प्रगल्भ पालकत्व …

एका व्यापारी आणि एका शिक्षकाने एक रोपटं आपआपल्या घरी आणलं. नवीन रोपट्याचं स्वागत दोन्ही घरात जंगी झालं. दोघेही आपआपल्या आयुष्यात मग्न झाले. इकडे शिक्षकाने नियमित आपल्या रोपट्याला पाणी घालणं सुरु ठेवलं पण त्यापलीकडे त्याने रोपट्याच्या वाढीकडे लक्ष दिलं नाही. तर तिकडे व्यापाराने आपल्या रोपट्याला खत, पाणी, औषध ह्याचा वापर सुरु केला. त्याला कोणतीही कीड लागू नये म्हणून रोज त्याची खातिरदारी त्याने सुरु ठेवली. काही महिन्यात व्यापाऱ्याच्या रोपट्याने जम धरला. रोपट्याला फुलं, फळ लागली. व्यापाऱ्याच्या घरी आनंदोत्सव सुरु झाला. तिकडे शिक्षकाचं रोपट वाढलं होतं पण अजूनही त्याला फुलं किंवा फळं लागली नव्हती. व्यापाराच्या रोपट्याच्या मानाने थोडं कमी बहरलेलं ही वाटत होतं. अश्यात एका संध्याकाळी वादळ आलं त्यात त्या व्यापाराने वाढवलेलं रोपटं पूर्णपणे कोसळल होतं तर शिक्षकाचं रोपटं मात्र तग धरून व्यवस्थित उभं होतं.

असं काय झालं की एकाचवेळी वाढवलेल्या रोपट्यांच आयुष्य मात्र वेगळं झालं. जेव्हा व्यापारी खत, औषधं वापरून फुलांसाठी आणि फळांसाठी रोपट्याला वाढवत होता तेव्हा शिक्षकाच रोपटं मात्र आपली मुळं मजबूत करत होतं. व्यापाऱ्याचं रोपटं बाहेरून खूप छान दिसत होतं पण आतून मात्र ते पोकळ राहिलं होतं. एक वादळ आणि रोपट्याला ते सहन करणं शक्य झालं नाही. ते त्यात उन्मळून गेलं कारण त्याची मुळं कधी जमिनीत रुजलीच नाहीत. शिक्षकाच रोपटं मात्र बाहेरून कृश वाटलं पण त्याची मुळं जमिनीत अशी रुजली होती की कोणत्याही वादळात ते तग धरू शकेल. असचं काहीसं आपल्या आजूबाजूला मुलांच्या बाबतीत घडत असते. अचानक बाहेरून सगळ छान असताना एका छोट्या अपयशाने मुलं खचून जातात आणि मग मानसिक आजार ते आत्महत्या, जीवनाचा शेवट त्यांना जास्ती जवळचा वाटतो. पण ह्यात दोष कोणाचा त्या रोपट्याचा का? त्याला वाढवणाऱ्या त्याच्या पालकांचा?

मी जेव्हा शिकलो तेव्हा साधनं मर्यादित होती. दिवाळी सारख्या सणालाच नवीन कपडे किंवा गोष्टी घरात येत असतं. आई – वडील दोघेही आज सांगितल्यावर उद्या कोणतीच गोष्ट आणून देत नसत. त्यांची ऐपत असली तरी सांगितल्यावर शब्द पडायच्या आधी गोष्टी कधी मिळत नसतं. अनेकदा ह्याचा राग येत असे. इतकी छोटी गोष्ट आणि आपला हट्ट हे का पूर्ण करू शकत नाहीत पण आज मागे वळून बघताना त्यांनी न दिल्याचं कौतुक जास्ती आहे कारण त्यांनी मला आपले पंख नाही दिले तर स्वतःच्या पंखांनी आयुष्यात विहार करायला शिकवलं. म्हणून आज आयुष्यात येणाऱ्या अनेक अपयशांना समोर जाण्याची धमक म्हणा अथवा मनाची तयारी आज पक्की आहे.

आज लाखोंची फी भरून आपल्या मुलांचे प्रत्येक दोन दिवसांनी प्रोजेक्ट करून त्याला / तिला प्रत्येक गोष्ट पुरवून मार्कांच्या स्पर्धेत कसं तरी घुसवून वाट्टेल त्या पद्धतीने त्यांच्या मार्कांच्या अंकावर स्वतःची पाठ थोपटून घेणारे पालक सगळीकडे झाले आहेत. शब्द खाली पडायच्या आगोदर वस्तू घरात आणून देऊन त्या नंतर त्यांना बिझनेस मॉडेल प्रमाणे अंकांच्या साच्यात बंद करायची घाई सगळ्याच पालकांना झालेली आहे. त्या व्यापाऱ्याने आपल्या रोपट्याला जसं खत, औषध ह्यांचा मारा केला जेणेकरून त्याला लवकर फुलं, फळ यावीत आज त्याच पद्धतीने आपण मुलांना अमेरिकेत जाण्यासाठी, करोडो रुपये कमवण्यासाठी तयार करत आहोत. पण ह्या सगळ्यात त्यांचे संस्कार, त्यांची मानसिक क्षमता आणि त्याचं व्यक्तिमत्व ह्यावर दुर्लक्ष होते आहे हे कळायला आपल्याला एखाद्या वादळाची वाट बघत बसावी लागत आहे. मार्कांच्या स्पर्धेत मुलांना जुंपल्यावर त्या यशाने कितीही आनंद झाला तरी त्याची मुळं मात्र आपण वाढू देत नाही आहोत. असंच एखादं वादळ जेव्हा ते रोपटं मुळापासून उखडून टाकते तेव्हा असं का झालं? ह्याची उत्तरं मिळाली तरी वेळ निघून गेलेली असते.

मुलांना हवं ते दिलं म्हणजे मुलं यशस्वी होतात असा सरळ अर्थ आजकाल पालक काढत आहेत. आमच्या वेळी आम्हाला हे मिळालं नाही म्हणून आज मुलांच्या जडणघडणी मध्ये कोणतीच कमतरता आम्ही ठेवत नाही हीच चूक आपल्या मुलाचं आयुष्य उध्वस्थ करू शकते हे आताच्या पिढीतील पालकांच्या लक्षात येत नाही. आपले पंख देऊन आपण त्यांची उडण्याची क्षमताच नकळत काढून टाकत आहोत. गरुडाचं पिल्लू पण कितीही मजबूत पंख असले तरी पहिल्यांदा उडताना पडतेच. पण त्या पडण्यामुळेच त्याच्या पंखाना बळ मिळत असते हे आपण कधी समजणार आहोत? आज तुम्ही, आम्ही जे काही आहोत त्या यशाचं रहस्य कदाचित अश्याच एखाद्या आयुष्याच्या ठेचे मधेच लपलेलं असते. मला आयुष्यात त्याकाळी हे नाही मिळालं तेव्हाच ठरवलं की एक दिवस मी हे बनून अथवा मिळवून दाखवणार हे वाक्य प्रत्येक यशस्वी माणसाच्या तोंडातून आपण अनकेदा ऐकतो. पण तीच ठेच लागण्याची संधी आपण आपल्या मुलांना देतो का? ह्याचा सुज्ञ पालकांनी एकदा विचार नक्कीच करावा.

मुलांच्या पाठीमागे भक्कम उभं राहणं ह्याचा अर्थ त्यांना आपले पंख देणं हा होतं नाही तर त्या पडलेल्या, ठेच लागलेल्या पिलाला पुन्हा उभारी देण्यासाठी त्याची सोबत करणं म्हणजे भक्कम उभं राहणं होय. आपलं घर आणि त्याचे पंख ह्याची जाणीव मुलांना करून दिल्यावर त्या पंखांनी कशी भरारी घ्यायची हे त्यांना ठरवायचं स्वातंत्र्य आपण त्यांना द्यायला हवं. त्यात ते पडतील, जखमी होतील, अनेक वादळे येतील, पण हे सगळंच त्यांची मुळं घट्ट करतील अनुभवांच्या शिदोरीने. मग एक वेळ अशी येईल की कोणतंही वादळ आणि कोणताही प्रसंग त्या पंखाच बळ कमी करू शकणार नाही. आपले पंख त्यांना देऊन मग आयुष्याच्या वादळात सगळं उध्वस्थ झाल्यावर असं का झालं ह्याची उत्तर शोधण्यापेक्षा त्यांच्या पंखाना अनुभवाचं बळ देणं हेच खरं प्रगल्भ पालकत्व आहे.

वाचण्यासारखे आणखी काही…

खगोल / अंतराळ
पालकत्व
प्रॉपर्टी/मालमत्ता खरेदी


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “प्रगल्भ पालकत्व …”

  1. अतिशय मनाला भावणारा व वास्तव लेख आहे,

    Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय