ऐंशीच्या दशकातलं बालपण, पैशाने नसलं तरी मनाने समृद्ध होतं

शाळेच्या त्या दिवसांत खरे तर अभ्यास, करियरसारख्या गोष्टींचा विचार कॉलेजमध्ये गेल्यावर करायचा असतो, अशा विचारात मी नेहमी असायचो.

शाळा म्हणजे जुजबी ज्ञान देणारी संस्था आणि तिकडे जाणं म्हणजे आपल्या बालपणाला लागलेला शाप असं मला नेहमी वाटायचं.

त्यामुळे अभ्यास आणि करिअर वगैरे असल्या प्रश्नांना निदान दहावीच्या परीक्षेपर्यंत तरी माझ्या मनात थारा नव्हता. कसे तरी आपले ७-८ तास शाळेत काढायला जायचो, तेही आपले मित्र भेटणार, ते काही सुंदर चेहऱ्यांना बघायला मिळणार त्यासाठी!

त्या सुंदर चेहऱ्यांना बघण्यापुरतीच माझी मर्यादा असायची हे वेगळ्याने सांगायला नको…

शाळेत असताना माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी होत्या त्या म्हणजे खेळ, मनसोक्त हुंदडणं आणि धमाल मस्ती!! शाळा कधी एकदा सुटते असं व्हायचं आणि धावत घरी येऊन ते दप्तर असं गादीवर फेकून देऊन कसेतरी दोन घास तोंडात कोंबत जो घराबाहेर पळायचो, तो अंधार पडल्यावर आई बोलवायला येईपर्यंत.

आईला नाही म्हणणे म्हणजे वेताच्या छडीचे वळ आपल्या पायांवर रेखाटण्याची तयारी करणे. ती वेताची छडी किती वेळा मोडायचा प्रयत्न केला असेल पण पूर्ण धनुष्य केलं तरी ती कधीच तुटली नाही.

त्यामुळे आईचा आदेश हा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश मानून घरी जाणं भाग असायचं.

अनेकदा फुटलेलं ढोपर आणि अंगठे जेव्हा हात पाय धुताना झोंबायाचे तेव्हा नक्की हे कधी लागलं ह्याचा विचार डोक्यात सुरु व्हायचा. नक्की कोणता बॉल अडवताना लागलं ते कोणामुळे हे सगळं जाणवायला रात्रीच्या स्वप्नांचा आधार असायचा मला…

रोज क्रिकेट खेळून कंटाळा आला किंवा सोबतीला कोणी नसलं की आता संध्याकाळच्या वेळी काय करायचं असा विचार यायचा तेव्हा अनेक गोष्टी समोर असायच्या.

त्यातल्या त्यात माझ्या आवडीच्या गोष्टी म्हणजे सायकलिंग. त्या काळी सायकल म्हणजे निदान माझ्यासाठी तरी चैनीचा भाग होती.

स्वतःची सायकल घेणं म्हणजे परीक्षेत नंबर काढण्याचं शिवधनुष्य पेलण्याची माझी मानसिकता नव्हती. त्यामुळे माझा कल असायचा तो भाड्याच्या सायकलवर.

आमच्या नाक्यावर असणारं सुभाष काकांच्या सायकलीचं दुकान म्हणजे माझी पुंजी. आई – बाबा किंवा कोणीतरी दिलेले एक – दोन रुपये म्हणजे माझ्यासाठी आजच्या काळातील १०० रुपयांएवढे होते.

त्यामुळे क्रिकेट खेळून कंटाळा आला की मस्तपैकी सुभाष काकाच्या दुकानातून ५० पैशात अर्धा तास आपल्या आवडीची सायकल भाड्याने घ्यायची.

मग त्यावर टांग मारून अशी काही चालवायची की पुन्हा आयुष्यात मिळेल, नाही मिळेल. सायकल घेताना आणि देताना घड्याळ्याच्या काट्यांची उजळणी जास्त व्हायची. कारण प्रत्येक मिनिट महत्त्वाचा असायचा. सायकल कोणत्याही अवस्थेत असली तरी ती माझ्यासाठी तेव्हा ‘हार्ले डेव्हीडसन’च असायची.

सायकल आणि माझं प्रेम जे तेव्हा जुळलं ते आजतागायत आहे. कट मारणं म्हणजे काय ह्याचा उलगडा आणि प्रात्यक्षिक मी सायकलवर शिकलो.

शरीराच्या अनेक ठिकाणी ताऱ्यांच्या लोखंडी टोकांनी अनेक ओरखडे केले पण त्याने सायकल आणि माझं प्रेम जास्तच बहरलं.

सायकल जोरदार फिरवून झाल्यावर घामाने डबडबल्यावर श्रम परिहार म्हणजे गांजीच्या दुकानात मिळणारा चार आण्याचा पेप्सी कोला.

(त्याला पेप्सी कोला का म्हणत हा मला आजही पडलेला प्रश्न आहे. कारण त्यात न कधी पेप्सी असायचं ना त्यात कोला असायचा.) शेंदरी रंगाचा ते कालाखट्टा अशा विविध रंगात मिळणारा छोटा पेप्सी कोला माझी तहान भागवायचा. त्यातही दोन प्रकार यायचे.

चार आण्याचा छोटा आणि आठ आण्याचा मोठा. पण मी कधीच आठ आण्याचा कोला घ्यायचो नाही कारण चार आण्याचे दोन कोल्यांची मज्जा जास्त वेळ अनुभवता यायची. तो

कोला घ्यायचंही एक टेक्निक असायचं. कोपऱ्यावर अगदी दाताने थोडसं फोडून मग अगदी तो सगळा बर्फ वितळेपर्यंत तो माझ्या घशाला थंड करायचा. मग घरी जाऊन गुपचूप जीभ कोणत्या रंगाची झाली ते बघण्याची मज्जा काही वेगळीच होती.

दिवाळी संपून थंडीचे दिवस सुरु झाले की एक नवीन मोर्चा उघडायचा. पतंग उडवायला मला खूप आवडायचं. कोणा दुसऱ्याचा पतंग कापण्यापेक्षा आपला पतंग सगळ्यात उंच आणि दूरवर नेण्यात जी मज्जा असायची त्याची सर कशाला नाही.

एकदा तर दुपारी दोन वाजता उडवलेला पतंग चक्क संध्याकाळी सात वाजे पर्यंत उडवत होतो. तो इतका दूर गेला होता की उडवताना नजरेस पण पडायचा नाही.

त्या पूर्ण आकाशात माझ्या एकट्याचा पतंग असा विहार करताना बघताना जग जिंकणं म्हणजे काय ह्याची प्रचीती मला तेव्हा आली.

अंधार पडायला लागला म्हणून तो इतक्या दूरवर गेलेला पतंग पुन्हा खाली उतरवला. त्यानंतर अनेक दिवस तो पतंग माझ्या घराच्या भिंतीवर अभिमानाने विराजमान केलेला होता जसं काही आयुष्यात अतुलनीय कामगिरीसाठी मिळवलेलं ते एक प्रशस्तीपत्रक होतं.

आज अनेकदा एक रुपयाचं नाणं बघतो तेव्हा एक रुपयाची खरी किंमत काय होती हे जाणवते. आज लोक म्हणतात एक रुपया भिकारीही घेत नाही तेव्हा वाटते ह्याच एक रुपयाने मला आयुष्यात असे काही क्षण दिले जे माझ्यासाठी किंमत न करता येणारे आहेत. आ

पली पिढी इतकी सुदैवी असल्याचा आनंद एकीकडे वाटतो तितकीच माझी पिढी हा आनंद नवीन पिढीकडे सुपूर्द करायला कमी पडली ह्याची खंत ही वाटते.

चार आण्याचा कोला, आठ आण्याची सायकल आणि रुपयाच्या पतंगाने खरंच माझं आयुष्य समृद्ध केलं.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!