आनंदाने कसं जगायचं याचं भन्नाट गुपित सांगणारी हि छोटीशी प्रेरणादायी गोष्ट

लेखन: डॉ. अंजली औटी

घरात जाण्यासाठी वळले तर पायापाशी एक छोटंसं मनीप्लॅन्टचं पान, थोड्या देठावर, कसंबसं तग धरून. हिरवा रंग पण थोडसं मलूल. तिथे कधीपासून होतं, माहीत नाही.

तसा त्याचा वेल होता, आजूबाजूला जिकडेतिकडे पसरलेला. हे मात्र सगळ्यांपासून तुटून जमिनीवर..

नशीब अजून कोणी त्याच्यावर पाय नव्हता दिलेला. पटकन उचललं. घरात एका ग्लासभर पाण्यात ठेवलं. किचनच्या खिडकीत, मला दिसेल असं. दोन दिवस जगेल की नाही, वाटत होतं. पण हळूहळू ते तरारलं. त्याला स्पर्श केला की कळायचं, आतून जगण्याची जिद्द होती त्याच्यात.

प्रेरणादायी

काही दिवसातच त्याच्या तुटलेल्या भागाला पांढरट मुळं फुटलेली दिसली. कमाल वाटली मला त्याची.

छोटासा जीव किती चिवट इच्छाशक्ती धरून होता! शब्दही न बोलता मला त्याची जगण्याची धडपड समजत होती. त्याच्या विश्वात मी होते की नाही, माहीत नाही…. पण माझ्या विश्वात मात्र त्याचं असणं होतं!

अवघ्या काही दिवसांत देठाशी नव्या पानाचा उगम दिसायला लागला आणि मला जग जिंकल्यासारखा आनंद झाला. आता मला त्याची काळजी नव्हती. ग्लासमधलं पाणी बदलतांना त्याचा हळूवार स्पर्श मला होई. “आता उद्यापासून तू मातीत राहायचं हं.. तुझं खरं घर तेच आहे. तुला आवडेल तिकडे..” मी सांगितलेलं समजलं असेल का त्याला?

दुसऱ्या दिवशी माझ्या हाताने कुंडी तयार केली. मातीत थोडे नैसर्गिक खतदेखील मिसळले. आणि अलगद बोटांनी त्याला मातीच्या कुशीत ठेवले. मातीला आणि पाण्याला त्याची काळजी घ्यायला सांगितले. तरी मला वाटत होते, नीट येईल ना मातीत? आवडेल ना त्याला हे नवीन घर? लगेच कसं समजेल? मला वाट बघायला हवी.

हा बदलदेखील त्याला मानवला. ते कोमेजले नाही. किती वेळ लागला त्याला तिथे जुळवून घ्यायला. पाणी जास्त व्हायला नको, कमी पडायला नको. ऊन कडक नको, उजेड मात्र भरपूर हवा, हवा खेळती असावी. माझं बारीक लक्ष होतं. “बस, मरना नहीं..” मनावर उमटलेलं मूव्हीतलं हे वाक्य त्यालाच किती वेळा म्हटलं मी.

ऐकलं असेल का त्याने? ऐके दिवशी त्याच्या देठावर हिरवट पिवळा उंचवटा दिसला.. इथून कोंब फुटणार.. आता मला खात्री झाली आणि अगदी हळूहळू त्यातून नवे पान उगवले….

किती सावकाश झाले सगळे. त्याला कसलीही घाई नव्हती. मात्र घाई होती माझ्याच मनात. त्याने त्याचा वेळ घेतला. मग मला अपोआप समजलं, सगळ्या गोष्टींची वेळ ठरलेली आहे! त्याच्या त्या वेगाशी जुळवून घेणं मग एकदम जमूनच गेलं मला. आणि आवडलंही.

पटापट एका विचारावरून दुसऱ्यावर धावणारं माझं मन आपोआप सैलावलं.. घाई करून एखादं काम लवकर होईल फारतर. त्याने असा काय फरक पडतो? मला “स्लो डाऊन” होण्यातली मजा समजली. आता त्याच्याकडे अनेकदा बघूनही प्रत्येकवेळी नवेच काहीतरी दिसत होते.

