सर्वोत्तम सामन्यांचा रंगतदार दिवस!!

सर्वोत्तम सामन्यांचा रंगतदार दिवस

काल दोन महत्त्वाच्या स्पर्धांचे अंतिम सामने एकाच वेळी सुरु होते. कोणता सामना बघू आणि कोणता सोडू अशी अवस्था ह्या वेळी प्रत्येक खेळप्रेमीची होत होती. कारण दोन्ही सामने रंगतदार अवस्थेत होते. कधी इकडे तर कधी तिकडे झुकणारे हे सामने नक्की कोण कधी जिंकेल ह्याबाबत अगदी शेवटच्या क्षणापर्यंत कोणालाच निर्णायकरित्या सांगता येतं नव्हतं इतके चुरशीचे झाले. कोण जिंकलं आणि कोण हरलं ह्याचा उहापोह करण्यापेक्षा ह्या सगळ्यात खेळ जिंकला! कारण खेळात कोणीतरी जिंकतो आणि कोणीतरी हरतो पण खेळ ज्या खिलाडूवृत्तीने खेळला गेला ते खेळाला उंचीवर नेत असते.

ह्या दोन्ही सामन्यात भारत कुठे नव्हता तरीही त्याची उत्कंठा भारतातही तितकीच होती. एकीकडे क्रिकेट ह्या भारताला वेड लावणाऱ्या खेळाचा जन्मदाता देश पहिल्यांदा क्रिकेट च्या पंढरीवर दर ४ वर्षांनी होणाऱ्या विश्वकप स्पर्धेच्या कपासाठी खेळत होता तर न्यूझीलंड सारखा देश दोन वेळा हुलकावणी देणाऱ्या ह्या कपाच्या दावेदारीसाठी त्वेषाने खेळत होता. दोन्ही संघ तितकेच तुल्यबळ होते. तेच ह्या सामन्यात दिसून आलं.

अगदी शेवटच्या चेंडू पर्यंत रंगलेला हा सामना १०० ओव्हर खेळल्यावर पण बरोबरीत राहिला होता. हेच काय कमी तर ‘सुपर ओव्हर’ मध्ये ही दोन्ही संघ हे बरोबरीत राहिले. जय पराजयाचा निर्णय हा क्रिकेटच्या नियमांनी करावा लागला. ब्रिटिश संघ आणि न्यूझीलंड चा संघ हे दोघेही खरे तर जिंकले कारण काल क्रिकेट जिंकलं. मला सगळ्यात आवडलं ते म्हणजे कोणीही जिंको पण प्रेक्षकांनी खेळाला दाद दिली. लॉर्ड्स वर असणाऱ्या ते जगभर दूरदर्शन, इंटरनेट वरून बघणाऱ्या प्रत्येकाने काल क्रिकेट हा खेळ बघितला. मला वाटते जिंकणारा तर जिंकला पण हरणारा पण सगळ्यांची मन जिंकून गेला हे कालच्या सामन्याच वैशिष्ठय.

दुसरीकडे एक चाळीशीमध्ये पोचणारा हिरवळीचा राजा. ज्या हिरवळीवर त्याने गेले काही दशके राज्य केले आज त्याच हिरवळीवर तो वयाच्या चाळिशीच्या आसपास पुन्हा एकदा आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या तयारीत होता. जगातील नंबर २ असणाऱ्या खेळाडूला विम्बल्डनं स्पर्धेच्या उपांत्य फेरीत हरवत वयाच्या ३८ व्या वर्षी सुद्धा आपण तितकेच समर्थ असल्याचा पुरावा त्याने जगाला दिला होता. तब्बल ८ वेळा ही स्पर्धा त्याने जिंकलेली होती आणि समोर जगात नंबर १ वर असलेला खेळाडू होता. अगदी चुरशीचा झालेला हा सामना रंगला तो ह्या दोघांच्या फटक्यांमुळे!

सर्वोत्तम सामन्यांचा रंगतदार दिवस

पूर्ण सामन्यात जेव्हा सामना एका बाजूला झुकतो आहे असं जाणवतं होतं तेव्हाच प्रतिस्पर्धी आपला खेळ उंचावत पुन्हा सामना आपल्या बाजूने झुकवत होता. ह्यामुळेच सेंटर कोर्ट वर असणाऱ्या आणि टी.व्ही., इंटरनेट वरून हा सामना बघणाऱ्या प्रत्येकजण टेनिस ह्या खेळातील एका अजरामर सामन्याचा साक्षीदार होत होता. सामना जरी जोकोव्हिच ने जिंकला तरी मने मात्र रॉजर फेडरर ने जिंकली ह्यात शंका नाही. सामन्यानंतर खुद्द जोकोव्हिच म्हणाला की वयाच्या ३८ व्या वर्षी सुद्धा फेडरर मला कडवी झुंज देईल ह्याची खात्री मला होती. आपल्या प्रतिस्पर्ध्याचा इतका आदर खूप काही सांगून गेला आणि पुन्हा एकदा टेनिस जिंकलं.

हे दोन्ही सामने सुरु असताना तिकडे झेक प्रजासत्ताक मध्ये सुरु असलेल्या क्लॅनदो अथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या ‘हिमा दास’ने दोन आठवड्यात तिसरं सुवर्ण पदक भारताच्या खात्यात जमा केलं. क्रिकेट मध्ये अडकलेल्या भारतीयांना क्रिकेट बाहेर ही भारत आपली छाप पाडू शकतो ह्याची दखल घेण्यास हिमा दासने भाग पाडलं आहे. धावण्याच्या शर्यतीत जागतिक स्पर्धांमध्ये एक दोन अपवाद सोडले तर भारताची दखल ना जगाने कधी घेतली न खुद्द भारतीयांनी पण ह्या विचारधारणेला बदलण्याचं काम भारतीय धावपटू विशेषतः स्त्री धावपटूंनी गेल्या काही वर्षात केलं आहे. चाहत्यांचा पाठिंबा नसताना पण आपण आपला सर्वोत्तम खेळ करत तिरंगा उंचावर फडकावण्याच्या कामगिरीने हळूहळू का होईना भारतीय सुजाण प्रेक्षक आता क्रिकेट पलीकडे विचार करण्यास प्रवृत्त होत आहेत, हे ही नसे थोडके…

सर्वोत्तम सामन्यांचा रंगतदार दिवस

एकूणच कालचा दिवस खेळाचा होता. योगायोगाने विम्बल्डन आणि क्रिकेट विश्वकप ह्या दोन्ही स्पर्धा एकाच वेळी एकाच देशात सुरु होत्या. दोन्ही स्पर्धेचे जनक असलेल्या देशात विम्ब्लडनचं सेंटर कोर्ट आणि क्रिकेटमधील लॉर्ड्सचं मैदान ह्या दोन्ही ठिकाणी आपला खेळ दाखवण्याचं स्वप्न प्रत्येक खेळाडू बघत आलेला असतो अशा वेळी ह्या दोन्ही खेळांचे त्या त्या खेळांच्या पंढरीमध्ये सर्वोत्तम सामने व्हावेत हा योगायोग पण खेळासाठी नक्कीच चांगला होता.

काल कोणी जिंकलं आणि कोणी हरलं तरी काल पुन्हा एकदा खेळ, सांघिक भावना आणि खेळाडू जिंकले ह्याचं समाधान मला सगळ्यात जास्त आहे!

मनाचेTalks च्या वाचकांचे अभिप्राय:

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीकिंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यासयेथे क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!