बीभत्स- कथा

बीभत्स- कथा

समोर घड्याळ पाहिले. तासाने सात तर मिनीटं.. काटा आठला फारकत घेऊन निघालेला.

खूपच उशिर झाला होता आज मला. मग पांघरुण नायका सारखा हवेत उडवून मी थेट प्रवेश केला बाथरुममध्ये. सर्व प्रकारचे विधी उरकून वीस मिनीटानंतर बाहेर आलो. कपडे चढवून, घाईतच नाश्ता करून निघालो. मोटार बाईक पुसायला इंजिनच्या बाजूला चिंधी शोधायला हात टाकला तर….

कुणी तरी चिंधी चोराने चिंधीगिरी केली होतीच. मग फक्त दोन थापा सिटला देऊन निघालो. किल्ली फिरवली.

हेल्मेटची काच लावली आणि निघालो.

थोडं अंतर म्हणजे जेमतेम पाचशे मीटर गेलो असेल, तर मोबाइलची रिंगटोन वाजली. पण उशिर झाल्या कारणाने मी फोन घ्यायचे टाळले. आता पुढे आल्यावर पुन्हा रिंगटोन वाजली. आता मी वैतागलो.

मोटार बाईकवर असता फोन आला का… चिडचिड होतेच. मी आता पण फोन कनेक्ट नाही केला. मोबाइल पॅन्टच्या खिशात होता. घाईत असता बाईकवर पॅन्टच्या खिशातून मोबाइल काढणं म्हणजे त्रासदायकच.

आता एखादे किलोमीटपर्यंत आलो असेल आणि पुन्हा मोबाइल वाजला. आता माझाही नाइलाज झाला. समोरची व्यक्ती कोण? हे माहीत नाही आणि लगोपाठ तीसर्‍यांदा काॅल करतेय. म्हणजे काम काही महत्वाचे असणार. सिग्नल देऊन गाडी बाजूला घेतली. डोक्यातली हेल्मेट काढली. खिशातून मोबाइल बाहेर काढला. फोन घरचाच होता.

फोन उचलून मी….. “हॅलो, काय झाले. लगोलग तीनदा काॅल केलास.”

पत्नी…. “जेवणाचा डबा विसरलात.”

मी….. “ठीक आहे. आज जेवतो बाप्यामाणसाच्या हातचे.”

सुंदर हसली आणि दोघांनी फोन ठेऊन दिला….

पण ओकारी येणारी दुर्गंधी मेंदूला सणक देऊन गेली. बाजूला पाहिलं तर नेमका मी कचराकुंडीच्या बाजूला गाडीसह ऊभा होतो. मला आश्चर्य वाटले मघापासून ऊभा आहे. मग वास आताच का आला.

मी सर्व लक्ष फोन आणि फोन करणारी व्यक्ती यांच्याकडे देऊन होतो. खूपच किळस येइल असे चित्र. आजूबाजूने जाणारे लोकं रुमाल नाकाला लावून जात होते. चाैकोनी रंगाची बाहेरून जो सुंदर सोनेरी रंग लावला होता. तो आता घाण लागून बिघडून गेला होता. कुठेतरी त्याच्या छटा दिसत होत्या. माश्यांची गर्दी तर जणू कहरच होता. त्यांच्या आवाजाने नळावर भांडणार्‍या गृहिणींना मागे टाकावे. आठ दहा कुत्री सभोवताली. सर्वच्या सर्व तेथे अन्नाच्या आशेने बसली होती….

मी गाडी बाजूला करायला गेलो तेथून दूर तर. गाडीच्या हॅन्डल वर ठेवलेली हेल्मेट खाली पडली. मग गाडी स्टॅन्डला लावून हेल्मेट घेऊन आलो. गाडी ढकलत पुढे घेऊन गेलो….

