वाढत्या वयाबरोबर विस्मरण होत असेल तर ‘हे’ करा

विस्मरणाची समस्या अल्झायमर्स वाचलेले लक्षात राहत नसेल

वाढत्या वयाबरोबर विस्मरणाची समस्या उद्भवू लागते. नक्की काय आहे ही समस्या? आपण याबाबत आजच्या लेखात विस्ताराने जाणून घेऊया.

जसजसे वय वाढत जाते तस तशा काही ना काही शारीरिक समस्या उद्भवू लागतात. काही आजारपणे, मधुमेह, उच्च रक्तदाब यासारखे आजार, गुडघेदुखी, संधिवात क्वचित कधी किडनी संबंधीच्या समस्या, डोळ्यांचे आजार, मोतीबिंदू असे आजार ज्येष्ठ नागरिकांमध्ये दिसून येतात.

वयोमानानुसार हे आजार झाले आहेत हे आपण गृहीत धरलेले असते. त्याचबरोबर सुरुवातीपासूनच पथ्य पाळणे, योग्य औषधे घेणे, वजन आटोक्‍यात ठेवणे असे उपाय केले तर अशा आजारांवर मात करणेदेखील ज्येष्ठ नागरिकांना शक्य होते.

परंतु या बरोबर आणखी एक आजार देखील ज्येष्ठ नागरिकांमध्ये दिसून येतो आणि तो म्हणजे विस्मरणाचा आजार.

हल्ली पन्नाशी पासूनच विस्मरणाचा आजार होताना दिसून येतो. उदाहरणच द्यायचे झाले तर आपण मित्रमंडळींच्या मैफिलीत बसून एखाद्या सिनेमाची गोष्ट सांगत असतो आणि त्यातील प्रमुख पात्राचे नाव अचानक आपल्याला आठवेनासे होते. किंवा काल परवा भेट दिलेल्या एखाद्या रेस्टॉरंटचे नाव आपल्याला आठवत नाही. अचानक भेटलेल्या जुन्या मित्र किंवा मैत्रिणीचे नाव आठवत नाही. घरचा किंवा जवळच्या व्यक्तीचा मोबाइल नंबर आपल्याला आठवत नाही.

अशा प्रकारचे विस्मरण जर होत असेल तर तो काही डिमेन्शिया वगैरे सारखा गंभीर आजार नव्हे. कारण अशा विस्मरण होणाऱ्या व्यक्तीचा स्वतःवर संपूर्ण ताबा असतो. दररोजच्या दैनंदिन कामांमध्ये त्या व्यक्तीस कोणताही अडथळा येत नाही. अशी व्यक्ती घरातील तसेच बाहेरची कामे, नोकरी-व्यवसाय व्यवस्थित करत असते.

परंतु वाढत्या वयाबरोबर अचानक काही गोष्टी न आठवणे हे मात्र घडू लागते. ज्याप्रमाणे आपण वाढत्या वयाबरोबर होणारे इतर शारीरिक आजार गृहीत धरतो आणि त्यांच्यावर आधीपासूनच उपाय करायला हवेत हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे वागतो. त्याचप्रमाणे अशा पद्धतीचे विस्मरण आपल्याला वयामुळे होऊ शकते हे आधीच गृहीत धरून त्याप्रमाणे आपण वागणे आवश्यक असते.

वाढत्या वयाबरोबर ज्याप्रमाणे डोळ्यांचे काम करणे कमी होते, त्वचेवर सुरकुत्या पडतात त्याचप्रमाणे माणसाची स्मरणशक्ती देखील कमकुवत होऊ शकते. स्मरण शक्ती कमकुवत होण्यासाठी मोबाईलचा अतिवापर देखील काही प्रमाणात कारणीभूत आहे.

पूर्वी कोणालाही फोन करायचा असेल तर बरेचसे नंबर आपल्या लक्षात असायचे, पण हल्ली मोबाईल फोन मध्ये सगळे नंबर स्टोअर असल्यामुळे अगदी जवळच्या व्यक्तींचा, घरचा फोन नंबर सुद्धा आपल्या लक्षात नसतो. असे होऊनच हळू हळू मेंदूची गोष्टी लक्षात ठेवण्याची तत्परता कमी होत जाते आणि मग त्याची कार्यक्षमता देखील कमी होते.

वाढत्या वयाबरोबर आपली स्मरणशक्ती कमी होऊ नये यासाठी काही उपाय नाहीत का?

तर असे नाही, आपल्या बाबतीत वाढत्या वयाबरोबर स्मरणशक्ती कमी होऊ नये म्हणून तरुणांनी आणि प्रौढांनी आवर्जून काही उपाय करावेत. त्यामुळे मेंदूची कार्यक्षमता वाढून गोष्टी लक्षात ठेवण्याची त्याची तत्परता वाढते आणि विस्मरण होणे कमी होते, पुढे ढकलले जाते.

त्यासाठी तरुणांनी आणि प्रौढांनी निरनिराळी शब्दकोडी सोडवणे, सुडोकूसारखे मेंदूला व्यायाम देणारे कोडे सोडवणे, उत्तम पुस्तकांचे वाचन करणे, वेगळे शब्द वहीत लिहून ठेवण्याची सवय लावून घेणे, काही गणिती आकडेमोड स्वतः करणे असे उपाय करावेत.

घरामध्ये असताना आपापल्या फोनमध्ये डोकी घालून न बसता कुटुंबियांनी एकमेकांशी बोलणे, संवाद साधणे ह्याचा देखील फार उपयोग होतो. वाढत्या वयाबरोबर कमी होणाऱ्या स्मरणशक्तीबाबत झालेल्या संशोधनामध्ये असे आढळून आले आहे की ज्या व्यक्ती वारंवार निरनिराळ्या शब्दांचा वापर करतात, कोडी सोडवतात किंवा फोन नंबर लक्षात ठेवून डायल करतात त्यांना हा आजार होण्याचे प्रमाण अतिशय कमी आहे.

स्मरणशक्ती वाढवणारी काही आयुर्वेदिक औषधे देखील उपलब्ध असतात परंतु त्यांचा वापर तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने करणे अतिशय आवश्यक आहे. स्वतःच्या मनाने अशी कोणतीही औषधे घेणे आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

तर हे आहेत अगदी साधे सोपे उपाय ज्यांचा वापर करून आपण विस्मरणाचा आजार होणे टाळू शकतो. अर्थात ह्या आजाराची गंभीर पातळी म्हणजे डिमेनशिया किंवा अल्झायमर. हे आजार मात्र गंभीर असून त्यावर मेंदूविकार तज्ञ आणि मानसोपचार तज्ञ डॉक्टरांची मदत आणि उपचार घेणे अत्यावश्यक आहे.

अल्झायमर्स ह्या आजाराबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा 

परंतु निव्वळ वाढत्या वयाबरोबर होणारे विस्मरण टाळायचे असेल तर आपण लेखात सांगितलेले उपाय अवश्य वापरू शकतो. ह्याबाबतचे तुमचे अनुभव आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा.

Manachetalks

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.