भविष्यात अवकाशात वस्ती करण्याची गरज का पडणार आहे?

दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या, त्यांना लागणारी उर्जा आणि पृथ्वीवर सिमित असणारे उर्जा साठे ह्यामुळे येत्या काळात पृथ्वीवरील लोकांसामोरील समस्या वाढत जाणार आहेत.
आपल्या उर्जेची गरज भागवायला पृथ्वी येत्या काळात कमी पडणार आहे. ह्यावरील सध्या तरी दृष्टीक्षेपात असणारा एक उपाय म्हणजे अवकाश.
आपलं विश्व हे अनेक गूढ, स्तिमित करणाऱ्या गोष्टींनी भरलेलं आहे. ज्यात असंख्य ग्रह, तारे, धुमकेतू, लघुग्रह, उपग्रह असं सगळचं सामावलेलं आहे.
ह्यातील अनेक ग्रह, लघुग्रह ह्यावर मानवी वस्तीसाठी पोषक वातावरण नसलं तरी त्यावर असलेल्या वातावरणात, मूलद्रव्यात माणसाच्या मुलभूत गरजांना भागवण्याची क्षमता आहे.
त्यामुळेच येत्या काळात अवकाश हेच आपलं भविष्य राहणार आहे.
माणसाच्या मुलभूत गरजांपेकी एक प्रमुख गरज म्हणजे पाणी.
असं म्हणतात की पुढलं विश्वयुद्ध हे पाण्यासाठी लढलं जाईल. पण पृथ्वीपेक्षा जास्त पाणी असणारा ग्रह आपल्याला मिळाला तर?
त्यासाठी आपल्याला लांब जायची गरज नाही. आपल्या सौरमालेत असा एक उपग्रह आहे ज्याच्यावर पृथ्वीपेक्षा जास्त पाणी आहे. आपल्या सौरमालेतील सगळ्यात मोठा उपग्रह ज्याच नाव आहे “ग्यानीमेडे”.
ग्यानीमेडे हा गुरू ग्रहाचा उपग्रह असून त्याचा विस्तार तब्बल ३२७३ मैल (५२६८ की.मी.) इतका आहे.
ह्याचा पृष्ठभाग बर्फाने झाकलेला असून त्या खाली असणारा पाण्याचा साठा नासाच्या मते जवळपास १०० किलोमीटर खोलीचा आहे.
(पृथ्वीवरील समुद्राची खोली जवळपास १० की.मी. इतकी आहे.) म्हणजेच ‘ग्यानीमेडे’वर पृथ्वीच्या १० पट पाणी असण्याचा अंदाज आहे.
हे पाणी जसच्या तसं वापरात येणं किंवा गोड नक्कीच नसणार आहे. हे पाणी समुद्राप्रमाणे खारट आहे. पण पृथ्वीवरील येत्या काळातील पाण्याची गरज लक्षात घेता भविष्यात पाण्याचा स्रोत म्हणून ग्यानीमेडे कडे बघण्यात येते आहे.
ह्याच्या संशोधनासाठी युरोपियन स्पेस एजन्सी ‘ज्यूस’ नावचं यान २०२२ पर्यंत ‘ग्यानीमेडे’वर पाठवत आहे.

आता विचार करा तुम्ही मस्त एका सरोवराच्या किनारी उभे आहात.
समोर पसरलेला अथांग सरोवर तुमचं मन मोहून टाकत आहे. पण अचानक लक्षात येते की हे पाणी नाही तर मिथेन, इथेन आहे.
ह्याच्या पृष्ठभागावर नद्या, सरोवर आहेत. ती पाण्याची नाहीत तर ती आहेत मिथेन आणि इथेन ह्या हायड्रोकार्बनची.
पृथ्वीवरील आत्तापर्यंत माहीत असलेल्या नैसर्गिक वायूचा साठा आहे जवळपास १३० बिलियन टन. इतक्या साठ्यातून ३०० पट जास्त उर्जा निर्मिती होऊ शकेल जितकी एकट्या अमेरिकेला वर्षभरासाठी लागते.
आता पृथ्वीवरील संपूर्ण साठ्याची क्षमता टायटन वरील मिथेन, इथेन च्या एका सरोवराची आहे. असे कित्येक सरोवर टायटन वर आज प्रवाही आहेत.
म्हणजे पूर्ण मानवजातीच्या पुढल्या कित्येक पिढ्यांना उर्जा देण्याची क्षमता एकट्या टायटन वरील हे सरोवर राखून आहेत. त्यामुळेच येत्या काळात संशोधनाची सुईही टायटन भोवती फिरणार आहे.

ह्या उपग्रहांसोबत पृथ्वीच्या आसपास जवळपास १०,००० पेक्षा जास्त लघुग्रह भ्रमण करत आहेत. हे लघुग्रह वैज्ञानिकांच्या नजरेतून सुटलेले नाहीत.
लघुग्रह ‘४३३ इरॉस’ जो की १९९८ साली पृथ्वीच्या जवळून गेला होता. त्यावर जवळपास २० बिलियन टन सोनं, प्लॅटेनियम आणि टायटेनियम आहे ज्याची आजमितीला किंमत ११ ट्रिलीयन अमेरिकन डॉलर आहे.
पृथ्वीवर आजपर्यंत उत्खनन झालेल्या सोन्याची किंमत फक्त ३ ट्रिलीयन अमेरिकन डॉलर आहे. ह्यावरून इरॉस ४३३ वर असणाऱ्या खनिज विपुलतेचा अंदाज आपण बांधू शकतो.

प्लॅनेटरी रिसोर्सेस नावाची कंपनी अशा लघु ग्रहांवर उत्खनन करण्याचं तंत्रज्ञान विकसित करत आहे.
ह्या कंपनीला पैसा पुरवण्यात अग्रेसर असलेल्या व्यक्तींमध्ये गुगलचे संस्थापक लॅरी पेज, चित्रपट निर्माता जेम्स केमेरून, रिचर्ड ब्रॅन्सन अश्या प्रमुख व्यक्तींचा सहभाग आहे.
कारण काळाच्या पुढे जाऊन येणाऱ्या हवेचा रोख त्यांनी आधीच ओळखला आहे. अवकाश हेचं मानवजातीचं भविष्य येत्या काळात असणार आहे.
अजून अशा कित्येक गोष्टींचा शोध लागायचा आहे किंवा त्यांचा शोध घेणारी यंत्रणा निर्माण व्हायची आहे.
पण तंत्रज्ञान ज्या वेगाने पुढे जाते आहे ते बघता भविष्यात अवकाश हाच आपला आसरा असणार आहे.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा
'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा