केसांचे आरोग्य आणि आयुर्वेद

काळ्याभोर, रेशमी केसांचे आकर्षण सर्वांनाच वाटते. केसांची वाढ योग्य रीतीने होण्यासाठी आणि त्यांचे सौंदर्य टिकून राहण्यासाठी बाह्य उपचारांसोबतच इतर अनेक घटक कारणीभूत ठरतात.

या लेखातून केसांच्या आरोग्यासाठी आवश्यक असणारी सर्व माहिती जाणून घेऊया.

केसांची उत्पत्ती कशी होते

केसांची उत्पत्ती गर्भावस्थेतच होते. पण ती कमी जास्त प्रमाणात आढळते. काही बालके जन्माला येतानाच दाट जावळ घेऊन येतात तर काही बालकांमध्ये केस अगदी विरळ असतात.

याचप्रमाणे केसांच्या रंगात सुद्धा फरक आढळतो. अगदी काळेभोर किंवा तांबूस, पिंगट रंगछटा असलेले केस साधारणतः भारतीय वंशाच्या लोकांमध्ये दिसून येतात.

आयुर्वेदानुसार आपले शरीर रस, रक्त इत्यादी सात धातुंपासून बनले आहे. यापैकी अस्थि धातुचा मल म्हणजे केस.

आधुनिक शास्त्रानुसार या गोष्टीचा कार्यकारणभाव लक्षात घेतला तर शरीरात कॅल्शियम अभावी हाडे कमकुवत झाली की त्याचा परिणाम म्हणून केसगळती होते.

मेनॉपॉजच्या काळात हार्मोन्स बदलतात तेव्हा केस विरळ होऊ लागतात. कॅन्सर सारख्या रोगात केमोथेरपी नंतर केस प्रचंड गळतात.

प्रतिकारशक्ती कमी झाली की केस गळण्याचे प्रमाण वाढते. यामुळेच मलेरीया, टायफॉइड किंवा इतर मोठ्या आजारानंतर केस गळण्याचा प्रकार वाढलेला दिसतो.

वात, पित्त आणि कफ हे त्रिदोष आहेत. यापैकी ज्या दोषाचे आधिक्य किंवा प्रभाव आपल्या प्रकृतीवर असतो त्यानुसार आपल्या केसांचा, रंग, पोत, भरीवपणा ही सर्व लक्षणे दिसतात.

वात प्रकृतीच्या व्यक्तीचे केस रुक्ष, तुटक, गळणारे असतात. पित्त प्रकृतीच्या व्यक्तीचे केस पिंगट रंगाचे, विरळ, कोमल असून यांना लवकर टक्कल पडण्याची शक्यता असते. कफ प्रकृतीच्या व्यक्तीचे केस घनदाट, काळेभोर, लवकर न तुटणारे असतात.

आईने गर्भारपणात घेतलेल्या आहाराचा बालकाच्या केसांच्या आरोग्यावर परिणाम होतो. म्हणून गरोदरपणात हाडांना मजबूत करणारा कॅल्शियम युक्त आहार घ्यावा.

त्याचप्रमाणे शरीरातील लोहाचे प्रमाण कमी झाले तरी केस लवकर पिकतात. यासाठी लोखंडाच्या कढईत अन्न शिजवावे. हिरव्या पालेभाज्या, मोड आलेले धान्य, सुकामेवा यांचा आहारात समावेश करावा.

तरूण मुले, मुली वजन कमी करण्यासाठी चुकीच्या पद्धतीने डाएट करत असतील तर आवश्यक जीवनसत्त्वे न मिळाल्याने केस गळतात.

केसांच्या आरोग्याशी निगडीत इतर घटक

बाहेरच्या वातावरणाचा केसांवर खूप परिणाम होतो. हवेतील धूळ, प्रदूषण यामुळे केस कोरडे होतात.

रोजच्या प्रवासात घाम येतो आणि त्यामुळे केस चिकट होतात. यावर उपाय म्हणून काही लोकांना रोज शाम्पू लावून केस धुण्याची सवय असते.

पण सकाळी कामावर जाण्याच्या गडबडीत केस पूर्ण न सुकवता तसेच ओलसर ठेवले तर केसांमध्ये कोंडा होण्याची शक्यता असते. आणि मग केसगळती जोरात सुरू होते.

खाज येणे किंवा चाई सारखे रोग होतात. तर काही व्यक्ती फॅशनच्या चुकीच्या कल्पना मनात ठेवून केसांना तेल लावणे म्हणजे मागासलेपणा किंवा गावंढळपणा असे समजतात. अशा व्यक्तींना केसगळती किंवा लवकर केस पांढरे होणे असे त्रास होऊ शकतात.

किमान आठवड्यातून एकदा केसांच्या मुळापर्यंत कोमट तेलाने मसाज करावा. आणि एक ते दोन तासांनी केस स्वच्छ धुवून, नीट सुकवावेत.

केसांची निगा राखण्याचा आळस केला तर अस्वच्छतेमुळे उवा, लिखा यांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. आपल्या वापरातील कंगवे, ब्रश वारंवार स्वच्छ करावेत.

केस विंचरण्यासाठी स्वतःचाच कंगवा वापरावा. तो इतरांसोबत शेअर करणे म्हणजे आपणहून रोगांना आमंत्रण देणे.

केस कापण्यासाठी आपण जिथे जातो त्या पार्लर किंवा सलून मधल्या स्वच्छतेची नीट खात्री करून घ्यावी.

केस धुण्यासाठी केमिकल युक्त शाम्पू, कंडिशनर, वेगवेगळी सिरम्स यांचा वापर टाळावा. कालांतराने ही केमिकल्स केसांचे नुकसान करतात.

याचप्रमाणे केस सुकविण्यासाठी ड्रायरचा वापर करू नये. तलम पंचा किंवा टॉवेल गुंडाळून केसातील पाणी टिपून घ्यावे.

कडक उन्हाचा पण केसांना त्रास होतो. यासाठी भर उन्हात फिरू नये. बाहेर जाणे अगदीच टाळता येणार नसेल तर डोके झाकण्यासाठी स्कार्फ किंवा कॅप वापरावी.

केशरचना करताना केस अगदी घट्ट बांधून ठेऊ नयेत त्याचप्रमाणे विशेष करून सायकल किंवा बाईक वरून प्रवास करताना वाऱ्यावर केस मोकळे सोडू नयेत.

केस ओले असताना झटके देऊन जोरजोराने विंचरणे योग्य नाही कारण त्यामुळे केसांच्या मुळांना दुखापत होते आणि केस तुटतात. गुंतलेले केस, जटा हळूवारपणे सोडवाव्यात.

मिडीया, चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या कलाकारांना सतत प्रखर लाईट समोर थांबणे, भूमिकेनुसार वेगवेगळा मेक अप करणे यामुळे केसांबाबतच्या समस्या उद्भवू शकतात. म्हणून त्यांनी अधिक काळजी घ्यावी.

केसांसाठी उपयुक्त वनस्पती

माका, भृंगराज, ब्राह्मी, शिकेकाई, कढीपत्ता, रीठा, जास्वंद, मेथी, कलौंजी, सुगंधी कचोरा, आवळा, तुळस, कोरफड, नीम, वटवृक्षाच्या पारंब्या, वटांकुर, खोबरेल तेल हे सर्व केसांसाठी हितकर आहेत.

यांच्यापासून बनविलेले तेल किंवा हेअर पॅक आपण वापरू शकतो.

कृत्रिम सौंदर्याचा हव्यास धोकादायक

केस निरनिराळ्या रंगात रंगवणे, कुरळे केस सरळ किंवा सरळ केस कुरळे करून घेणे यात केसांच्या मूळ रचनेला धक्का बसतो.

याशिवाय या ट्रिटमेंट्स करताना आयर्निंग म्हणजे केसांवर इस्त्री फिरवल्याप्रमाणे गरम करणे अशा प्रक्रिया करतात. त्यामुळे काही काळानंतर केसांचे आरोग्य बिघडते.

म्हणून आपले नैसर्गिक सौंदर्य जपावे. ब्युटी मॅगझिन्स, मॉल, जाहिरातींमधून नवनवीन प्रॉडक्ट्स सतत आपल्या नजरेसमोर दिसत असतात.

त्यांना भुलून जाऊ नये आणि उगीचच त्यांचा प्रयोग करण्यासाठी म्हणून आपल्या केसांचा वापर करणे कितपत शहाणपणाचे आहे?

आपल्या केसांना सुट होणारे तेल किंवा शाम्पू विनाकारण सतत बदलत राहणे योग्य नाही.

वाढत्या वयाचा आनंदाने स्वीकार

वयोमानानुसार केस पांढरे होणारच. हे निसर्गाचे चक्र आहे आणि ते थांबविणे कोणालाच शक्य नाही.

त्यामुळे तरूण दिसण्याचा अट्टाहास करून सतत केसांना डाय लावणे सोडून द्यावे. यामुळे कॅन्सरचा धोका निर्माण होतो. त्याचप्रमाणे नजर कमकुवत होणे, वेगवेगळ्या प्रकारच्या ॲलर्जी सुद्धा होऊ शकतात.

ठराविक वयानंतर सौंदर्य हे बाह्य रूपावर अवलंबून नसते. तर आपले ज्ञान, अनुभव, शहाणपण यावर ठरत असते. म्हणून तरूण दिसण्याचा केविलवाणा प्रयत्न सोडून द्यावा आणि केसातील रुपेरी छटांचा मनापासून स्वीकार करावा.

हल्ली तणावपूर्ण जीवनशैली मुळे लहान वयातच केस पिकलेले दिसतात. अश्या व्यक्तींनी केस काळे करण्यासाठी मेंदी, आवळा, कॉफी पावडर, बीट रूट किंवा जास्वंद अर्क यापासून बनवलेला नैसर्गिक डाय वापरावा.

शिरोधारा एक वरदान

शिरोधारा ही आयुर्वेदामध्ये करण्यात येणारी एक विशिष्ट चिकित्सा आहे. ज्याप्रमाणे शंकराच्या पिंडीवर संततधारेने अभिषेक केला जातो त्याचप्रमाणे औषधी तेल किंवा काढा एका पात्रात भरून अगदी संथपणे त्याची धार रुग्णाच्या मस्तकावर सोडली जाते. केसांच्या निरनिराळ्या समस्यांसाठी शिरोधारा हा प्रभावी उपाय आहे. याचा अजून फायदा म्हणजे शांत झोप लागते, ताणतणाव दूर होतो.

केसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त योगासने

शीर्षासन, सूर्यनमस्कार, सर्वांगासन, अधोमुख श्वानासन, मत्स्यासन, उत्तानासन, प्राणायाम, कपालभाती, शवासन अशी अनेक आसने केसांच्या समस्येवर उपयोगी आहेत.

या आसनांमुळे मेंदूचा रक्तपुरवठा वाढून योग्य प्रमाणात ऑक्सिजन मिळतो. त्याचप्रमाणे टेन्शन, चिंता दूर होण्यास मदत होते.

केसांच्या आरोग्यासाठी आपण काळजीपूर्वक दक्षता घेतली तर सुंदर, रेशमी, चमकदार केस डौलाने मिरवू शकतो.

केसांच्या आरोग्यासाठी योगासने वाचा या लेखात.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय