घरात ना खूप ओपन वातावरण आहे, सगळ्यांना आपल्या मनाप्रमाणे वागायचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. म्हणून तर मी अशी मस्त एन्जॉय करते, बाहेर फिरते”

बाई माझ्या नजरेला नजर न मिळवता बोलल्या. खाली यायच्या गडबडीत त्यांच्या नवीन टी शर्टचा प्राईज टॅग त्या काढायला विसरल्या होत्या हे माझ्या आता लक्षात आलं. तो गळ्यात मंगळसुत्रासारखा लोंबणारा प्राईज टॅग त्यांच्या स्वातंत्र्याबद्दल मला ओरडून ओरडून सांगत होता.

लेखन : सचिन मणेरीकर

आणखी काही कथा…

माझा संशय आहे, घातपात झाला असेल त्यांच्या घरात….
वळण (कथा- प्रेम, धोका आणि पुन्हा निखळ प्रेम)


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.