करोडपती मेंदुचं रहस्य या पुस्तकात सांगितलेले श्रीमंत बनण्यासाठीचे अकरा नियम

श्रीमंत लोक

तो मार्च किंवा एप्रिल महीना असावा, वर्ष २०१५, एका संध्याकाळी, उदास चेहर्‍याने मी ऑफीसमध्ये बसुन होतो, पैशाची प्रचंड चणचण जाणवत होती.

लातुरमध्ये भयाण दुष्काळ पडला होता, जिकडेतिकडे भीषण पाणीटंचाईच्याच चर्चा चालु होत्या. बांधकामे पुर्णपणे ठप्प झाली होती, व्यवसायाने मी आर्किटेक्ट, मागचा एक वर्ष तुटपुंज्या बचतीवर कसेबसे निभावले होते, पण आता खिसे रिकामे झाले होते.

गरजा कशा भागवायच्या अशी चिंता सतावत होती, कसलाच मार्ग दिसत नव्हता, पैशाचे दुखणे खरचं अवघड जागचे दुखणे असते, “सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही”, कुणापुढे आर्थिक अडचणी सांगितल्या तर उरलीसुरली अब्रुही जाते.

विशेष काही काम नव्हतं, (खरतरं कसातरी टाईमपास करुन दिवस ढकलायचो, बस्स!) मन मोकळं करायला जवळचा, आपला म्हणावा, असा कोणी मित्रही नव्हता, उदास राहण्याने आणि टेंशन घेण्याने कशाचाही कंटाळा येवु लागतो, अशा वेळी मुड बदलण्यासाठी चांगलं पुस्तक वाचणं आणि रिचार्ज होणं, हाच एक हुकुमी उपाय असतो आपल्याजवळ. मग त्या संध्याकाळी खुप दिवसांनी जड मनाने लायब्ररीत गेलो.

काचेच्या कपाटात ओळीने पुस्तकं मांडुन ठेवली होती, त्या कपाटांपुढे मी रेंगाळत होतो, अचानक एका पुस्तकाच्या टायटलमधल्या ‘करोडपती’ शब्दाने माझं लक्ष वेधुन घेतलं.

पैशासाठी खुप भुकेला होतो मी, इतकं माझ्याएवढं गरजु ह्या ब्रम्हांडात कोणीच नव्हतं! आणि एका भाग्यवान क्षणी एक पुस्तक हाती पडलं!, माझं आयुष्य उजळुन टाकणारं, ‘Secrets of the Millionaire Mind’ ‘करोडपती मेंदुचं रहस्य’ येथे क्लिक करून अमेझॉनवर हे पुस्तक खरेदी करता येईल हे ते पुस्तक!

मी तात्काळ ते बुक इश्शु केलं, पुन्हा ऑफीसला येवुन वाचायला बसलो, सात वाजले असतील, वाचायला सुरुवात केली, आणि पुढचा अडीच तास कसा गेला, कळालंच नाही! ते पुस्तक वाचताना, माझ्यात एका आगळ्यावेगळ्या शक्तीचा संचार झाला, काही वेळा मी हसलो, कधी डोळ्याला धारा लागल्या, कधी आश्चर्यचकित झालो, कधी आनंदाने बेभान!

अंतर्मुख होवुन, आत्मपरीक्षण करण्यास ह्या पुस्तकाने भाग पाडलं.

ह्या पुस्तकाचा लेखक आहे, टी. हार्व एकर, ह्या अमेरीकेतल्या माणसानं हे पुस्तक लिहलयं, हार्व एक जो प्रचंड मेहनती, कष्टाळु माणुस होता, पण अनेक बिजनेस करुनही, वयाच्या तिशीत कफल्लकच होता, दहा वर्षात तीनदा दिवाळखोर जाहीर झाला होता आणि अद्याप सुशिक्षीत बेकारच होता, त्याला तीव्र निराशेने घेरलेले असते आणि आईवडीलांच्या मदतीवर तो जगत होता.

एका रात्री त्याच्याकडचे पुर्ण पैसे संपलेले असतात, आणि त्याला आपल्या गाडीत पेट्रोल भरायचे असते, तेव्हा आपल्याकडचे सुटे पैसे, पिशवीमध्ये तो एकत्र करतो आणि आपली खटारा कार घेऊन पेट्रोल पंपावर जातो, आणि ती चिल्लरची पिशवी पाहुन तिथले लोक जोरजोरात हसु लागतात.

हार्वला खुप ओशाळवाणे वाटते, तिथुन कसाबसा बाहेर पडून तो, पुढे जाऊन तो रस्त्याच्या कडेला गाडी थांबवतो, झालेला अपमान त्याला सहन होत नाही, तो ओक्सबोक्शी रडु लागतो, त्याला स्वतःच्या गरीब असण्याचा तिटकारा येत असतो, स्वतःवरच दया येत असते, प्रचंड बुद्धीमान असुनही ही वेळ का आली? हा प्रश्न त्याला सतावत असतो.

आणि तो एक गर्जना करतो, “बस्स! हे सगळे मी आता बदलुन दाखवीन! या जगाला मी श्रीमंत बनुन दाखवीन!”

त्या दिवसांपासुन त्याने झपाटुन मेहनत घेतली, त्याची रोमहर्षक कथा मुळ पुस्तकात वाचता येईल, पण थोडक्यात सांगायचे तर पुढच्या फक्त दोन वर्षांनी हार्वची कंपनी, “फॉर्चुन ५००” मध्ये जाऊन पोहचली, गरीबीवर मात करुन हार्व ‘श्रीमंत कसे व्हावे’ हे शिकवणारा मोटीव्हेटर टिचर झाला.

आता जगभर त्याचे सेमिनार होतात.

काय होतं हे करोडपती होण्याचं तंत्र!

अशी पुस्तकं वाचुन, खरचं एका रात्रीत, असं आयुष्य बदलतं का?

झटपट श्रीमंत व्हायला शॉर्टकट असतात का, कि ही पुस्तकांना खपवुन बेस्ट सेलर बनवण्याची नुसती बुवाबाजी?

असले प्रश्न पडले असतील तर मुळ पुस्तक वाचुन तुम्हीच उत्तर शोधा.

श्रीमंत बनण्यासाठी हार्वने ह्या पुस्तकात सतरा नियम सांगीतलेत, जे वापरुन मलाही खुप फायदा झाला, मी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र झालो, रोजच्या ब्रेड-बटर च्या फाईट मधुन सुपरफास्ट वेगाने बाहेर पडलो, आता मी फक्त आनंद घेण्यासाठी जीवन जगतोय.

व्यवसायामध्ये आता ज्यात मला आत्मिक समाधान आणि अपेक्षित पैसा मिळेल, अशीच कामं करतो.

प्रत्येक दिवशी लेखण, वाचन, व्यायाम, बागकाम, टिचींग, मोटीव्हेशन असे छंद जोपासतो.

आयुष्यातली, पैसे कमवण्याची मजबुरी संपवणं, म्हणजे आर्थिक स्वतंत्रता!..

वयाच्या तेहतीसाव्या वर्षी हे साध्य करायला कारणीभुत ठरलं, हे पुस्तक!..

हे संपुर्ण पुस्तक, ‘श्रीमंत’ आणि ‘गरीब’ ह्या दोन शब्दांभोवती फिरते, लेखक स्प्ष्ट करतो की कुणालाही गरीब म्हणुन त्याला अजिबात हिणवायचं नाहीये, श्रीमंत आणि गरीब हे शब्द फक्त आपल्या मानसिकता दाखवण्यासाठी वापरले आहेत.

तर श्रीमंत बनण्यासाठी काय करायला हवे? याबद्द्ल या पुस्तकातुन लेखकाने सांगितलेले पहिले सहा नियम आधी आपण बघू.

 1. श्रीमंत लोकांना वाटते, मी माझं आयुष्य घडवतोय!, गरीब लोकांना वाटते, नियती माझ्याशी खेळत आहे! हार्व म्हणतो, माणुस पहीले मनाने श्रीमंत होतो, आणि मग प्रत्यक्षात पैसा त्याच्यापाशी येतो, श्रीमंत लोक यश-अपयशाची जबाबदारी घेतात, गरीब लोक दुःखाचा बागुलबुवा करतात, त्यांना वाटतं, की आयुष्य त्यांना शिक्षा देत आहे, म्हणुण ते अधिकाधिक गरीब होतात.
 2. श्रीमंत लोक जिंकण्यासाठी मनसोक्त खेळतात, गरीब लोक न हरण्यासाठी लढत राहतात. श्रीमंत लोक उराशी मोठी ध्येय बाळगतात, आणि संधी मिळताच पुर्ण ताकतीनिशी त्यावर तुटुन पडतात, म्हणुन बहुतांश वेळा फत्ते होतात, गरीब लोक आयुष्याकडून जेमतेम अपेक्षा ठेवतात, मग समोर दडलेल्या संधीही त्यांना दिसत नाहीत, आणि असलीच तर तिचा वापर करण्याची उर्जाही त्यांच्यात निर्माण होत नाही.
 3. श्रीमंत लोक श्रीमंत होण्यासाठी समर्पित असतात, गरीब लोकांजवळ श्रीमंत व्हायची फक्त इच्छा असते. समर्पित होणं म्हणजे झपाटुन जाणं, वेळ पडल्यास, न कुरकुरता, दिवसातुन अठरा-वीस तास सहज काम करणं, ध्येयासाठी वेडं होणं, मग इतरांना अशक्यप्राय आणि स्वप्नवत वाटणार्‍या गोष्टीही, पायाशी येऊन सलाम करु लागतात. नुसती इच्छा बाळगुन स्वप्ने पुर्ण होत नाहीत, त्यांना प्रत्यक्षात आणण्यासाठी वाटचाल करावीच लागते. ह्या जगात फुकट काहीही मिळत नाही, कशाच्या तरी बदल्यातच काहीतरी मिळतं.
 4. श्रीमंत लोक मोठा विचार करतात, गरीब लोकं अल्पसंतुष्ट असतात….. तुमचं व्यक्तीमत्व आणि तुमचा व्यवसाय किती जास्त लोकांवर प्रभाव टाकतयं, त्यावरुन तुमच्याकडे येणार्‍या संपत्तीचा ओघ नक्की होतोय. करोडपती लोकं असे व्यवसाय निवडतात की जो हजारो-लाखो लोकांच्या आयुष्यावर परीणाम करेल. व्यवसायाला अशा पातळीवर नेऊन ठेवतात……. गरीब लोकं मर्यादित लोकांच्या जीवनावर परीणाम करतात, त्यांच्या असण्याने नसण्याने समाजाला विशेष फरक पडत नाही, त्यामुळेच त्यांचं शोषणही होतं, जे मिळेल ते खुप आहे, आता नवीन खटपटी नको, अशी वृत्तीही त्यांना संपत्तीचा परीघ ओलांडु देत नाही.
 5. श्रीमंत लोक संधीवर लक्ष केंद्रीत करतात, गरीब लोकांना मार्गातले अडथळे तेवढे दिसतात, प्रत्येक रस्त्यावर खाच खळगे असणार, पण म्हणून प्रवासच टाळायचा का? अडथळ्यांवर मात करुन गंतव्य स्थानी पोहचण्याचा आगळावेगळा आनंद लुटायचा का खड्ड्यांना नाके मुरडायची? श्रीमंत आणि गरीब लोकांमध्ये हाच फरक असतो.
 6. श्रीमंत लोक इतरांच्या संपत्तीचा द्वेष करत नाहीत, गरीब लोक इतरांच्या श्रीमंतीचा हेवा करतात.

इथे लेखक एक अनुभव कथन करतो, जेव्हा स्वतःची महागडी जॅग्वार कार घेऊन एका झोपडपट्टीत मित्राला भेटायला गेला, तेव्हा तिथल्या रहीवाशांनी कारवर स्क्रॅचेस पाडुन बहुमुल्य गाडीची नासधुस केली, दुसऱ्या वेळी त्याने एक खटारा गाडी नेली, ती सुखरुप होती.

जे लोक स्वतःला पिडीत, व्यवस्थेचे बळी मानतात, त्यांच्या मानसिकतेमुळे त्यांच्या उत्कर्षात ते स्वतःच बाधा बनतात, ते श्रीमंतांचा तिरस्कार करतात, पर्यायाने संपत्तीचा तिरस्कार करतात, ज्या गोष्टीचा आपण तिरस्कार करु, ती जवळ कशी येईल? म्हणुन श्रीमंत दिवसेंदिवस अधिक श्रीमंत होतात आणि इतरांविषयी, त्यांच्या चांगल्या गोष्टींचा मत्सर करणारे, द्वेषभावना बाळगणारे, दिवसेंदिवस, अधिकाधिक गरीब होतात.

म्हणुन एखाद्याचा सुंदर बंगला बघितल्यास, आणि तुम्हालाही तसा हवा असल्यास त्याला मनःपुर्वक आशिर्वाद द्या, एखाद्याची अलिशान कार, एखाद्याचं सुंदर व्यक्तीमत्व बघुन, त्याची मनमोकळेपणाने स्तुती करा, तो करु शकतो, मग मी ही करु शकतो, ह्या एटीट्युडने अशा परिस्थीतीला सामोरे जा.

तर हार्व म्हणतो, की माणसाचा मेंदु एखाद्या कॉम्प्युटर प्रमाणे काम करतोय, जशा कॉम्प्युटरमध्ये फाईल्स सेव्ह केलेल्या असतात, तशा मेंदुच्या कपाटात फाईल्स सेव्ह आहेत, ते म्हणजे आपले विचार! जसे आपले विचार, तसं आपलं जीवन!

माणुस पहील्यांदा विचारांमध्ये, कल्पनेमध्ये श्रीमंत होतो, आणि मग प्रत्यक्षात!

नियम सातवा 

श्रीमंत लोक श्रीमंताच्याच संगतीत वेळ घालवतात, गरीब लोकांना आपल्याइतकी कमाई करणार्‍या लोकांमध्ये सुरक्षित वाटते, त्यांचीच कंपनी बरी वाटते.

अर्थशास्त्राचा एक अजब सिद्धांत आहे, तुमच्या जवळच्या दहा लोकांची यादी बनवा, ज्यांच्यामध्ये तुम्ही उठबस करता, त्यांची एव्हरेज कमाई लिहा, तुमचेही उत्पन्न जवळपास तितकेच असेल.

सारख्या रंगाची पिसे असणारे पक्षी एका थव्यात उडतात, आपण ज्या लोकांसोबत वावरतो, दिवसाचा जास्तीत जास्त वेळ घालवतो, अशा लोकांचं आपण कळत नकळत अनुकरण करत असतो.

स्वप्न करोडोंची पण दिवसभर वावर मात्र काही हजार रुपये कमवण्यासाठी झगडणार्‍यांसोबत असेल, तर एक करोड दारात चालत येतील काय? त्यासाठी करोडपती मित्र जोडा, त्यांच्या बिजनेस मॉड्युलचा अभ्यास करा, बारकाईने निरीक्षण करा, आपल्या कल्पना उत्साहाने कागदावर मांडा आणि अंमलात आणा, इतकं सोप्पं आहे हे!

तुम्ही म्हणाल, पण मी करोडपती मित्र आणु कुठुन? एकतर ते आपल्याला जवळ येऊ देत नाहीत, आणि आपण गेलो तर पटकन मैत्री स्वीकारत नाहीत, मग आपल्या आत्मसन्मानाचे काय? हा प्रॉब्लेम मलाही यायचा.

मग मी अशा श्रीमंत लोकांना आपला जिवलग मित्र मानलं, ज्यांनी पुस्तकातुन त्यांचं आयुष्य अणि कमाईचे गुपितं जगजाहीर केली, रॉबर्ट कियोसॉकी, नेपोलीयन हील, डोनाल्ड ट्रंप, जेआरडी टाटा, वॉरेन बफे, धीरुभाई अंबानी हे लोकं त्यांच्या आत्मचरित्रातुन मोकळेपणाने भेटतात, आडपडदा न ठेवता, व्यक्त होतात. विवेक बिंद्रा, संदीप महेश्वरी, हिमेश मदान यांना गुरु मानलं, अणि ते प्रत्येक व्हिडीओतुन काही ना काही महत्वाचे, आयुष्याचे धडे शिकवायला लागले.

अजुन एक करता येतं, श्रीमंत म्हणावेत अशे तुमच्या आजुबाजुचे लोक निवडा, त्यांना जन्मदिवसाच्या, लग्नाच्या वाढदिवसच्या शुभेच्छा द्या, शुभेच्छा देणारे प्रत्येकाला आवडतात, एक शंभर रुपयाचा बुके तुम्हाला लाखमोलाचा मित्र देईल, कधी त्यांना हॉटेलमध्ये जेवायला येण्यासाठी विचारा, जेवता जेवता, त्यांच्या आयुष्याच्या रोमहर्षक प्रवासाविषयी विचारा, ते उत्साहाने आपल्या आयुष्याच्या अनुभवांचा समृद्धपणाचा खजिना खुशीने तुमच्यापुढे खुला करतील.

मी ही क्लृप्ती वापरुन अनेक श्रीमंत मित्रांना आपलसं केलं! इट रिअली वर्क्स! आपल्या रोल मॉडेल्सचं अनुकरण करुन आपणही श्रीमंत बनतो!

नियम आठवा 

श्रीमंत लोक स्वतःचा, स्वतःच्या गुणांचा, उत्साहाने प्रचार आणि प्रसार करतात, गरीब लोकांना स्वतःबद्द्ल भरभरुन बोलणं, बढाईखोरपणा वाटतो, किंवा ती हलकी प्रसिद्धी वाटते!

आपली मार्केटींग आपणच करायची असते, ह्या एका गुणाने, नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवलयं, ते स्वतःची आणि केलेल्या कामाची प्रभावी जाहीरात करतात पण इतक्या सुंदर पद्धतीने की आपण त्यांच्या प्रेमात पडतो,

जाहीरातीच्या बळावर त्यांनी कोट्यावधी लोकांची मनं जिंकली!

कुठलाही यशस्वी अभिनेता, क्रिकेटर, बिजनेसमन स्वतःबद्द्ल, त्यांच्या प्रोफेशनल लाईफबद्द्ल भरभरुन बोलतात, म्हणुन आपलं त्यांच्याकडे लक्ष वेधलं जातं, आपल्या अंगात लपलेली कला जगासमोर नम्रपणे मांडण्यात गैर ते काय? शेवटी बोलणार्‍याच्याच तर तुरी विकतील.

अपयशी लोकांना स्वतःची असो वा इतरांची स्तुती खटकते, “मी स्वतःहुन कुणाला काम मागणार नाही, त्यांनीच माझ्या ऑफीसला यावं,” “चीप पब्लिसीटी मला आवडत नाही” “स्वतःच स्वतःची तारीफ करणं, मला पटत नाही, आवडत नाही,” असे विचार, अशी वाक्यं त्यांना लोकांपुढे आपली कला मांडण्यापासुन रोखतात.

स्वतःवर, स्वतःच्या व्यवसायावर प्रेम करणं, आणि योग्य ठिकाणी, योग्य प्रकारे व्यक्त होणं, हे श्रीमंत लोकांनी शिकुन घेतलेलं असतं.

