डिपोझिटरी रिसिप्ट (Depository Receipts)

depository receipt

डिपॉझिटरी रिसिप्ट (Depository Receipts) या भारतीय कंपन्यांना परकीय चलनात अल्प मोबदल्यात भांडवल उभारणी करण्याचे साधन आहेत. या रिसिप्ट म्हणजे शेअरचा संच असून त्यावर परकीय चलनात प्रिमियम आकारणी केलेली असते. या शेअरना मताधिकार (Voting rights) नसतात. त्यांची नोंदणी आणि व्यवहार परदेशांतील शेअर बाजारात होतात. या रिसिप्ट नेहमी परकीय चलनात जारी केलेल्या असल्याने ज्या कंपनीला अशा तऱ्हेने भांडवल उभारणी करायची असते ती कंपनी नोंदणी करावयाच्या नियोजित स्टॉक एक्सचेंजच्या नियमांची पूर्तता करून ठराविक रकमेचे शेअर जारी करते. त्यांचा ताबा डी. आर. देणाऱ्या कस्टोडियन बँकेस दिला जातो. या शेअर्सचे बदल्यात काही शेअर्सचे प्रतिनिधित्व करणाऱ्या डी. आर. बँकेकडून बाजारात विक्रीसाठी दिल्या जातात. हे सर्व इलेक्ट्रॉनिक पद्धतीने होते.

डी. आर. चे व्यवहार कोणत्या एक्सचेंजवर होणार त्या ठिकाणावरून खालील तीन मुख्य प्रकार आहेत. यामुळे भारतीय कंपन्यांना शेअरचे व्यवहार परदेशातील बाजारात आणि परदेशातील कंपन्यांना त्यांच्या शेअरचे व्यवहार भारतातील बाजारात त्या देशातील मान्य चलनात करता येतात.

  • ए डी आर (American Depository Receipts): या रिसिप्ट यू. एस. डॉलरमध्ये असून त्यांचे व्यवहार हे अमेरिकेतील स्टॉक एक्सचेंजवर होतात. जसे न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज.
  • जी. डी. आर. (Global Depository Receipts) : यांचे व्यवहार अमेरिका सोडून इतर एक्सचेंजवर होतात. जसे लंडन स्टॉक एक्सचेंज.
  • आई. डी. आर. (Indian Depository Receipts): भारतीय शेअर बाजारात नोंदणी झालेल्या व व्यवहार होणाऱ्या आणि इतर देशातील शेअरचे प्रतिनिधित्व करतात.

डिपॉझिटरी रिसिप्ट जारी करताना जेव्हा विद्यमान शेअरहोल्डर आपल्याकडे असलेले शेअर देवू करतात तेव्हा त्या इश्यूला स्पॉन्सरर इश्यु म्हणतात. याशिवाय समभाग भांडवलात वाढ करूनही कंपनीस डी. आर. निर्मिती करता येते.

डिपॉझिटरी रिसिप्टमुळे —

  • कंपनीला जगभरातून गुंतवणूकदार मिळतात.
  • कमी खर्चात परकीय चलनात भांडवल उपलब्ध होते.
  • स्पॉन्सरर इश्यु असेल तर शेअर होल्डरना विक्रीची अधिकची संधी मिळते.
  • परदेशी गुंतवणूकदाराना तुलनेने सहज गुंतवणूक करण्याची संधी मिळते.
  • डी. आर. जेथे लिस्टेड आहेत, त्या देशाच्या नियमांचे अधीन राहून येथील लोकल मार्केटमधून शेअर खरेदी करून त्याचे डी. आर. मधे रूपांतर किंवा डी. आर. खरेदी करून त्याचे रूपांतर शेअरमध्ये करता येते. भावात असलेल्या फरकाचा लाभ करून घेता येतो.

सेबीच्या यासंदर्भातील मार्गदर्शक तत्वानुसार भारतीय कंपन्यांना भांडवल मिळवण्यासाठी शेअरचे रूपांतर डी. आ.र (ADR/GDR) मध्ये करण्याची आणि परकीय कंपन्यांना भारतातून भांडवल मिळवण्यासाठी (IDR) चे माध्यम वापरण्याची परवानगी आहे. मात्र त्यांनी जारी केलेल्या IDR चे शेअरमध्ये एक वर्षापूर्वी रूपांतर करता येत नाही आणि हे lDR फक्त भारतीय गुंतवणूकदांरानाच खरेदी करता येतात.

वाचण्यासारखे आणखी काही…..

निर्देशांक (Index) म्हणजे काय? आणि तो कसा मोजतात
ब्रोकरची निवड करतांना घेण्याची काळजी
नफा देणारे शेअर शोधण्याची गुणोत्तरे -भाग २ (How to find good Shares)

Previous articleवारी – एक आनंदसोहळा
Next articleघाट्याचा सौदा!…
१९८२ पासून "हिंदुस्तान ऑरगॅनिक केमिकल" या कंपनीत नोकरी, शिक्षण बी कॉम. एवढ्यातच अकाउंट डिविजन मधे पी. एफ. विभागात उपव्यवस्थापक म्हणून मी स्वेच्छानिवृत्ती घेतली. मी मुंबई ग्राहक पंचायतच्या शिक्षण विभागाचा सक्रिय कार्यकर्ता असून १९८४ पासून शेअर बाजाराशी संबधीत, गुंतवणूक करप्रणाली आणि आर्थिक विषयांच्या लेखनासाठी अलीकडेच सुरुवात केली आहे. मराठी माणसाला शेअरबाजाराबद्दल शास्त्रशुद्ध माहिती मिळावी आणि तीही आपल्या भाषेत म्हणून हा माझा छोटासा प्रयत्न.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.