दिवसागणिक वाढणारा त्याचा ताजेपणा लक्षात येत होता. ऐकाका पानाचा प्रवास उमगत होता. सावकाश एका पानाची पाच-सहा पाने झाली होती. त्याच्याशी माझी जवळिक वाढली होती, खरंतर जवळिक वाढली होती माझी माझ्याशीही.

इतक्यादिवस मला वाटे की मी त्याच्या सोबत आहे! पण मग लक्षात आलं की अरे, हे तर नेमकं याच्या उलट आहे की! त्याला माझी नाही तर मला त्याची सोबत आहे! मी असले नसले तरी त्याच्या असण्यात फरक पडणार नाहीये काही.. पण माझ्यात मात्र हळूहळू खूप काही बदलतेय.

माझ्या जगण्याच्या चौकटीतून मी त्याच्या जगण्याचा अर्थ शोधत होते, कसं शक्य आहे हे? माझ्या चौकटीत असलेले अनुभवांचे अर्थ अपूरे, माझ्या नजरेतून असू शकतील. त्यापलीकडे असलेलं त्याचं जग समजायचं असेल तर आधी मला माझ्या चौकटीतून बाहेर पडलं पाहिजे.

अर्थ शोधायला न जाता त्याचं फक्त जगणं समजून घ्यावं लागेल. आणि मग मला समजलं, कशाला हवा आहे, प्रत्येक गोष्टीला अर्थ?

नुसतं जगणं, नुसतंच असणंदेखील पुरेसं असतं. अनुभवतेय की मी ते त्याच्या सोबतीने. त्याच्याकडे बघतांना माझ्या मनात आपोआप जे उमटेल तेच आहेत त्याचे जगण्याचे बोल. ते पोहोचण्यासाठी कोणतेच शब्द लागत नाही. त्याशिवायच भाव पोहोचतो.

आपल्या मरणासन्न अवस्थेबद्दल तरी त्याची तक्रार कुठे होती? त्याने कधी कोणाची तक्रार केली की गाऱ्हाणे मांडले? मी उचलले नसते तर ते तितक्याच शांतपणे नाहीसेही झाले असते जगातून. त्याने अपेक्षा केली नव्हतीच, नंतर मात्र मी दिलेला मदतीचा हात घेऊन मन:पूर्वक जगण्याचा प्रयत्न केला. त्याने फक्त जे घडेल त्याची वास्तविकता स्वीकारली. त्या त्या प्रत्येक क्षणी. पाण्यातून मातीत आणून ठेवलं तरी. त्याची सगळी शक्ती फक्त टिकून राहण्यात एकवटली. त्याला माहीत होतं, जगणं महत्त्वाचं आहे, वाढ तर आपोआपच होणार आहे.

शून्यापासून सुरवात करून पुन्हा शून्यापर्यंत जाण्याचं नाव आहे नाही का, आयुष्य म्हणजे! या दोन शून्यांच्या दरम्यान जे काही आहे, तेच तर आहे प्रत्येकाचं जगणं..

मग हेच करतांना आपण माणसं किती घाई करतो..? एकमेकांशी स्पर्धा करतो. पण खरंतर प्रवास किती वेगवेगळा आहे आपल्या प्रत्येकाचाच शून्यापर्यंत जाण्याचा. त्यात कितीतरी वेगवेगळे अनुभव आहेत. मग तुम्ही कोणीही असा, तुम्हाला आयुष्याचे काय अनुभव येतात, कोणत्या परिस्थितीत येतात आणि त्यातून नेमके काय घेऊन तुम्ही वाढत असता.. हे प्रत्येकासाठी वेगळेच आहे ना..? कोणतेही झाड असे कुठे म्हणते कधी की, मला ना.. त्या दुसऱ्या झाडासारखं जगायचं आहे, मला का नाही त्याच्यासारखं उंच होता येत? मला का नाही अमूक रंगाची फुलं येत? माझ्या फुलांना दुसऱ्या फुलांसारखा वास का नाही? इतरांसारख्या माझ्याकडे प्राणी-पक्षी, मधमाश्या का नाही येत? ते ना कधी कोणाशी तुलना करत, ना स्पर्धा करत.

