बाप

Police Station

“साहेब …माफ करा.  पुन्हा नाही अशी चूक होणार. नका मारू हो…. पाया पडतो तुमच्या”. हात जोडून गयावया करीत मितेश एस. पी. साहेबांना म्हणाला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. गालावर पाच बोटे उमटलेली दिसत होती.

” मारामारी करताना ही नाटके कुठे गेली होती..? साल्यानो पोरींची छेडही काढता आणि मारामारीही करता” एस. पी. संजय देशपांडे चिडून बोलत होते.. “बोलवलय तुझ्या बापाला ….त्याचीही काढतो बघ कशी. पोरांना हेच शिकवतो का “??

“नको नको साहेब …! त्यांना नका बोलावू. खूप साधे आहेत हो ते. कधी कोणाशी भांडत नाही. आवाजही चढवून बोलत नाहीत घरी. खूप धक्का बसेल हो त्यांना. आतापर्यंत ते पोलीस स्टेशनची पायरी चढले नाहीत” मितेश आता फारच जोरात रडू लागला.

एका हवालदाराने त्यांच्या कानात येऊन काहीतरी सांगितले. तसे देशपांडे म्हणाले “आला बघ तुझा बाप. बघतो त्याला आता. इतक्यात दरवाजावर ते उभे राहिले. उंच कृश बांधा, डोळ्यावर चष्मा. आगतिक चेहरा. आल्याआल्या त्यांनी देशपांडे साहेबांना हात जोडून नमस्कार केला. त्याला पाहून देशपांडे चमकलेच.

“मी रत्नाकर निकम.. याचा बाप. साहेब साधा आहे हो माझा मुलगा. काही केले नसेल त्याने. सोडून द्या त्याला. बोलता बोलता रत्नाकरच्या डोळ्यात अश्रू आले. देशपांडे पुन्हा चमकलेच. आता तर दोघेही बाप बेटे त्यांच्या समोर हात जोडून उभे होते.

काही क्षण विचार करून देशपांडे म्हणाले “ठीक आहे सोडून देतो पण पुन्हा कुठे असा सापडलास तर खैर नाही तुझी. जा तू घरी. बाबा राहू दे इथे थोडावेळ बोलायचे आहे त्यांच्याशी ”

मितेश हात जोडून निघून गेला. तो जाताच देशपांडेंनी खुर्चीवरून उठून जोराने रत्ना तू ..!! असे ओरडतच त्याला मिठी मारली. त्यानेही हसत संजा..! म्हणत प्रतिसाद दिला.

“अरे काय ही तुझी परिस्थिती मित्रा …?. आमचा डॅशिंग मित्र आज या अवस्थेत कसा… ?? अरे कॉलेजमध्ये, खेळाच्या मैदानावर तुझ्या जीवावर किती मारामाऱ्या दादागिरी केली आम्ही…. किती वर्षांनी भेटतोय आपण… आणि तेही या परिस्थितीत…

रत्नाकर हसला “अरे परिस्थिती बदलत असते प्रत्येकाची. आता बघना.. तुही मोठा साहेब झालास.

“पण तू बद्दलशील असे वाटले नव्हते” देशपांडे म्हणाले… तुझा स्वभाव आक्रमक होता. त्या डान्सबारमधील मुमताजला फाटलेली नोट द्यायचास. ती काहीतरी बोलेल याची भीती वाटायची आम्हाला पण तू मात्र बिनधास्त असायचास. तुझ्या जीवावर तर सर्व चालत होते. तू असलास की आधार वाटायचा खूप. प्रत्येक प्रॉब्लेमचे सोल्युशन होते तुझ्याकडे. देशपांडे जुन्या आठवणीत रमून गेले.

“हो रे ….पण शिक्षण पूर्ण झाल्यावर घरची जबाबदारी घ्यावी लागली. शिक्षण पूर्ण होईपर्यंत बापाची जबाबदारी होती. पण नंतर कळले आता आपणही हातभार लावला पाहिजे. दोन तीन ठीकाणी जॉब केला. शेवटी किती नोकऱ्या बदलणार म्हणून एक नोकरी पक्की केली आणि त्यातच गुरफुटून गेलो. मग लग्न आणि त्यानंतर हे चिरंजीव. संसार करताना बाकीचे सर्व विसरून गेलो. कुटुंबातच रमून गेलो. खरेतर रोजच्या खर्चाच्या काळजीतच आतापर्यंत जगतोय तर इतर ठिकाणी काय बघणार …?

रत्नाकर हसत बोलत होता पण त्याच्या डोळ्यातील वेदना लपत नव्हती. “संजा एक विनंती करू का ..?? तो हात जोडून म्हणाला.”मी कसा होतो हे माझ्या कुटुंबाला कळू देऊ नकोस. त्यांच्या मनातील माझ्या प्रतिमेला तडा जाईल. खूप साधा समजतात ते मला. तसेच राहूदे .”

देशपांडे त्याचा हात हाती घेऊन म्हणाले “रत्ना दोस्त आहे मी तुझा. नाही सांगणार मी कोणालाच. फक्त मला एक सांग एमपीएससी परीक्षेचे पुस्तक तू मला कुठून आणू दिले होतेस..?? त्यावेळी ते पुस्तक घेण्याची माझी परिस्थिती नव्हती ना तुझी ”

रत्नाकर मोठ्याने हसला” जाऊदे ना मित्रा…! झालासना ऑफिसर तू …. विषय सोड … फार नाही.. त्या नाक्यावरच्या लायब्ररीतील एक पुस्तक कमी झाले असेल. आणि हातावर टाळी देत रत्नाकर बाहेर पडला.

वाचण्यासारखे आणखी काही…..

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!