सहज कुंडीकडे नजर वळवली. तर एक व्यक्ती हातात शिल्लक रात्रीच्या अन्नाच्या थैल्या घेऊन येतांना दिसला. माझी जिज्ञासा जागृत झाली. मी पुढे पाहत बसलो. आता काय होईल. तेव्हड्यात कचराकुंडीच्या शेजारी चार पाच लहान मुलं पाहिली. रंग त्यांचा अनेक दिवस अंघोळ न केल्याने कोळश्याला उजवा ठरवणारा होता. संपूर्ण कपडे कुणाकडे नव्हते. दोघांच्या कडे फक्त शर्ट होता. तर एकाकडे गुडघ्या पर्यंत शर्ट होता. कदाचित आत चड्डी नसेल. एकाकडे फक्त चड्डीच नेसलेली पाहिली. चेहर्‍यावरून त्यांना जोरात भूक लागलेली वाटत होती. ती अन्नाच्या थैल्या घेतलेली व्यक्ती जवळ आली त्यावेळेस स्पष्ट दिसत होते. एका थैलीत चपाती तर दुसर्‍या थैलीत भाजी आहे हे दिसत होते. कचराकुंडी जवळची मुलं आनंदली. पण. . .

पुढे आजूबाजूला असणारी कुत्री एकत्र गोळा होउन त्यांच्यावर भुंकू लागली. तशी कुत्र्यांना घाबरून मुलं बाजूला झाली. आता त्यांना आणखी निराश व्हावे लागले. पण अन्न त्यांना स्वस्थ बसून देत नव्हते. पण पुढे त्यांच्या आशा पल्लवित होणारं आणखी एक कारण मिळालं..

कुत्री भुंकून ज्या आवेशात कचराकुंडीमधे घुसणार होती. ती आता साैम्यपणे गुरगुरत मागे सरली. मुलं बघत होती पण कुत्री का मागे सरली हे मला पण समजलं नाही. मुलांना भुकेपुढे कारण समजावून घ्यायचे नव्हते. माझी जिज्ञासा मला स्वस्थ बसून देत नव्हती. मी टाचांवर उभा राहून. तोंड बंद करून अनामिका व अंगठ्यांने नाक बंद करून आत डोकावून पाहिले….

सकाळी घरातून निघतांना जो नाश्ता केलेला तो ओकारी होऊन बाहेर. आतमध्ये एका मेलेल्या कुत्र्याचे धड होते. त्याचे तोंड उघडे होते. डोळे उघडे होते. पोट फुटून आतडे बाहेर आलेले. संपूर्ण शरीरावर म्हणजे उघड्या तोंडात, डोळ्यात हजारो माश्या त्याच्या अंगावर बसल्या होत्या. आता समजल कुत्री का बाजूला झाली. दुसर्‍या कुत्र्याचे शव बघून ती बाजूला झाली. कुत्रा कुठल्याही प्रकारचे सडलेले मांस खात असला तरी कुत्र्याचे मांस दुसरा कुत्रा कधी खात नाही. .

आता मुलं एकमेकांना आधार देत कचराकुंडीत चढत होती. मला वाटले कदाचित त्यांची पण निराशा होईल. कारण एव्हडा छिन्नविछिन्न अवस्थेतील कुत्र्याचे धड पाहिले का ती किळस येऊन मागेच सरतील….

आता मुलांनी दहिहंडीला जसा थर लावतात तसे खांद्यांवर एकमेकाला घेऊन कुंडीत चढायला सुरवात केली. आता दोन मुलं कुंडीत चढून अन्न शोधत होती. त्या दोन लहान मुलांना कुठल्याही प्रकारची किळस वाटत नव्हती. ते दोघेही हात घालून अन्नाच्या थैल्या शोधत होते आणि…

त्यांना त्या अन्नाच्या थैल्या मिळाल्या. ती मुलं आनंदाने हसू लागली. त्यांना पहिल्या पासून दुर्गंधी किंवा किळस येत नव्हती. आता ती मुलं गोल वर्तुलाकार बसली अन्नाच्या थैल्या सोडल्या आणि त्या मधील अन्न खाऊ लागली….

अन्न पोटात गेल्यावर त्यांच्या चेहर्‍यांवरचे तेज एखाद्या योग्याला लाजवेल असे तेजःपुंज वाटत होते.


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी किंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यास येथे क्लिक करा.

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!