ते स्वतः जगते आणि दुसऱ्यांना जगायला मदत करते. आजूबाजूच्या सगळ्याशी स्वतःला जोडून घेते. आपल्या आजूबाजूला असलेल्या जगाशी असलेलं नातं प्रत्येक झाडाला अंतर्यामी माहीत असतं. “माझ्या जगण्याचा हेतू काय?” असले प्रश्न त्याला कधीच पडत नसावेत. आपला प्रवास तन्मयतेने करणे, हेच असतं त्याचं जगणं.

तो प्रवास करतांना मातीशी, तिच्यातल्या वेगवेगळ्या घटकांशी, कृमी-किटकांशी, हवेशी, वातावरणाशी, या प्रत्येकाशी जोडले गेलेले त्याचे जगण्याचे हेतू. म्हणजे झाडांचा प्रवास आतून बाहेर आहे आणि माणूस म्हणून आपला प्रवास बाहेरून स्वतःकडे जाणारा, स्व-केंद्रित! प्र

त्येकाचे वेगळेपण स्वीकारत, सामावून घेत, जोडून घेत, देवाण-घेवाण करत एकमेकांशी पूरक होत जाणारं आहे यांचं आयुष्य आणि आपण मात्र ‘मी’, ’माझं’,’ माझ्यापुरतं’ बघून स्वतःला मर्यादित करत, चौकटीत बांधत जगत रहातो. आणि म्हणूनच याच निसर्गात राहूनही आपण त्याचाच एक भाग होऊ शकत नाही. सगळ्यांमध्ये असूनही ‘वेगळे’ आहोत. ते वेगळेपण मिरवणं आवडतं आपल्याला. कधीकधी तर ते सर्वश्रेष्ठही वाटतं!

ही आपली वाटचाल नैसर्गिक नाही, निसर्गाशी पूरक नाही, जोडून घेणारी तर नाहीच नाही. विचार करायला हवा, नाही का? निसर्गापासून दूर जातांनाच आपण आपल्या विचार, भावना आणि वागण्यातला समतोल गमावून बसलो.

निसर्गावर अतिक्रमण करून आपण यश, प्रसिद्धी, पैसा आणि लोकप्रियता तर मिळवली आणि आता मनस्वास्थ्य बिघडले आणि शरीरस्वास्थ्य बिघडले म्हणून आपण अस्वस्थ आहोत. मानसिक आणि शारिरीकदृष्ट्या निरोगी, निरामय आणि सशक्त आयुष्य जगणे आणि इतरांना त्यासाठी मदत करणे, हे माझे ध्येय आहे असे आता मनापासून वाटते आहे. माझ्या विचारांमधला हा बदल काही माझी स्वतःची समज आहे? सर्वांगाने मनापासून वाढणाऱ्या या माझ्या लाडक्या छोट्याशा रोपट्याने सहज, कसलाही आव न आणता समजावलेले हे जगण्याचे गुपित आहे!

मनाचेTalks च्या वाचकांच्या प्रतिक्रिया:

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीकिंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यासयेथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

11 thoughts on “आनंदाने कसं जगायचं याचं भन्नाट गुपित सांगणारी हि छोटीशी प्रेरणादायी गोष्ट”

  1. अंतर्मुख करणारा …

    मानसिकता बदलण्यासाठी अंतर्दृष्टी दिलेली आहे..!

    Reply
  2. अतिशय सुरेख पद्धतीने पानाचं, वेलीची गोष्ट सांगून आयुष्य जगताना आपला दृष्टीकोन कसा सकारत्मक ठेवावा याची शिकवण दिलेली आहे
    मनःपूर्वक धन्यवाद 🙏

    Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय