महिलांनी आरोग्याची काळजी का आणि कशी घ्यावी. प्रत्येकाने वाचावी अशी महत्त्वपूर्ण माहिती

स्त्रिया आणि पुरुष निसर्गत: वेगवेगळे असल्यामुळे त्यांच्या आरोग्यविषयक समस्या देखील वेगवेगळ्या असतात. काही आजार स्त्री-पुरुष दोघांनाही होतात तर काही आजार फक्त स्त्रियांमध्येच दिसून येतात.
मासिक पाळी, गरोदरपणा, प्रसूती आणि रजोनिवृत्ती ह्या चार अवस्था स्त्रियांना पुरुषांपेक्षा वेगळ्या बनवतात. ह्या अवस्थांमधील आजार हे फक्त स्त्रियांशी निगडीत असल्यामुळे त्यांचा अधिक विचार करणे गरजेचे आहे.
सुरुवातीपासूनच संपूर्ण जगभरात महिलांचे स्थान पुरुषांपेक्षा दुय्यम ठरवले गेले आहे. त्यामुळे महिलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे, त्यांचे आजार, त्यावरील उपचार ह्यांचे नीट निदान न होणे ह्या गोष्टी घडत गेल्या. आज २१ व्या शतकात महिला सशक्तीकरणाच्या काळात देखील अनेक स्त्रियांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असते. ते टाळण्यासाठी आता जगभरात वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न सुरू असतात.
महिलांच्या आरोग्याबद्दलचे विविध लेख या लेखाच्या शेवटी पहा.
स्त्रियांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज का आहे ?
जगाच्या एकूण लोकसंख्येच्या ४९.६ टक्के भाग स्त्रिया आहेत. स्त्रियांचे कौटुंबिक, सामाजिक आणि आर्थिक स्तरावर खूप मोठे योगदान असते. परंतु लोकसंख्येचा इतका मोठा भाग असताना आणि मनुष्यजातीच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत असून देखील जगभरात स्त्रियांच्या आरोग्याकडे मात्र मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष होते.
खरेतर मानवाची पुढील पिढी तयार करण्याची खूप मोठी जबाबदारी स्त्रियांवर असते. त्यामुळे त्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असते.
स्त्रियांच्या आरोग्यविषयक तक्रारी
पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये वेगळेपण हे त्यांच्या गर्भ धारण करण्याच्या आणि प्रसुतीच्या क्षमतेमुळे उठून दिसते. स्त्रियांच्या आरोग्याच्या समस्या देखील या विषयाशी निगडित असलेल्या दिसून येतात.
१. मासिक पाळीशी संबंधित समस्यांमध्ये अनियमित मासिक पाळी, योनीमार्गातील संसर्ग, पीसीओएस आणि पीसीओडी हे आजार, गर्भाशयात फायब्रॉइडच्या गाठी असणे यांचा समावेश होतो.
२. गरोदर पणाशी संबंधित आरोग्य समस्यांमध्ये प्रसूती नंतर घेण्याची काळजी घेतली न जाणे, अकाली गर्भपात होणे, प्रसूती लवकर होणे, सिझेरियन, स्तनपानाशी निगडीत समस्या यांचा समावेश होतो.
३. याशिवाय जननेंद्रिय आणि पुनरुत्पादनाचे अवयव यांच्याशी निगडीत कॅन्सर हे देखील स्त्रियांमध्ये आढळून येतात.
या शिवाय स्त्री आणि पुरुष दोघांनाही होऊ शकणारे परंतु स्त्रियांच्या आरोग्यावर जास्त परिणाम करणारे काही आजार देखील आहेत.
१. हृदयरोगाची शक्यता स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये समसमान असली तरी हार्ट अटॅक येऊन मृत्यू येण्याची शक्यता स्त्रियांमध्ये अधिक असते.
२. स्ट्रेस आणि ताणतणाव स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये समसमान असले तरी प्रसूतीनंतरच्या ताणामुळे मृत्यू ओढवण्याची शक्यता स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात असते.
३. संधिवाताची शक्यता स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात असते.
४. व्यसने करण्याची प्रवृत्ती स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा कमी असते. परंतु ज्या स्त्रिया व्यसने करतात त्यांच्या आरोग्यावर त्या व्यसनांचा घातक परिणाम पुरुषांपेक्षा तुलनेने अधिक प्रमाणात होतो. उदाहरणार्थ मद्यपान करण्यामुळे स्त्रियांचे आरोग्य पुरुषांच्या तुलनेत जास्त प्रमाणात बिघडते.
५. युरिन इन्फेक्शन होण्याचे प्रमाण देखील स्त्रियांमध्ये पुरुषांच्या तुलनेत जास्त असते.
युरीन इन्फेक्शन पासून आराम देणारे काही घरगुती उपाय वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
स्त्रियांच्या आरोग्याच्या इतक्या वेगवेगळ्या तक्रारी असताना संपूर्ण जगभरात स्त्रियांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष का बरे होत असेल? आज आपण त्याची काही कारणे जाणून घेऊया.
१. सामाजिक सांस्कृतिक कारण
भारतासह संपूर्ण जगभरात स्त्रियांना समाजाकडून सतत दुय्यम भूमिका मिळत गेली आहे. त्यामुळे स्त्रियांचे शिक्षण, आर्थिक स्वातंत्र्य, सामाजिक स्वातंत्र्य आणि त्यांचे आरोग्य याकडे समाजाचे दुर्लक्ष होत आले आहे.
समाजाच्या अनेक स्तरांमध्ये आजही स्त्रियांना मनमोकळेपणाने स्वतःचे दुखणे, वेदना सांगण्याची मुभा नाही. कुटुंबात मुलग्यांना दिल्या जाणाऱ्या महत्त्वामुळे मुलींना लहानपणापासून स्वतःकडे दुर्लक्ष करण्याची सवय लागते.
मुलींच्या आरोग्याशी संबंधित स्वच्छता, पोषक आहार याकडे खुद्द मातापित्यांचे दुर्लक्ष होताना दिसून येते.
२. आर्थिक कारण
भारतासह संपूर्ण जगभरात ७६.७ कोटी लोक निम्न आर्थिक स्तरातील आहेत. अशा कुटुंबातील लोकांचे कुटुंबातील स्त्रिया आणि मुलींच्या आरोग्याकडे आर्थिक कारणामुळे दुर्लक्ष होते.
जवळ असणाऱ्या तुटपुंज्या पुंजीतून मुलगे आणि पुरुषांच्या आरोग्याकडे जास्त लक्ष दिले जाते. बऱ्याच कुटुंबांमध्ये स्त्रिया स्वतः कमवत नसल्यामुळे आर्थिक न्यूनगंडातून स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात.
३. सर्वे मध्ये महिलांना दुय्यम स्थान
जगभरात कोणत्याही सर्वेमध्ये महिलांच्या समस्यांना प्रामुख्याने स्थान मिळत नाही. तसेच महिलांच्या समस्यांवर तुलनेने कमी प्रमाणात संशोधन होताना दिसून येते.
जगभरातील विविध सामाजिक संस्था आता ही परिस्थिती बदलण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहेत.
महिलांनी आरोग्याच्या कोणत्या तक्रारींकडे विशेष लक्ष पुरवावे?
नवीन पिढी निर्माण करणाऱ्या महिलांचे त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ नये यासाठी डब्ल्यू. एच. ओ. सहित अनेक संस्था महिलांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. खालील मुद्द्यांवर भारतासहित सर्व देशांनी महिलांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करावा असे त्यांचे अपील आहे.
१. कॅन्सर
स्तनाचा आणि गर्भाशय मुखाचा कॅन्सर होण्याचे प्रमाण एकुण कॅन्सरग्रस्त रुग्णांमध्ये सर्वात जास्त आहे. या दोन्ही प्रकारचे कॅन्सर अर्थातच महिलांना होतात.