नियम नववा 

श्रीमंत लोक स्वतःला कुठल्याही समस्यांपेक्षा मोठे मानतात, गरीब लोकांना मात्र त्यांच्या समस्या त्यांच्या कुवतीपेक्षा प्रचंड मोठ्या वाटतात.

लेखक म्हणतो, समस्येपेक्षा मोठे व्हा, प्रॉब्लेमला पुरुन उरा, कधी कुठला प्रॉब्लेम सतवायला लागला की जोरजोरात म्हणा, मी मोठा, मी मोठा, मी मोठा! समस्या छोटी वाटेपर्यंत असे करत रहा, आणि खरोखरच समस्या क्षुल्लक भासु लागेल!

नियम दहावा

श्रीमंत लोक हे खुप चांगले ग्राहक असतात, गरीब लोक खुप वाईट ग्राहक असतात.

इथं ग्राहक हा शब्द पारंपारिक ‘गिह्राईक’ ह्या अर्थाने नाही, ‘रिसीव्हर’, ‘स्वीकारणे’ ह्या अर्थाचा आहे, म्हणजे एखाद्याने तुमची भरभरुन स्तुती केली तर त्याला मध्येच अडवु नका, त्याची स्तुती प्रसन्नपणाने पुर्णपणे स्वीकारा, श्रीमंत लोक त्यांच्याकडे येणार्‍या प्रत्येक गोष्टीचा स्वीकार करतात, धन्यवाद देतात.

जसं शब्दांचं, तसंच पैशाचंही, श्रीमंत लोक त्यांच्याकडे येणार्‍या प्रत्येक रुपयाचं, स्वागत करतात, खोट्या, पोकळ मोठेपणाच्या आहारी जाऊन, ते पैशाला कधीच नाकारत नाहीत, म्हणुन ते पैसा खेचणारे चुंबक बनतात

गरीब लोक मनातुन तर पैशासाठी तळमळत राहतात, पण वर वर खोटा आव आणतात,

 • ‘मी पैशाला किंमत देत नाही’,
 • ‘पैसा कमवणं, हातचा मळ आहे’,
 • ‘मला पैशापेक्षा जास्त माणसं प्रिय आहेत’
 • ‘अशा संपत्तीला मी लाथ मारतो’,
 • ‘पैसा एकटा येत नाही, सोबत काहीनाकाही प्रॉब्लेम घेऊन येतो”
 • सगळे पैशेवाले लुच्चे असतात, गरीबांच शोषण करुन मोठे होतात,
 • दोन नंबरचे धंदे करुन मोठे होतात,

अशा गोंडस वाक्यांना, गरीब लोक वेळोवेळी बळी पडतात, अज्ञ मनात वरील विचारांच्य विषारी मुळ्या घुसल्यास आपोआपच खिसे रिकामे राहतात, यात नवल ते काय?

ह्या ब्रम्हांडाचा नियमच आहे, कळत नकळत ज्या गोष्टींचा आपण तिरस्कार करतो, त्या आपल्या पासुन दुर जातात. एखाद्या माणुस जर आपल्या बायकोला रोजच म्हणाला, की “माझ्या आयुष्यातुन चालती हो, काळं कर तुझं तोंड”, तर खरचं एके दिवशी त्याची पत्नी घर सोडुन जाते. अगदी असचं पैशाच आहे, त्याच्यावर प्रेम केलं की तो येतो, त्याला शिव्या दिल्या की तो जातो,

नियम अकरावा

श्रीमंत लोक केलेल्या कामाच्या परीणामावर आधारीत मोबादला मिळवतात, गरीब लोक दिलेल्या वेळेच्या बदल्यात मोबादला मागतात.

श्रीमंत लोक ‘एन्ड रिझल्ट’ वर लक्ष केंद्रीत करतात, आपल्या मुळे आपल्या ग्राहकाचा फायदा होईल याला ते महत्व देतात, त्यामुळे त्यांच्याकडे येणारे ग्राहक त्यांच्यावर संतुष्ट होवुन, ते मागतील तो मोबादला आनंदाने देतात.

याउलट गरीब लोक उलटा विचार करुन आतातायीपणा करतात, मी इतके तास काम केले, त्यात तुमचे समाधान होवो न होवो, मला माझा माझा मोबादला द्या, असे त्यांना भांडावे लागते, सारखे आपले म्हणणे रेटुन मांडावे लागते, पैसे बुडतील की काय असा त्यांना सतत संशय असतो, त्यामुळे कामाची क्वालीटी सुधारण्याकडे ते पुरेसं लक्ष देऊ शकत नाहीत!

काम नाही म्हणुन पैसा नाही!…

आणि पैसा नाही म्हणुन काम नाही अशा व्हिशीअस सर्कलमध्ये ते अडकतात. पैशाची निकड त्यांना व्याकुळ करते, जो आपल्या कामाच्या पद्धतीत बदल करतो, तो हे व्हिशीअस सर्कल आरामात तोडु शकतो.

आजचा एक्सरसाईज

लेखक म्हणतो, श्रीमंत होण्यासाठी स्वयंसुचना खुप मदत करतात, मीही ह्या टेक्निकचा वापर केला, ज्याचा मला प्रचंड फायदा झाला.

एकटे असताना, दिवसातुन दोन वेळा एका फुल हाईट आरशासमोर उभे रहा, स्वतःच व्यक्तीमत्व बारकाईने न्याहाळा, स्वतःच्याच प्रेमात पडुन खुद्कन हसा, स्वतःलाच एक फ्लाईंग किस द्या,

“वॉव, भगवान, क्या पीस बनाया है?”

तुमच्या विकनेस वर मात करतील अशा विरुद्ध अर्थाचे अफेर्मेशन्स जोरजोरात मोठमोठ्याने म्हणा,

मी शक्तीशाली आहे, मी श्रीमंत आहे, मी आनंदी आहे, मी प्रभावी व्यक्तीमत्वाचा स्वामी आहे, मी सर्वांना हवाहवासा वाटतो, मी यशस्वी आहे, मी एक करोड रुपये सहज मिळवले आहेत, सगळे माझ्यावर प्रेम करतात आणि मी सगळ्यांवर प्रेम करतो.

तुमच्या प्रिय आणि जवळच्या व्यक्तींना हा लेख वाचुन स्वप्नं पुर्ण करण्याची उर्जा मिळेल असा विश्वास असल्यास शेअर करा.

तुम्हा सर्वांना इच्छित संपत्ती प्राप्त होवो, ह्या प्रार्थनेसह आता तुमची रजा घेतो. जगण्याचे सेलिब्रेशन करा, रडु नका, कुढु नका, आयुष्यावर प्रेम करा, ह्या जगात दुःखी कष्टी माणसं कोणालाच आवडत नाहीत, चिअरफुल लोकांवर मात्र सगळं जग प्रेम करतं…


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

 

14 COMMENTS

 1. नैराश्याने जे खचलेल्या मित्रांसाठी खूपच प्रेरणादायी.

 2. I m trully agree with it. Though it’s my first time to read all this, I realised that I m following some of the rules given here.

 3. मी आपला प्रत्येक लेख वाचत असतो आपले लेख खूप प्रेरणा दायी असतात खुप छान

 4. Lekh vachun aplyatil univanchi janiv hote.kharach apan changlya lokanchyach sahvasat rahil pahije success honyasathi avashyak tips vaparlyach pahijet motivate honyas upyukt.

 5. रात्रीचे दिड वाजले आहेत … मला करोडपती व्हायचय या विचारात झपाटुन गेलेला असताना आपला लेख हाती लागला …. आपण सुरुवातीला सांगितल्यासारख्या अवस्थेतुन मी जात आहे ….पण आपला लेख वाचून नवीन उर्जा मिळाली… धन्यवाद सर !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.