दरवर्षी जवळजवळ पाच लाखाहून जास्त महिला या दोन प्रकारच्या कॅन्सरमुळे मृत्युला सामोऱ्या जाताना दिसून येतात.
जर या दोन प्रकारच्या कॅन्सर बाबत महिलांमध्ये जनजागृती केली गेली आणि आणि अशा प्रकारच्या कॅन्सरचे वेळीच निदान झाले तर योग्य उपचार मिळून अशा महिलांचा जीव वाचवणे शक्य होईल. यासाठी आता भारत सरकारसह जगभरातील आरोग्य संस्था कार्यरत आहेत.
२. प्रसूती
निसर्गात गर्भधारणेची शक्ती फक्त फीमेल म्हणजे महिलांकडे असते. लहान वयापासून प्रजनन आणि त्यासंबंधीच्या अवयवांची संपूर्ण शास्त्रीय माहिती मुलींना करून देणे, तसेच स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी त्यांना प्रशिक्षण आणि प्रोत्साहन देणे आवश्यक असते.
प्रसूती आणि त्यासंबंधीच्या अफवांची भीती दूर करणे, योग्य गर्भनिरोधके वापरण्याचे प्रशिक्षण देणे, लहान मुलींना लैंगिक शोषण इत्यादी संबंधीची माहिती देणे या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या विषयावर देखील सध्या जगभरातून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न होताना दिसून येत आहेत.
३. सर्व वयोगटातील स्त्रियांचे आजार
अगदी लहान मुली, पौगंडावस्थेतील मुली, तरुणी, प्रौढ स्त्रिया आणि रजोनिवृत्तीच्या वयातील स्त्रिया ह्या सर्वांना त्यांच्या आरोग्याची आणि उद्भवू शकणाऱ्या समस्यांची माहिती तज्ञ व्यक्तीकडून करून देणे गरजेचे असते. त्यासाठी शालेय स्तरापासून प्रयत्न करणे आवश्यक आहे.
४. घरगुती हिंसा आणि लैंगिक शोषण रोखणे
जगभरातील वेगवेगळ्या रिपोर्ट नुसार दर तीन पैकी एक महिला परिचित व्यक्तीकडून घरगुती हिंसा किंवा लैंगिक शोषणाची शिकार झालेली असते.
अशा प्रकारच्या वागणुकीमुळे स्त्रियांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर खूप मोठा परिणाम होताना दिसतो.
त्यामुळे अशा प्रकारच्या गुन्ह्यांबाबत लहान वयापासूनच मुलींना संपूर्ण कल्पना देणे, विपरीत काही घडल्यास ताबडतोब आई-वडिलांना ते सांगणे, स्वतःचे संरक्षण करण्यासाठी प्रशिक्षण देणे, मुले व पुरुषांना अशा प्रकारचे गुन्हे करण्यापासून रोखणे असे प्रयत्न करणे आवश्यक आहे.
प्रशासनाने आणि आरोग्यविषयक संस्थांनी याबाबत मोठी पावले उचलणे आवश्यक आहे.
तर अशाप्रकारे केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील महिलांच्या आरोग्याचे प्रश्न सोडवणे शक्य होईल. मित्र-मैत्रिणींनो आपणही या बाबतीत जागरूक राहूया आणि आपल्या परिचयातील महिलांचे आरोग्यविषयक प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करूया.
आणि याबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी हा लेख जास्तीत जास्त शेअर करा. यावरील तुमचे विचार आणि तुमचे अनुभव कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका .
मोनोपॉज ची लक्षणे आणि त्रास कमी करण्यासाठी उपाय
युरीन इन्फेक्शन पासून आराम देणारे काही घरगुती उपाय
महिलांमध्ये आढळणारे कॅन्सरचे प्रकार
महिलांनी नियमितपणे करण्याच्या तपासण्या
अनियमित मासिक पाळी साठी घरगुती उपाय
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा